बी.डी. भालेकर हायस्कूल इमारतीच्या पाडकामाचा निर्णय लोकआंदोलनामुळे कदाचित रद्द केला जाईल. नजीकच्या काळात पालिका निवडणुका असल्यामुळे हा विषय त्रासदायक तर ठरणार नाही ना, याचा विचार सत्तारूढ महायुती करू शकेल. शिवाय अनेक इच्छुकांना तर आयताच विषय मिळाला म्हणून त्यांना तो तापता ठेवण्यातही रस असेल. काहीही झाले तरी वेगळ्या कारणांनी ओळखली जाणारी ही शाळा व तिची इमारत आता किमान लोकांच्या स्मरणात तरी तिच्या मूळ कर्तृत्वासाठी राहील, असे समजूया. कालच्या भागात आपण भालेकर व पीरजादे यांच्या दातृत्वाविषयी समजून घेतले. पण हा इतिहास केवळ तेवढाच नाही. त्या काळी शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे पालिकेने शाळा सुरू करून गोरगरीबांना हात द्यावा असा विचार सुरू झाला.
जुन्या नाशिकमध्ये ही माध्यमिक शाळा १९६८ साली सुरू झाली तेव्हा तिला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यापासून हुरुप आलेल्या तत्कालिन नगरसेवकांनी शाळा नव्या चांगल्या जागी स्थलांतरीत करण्याची गरज ओळखली. तेव्हा नाशिक नगरपालिकेच्या शिक्षण समिती सभापतीपदी श्रीमती सुशीला वीरकर होत्या. त्यांनी अशा प्रकारच्या शाळेची संकल्पना मांडली. तत्कालिन नगराध्यक्ष पंडितराव खैरे, तसेच उत्तमराव ढिकले यांनी आपापल्या पदाच्या काळात त्यासाठी झटून या शाळेचा श्रीगणेशा केला. आज या दोघांपैकी खैरेंचे वारस ही शाळा वाचविण्यासाठी धडपड करताना दिसतात; पण ढिकलेंचे वारस आमदार असतानाही त्यांचे मात्र दुर्लक्ष आहे. कदाचित हा इतिहास त्यांनाही ठाऊक नसावा. ही केवळ शाळा किंवा दगडमातीची इमारत नव्हती. त्या काळात शाळेत हजारावर विद्यार्थी असत.
थेट विल्होळी, पाथर्डी अशा दूरवरच्या भागातूनही विद्यार्थी येत. विशेषत: निम्न आर्थिक स्तर तसेच गोरगरीब परिवारातील विद्यार्थ्यांची ही शाळा पसंतीची होती. कारण ती शासकीय होती आणि शुल्क नव्हते. शाळेने दोन आमदार या शहराला दिले. माजी विधान परिषद सदस्य नानासाहेब बोरस्ते यांनी याच शाळेत दहा वर्षांहून अधिक काळ अध्यापन केले. देवळाली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले भिकचंद दोंदे हे याच शाळेचे विद्यार्थी. याशिवाय सुरेश दलोड, बाळासाहेब तिगोटे, संजय साबळे आदी नगरसेवकही याच शाळेत शिकले. या शाळेचे दहा वर्षांहून अधिक काळ मुख्याध्यापक राहिलेले दिवाकर जोशी यांनी तर ही केवळ शाळा नव्हती तर सर्वगुणसंपन्न अशा विद्यार्थ्यांचा आधारवड असल्याचे सांगितले. शाळेचे अनेक विद्यार्थी कबड्डीत राज्य स्तरावर खेळून आलेले होते. लेझिम, टिपरी आणि भांगडा पथके ही शाळेची त्या काळी खास ओळख होती. दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अग्रभागी भालेकर हायस्कूलचीच ही तीन पथके असत.
नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणार्या कला ते सादर करीत. ही शाळा शासनाच्या शंभर टक्के अनुदानावर चालत असल्याने पालिकेला तिची काहीही तोशीस नव्हती. बिल्डींग भाडे देखील शासनाकडून येई. सुरुवातीला हजारभर विद्यार्थी असलेली आणि गोरगरीबांचा शिक्षण आधार असणारी ही शाळा नाशिक जसजसे विस्तारू लागले तसतशी आक्रसू लागली. उपनगरे वाढली तशा त्या त्या ठिकाणी विविध संस्थांच्या शाळा सुरू झाल्या. इंग्रजीचे फॅड आले. सामान्यांंनाही त्याचे आकर्षण वाढले. उपनगरांमधील जवळच्या शाळांमुळे दूरवरील विद्यार्थ्यांना सोय झाली. त्यामुळे त्यांनीही ती सोय पाहिली. असे करता करता विद्यार्थी संख्येचा पट खालावू लागला. महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत ही एकमेव माध्यमिक शाळा होती आणि ती देखील शंभर टक्के अनुदानित. असे असूनही तत्कालिन प्रशासनातील अधिकार्यांनी शाळेकडे दुर्लक्ष सुरू केले.
विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले नाही. शिक्षकवर्गही काही प्रमाणात बनचुका निघाला. कोणालाच काही घेणेदेणे नसल्यासारखे झाले. अनुदान असल्यामुळे शिक्षकांना पगारपाण्याचा घोर नव्हता. अधिकार्यांना शाळा राहिली काय अन् बंद पडली काय, त्यांच्या जीवनावर काहीच फरक पडणार नव्हता. तत्कालिन समाजसेवक, लोकप्रतिनिधी यांचीही जाण भविष्यवेधी नसावी. साहजिकच, सर्वच बाजूंनी कोंडी होत गेली. वास्तविक आजही झोपडपट्ट्यांची संख्या कितीतरी पटीने वाढली आहे. गोरगरीबांना शिक्षण परवडेनासे झाले आहे. महागड्या शिक्षणाने अनेकांचे शिक्षण अर्धवटच राहू लागले आहे. अशा सर्वच वंचित व शोषित वर्गासाठी अशा शासकीय शाळांचा मोठाच आधार आजही आहे. दुर्दैवाने त्याअर्थाने कोणीच याकडे पाहिले नाही. मुळात ही काही समस्या आहे हेच कोणाला जाणवले नाही, हे अधिक चिंतनीय आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी जीवाचे रान करणारी मंडळी आपल्याच समुदायासाठी असलेल्या सोयीसुविधा कटाक्षाने दर्जेदार राहतील व त्या चालतील याकडे कधी लक्ष देत नाही.
भविष्यवेधी दृष्टीकोनाचा अभाव सगळीकडेच आहे, हे खरे असले तरी गेली चाळीस एक वर्षे किमान दोन-तीन पिढ्यांचे शैक्षणिक भरणपोषण केलेल्या वास्तूला असे बाराच्या भावात काढावे हे केवळ दु:खद आहे. ही इमारत पाडून म्हणे तेथे शेक़डो कोटींचा दौलतजादा करत पालिका विश्रांतीगृह बांधणार आहे. पालिकेच्या फाळके स्मारकातील अशाच विश्रांतीस्थानांची अवस्था एकदा सर्वांनी मिळून पहावी आणि नंतरच या पंचतारांकित वास्तूचा विचार करावा. शाळा सुरू कशी राहील याबाबत काडीचाही विचार न करता तेथे केवळ अधिकारी वा पुढार्यांच्या शयनव्यवस्थेची काळजी घेतली जाणार असेल तर असली लोककल्याणकारी शासनप्रणाली संबिंधतांना लखलाभ. तसाही आपल्याकडे जतन, संवर्धन यांचा सार्वजनिक तिटकारा आहेच. अशा वातावरणात भालेकर शाळा व तिच्या इमारतीचे श्राद्ध घातले जाणे ओघाने आलेच. कालाय तस्मै नम:




