Sunday, April 12, 2026
Home Blog Page 13164

संतप्त आदिवासी महिलांनी ठोकले म्हैसगाव ग्रामपंचायतीला टाळे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कर्मचार्‍यानेच तोडले टाळे; ठाकरवाडीत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी, पाण्यासाठी आदिवासी महिलांची रानोमाळ भटकंती

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील म्हैसगाव हद्दीतील आदिवासी बहूल असलेल्या ठाकरवाडीच्या समस्या गेल्या अर्धशतकातही सुटलेल्या नाहीत. हाकेच्या अंतरावर मुळा धरण असूनही गेल्या वर्षभरापासून पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करणार्‍या संतप्त आदिवासी महिलांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायतीलाच टाळे ठोकून सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर महिलांनी ठोकलेले टाळे एका कर्मचार्‍यानेच तोडल्याने आदिवासी महिलांचा संताप वाढला आहे.

संतप्त महिलांनी राहुरीचे तहसीलदार व पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनाही निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले, ठाकरवाडी येथील ग्रामस्थ म्हैसगाव ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला वैतागलो आहे. आदिवासी वाडीला शासनाने रोजगार हमी योजनेतून 11 लाख रुपये खर्चून विहीर बांधून दिली. विहिरीत सध्या 50 फूट इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

मात्र, त्यावरील मोटारी दुसरीकडेच बसविण्यात आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर-दर्‍यांत हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. ठाकरवाडीतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांचेही मोठे हाल होत आहेत. ठाकरवाडी ही आदिवासी वस्ती असून स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून अस्वच्छतेमुळे सर्वत्र डासांचा प्रादूर्भाव होऊन साथीच्या आजाराची लागण झाली आहे. कचरा कुंडीजवळ सुमारे 5 ते 10 फूट कचर्‍याचे ढीग साचलेले असल्याने दुर्गंधीही वाढली आहे.

सांडपाणी वाहून नेणार्‍या गटारी व स्वच्छता गृह तुंबलेले असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाल्या तुंबून आजार वाढले असून ठाकरवाडीत डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत वाडीवर डास प्रतिबंधक फवारणी केली जात नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. सरपंच बाहेरगावी नोकरीला असून सरपंच व ग्रामसेवकाच्या मनमानीला आदिवासी कंटाळल्याने सरपंच व ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी महिलांनी केली आहे.

निवेदनावर विजय विधाटे, सोमनाथ मुसळे, राहुल दुधाट, अर्जुन दुधाट, हिरामण बर्डे, भीमराज शेलार, वनिता जाधव, ताराबाई जाधव, अनिता जाधव, गीताबाई पारधे, सविता पारधे, मंदाबाई जाधव, मनीषा जाधव, भाऊराया जाधव, पारूबाई जाधव, येणूबाई जाधव, कारूबाई जाधव, कविता जाधव, सोनाबाई जाधव, वैशाली जाधव, झुंबरबाई जाधव, किसन जाधव, पोपट जाधव, भीमबाई जाधव, लता जाधव, किरण जाधव, अंकुश जाधव, रोहित जाधव, मंगल जाधव, मंदाबाई पारधे, मीनाबाई पारधे, रमेश जाधव, भाऊसाहेब पारधे आदींसह आदिवासी महिलांची नावे आहेत.

गेल्या 50 वर्षांपासून ठाकरवाडी येथील आदिवासी शेतकरी आणि महिला आपल्या न्यायहक्कासाठी शासन दरबारी संघर्ष करीत होते. त्यांचे काही प्रश्न पद्मभूषण स्व. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी मार्गी लावले. मात्र, आता राजकीय कोलदांड्यामुळे पुन्हा ठाकरवाडीच्या समस्या आ वासून उभ्या राहिल्या असून आदिवासी महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी हेळसांड होत आहे. वनखात्याच्या जागेत पिण्याच्या पाण्यासाठी गेलेल्या महिलांना वनखात्याचे कर्मचारी अरेरावी करून त्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. तर ठाकरवाडीतील वीजही खंडित करण्यात आली असून ठाकरवाडी पुन्हा अंधारात सापडली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने दिलेल्या विहिरीच्या पाण्यावर धनदांडगे सायफन करून डल्ला मारीत असल्याने आदिवासी महिलांना हक्काचे पाणी मिळत नाही. अशी दुरवस्था झाली असून शासकीय अधिकारी मात्र, याकडे डोळेझाक करीत आहेत.

