अहिल्यानगर (प्रतिनिधी)
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लागू केलेल्या लाडकी बहिण योजनेतील नगर जिल्ह्यातील १ लाख २६ हजार महिलांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण केली आहे. या पडताळणीत एकाच कुटूंबातील दोन लाभार्थी अशा १४ हजार तर वयाच्या अटी पूर्ण न करणाऱ्या दीड हजार असे १५ हजारांहून अधिक महिलांची नावे कमी करण्याचा अहवाल राज्य सरकारच्या महिला बालकल्याण विभागाला पाठवला असल्याची माहिती सुत्रांच्यावतीने देण्यात आली. यामुळे लाडकी बहिण योजनेतील अनुदानाचा पुढील हप्ता न येणाऱ्या महिलांचा या योजनेतून पत्ता कट झाल्याचे मानले जात आहे.
नगर जिल्ह्यात गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी लागू केलेल्या लाडक्या बहिण योजनेत ११ लाख २७ हजारांहून अधिक महिलांचा समावेश करण्यात आला होता. योजनेतील पात्र महिलांना महिन्यांला दीड हजार याप्रमाणे आर्थिक मदत देण्यात येती होती. दरम्यान, महिनाभरापूर्वी राज्य सरकारच्यावतीने एकाच कुटूंबील दोन लाभार्थी अशा १ लाख १९ हजार महिलांची तर वयाच्या अटीत न बसणाऱ्या ७ हजार महिलांची यादी महिला बालकल्याण विभागाला पाठवण्यात आली होती. या यादीतील महिलांची पडताळणी गाव पातळीवर अंगणवाडी सेविका आणि महिला कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने करण्यात आली. ही पडताळणी पूर्ण झाली असून यात १५ हजारांहून अधिक महिला अपात्र करण्यात आल्या असून १ लाख १० हजारांहून अधिक यादीतील महिला लाभार्थी यांना पात्र ठरवण्यात आल्याचे सुत्रांच्यावतीने सांगण्यात आले.
राज्य सरकारच्या महिला बालकल्यण विभागाच्यावतीने नगर जिल्ह्यातील १ लाख १९ हजार महिलांची यादी जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग आणि जिल्हा महिला बालकल्याण विभागाला पाठवली होती. या यादीनूसार प्रत्येक नावाची गाव पातळीवर खात्री करण्यात आली असून त्याचा अहवाल महिला बालकल्याण विभागाला पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अशी आहे जिल्ह्यातील स्थिती
नगर जिल्ह्यात एकाच कुटूंबातील दोन महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत असल्याची खात जमा केल्यानंतर १४ हजार नावे कमी करण्यात आली आहेत. तरे दीड हजारांच्या जवळपास महिलांचे वय १८ वर्षापेक्षा कमी अथवा ६५ वर्षापेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहेत. यामुळे ही नावे कमी करण्यात आली आहे. यामुळे सरकार पातळीवरून आलेल्या यादीतील १५ हजारांहून नावे कमी होणार असल्याचे महिला बालकल्याण विभागाच्या सुत्रांच्यावतीने सांगण्यात आले.
१७८ लाभार्थ्यांचा योजनेला नकार
लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यातून १२ लाख ४१ हजार ८७६ महिलांनी अर्ज केले होते. यातील ११ लाख २६ हजार ६५२ महिला योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. यातील १ लाख २६ हजार महिलांचे अर्ज शासनाने पडताळणीसाठी पाठवले होते. तर १७८ महिलांनी स्व इच्छेने योजनेचा लाभ नाकारला आहे.




