नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. ‘देशदूत’ – संपादक
साऱ्या जगाला हेवा वाटेल असे सिंहस्थमेळ्याचे आयोजन करू असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनीच नाशिक मुक्कामी सिंहस्थ तयारीच्या आढाव्यानंतर बोलतांना दिला होता. तेव्हा कामांना उशीर होत असल्याबद्दल माध्यमकर्मीनी प्रश्न विचारले तर त्याला उत्तर देतांना मैं हूं ना, थाटात त्यांनी सगळं काही ठीक होईल, असा दिलासा दिला होता. पुढे खरोखरच सिंहस्थाची कामे मार्गी लागल्याचे नाशिककर (Nashik) अनुभवत आहेतच. परंतु एकाचवेळी शहरातील जवळपास सर्वच मोठ्या रस्त्यांची कामे सुरु होत असल्याने नाशिककरांचा जीव कासावीस झाला आहे.
खरे तर प्रशासनाने सुरु होणारी कामे, दैनंदिन वापरासाठीचे पर्यायी रस्ते, थांबे, अवजड वाहतुकीची व्यवस्था, ट्रॅव्हल्सच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था याचे नियोजन करुन तशी अधिसूचना काढली होती. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी पूर्णांशाने सुरु झालेली नसतांनाच झालेला गोंधळ नवीच डोकेदुखी ठरली आहे. द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून ग्रेड सेपरेटरचा प्रयोग करण्याचे योजिले आहे. हे ग्रेड सेपरेटर म्हणजे काय व त्याने नेमके काय होणार याचा काहीही अंदाजयेत नसल्याने गोधळाची स्थिती आहे. नियोजनाअभावी आजच द्वारका चौक हा विकासाचा सेतू नव्हे तर प्रशासकीय धोरण लकव्याचे केंद्र ठरु पहात आहे.
जनतेला अंधारात ठेवून होत असलेल्या या निर्णयात विविध खात्यांचा समन्वय असणे अपेक्षित होते. सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक, पर्यायी मार्गाचे पूर्व परीक्षण, बसथांब्यांचे नियोजन, नागरिकांना वेळेत माहिती, शाळा-कॉलेजच्या वेळेनुसार बदल विचारात घेणे गरजेचे होते. हे सगळे झाले असते, तर आजची कोंडी आणि जनसामान्यांचा रोष टाळता आला असता. पालिका व शहर वाहतूक पोलिसांनी (Police) एकमेकांबर जबाबदारी ढकलण्याऐवजी समन्वय, संवाद आणि संवेदनशीलता दाखवली नाही, तर नाशिककरांच्या मनात सिंहस्थाच्या विकासकामांबद्दलच घृणा निर्माण करेल.
महानगराचे नाक समजला जाणारा द्वारका चौक हा प्रमुख व उप अशा तब्बल सोळा रस्त्यांचे केंद्र आहे. आजपर्यंत अनेकांनी अगदी वाहतूक तज्ज्ञ म्हणून ज्यांचा देशभर नावलौकिक आहे अशा परमजित सिंग पसरीचा यांनीही येथीलकोंडीवर उपाय सुचवून शेवटी हात टेकले. दरवर्षी या संदर्भात नवनवे निर्णय घेतले जातात. नंतर कळते की अरे आधीचीच स्थिती बरी होती. आता देखील तसे काही होऊ नये म्हणजे मिळविली. या कामांमुळे जे पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत तेथे अचानक बाहनांची गर्दी, कॉडी व अपघातांची भीती वाढली आहे.
ऑफिसला जाणारे कर्मचारी, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवा, या सगळ्यांसाठीकोणतीही ठोस व्यवस्था न करता केवळ “पाहूया काय होते” या मानसिकतेने वाहतूक वळवणे ही प्रशासनाची बेफिकिरी आहे. एसटी, सिटी लिंक आणि खासगी बसेससाठी मार्ग व बसथांबे बदलण्यात आले. पण या मार्गांची वहनक्षमता तपासली आहे का, अपघातप्रवण ठिकाणी अतिरिक्त सुरक्षेची व्यवस्था आहे का? प्रवाशांना स्पष्ट माहिती देण्यात आली आहे का? आजही अनेक प्रवासी चुकीच्या बसथांब्यावर उभे राहतात, चालकांशी बाद होतात, वेळ व इंधन वाया जाते. ही गोंधळाची स्थिती समन्वयाच्या अभावाचे जिवंत उदाहरण आहे.ग्रेड-सेप्रेटर हा महापालिकेचा प्रकल्प आहे.
पायाभूत सुविधा, ठेकेदार, साहित्य, रॅम्प, भराव या सगळ्या बाबी महापालिकेच्या अखत्यारित येतात. मग आवश्यक तयारी पूर्ण होण्याआधी वाहतूक बदल का केला गेला. ठेकेदाराला ‘क्लिअरन्स’ मिळण्याआधी अधिसूचना कशी निघाली, याचे उत्तर मिळत नाही. दोषाचे धनी मात्र वाहतूक पोलीस होतात. सध्या शहरात सात विशेष वाहतूक पथके कार्यरत आहेत. दंडात्मक कारवाईऐवजी थेट गुन्हे नोंदविण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दहा दिवसांत अडीचशेहून अधिक गुन्हे नोंदले गेले. दिवसाकाठी ३० ते ५० चालकांवर कारवाई होते. बाहतूक पोलिसांसोबत हुज्जत वाढू नये म्हणून १५० ‘बॉडी वॉर्न कॅमेरे’ खरेदी करण्याचा निर्णयही घेतला. हा निर्णय परिस्थिती हाताळण्यासाठी आहे. मूळ समस्या सोडवण्यासाठी नाही, हेच त्यातून स्पष्ट होत असल्याने आजही या समस्येला निर्णायक उत्तर प्रशासनाला सापडलेले नाही याचीच कबुली मिळते.
ग्रेड सेपरेटरचा निर्णय झाला तेव्हाच संबंधीत मार्गांचे पूर्व-परीक्षण, बसथांब्यांचे नियोजन, नागरिकांना वेळेत माहिती, शाळा-कॉलेजच्या वेळेनुसार बदल हे सगळे झाले असते, तर आजची कोंडी, खोळंबा आणि रोष टाळता आला असता. बाहेरगावी जाणाऱ्या काही बस आता निमाणी थांब्यावरुन जाणार आहेत. पहिल्याच दिवशी प्रवाशांना कमालीचा त्रास झाला, त्र्यंबकेश्वर रस्त्याचे कामही असेच ऐन संत निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवातच सुरु केले गेले. त्याच्या कटू आठवणी ताज्या असतांनाच आता संपूर्ण शहरालाही वेठीस धरले गेले आहे. शहर बससेवा, ट्रॅव्हल्सच्या बसेस व त्यांच्या प्रवाशांबाबतही अशीच अनास्था आहे. प्रत्यक्ष काम सुरु होईल, तेव्हा संपूर्ण शहरातच अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली असेल, तेव्हा ती हाताळण्यासाठी सक्षम व संवेदनशील यंत्रणा नसेल तर अनवस्था प्रसंग निर्माण होऊ शकेल. सबब प्रशासनाने अधिक सजग, सक्षम राहण्याची गरज आहे.