जीवघेणी डबलट्रॉली ऊस वाहतूक देतेय अपघातांना निमंत्रण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

परिवहन विभागाचे दुर्लक्ष; नेवासा बुद्रुक ग्रामस्थांचा रास्तारोकोचा इशारा

नेवासा बुद्रुक (वार्ताहर)- टेप लावून गाण्याच्या तालावर बेधुंद चालणारी ऊस वाहतूक करणारी वाहने आपघाताला निमंत्रण देत असून चाळणी झालेल्या नेवासा- श्रीरामपूर रस्त्यावर अशा वाहनांमुळे अपघातांमध्ये वाढ झाली असून नेवासा बुद्रुक परिसरातील नागरिक, व्यापारी वर्ग व शालेय विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने लवकरच रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर तसेच नेवासा बुद्रुक, बहिरवाडी, भालगाव, सुरेगाव, पुनतगाव, पाचेगाव या भागात डबलट्रॉलीच्या ट्रॅक्टरद्वारे उसाची सर्रास वाहतूक सुरू आहे. यात अपघात झाल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. नेवासा बुद्रुक परिसर गंगाथडीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन आहे. येथून ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून पंधरा ते वीस टन उसाची वाहतूक केली जाते. ऊस वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर टेप लावून बेशिस्तपणे चालत असल्याने इतर वाहनांना अपघताचा धोका निर्माण होतो.

टॅ्रक्टरच्या ट्रॉलीला मागील बाजूस कुठल्याही प्रकारची रेडियम पट्टी किंवा साईड लाइट लावलेले नसतात. याकडे परिवहन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सोईस्करपणे दुर्लक्ष करताना दिसून येतात. यापूर्वीही रस्त्यावर लहान मोठ्या अपघातात हकनाक अनेकजण बळी गेले आहेत. या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

भरधाव वेग, कर्णकर्कश हॉर्न, टेपरेर्कार्डरच्या गाण्यांचा मोठा आवाज आणि डबलट्रॉलीने उसाची नियमबाह्य वाहतूक करणार्‍या या ट्रॅक्टरला ओलांडून दुचाकीस्वार व अन्य वाहनचालक भीतभीतच पुढे जातात. दुचाकी, चारचाकी वाहन चालवणे म्हणजे मरणाला सामोरे जाणे अशीच परिस्थिती आहे.

डबलट्रॉली ट्रॅक्टर चालकांत बहुतेक जणांकडे वाहन परवाना व वाहनांची कागदपत्रेही नसतात. वाहनांना रिफ्लेक्टरही नसते. अशी वाहने बंद पडली किंवा टायर पंक्चर झाले तर रस्त्यावर आहे तिथेच दोनदोन दिवस वाहन सोडून चालक निघून जातात. रात्रीच्या वेळी अशा वाहनांना धडकून अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे.

वाहन परवाना नियमावलीनुसार ट्रॅक्टरचालकांना वाहतुकीसाठी फक्त एकाच ट्रॉलीचा वापर करता येतो. त्याचबरोबर पाठीमागील बाजूस परावर्तक पट्ट्या बसवाव्या लागतात. वाहनाचा वेग ताशी दहा किमी वेगाचा असावा व क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करू नये. ट्रेलरसहित ट्रॅक्टरची लांबी 18 मिटरपेक्षा अधिक असू नये. हे सर्व नियम असले तरी मात्र परिवहन अधिकारी यांनी हे नियम धाब्यावर बसवले असल्याचे दिसते.

