लांच्छनास्पद! जन्मदात्यांनीच लेकीला ढकलले वेश्या व्यवसायात; आई-वडिलांना अटक
नाशिक | प्रतिनिधी
अंबड येथील वावरे नगर परिसरात अल्पवयीन मुलीस वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडून पैसे कमवणार्या आई-वडलांना अवैध धंदे विरोधी पथकाने जेरबंद केले. त्यांच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यासह पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वावरे नगर येथे एका अल्पवयीन मुलीची सावत्र आई व वडिलांनी व्यवसाय करून घेत असल्याची तक्रार पोलीस आयुक्तालयास मिळाली. आयुक्तांच्या आदेशाने अवैध व्यवसाय विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिरसाठ, पोलीस नाईक सारंग वाघ, पोलीस शिपाई गजानन पवार, सूरज गवळी आणि संतोष वाघ यांच्या पथकाने सोमवारी (दि.23) सापळा रचला.
या दाम्पत्याकडे तोतया गिर्हाइक पाठवून तक्रारीची शहानिशा केली. दाम्पत्य अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करण्यास जबरदस्ती करत असल्याचे यात आढळून आल्याने पथकाने धाड टाकत पीडितेच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यासह पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने परजिल्ह्यात सातवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
चालक असलेल्या पित्यासह ती नाशिकला राहण्यास आली, मात्र तिच्या सावत्र आईने व पित्याने पीडितेला वेश्या व्यवसायात ढकलले. तीच्या वरील अत्याचार पाहुन जागृक नागरीकाने पोलीस आयुक्तालयास ही माहिती दिली. यानंतर ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याकडे 16 मोबाइल, सीडी, दुचाकी, 13 हजार 950 रुपये रोख व इतर साहित्य असा 92 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
जेलरोडला सहा जुगारी जेरबंद; अवैध धंदे विशेष पथकाची धाड
नाशिक | प्रतिनिधी
मोकळ्या जागेत जुगार खेळणार्या व खेळवणार्या 6 जुगार्यांना मंगळवारी (दि. २४) दुपारी अवैध धंदे विरोधी विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. जेलरोड शिवारातील पाण्याच्या टाकी जवळील मच्छी मार्केटजवळ ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी जागा मालक विलास पवार (रा. जेलरोड) याच्यासह इतर पाच जणांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड परिसरात मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती अवैध धंदे कारवाई पथकास मिळाली.
त्यानुसार पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांनी मंगळवारी दुपारी ही कारवाई केली. त्यात संशयित सुरेश देवराम कुवर (61, जेलरोड), देविदास राधाकिसन पगारे (34, दोघे रा. जेलरोड) हे जुगार्यांकडून मटका खेळवून घेत असल्याचे आढळले.
यात पोलिसांनी इतर तीन जुगार्यांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून 1 लाख 12 हजार 624 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगार्यांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘शेपिंग फ्यूचर मोबिलिटी’मध्ये नाशिकचे विद्यार्थी चमकले
नाशिक | प्रतिनिधी
व्हेक टेक रंगराजन येथे सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनियर्स (एसएई इंडिया) च्या दक्षिण विभागाने आपले बारावे एडब्ल्यूआयएम राष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत नाशिक येथील सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालयाच्या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. येथील विद्यार्थ्यांनी जेट टॉयवर आधारित प्रकल्प सादर केला होता.
नुकतीच चेन्नईतील सगुंतला आर अँड डी इंस्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये दोन वर्षाच्या राष्ट्रीय कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाची यंदाची थीम ‘शेपिंग फ्यूचर मोबिलिटी’ अशी होती.
नाशिकच्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कामगिरी करत अनोखी खेळणी तयार करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्किमर, जेट टॉय, स्ट्रॉ रॉकेट आणि यासारख्या खेळणी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना कच्चा माल असलेली किट देण्यात आली होती.
एसएई इंटरनॅशनलने हा अभ्यासक्रम घेतला होता. तसेच हि संस्था देशभरातील शाळांमध्ये हा उपक्रम राबवित आहे. मॉडेल वाहने तयार करून डिझाइन करून अभियंता अभियांत्रिकीमधील तरुणांना प्रोत्साहित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
यावर्षी या कार्यक्रमात एकूण ८४ संघ होते. यात एकूण ३३२ विद्यार्थी, १७८ स्वयंसेवक आणि ४० वेगवेगळ्या प्रदेशातील शिक्षकांचा सहभाग होता.
