Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : भाजप-शिवसेना संघर्षातील चांदवड पॅटर्न

पडसाद : भाजप-शिवसेना संघर्षातील चांदवड पॅटर्न

नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. ‘देशदूत’ – संपादक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Local Body Election) भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी भरीव कामगिरी केली. राज्यात ही युती काही ठिकाणी एकत्र तर अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढली. पण निवडणुकीनंतर मात्र महायुतीने कशी सर्वदूर बाजी मारली ही बढाई मारण्यास मात्र त्यांनी अजिबात कसूर केली नाही. विरोधात लढूनही आम्हीच जिंकलो, असे म्हणणे राजकीयदृष्ट्या सोयीचे असले तरी आता प्रत्यक्ष संसार करताना भांड्याला भांडे लागायला सुरुवात झाली. देशाचे नाक व आर्थिक राजधानी समजली जाणाऱ्या मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेने विजय मिळविल्यानंतरही दोन्ही पक्षांमधील एकमेकांना जोखण्याचे प्रकार आतापावेतो सुरूच होते. मुंबईचा तिढा सुटत नव्हता तोपर्यंत राज्यातील इतर पालिकांमध्येही गुंता कायम होता. नाशिकमध्ये तर आम्ही स्वबळावर लढ्न बहुमत मिळविलेले असल्याने आम्हाला कुबड्यांची गरज नसल्याचे सांगून गिरीश महाजन यांनी शिवसेनेला डिवचले. परिणामी, लाभाची किमान दोन-तीन पदे तरी मिळतील या आशेवर शिवसेनेला तूर्तास पाणी सोडावे लागलेले दिसते. त्यावरून बरीच आदळआपट सुरू आहे.

- Advertisement -

शिवसेनेने उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल रून सूचक इशाराही दिला आहे. यामुळे होणार काहीच नाही किंवा वरिष्ठांकडून जमवून घेण्याचा आदेश आला तर उपमहापौरपदावर भागवावे लागू शकते. काय होईल ते येत्या दोन-चार दिवसात स्पष्ट होईलच; पण चांदवड नगरपरिषदेत तर महायुतीचा झगडा पार तुटेपर्यंत ताणला गेला आहे. नगरपरिषदांमध्येही उपरोल्लेखित संघर्ष झाले. नंतर ते मार्गीही लागले. मनमाडला भाजपला बरोबर घेताना त्यांना केवळ एक जागा मिळूनही शिवसेनेने त्यांना पद तर दिलेच; शिवाय स्वीकृत सदस्याचा आनंदही दिला. आमदार सुहास कांदेंची ती कदाचित भविष्यातील गुंतवणूक असू शकेल. परंतु असे बेरजेचे राजकारण करूनच त्यांनी मतदार संघावर आपली पकड घट्ट केल्याचे दिसते. नजीकच्या चांदवडमध्ये मात्र भाजप व शिवसेनेत सुरुवातीपासूनच खडाखडी होती. प्रारंभी स्वबळ आजमावण्याची भाषा करणाऱ्या भाजपने नंतर शिवसेनेशी जुळवून घेताना त्यांना चार जागा तसेच उपनगराध्यक्ष व स्वीकृत पद देण्याचा शब्द दिला असल्याचे आता सांगितले जाते. विजयी झालेल्या