नेवासा श्रीरामपूर रस्त्याची मोठ्या प्रमाणावर चाळणी झाली असून सदरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे देखील पडले आहेत .सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको आंदोलन करणार आहोत.
– नवनाथ मारकळी, ग्रामपंचायत सदस्य, नेवासा बुद्रुक

डबल ट्रॉलीची वाहने एकामागे एक धावतात. मागच्या वाहनांना अशा वाहनांना ओलांडून पुढे जाताना (ओव्हरटेक) अपघात घडतात.रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार समोरच्या वाहनांना धडकतात. अशा बेशिस्त वाहतुकीला लगाम घालावा.
– संभाजी ठाणगे, सामाजिक कार्यकर्ते

शेती व पिण्याच्या शाश्वत पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

आ. आशुतोष काळे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन केली मागणी

कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा पर्जन्यछायेखाली येत असल्यामुळे संपूर्ण मतदारसंघात नेहमीच पाऊस कमी पडतो. मागील काही वर्षांपासून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचे हक्काचे पाणी जायकवाडीला जात आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला असून कोपरगाव शहरासह मतदार संघातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनुत्तरित आहे.

आपण व्यक्तिगत लक्ष घालून कोपरगाव मतदारसंघासाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.

मुंबई येथे आ.आशुतोष काळे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कार्यकर्त्यांसह भेट घेतली व त्यांना या आशयाचे निवेदन दिले. तसेच याप्रश्नी शरद पवार यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी आ. काळे व कार्यकर्त्यांनी केली. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पिकाच्या व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अवलोकन केली. शरद पवार यांनीही सर्व गोष्टी समजावून घेतल्या.
यावेळी शरद पवार यांना दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव मतदारसंघातील शेतकर्‍यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे.

गोदावरी खोरे हे अतीतुटीचे असूनही नगर, नाशिकच्या धरणांतून अनेकवेळा जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्यामुळे अहमदनगर, नाशिक व मराठवाडा असा प्रादेशिक वाद निर्माण झालेला आहे. हा वाद मिटवण्यासाठी व गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे पाणी पूर्ववत मिळण्यासाठी पावसाळ्यात पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे 80 टीएमसीपेक्षा जास्त पाणी पूर्वेला गोदावरी खोर्‍यात वळविण्यासाठी राज्य शासनाला तातडीने निधीची उपलब्धता करण्यासाठी योग्य त्या सूचना कराव्यात, असे आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

राज्य शासनाने नुकतीच शेतकर्‍यांना कोणत्याही अटी, शर्तीविना सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. पावसाळ्यात पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे 80 टीएमसीपेक्षा जास्त पाणी पूर्वेला गोदावरी खोर्‍यात वळविण्यासंदर्भात आ. आशुतोष काळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या नागपूर अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी पवारांच्या घेतलेल्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पाथर्डी : दैत्यनांदूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील दैत्यनांदूर गोळीबारामध्ये सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांच्या हत्येतील मुख्य संशयीत आरोपी शहादेव पंढरीनाथ दहिफळे याला बुधवार (दि. 25) पोलीसांनी अटक केली आहे.

17 डिसेंबरला सायंकाळी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे राजकीय वादातून झालेल्या गोळीबारात जखमी सरपंच संजय दहिफळे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शहादेव दहिफळे यांच्यासह 12 जणांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येतील मुख्य संशयीत आरोपी शहादेव दहिफळे हा अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार घेत होता. उपचार पुर्ण झाल्यानंतर पाथर्डी पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

दरम्यान रुग्णालयात मुख्य संशयीत अरोपी शहादेव दहिफळे उपचार घेत असतांना त्यांनी दिलेल्या जबाबावरून मयत संजय दहिफळे यांच्या सह 11 जणांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद दिली आहे. याप्रकरणात दोन्ही गटांकडून परस्परा विरोधा गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यात शहादेव दहिफळे, विष्णू दहिफळे, ज्ञानेश्वर दहिफळे, राहुल दहिफळे व व्दारका नागरगोजे या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या हत्येचा तपास पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी करत आहेत.