या कार्यक्रमात जेट टॉय आणि स्किमर संघांना १५ हून अधिक प्रकारांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्कायम्मर येथे राष्ट्रीय ऑलिम्पिक २०१९ चे एकूणच विजेते वाना वाणी मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालय, तर नाशिक येथील सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालयास द्वितीय क्रमांक मिळाला.
या विद्यालयास जेट टॉयसाठी दुसरा क्रमांक देण्यात आला. या व्यतिरिक्त, वेल टेक यांनी ‘शेपिंग फ्यूचर मोबिलिटी’ या थीमवर नॅशनल बेस्ट प्रेझेंटेशनचे पाच विशेष बक्षीसेदेखील वितरीत केले. या कार्यक्रमात यावर्षी सातव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी ग्लाइडर चॅलेंज ही एक नवीन स्पर्धादेखील सुरू झाली.
pic credit : https://www.autocarpro.in/
साध्या वेशात महिला पोलीसच उतरल्या रस्त्यावर; विशेष मोहिमेत सहा विकृत गजाआड
नाशिक । प्रतिनिधी
महिला सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहीम, ऑलआऊट ऑपरेशनमध्ये विविध ठिकाणी महिलांची छेडखानी करण्याचा प्रयत्न करणार्या विकृतांना साध्या वेशातील महिला पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले.
कमलकुमार गिरधरलाल खेमानी (52, रा. चेतननानगर, इंदिरानगर), आशिष लक्ष्मीचंद अग्रहरी (30), अक्षी अमीर इस्माईल आत्रम (45, रा. दोघेही पंचवटी), हेमंत शिवाजी वाघ (33, रा. पारिजातनगर), भरत अभिमन पाटील (एकदंतनगर), गणेश परशुराम वरुडे (31, रा. दत्तमंदिर, नवीन नाशिक) अशी जेरबंद करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
आमच्या नियमित अपडेट होत असलेल्या बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी इथे क्लिक करा
हैदराबाद येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पुढाकाराने नाशिकमधील प्रामुख्याने उशिरा कामावरून परतणार्या महिलांच्या सुरक्षेसाठी ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये महिला पोलीस सेवकांनी साध्या वेशात ठराविक ठिकाणी उभे राहिल्यानंतर त्यांची छेड काढणार्यांना पोलिसांनी जेरबंद केले. शहरात विविध भागात अशा सहा जणांना अटक करण्यात आली.
कामावरून घरी परतणार्या महिलांचा एकटेपणा, कमजोरीचा रात्रीच्या काळोखाचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केले जातात. हे रोखण्यासाठी शहर पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी साध्या वेशातील महिला सेवकांनी स्टिंग ऑपरेशन केले.
यामध्ये महिला पोलीस साध्या वेशात बसची वाट पाहत थांबल्या. पथकातील पुरुष दूर अंतरावर साध्या वेशात उभे राहिले. तसेच काही आजूबाजूला गस्त घालत होते. या महिलेची छेड काढण्याचा कोणी प्रयत्न केला असता त्याचे व्हिडीओ शूटिंग करून त्यांना जेरबंद करण्यात आले.
मोदींंच्या कॅबिनेटमध्ये लोकसंख्या जनगणनेला मंजुरी!
दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील कॅबिनेटने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला मंजुरी दिली आहे. तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल आणि केरळ सरकारनं एनपीआरला त्यांचा विरोध असेल, हे आधीच स्पष्ट केल आहे. म्हणून सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन घमासान सुरु असताना मोदी सरकार संपूर्ण देशात एनपीआर कसे बवणार हे पाहणे औत्सुक्याच आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन देशातल वातावरण ढवळून निघत असताना मोदी सरकारन राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला (एनपीआर) मंजुरी दिली आहे.