YouTube video player

पाच अपक्षांपैकी दोन जणांना गळाला लावत शिवसेनेने आघाडी केली. पण भाजपने उर्वरित तीन अपक्षांसह उबाठाचा एक अशांची मोट बांधून स्वतंत्र गट स्थापन केला. तत्पूर्वीच्या हालचाली आमदार राहुल आहेर यांना पसंत नसल्याची चर्चा सुरू झाली. पुढील राजकीय घडामोडींमध्ये भाजपने पद्धतशीरपणे शिवसेनेला बाजूला ठेवले. हा तणाव या आठवड्यात आणखी वाढून आता युती तुटेपर्यंत ताणलीगेल्याचे दिसले. विषय समित्या निवडीत भाजपने शिवसेनेला ठेंगा दाखविल्यानंतर शिवसेनेने सभेवर बहिष्कार टाकला. तत्पूर्वी उपनगराध्यक्षपदाच्या निवडीवेळी देखील शिवसेनेने आपला आग्रह मागे घेत भाजपला समर्थन दिले होते. सभेतील विकासकामांच्या सर्वच प्रस्तावांना मंजुरी देत सहकार्याची भूमिकाही घेतली होती.असे असताना एका समितीचे सभापतिपद देण्यासही भाजपने शिवसेनेला नकार दिला. भाजपच्या या हडेलहप्पी वर्तनाने शिवसेनेच्या स्थानिक नेते कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात येत असून युती तोडण्याची भाषा त्यांनी सुरू केली आहे. भाजपने मात्र शिवसेनेची शहरातील ताकद पाहनच ही रणनीती आखली असल्याचे दिसते, त्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेला असा कोणताच शब्द दिला गेला नव्हता. भाजपने अकरा जागांवर विजय मिळविल्याने पक्षाच्या सर्व सदस्यांचे समाधान करणे ही आमची जबाबदारी आहे. शहरातील भाजपचा प्रभाव, ताकद व अस्तित्व हे शिवसेनाही नाकारू शकणार नाही. त्यामुळे त्यांची विद्यमान भूमिका ही कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आहे. भाजपला यामुळे तसाही काहीच फरक पडत नाही. बहमत असल्याने हा कठोर पण न्याय्य निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते. आमदार डॉ. राहुल आहेर यांना शहराच्या स्थानिक राजकारणात गुंतायचे नसले तरी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या

निवडणुकीच्या दृष्टीने त्यांना शिवसेनेला दुखवायचे नसावे असे दिसते. त्यामुळेच यापुढील परिषदेच्या राजकारणात कदाचित ते अधिक लक्ष घालतील, असे दिसते. भाजप व शिवसेना यांच्यात त्र्यंबकेश्वर, भगूर, येवला, सिन्नर, इगतपुरी, सटाणा आदी काही पालिकांमध्येही तणाव आहेत. भगूरमध्ये तर शिवसेनेची पंचवीस वर्षांची सत्ता उलथविण्याच्या कार्यात भाजपने इतर सर्वच पक्षांची मदत घेतली होती. इगतपुरी, सटाणा व त्र्यंबकेश्वरमध्येही भाजपला धडा शिकविण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली होती. महायुतीतील या दोन प्रमुख पक्षांनी जिल्ह्यात एकमेकांविरोधात लढून विरोधकांना भुईसपाट केले खरे; पण आता अनेक ठिकाणी या दोन पक्षांमध्येच सुरू झालेला सत्तेचा संघर्ष भविष्यात काय वळण घेतो, हे बघावे लागेल. आमदार राहल आहेर यांनी लक्ष घालून चांदवडमधील भाजप व शिवसेनेतील भांडणावर तोडगा काढला तर कदाचितः लागलेल्या वर्चस्वाच्या आगीचे वणव्यात रूपांतर होणार नाही. अर्थात, आभाळच फाटले तर ठिगळ कुठे कुठे लावणार, या उक्तीनुसार इतर पालिकांमधील ताणेबाणेही त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार स्थानिक नेत्यांनी मिटविले तरच या युतीतील महा हा शब्द सार्थ ठरू शकेल.

ताज्या बातम्या

Nashik Crime : किन्नरांच्या गटांत संघर्ष! दुफळी माजली; वसुली, वर्चस्व आणि...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहर व जिल्ह्यातील तृतीयपंथीय समुदायाचे (Transgender Community) 'गटतट निर्माण झाले असून 'वसूली' सह वर्चस्व वादातून त्यांच्यातील संघर्ष पेटत चालला आहे....