कोपरगाव तालुक्यात पावसाची हजेरी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून तालुक्यातील काही भागात काल बुधवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यासह जिल्ह्यात देखील वेधशाळेने पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. सकाळपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरणासह आकाश भरून आले होते. सकाळी सूर्यनारायणाने नुसते दर्शन दिले. त्यानंतर दिवसभर आकाशात ढगांची दाटी झाली होती.

दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरासह तालुक्यातील कोळपेवाडी, चास, मंजूर, धामोरी, बक्तरपूर, सुरेगाव, हंडेवाडी, सोनेवाडी, पोहेगाव, देर्डे कोर्‍हाळे, चांदेकसारे, कोकमठाण, चांदवड, जेऊर कुंभारी, डाऊच खुर्द आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांची मोठी धावपळ झाली.

मकाचे रचून ठेवलेले ढीग पावसाच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कापडाने झाकण्यात आले. अगोदरच उशिरा सुरू झालेला मान्सून त्यात परतीच्या पावसाने मका, कापूस, कांदे, भुईमूग, बाजरी, सोयाबीन यासह खरिपाच्या इतर पिकांची नासाडी केलेली असताना आता या अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतातूर झाला आहे.

यंदा परतीच्या पावसासह अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने शेतातील खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेल्या मका, बाजरी व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे शेतात बरेच दिवस पाणी साचले होते. शेतात जास्त प्रमाणात ओलावा असल्याने रब्बीसाठी शेती तयार करता येत नव्हती.

त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात गवत माजले. शेतकर्‍यांनी शेतातील मका व बाजरी पिकाची कणसे व इतर धान्य आवरून गवताची साफसफाई करून ऊस, गहू, हरभरा, उन्हाळी मका, कांदा, भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. यामुळे रब्बीची पेरणी बर्‍यापैकी झाली. ही पिके तग धरून आहेत. या परिस्थितीत शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित होत असताना ढगाळ वातावरणामुळे पिके माना टाकत आहेत.

त्यामुळे संपूर्ण वाढ होईपर्यंत हे पीक हाती लागते की नाही याची चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे. यावर्षीच्या परतीच्या पावसामुळे खरीप पीक वाया गेल्याने शेतकर्‍यांच्या आशा रब्बीवर असल्या तरी ढगाळ वातावरणामुळे रोगामुळे हाती काही पडते की नाही असा प्रश्न आहे.दरवर्षी नोव्हेबर महिन्यात थंडीस सुरुवात होते व डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडते.

ही थंडी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिकांना पोषक असते. परंतु, डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा उलटला तरी अजूनही पाहिजे तशी थंडीची चाहूल दिसत नाही.

भंडारदरा धरण परिसरात पाऊस

भंडारदरा (वार्ताहर) – गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना काल (बुधवार) पहाटे व सायंकाळी 6.15 वाजता रिमझिम पाऊस पडला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. कडाक्याची थंडी सुरू असताना गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हवेत उकाडा निर्माण झालेला असताना काल पहाटे 3.30 वाजता अचानक पाऊस सुरू झाला. पाच मिनिटांत पावसाने उघडीप दिली. मात्र सायंकाळी 6.15 वाजता पुन्हा रिमझिम पाऊस सुरु झाला. 15 मिनीटे सुरु असलेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे आदिवासी जीवन पुन्हा गारठले आहे.

साखर उद्योग जगविण्यासाठी पुढाकार घ्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुख्यमंत्री ठाकरे यांचे कारखानदार व शेतकर्‍यांना आवाहन

पुणे (प्रतिनिधी)- साखरेची उत्पादकता वाढविण्याबरोबरच साखरेच्या उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता असून यावर कारखान्यांनी विचार करावा. उसासारख्या शाश्वत उत्पन्न देणार्‍या उद्योगाला जगविण्यासाठी सरकारबरोबर साखर कारखानदार आणि शेतकर्‍यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था शेतकर्‍यावर अवलंबून आहे. सध्या दुसर्‍याच्या आयुष्यात गोडवा वाटणार्‍या शेतकर्‍याचं आयुष्य उसाच्या चिपाडासारख होत आहे, त्यामुळे राज्यकर्त्यांनी या शेतकर्‍यांकडे लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