या अंतर्गत 1 एप्रिल 2020 ते 30 डिसेंबर 2020 दरम्यान नागरिकांची माहिती गोळा केली जाईल. त्यासाठी घराघरात जाऊन जनगणना केली जाईल. देशातील नागरिकांची व्यापक माहिती गोळा करण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी केली जाणार आहे. या अंतर्गत लोकांची बायोमेट्रिक माहिती गोळा केली जाणार आहे.
एनपीआर आणि एनआरसीमध्ये बराच फरक आहे. देशात अवैध पद्धतीने वास्तव्य करत असलेल्या लोकांची ओळख पटावी या उद्देशाने एनआरसी लागू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी अनेकदा म्हटले आहे. विविध योजना राबवण्यात मदत व्हावी या हेतूनं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी केली जाणार आहे. या अंतर्गत सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींची माहिती गोळा केली जाईल. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत एखाद्या बाहेरुन आलेल्या आणि सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून वास्तव्य करत असलेल्या व्यक्तीचीही माहिती गोळा केली जाईल.
सरकारी योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूनं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी करण्यात येणार आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारनं 2010 मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीची सुरुवात केली. 2011 मधील जनगणनेच्या आधी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचं काम सुरू झाले होते. आता पुन्हा 2021 मध्ये जनगणना होणार आहे. त्यामुळेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे कामदेखील सुरू करण्यात येणार आहे.
ढाबे, हॉटेलवर एक्साईजची नजर
7 पथकांची नियुक्ती । नाताळ, नववर्षानिमित्त तपासणी
अहमदनगर (प्रतिनिधी) – नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात मोठया प्रमाणात पार्टी व इतर कार्यक्रमांवर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 7 पथकाची नियुक्ती केली आहे. ही पथके अवैध मद्य वाहतूक, निर्मिती आणि वाहतुकीला आळा घालतील अशी माहिती एक्साईजचे एसपी पराग नवलकर यांनी दिली.
राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्षा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांचे आदेशानुसार व अधीक्षक पराग नवलकर तसेच उपअधीक्षक सी पी निकम यांचे नेतृत्वाखाली अवैध मद्यविक्री, निर्मिती, वाहतुकीला आळा घालण्याकरिता जिल्ह्यात 5 पथके व 2 भरारी पथके तयार करण्यात आलेली आहेत.
अहमदनगर विभागाचे विशेष पथकामार्फत रात्रीची गस्त घालण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व परवानाकक्ष अनुज्ञप्त्या व ढाबे यांचे निरीक्षण करण्यात येणार आहे.
नाताळ व नववर्षाच्या प्रारंभाच्या कालावधीत माफक दरात उच्च प्रतीचे मद्य (स्कॉच), डयुटी फ्री स्कॉच या नावाने बनावट व भेसयुक्त मद्य विक्रीचे प्रकार झाले आहेत. भेसळयुक्त मद्य विक्रीतून मद्य प्राशान करणार्या ग्राहकांची आर्थिक फसवणुक होते. त्याचबरोबर मद्य सेवनाने आरोग्यावर देखील परिणाम होतो. अनुज्ञप्ती धारकांनी सर्व नियमांचे पालन करुन ग्राहकांना मद्य पिण्याच्या परवान्यावर मद्य विक्री करावी. अनुज्ञप्तीधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कठारे कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.
व्हॉटस्अॅपवर द्या बोगस दारूची माहिती
अवैध व सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना आढळून आल्यास मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 नुसार तसेच ढाब्यांवर जागा मालकांविरुध्द सुध्दा गुन्हा दाखल करुन वैद्यकीय तपासणी करुन कडक कारवाई करण्यात येणार आहे. भेसळयुक्त व बनावट मद्य अथवा अवैध मद्यविक्रीची माहती असल्यास व तक्रार नोंदविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 18208333333 हा टोल फ्री आणि 8422001133 या व्हॉटसअप क्रमांकावर संपर्क साधावा, असे राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी कळविले आहे.
सिन्नर : शेतीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी, एकाचा मृत्यू
(फाईल फोटो)
सिन्नर : तालुक्यातील उजनी येथे शेतीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान अधिक माहिती अशी कि, सिन्नर तालुक्यातील उजनी येथे दोन कुटुंबात वादावादी झाली. याचे रूपांतर हाणामारीत होऊन यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. यावेळी त्याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर अन्य चौघे गंभीर जखमी आहेत.
