नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
त्र्यंबकेश्वर आणि आजूबाजूचा परिसर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीचा सामना करीत आहे. अलीकडेच आलेल्या ढगफुटीच्या ‘हाय अलर्ट’नंतर प्रशासकीय पातळीवर कमालीची धावपळ उडाली. राज्याचे कुंभमेळा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने प्रत्यक्ष मैदानावर उतरून मेटघर किल्ला ग्रामपंचायतअंतर्गत येणार्या सुपलीची मेट आणि गंगाद्वार मेट या वस्त्यांना भेट दिली. तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले.
मात्र, या आवाहनाला स्थानिक ग्रामस्थांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. याचे कारण म्हणजे, केवळ माणसांना सुरक्षित स्थळी हलवून प्रश्न सुटत नाही; गोठ्यात बांधलेली शेळ्या-मेंढ्या, गाय-बैल यांसारखी पाळीव जनावरे आणि वर्षानुवर्षांची घरगुती संपत्ती मागे सोडून जाणे या कष्टकरी लोकांसाठी अशयप्राय गोष्ट आहे. अगदी घरातील पाळीव कुत्री-मांजरं सोडून जाण्यासही येथील लोक तयार नाहीत. मुळात, केवळ धोयाच्या वेळी अशी धावपळ करण्यापेक्षा, ही जीवघेणी परिस्थिती का निर्माण झाली, याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे.
माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती होईल अशी भीती दाखवत प्रशासनाकडून हा सर्व प्रपंच सुरू असल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने ढगफुटी झाली नाही, तरीही येथील मेट वस्त्यांवर कोसळणारे संकट काही टळलेले नाही. याचे मुख्य कारण ढगफुटी हे नसून, या भागात भूमाफियांनी सातत्याने सुरू ठेवलेले डोंगरांचे बेकायदेशीर उत्खनन हे आहे. जमिनीची दलाली करणारे आणि जमीन विकसित करण्याच्या नावाखाली निसर्गाची तोडफोड करणारे घटक आज सर्वच राजकीय पक्षांच्या आडोशाला बसले आहेत. केवळ एवढेच नाही तर हे भूमाफिया सत्तारूढ मंडळींच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि त्याच जवळकीचा फायदा नंतर अधिकार्यांकडून कामे करवून घेताना करतात.
हे असे राजकीय अभय आणि प्रशासनाचा कानाडोळा यामुळे या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर विध्वंस सुरू आहे. हा विध्वंस महाजनांना माहिती नाही असे नाही. परंतु सत्तेच्या हव्यासापोटी त्याकडे डोळेझाक केली जाते. हाच विध्वंस उद्या त्र्यंबकेश्वर परिसराचे ‘माळीण’ करण्यास पुरेसा ठरू शकतो. धक्कादायक बाब म्हणजे, असे निसर्गाचे मारेकरी अनेकदा लोकप्रतिनिधींच्या आजूबाजूला फिरत असतात; त्यांना वेळीच लगाम लावला, तर आपत्तीच्या वेळी अशी धावपळ करण्याची वेळच येणार नाही. सन २०२१ मध्ये ब्रह्मगिरीच्या पायाला सुरुंग लावण्यात आले आणि गंगाद्वारच्या मागच्या बाजूला मोठे उत्खनन झाले होते. तेव्हापासूनच सुपलीची मेट आणि गंगाद्वारची मेट या दोन्ही वस्त्या धोयात आल्या आहेत. त्यावेळी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने, विशेषतः तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात थेट लक्ष घालून संबंधित प्रशासकीय अधिकार्यांना धारेवर धरले होते आणि तो विध्वंस तात्पुरता थांबवला होता.
मात्र, त्यानंतर अवघ्या दीड-दोन वर्षांत पुन्हा एकदा ब्रह्मगिरी, अंजनेरी आणि आजूबाजूच्या पर्वतरांगांच्या पोटात बेसुमार खोदकाम सुरू झाले आहे. टेकड्यांचे सपाटीकरण अत्यंत वेगाने होत आहे. जर सन्माननीय गिरीश महाजन यांनी या मूळ समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे खोदकाम कायमचे थांबवले, तर भविष्यातील मोठी दुर्घटना टाळता येईल. नुकत्याच झालेल्या पावसामुळे त्र्यंबकनगरीत एकाच दिवसात तीन वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पुराला निसर्गासोबतच काही मानवनिर्मित कारणेही कारणीभूत आहेत. गिरीश महाजन यांच्या महत्त्वाकांक्षी ‘सिंहस्थ उपसा योजने’अंतर्गत, बेझे धरणातून पाणी आणून गोदावरी नदी बारमाही प्रवाही ठेवण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी करण्यात आलेल्या चारीच्या खोदकामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले, हे नाकारता येणार नाही.
यामुळे तेथील नऊ कुटुंबांना घरे रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, नीलपर्वत टेकडीच्या उत्तर बाजूला असलेल्या देवस्थान ट्रस्टच्या जागेवर जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी आणि तेथे जाणार्या रस्त्यासाठी डोंगराचे प्रचंड प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. परिणामी, बुधवारच्या मुसळधार पावसात या जलशुद्धीकरण प्रकल्पाची संरक्षक भिंत कोसळली आणि भूस्खलन होऊन माती-दगडांचा मोठा ढिगारा ढासळला. सुदैवाने तो बिल्वतीर्थाच्या बाजूला खोदलेल्या चारीत अडकल्याने थेट बिल्वतीर्थ तलाव आणि बाजूच्या वस्त्यांवर कोसळला नाही; अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. त्र्यंबकेश्वर हे केवळ एक धार्मिक क्षेत्र नसून ते एक संवेदनशील पर्यावरणाचे केंद्र आहे. पूर आणि भूस्खलनासारख्या आपत्ती उद्भवल्यानंतर नागरिकांना घरे सोडण्याच्या नोटिसा देणे किंवा तात्पुरती मदत करणे हा यावर कायमस्वरुपी उपाय नाही.
जर सन्माननीय मंत्रिमहोदयांना भविष्यातील मोठी जीवित व वित्तहानी टाळायची असेल, तर त्यांनी डोंगर, पर्वत आणि टेकड्यांवरील अवैध उत्खननाला पूर्णपणे पायबंद घातला पाहिजे. तथाकथित जमीन विकासक (लँड डेव्हलपर्स) जे नदी-नाले बुजवत आहेत, डोंगराच्या कपारीला बेकायदेशीर प्लॉटिंग करत आहेत, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना लगाम घालणे आवश्यक आहे. तरच निसर्गाचा समतोल राखला जाईल आणि त्र्यंबकेश्वरवर वारंवार ओढवणारा हा बाका प्रसंग आणि गंभीर परिस्थिती कायमची थांबवता येईल.