सहकार क्षेत्र आणि राजकारण वेगळं केलं जाऊ शकत नाही. कारण अनेक राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्र मजबूत केलं आहे. साखर कारखानदारी आणि साखर क्षेत्राने अनेक नेते दिले असे सांगत ठाकरेंनी लहानपणी उसाचा रस पिण्यासाठी मिळायचा याची आठवण सांगितली. आम्ही शाळेत जायचो तेव्हा रस्त्यावर ठिकठिकाणी उसाचा रस पिण्यासाठी मिळायचा. उसाची गुर्‍हाळं नाक्यावर असायची. ऊन्हात गार उसाचा रस पिऊन बरं वाटायचं.

पण गुर्‍हाळात एका बाजूने गेलेला रसरशीत ऊस दुसर्‍या बाजूने चिपाड होऊन बाहेर पडतोय याकडे आमचं लक्ष नसायचं. ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकर्‍यावर अवलंबून आहे. दुसर्‍याच्या आयुष्यात गोडवा वाटत असताना शेतकर्‍याच्या आयुष्याचं चिपाड होत आहे. जर राज्यकर्त्यांनी, आम्ही याकडे लक्ष दिलं नाही तर या कार्यक्रमाला काही अर्थ नाही, असे ठाकरे म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, साखर कारखानदारी अडचणीत आहे. गेल्या वर्षीचा दुष्काळ आणि यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. साखर कारखान्यातील को-जनरेशन प्रकल्प शेतकर्‍यांच्या उसाला अधिकचा दर देण्याचा उपाय आहे. राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आहे. गेल्या वर्षीचा दुष्काळ आणि यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. साखर कारखान्यातील को-जनरेशन प्रकल्प शेतकर्‍यांच्या उसाला अधिकचा दर देण्याचा उपाय आहे. सहकारी साखर कारखानदारी शेतकर्‍यांना आर्थिक सक्षमीकरण करण्याचा मुख्य कणा असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार-हर्षवर्धन पाटील यांच्यात रंगल्या गप्पा
राजकारणात एकमेकांचे पक्के वैरी म्हणून सर्वश्रुत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील हे बुधवारी खुर्चीला खुर्ची लावून बसलेले पहायला मिळाले. केवळ खुर्चीला खुर्चीच नाहीतर दोघांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. याची जोरदार चर्चा रंगली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमास पोहोचण्यास उशीर होत असल्याने व्यासपीठावर नेत्यांमध्ये चर्चा सुरु होती. यावेळी हे दोन नेते एकामेकांशी गप्पा करण्यात व्यस्त होते. व्यासपीठावर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये कल्लपण्णा आवाडे यांच्या नावाची पाटी होती. अजित पवारांनी आवाडे यांच्या नावाची पाटी बाजूला सारून पाटील यांची पाटी शेजारी ठेवत त्यांना शेजारी बसवून घेतले. त्यानंतर कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये हशा पिकला. दोघे कार्यक्रम संपेपर्यंत विविध विषयांवर चर्चा करताना दिसले. संपूर्ण कार्यक्रमात हाच चर्चेचा विषयही झाला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात स्थानिक राजकारणावरून मतभेद आहेत. काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करताना हर्षवर्धन पाटील यांनी पक्ष सोडण्याचं सगळं खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडलं होतं. तर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, असा उपरोधिक टोलाही पाटील यांनी हाणला होता. त्याची अनेकांना बुधवारी आठवण झाली.

गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न आवश्यक- पवार
शरद पवार म्हणाले, उसाच्या व ऊस कारखानदारीच्या संबंधातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही देशातील अग्रगण्य संस्था आहे. ऊस उतारा, उत्पादन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक कारखान्यांनी ऊस विकासासाठी विशेष लक्ष द्यावे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. साखर व्यवसाय हा महाराष्ट्रातील ग्रामीण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. या व्यवसायामुळे राज्याला चांगले आर्थिक उत्पन्न होत आहे. उसाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रत्येक कारखान्यांनी ऊस विकास कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.