या प्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर : शिवसेेनेची मते फुटणार का? दिवसभर चर्चा
गुरूवारी मतमोजणी : जिल्हा नियोजनसाठी 100 टक्के मतदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या पर्यायाने शहराच्या राजकारणात चवीने चर्चिला गेलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार दि. 24 रोजी सर्व म्हणजे 67 महापालिका नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. शंभर टक्के मतदान झाल्यामुळे यात शिवसेनेच्या मतांमध्ये फाटाफूट होते का, याकडे लक्ष लागले असून गुरूवारी दि. 26 ला मतमोजणी झाल्यानंतरच ते स्पष्ट होणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये तीन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. महापालिका क्षेत्रातून या पाचपैकी तीन जागा होत्या. त्यामध्ये भाजपच्या आशाताई कराळे अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. सर्वसाधारण आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग या दोन जागांसाठी आज मतदान झाले. त्यातील सर्वसाधारण जागेसाठी अनिल शिंदे आणि ज्ञानेश्वर उर्फ अमोल येवले या दोन शिवसेनेच्या नगरसेवकांमध्येच लढत झाली. दुसर्या जागेवर विनित पाऊलबुधे (राष्ट्रवादी) आणि सुवर्णा जाधव (शिवसेना) यांच्यात लढत झाली.
राज्यात एकत्र आलेले शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नगरमध्ये मात्र एकत्र राहू शकले नाहीत. सर्वसाधारण जागेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि बसपचे नगरसेवक अनिल शिंदे यांच्या बाजूने उभे असल्याचे दिसून आले, तर नागरिकांचा मागासवर्ग या जागेवर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात सरळ लढत झाली. विशेष म्हणजे या दोन्ही जागेवर राज्यात या तीन पक्षाच्या विरोधात असलेली भाजप येथे मात्र राष्ट्रवादी, काँग्रेससोबत दिसून आली. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेनेला एकाकी पाडण्याचे राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप यांचे धोरण जिल्हा नियोजन समितीच्या पोटनिवडणुकीतही कायम राहिल्याचे चित्र होते.
सकाळी साडेअकरापर्यंत 67 पैकी तीस नगरसेवकांनी व त्यानंतर दुपारी एकपर्यंत 56 नगरसेवकांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. दुपारी साडेचारच्या सुमारास असिफ सुलतान यांनी शेवटचे मतदान केले. दुपारी शिवसेनेचे नगरसेवक स्वतंत्रपणे मतदानाला येत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजपचे नगरसेवक एकत्र मतदानासाठी येत होते. एकाचवेळी वेगवेगळ्या वाहनांमध्ये हे नगरसेवक तेथे आल्याने एकूण चित्र काय असेल, याचा अंदाज व त्यानुसार चर्चा सुरू झाली. महापालिकेत 68 नगरसेवक असून, त्यापैकी सारिका भूतकर यांचे पद रद्द झाल्याने 67 एवढेच मतदार होते.
शिवसेनेचे नगरसेवक एकमेकांसमोर उभारल्याने आणि शिंदे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेससह भाजपचा पाठिंबा मिळविल्याच्या चर्चेने शिवसेनेचे उपनेते अऩिल राठोड यांनी काल सायंकाळी उशीरा शिवसेना नगरसेवकांची बैठक घेतली. मात्र या बैठकीलाही काही नगरसेवकांनी दांडी मारल्याचे समजते. त्यांनी सर्व नगरसेवकांना येवले यांना मतदान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते मतदान केंद्रावर सकाळपासून उपस्थित होते. मात्र भाजप शहर जिल्हाध्यक्ष आणि शिवसेनेचे शहरप्रमुख मात्र केंद्राकडे फिरकले नाहीत.
‘बाप्पा, कामच झालं ना !’
शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांना बाप्पा या नावाने ओळखले जाते. त्यांची उमेदवारी म्हणजे उपनेते राठोड यांना शह असल्याचेही मानले जाते. मतदान सुरू असताना एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्यामध्ये ‘बाप्पा, कामच झालं ना, लाईनच बदलली ना’ असे एक गाणे असून, दिवसभर याच व्हिडिओची चर्चा होती.

