Monday, January 26, 2026
HomeनगरPadma Shri Award : संगमनेरचे तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री

Padma Shri Award : संगमनेरचे तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री

उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात येणार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. साहित्य, शिक्षण, समाजसेवा, वैद्यक, कला आणि सार्वजनिक क्षेत्रात योगदान देणार्‍या मान्यवरांना पद्म पुरस्काराने संम्मानित करण्यात येणार आहे. यात ब्रजलाल भट्ट, बुद्री थडी, भगवान दास रायकवार, रघुवीर खेडकर, धरमलाल चुन्नीलाल पंड्या, डॉ. श्याम सुंदर, चरण हेम्ब्रम आणि के. पझनीवेल या मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान होणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्काराने प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तमाशा संस्कृती टिकवण्यात आणि राज्याबाहेर तिचा प्रसार करण्याच रघुवीर खेडकर यांनी मोलाचे योगदान दिले आहे. रघुवीर खेडकर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत ज्येष्ठ, लोकप्रिय तमाशा कलाकार कलाकार आहेत.

YouTube video player

संगमनेरचे सुपुत्र असलेले खेडकर हे तमाशातील सोंगाड्या या भूमिकेसाठी प्रसिध्द आहेत. दरवर्षी महाराष्ट्रातील गावागावांमध्ये यात्रा भरते. या यात्रेत रघुवीर खेडकर तमाशा सादर करतात. त्यांच्या कलेने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य केले आहे. त्यांना याआधीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. तमाशा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ‘तमाशा महर्षी’ म्हणून ओळखले जाते.

आईकडून मिळाला लोककलेचा वारसा
रघुवीर खेडकर यांना तमाशाची कला ही वारशात मिळालेली आहे. त्यांच्या मातोश्री कांताबाई सातारकर या एक महान तमाशा कलावंत होत्या. बालपणापासूनच त्यांच्या मनात तमाशाविषयी प्रेम निर्माण झाले. त्यांनी आईचा वारसा पुढे सुरू ठेवत पारंपरिक लोकनाट्य तमाशाची परंपरा जपली आहे. गेली अनेक वर्षे ते तमाशा मंडळाचे नेतृत्व करत आहेत. कलाक्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ आणि पठ्ठे बापूराव पुरस्कार यांसारखे महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय सन्मान मिळाले आहेत. आई कातांबाई सातारकर यांनी स्वबळावर सुरू केलेल्या तमाशा ते आजतागायत यशस्वीपणे सांभाळत आहे. तसेच ते महाराष्ट्र राज्य ढोलकी फड तमाशा संघटनेचे अध्यक्षही आहेत. तमाशा फड मालक आणि कलाकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे.

करोना काळात तमाशा कलावंतांवर खराब दिवस आले होते. अनेक गावांमधील यात्रा रद्द झाल्याने तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी रघुवीर खेडकर खेडकर यांनी तमाशा कलावंतांच्या मदतीसाठी सरकारकडे मागणी केली होती. त्यांना अनेक तमाशा कलावंतांचा पाठिंबाही लाभलेला होता. करोना संपल्यानंतर तमाशा पुन्हा सुरू झाले आहेत. रघुवीर खेडकर गण, गवळण, बतावणी आणि वगनाट्य अशी पारंपारिक कला सादर करून गावाखेड्यातील लोकांचे मनोरंजन करताना पहायला मिळत आहे. त्यांच्या या कलेची दखल घेत आता त्यांना पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

रसिकांची सेवा केली, त्याची पोचपावती मिळाली
पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच रघुवीर खेडकर यांनी आनंद व्यक्त केला. माझ्या सात पिढ्यांचा उद्धार झालाय. लोकांसाठी, समाजासाठी जे झटलो, त्याची पोचपावती मिळाल्याचा मला आनंद आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच माझा आनंद गगनात मावत नव्हता. तमाशा लोककलेला हा पहिलाच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मला मिळतोय, हे माझं भाग्य आहे. रसिकांची मी सेवा केली, याची पोचपावती मला मिळाली, याचा मला आनंद आहे, असं खेडकर म्हणाले.

महाराष्ट्राला लोककलांची मोठी परंपरा असून स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध वारसा घेऊन लोककलावंत रघुवीर खेडकर यांनी आयुष्यभर समर्पित भावनेने तमाशाच्या माध्यमातून सेवा केली आहे. तमाशा कलावंतांच्या व लोककलावंतांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. याचबरोबर एक माणूस म्हणून कायम सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी योगदान दिले आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हा संगमनेर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यासाठी गौरवास्पद आहे.
– बाळासाहेब थोरात (माजी मंत्री, संगमनेर)

तमाशासम्राट रघुवीर खेडकर व त्यांच्या मातोश्री स्व. कांताबाई सातारकर यांनी तमाशा लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संगमनेरचे भूषण रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याने संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून मला व सर्व संगमनेरकरांना अत्यंत आनंद होत आहे. लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सर्व संगमनेरकरांच्यावतीने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
– अमोल खताळ (आमदार, संगमनेर)

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सुधारित कर आकारणीमुळे ग्रामपंचायती होणार मालामाल!

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar जिल्हा परिषद प्रशासन आणि विशेष करून ग्रामपंचायत विभागाने नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे गेल्या...