टेंभा मिरवण्याची हौस सत्तेच्या मुळावर ?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

प्रत्येक  दशकारंभी देशात खानेसुमारी वा शिरगणती (सेन्सस) होते. परकीय राजवटीने घालून दिलेला तो उपयुक्त पायंडा आजतागायत चालू आहे. 2021 साली ती होेणारच! त्या प्रक्रियेबाबतची सर्व माहिती सरकारी संकेतस्थळावर आहे.

तरीही परवा गृहमंत्र्यांनी काही वेगळे वक्तव्य करून जनतेला गोंधळात टाकले आहे. खानेसुमारी वा शिरगणती हे परिचित शब्द वापरणे गृहमंत्र्यांना कमीपणाचे वाटले असावे. म्हणून ‘राष्ट्रीय लोकसंख्या सूची’ अद्ययावत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असे त्यांनी अभिमानपूर्वक सांगितले.

या शब्दांनी खानेसुमारीपेक्षा वेगळे काही केले जाणार आहे असे सुचवण्याचा गृहमंत्र्यांचा हेतू असावा का? तसे असेल तर ते तो हेतू का स्पष्ट करीत नाहीत? अकारण शाब्दिक भोवरे निर्माण करून काहीतरी नवे करीत आहोत असा जनतेचा समज करण्याचा हा अट्टाहास कशासाठी? सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणीला होणार्‍या विरोधाची धार दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

त्या आगीत या भ्रामक विधानांनी तेल ओतले गेले आहे. कदाचित तोच उद्देश यामागे असावा का? ही सूची म्हणजे मागच्या दाराने केलेली नागरिक नोंदणी असल्याचा आरोप करून केरळ व पश्चिम बंगालने या प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ जाहीर केला आहे.

केंद्र सरकारला वेळोवेळी जनतेचा असा गोंधळ उडवून काय मिळवते? निर्णय अंगलट आला की मग काँग्रेसचे नाव घ्यायचे आणि त्यांचा निर्णय आम्ही लागू करीत होतो हे सांगायचे. म्हणजे सत्तारूढ पक्षाकडे स्वत:ची कोणतीही धोरणे नाहीत, योजना नाहीत, केवळ मागील सरकारच्या योजना नव्या शब्दांचे अभ्रे चढवून पुढे रेटावयाच्या आणि काहीतरी नवे केल्याचा आनंद मिरवायचा यातच सरकारी कर्तृत्व सिद्ध होते का? जग आर्थिक मंदीच्या तडाख्यात सापडले आहे.

भारत त्याला अपवाद नाही. त्या परिस्थितीत जनतेला दिलासा देणे टाळून संभ्रमित करण्याचा सोपा सोपान हेच सध्याचे सरकारी धोरण असेल का? लवकरच दिल्ली व बिहारच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या वर्षातील प्रत्येक निवडणुकीने सत्तापतींना चटके व झटके दिले आहेत.

त्यामुळे स्पष्ट होणारा जनतेचा अपेक्षाभंग सरकारच्या लक्षात येत नसावा का? म्हणूनच नव-नवा शाब्दिक गोंधळ उडवला जात आहे का? लोकसभेत गृहमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ‘एनसीआर’बद्दलच्या निर्धाराला खुद्द प्रधानसेवकांना जाहीरपणे उभा छेद द्यावा लागला.

तरी पुन्हा अशाच गोंधळाची नवी कारवाई गृहमंत्र्यांनी जाहीर का करावी? नव्या-नव्या शाब्दिक गोंधळांनी झारखंडच्या ताज्या निवडणूक निकालाची पुनरावृत्ती पुढील निवडणुकांत होऊ शकेल असे जनतेला वाटल्यास त्यात नवल काय? ‘राष्ट्रीय लोकसंख्या सूची’ आजवर जनतेला माहीत असलेल्या शिरगणती, खानेसुमारी वा ‘सेन्सस’पेक्षा बिलकूल वेगळी नाही इतक्या सोप्यारितीने सांगण्याची तसदी सरकारने घ्यावी. अन्यथा महाराष्ट्र व झारखंडच्या निवडणूक निकालांची पुढेही पुनरावृत्ती होण्याचा मार्ग प्रशस्त होईल हे सांगायला ज्योतिषाची गरज तरी असेल का?

झारखंडचा झटका का बसला ?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

डॉ जयदेवी पवार 

महाराष्ट्रातील अनुभवानंतर झारखंडमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपने घेतला असे म्हटले जाते. यामागे 

अतिआत्मविश्वास होता की मित्रपक्षांबद्दलचा संशय, याचे आत्मपरीक्षण पक्षाने केले पाहिजे. अर्जुन मुंडा यांना 

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित न केल्याचा आणि निवडणुकीच्या तोंडावर काही महत्त्वाच्या नेत्यांचा पक्षत्यागाचाही 

फटका भाजपला बसला आहे. लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीचे गणित वेगळे असते, हेच झारखंडमध्येही स्पष्ट झाले 

आहे.

खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षांनी एकत्रितपणे धक्का दिला. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने निवडणुकीपूर्वीच आघाडी करून भाजपविरोधात मोर्चेबांधणी केली होती आणि ती यशस्वी झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ऑल झारखंड स्टुडंट युनियन (एजेएसयू) या आपल्या मित्रपक्षासोबत निवडणूक लढवून भाजपने सत्ता मिळवली होती. भाजपला 37 तर एजेएसयूला 5 जागा मिळाल्या होत्या. यावेळी आपल्या एजेएसयू या मित्रपक्षाला दुर्लक्षित करण्याची किंमत भाजपला मोजावी लागली. एजेएसयू हा आपला जनाधार टिकवून आहे, हेही निकालांवरून दिसून आले आहे.

झारखंड राज्याची निर्मिती 2000 मध्ये झाली आणि तेव्हापासूनच भाजप आणि एजेएसयू यांची आघाडी होती. परंतु यावर्षी मात्र भाजपने एजेएसयू या मित्रपक्षाबरोबरचे संबंध तोडले. एवढेच नव्हे तर लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) भाजपला एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. हाही भाजपचा एकेकाळचा मित्रपक्षच होय. परंतु हा प्रस्तावही भाजपने नाकारला. या सर्व घडामोडी पाहता एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते. भाजपला सर्वच राज्यांत स्वबळ वाढवायचे आहे आणि केंद्रात भक्कम बहुमतासह सत्ता असल्यामुळे राज्यांमध्येही आपण स्वबळावर यशस्वी होऊ, असे पक्षाच्या नेतृत्वाला वाटू लागले आहे. त्यामुळे ज्या मित्रपक्षांसोबत भाजपने अनेक निवडणुका लढवल्या त्यांना डावलून स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा प्रयत्न भाजपने अनेक राज्यांमध्ये सुरू केला.

राज्याराज्यांमधील या घडामोडी एकछत्री नियंत्रण मिळवण्याची भाजपची जबरदस्त इच्छा दर्शवणार्‍या आहेत. परंतु स्थानिक पक्षांचा जोर अद्याप ओसरलेला नाही आणि मित्रपक्षांना दुर्लक्षून भाजपला पुरेसे संख्याबळ मिळणार नाही, हेच अलीकडच्या विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकांनी दाखवून दिले आहे. सर्वाधिक राज्यांमध्ये सत्ता हस्तगत करणारा पक्ष म्हणून भाजपने केलेले दावेही मित्रपक्षांमुळेच शक्य झाले होते आणि मित्रपक्ष दुरावल्यानंतर राज्यामागून राज्य भाजपच्या हातून निसटले. झारखंडचा निकाल हे याचेच ताजे उदाहरण !

भाजपने ‘एकला चलो रे’ भूमिका घेतलेली असताना भाजपच्या विरोधात इतर पक्ष मात्र एकवटले. विरोधी पक्षांनी एकजुटीने झारखंड विधानसभेची निवडणूक लढवली आणि भाजपचा हा किल्लाही उद्ध्वस्त केला. झारखंड मुक्ती मोर्चा, राजद आणि काँग्रेस यांनी निवडणुकीपूर्वी महाआघाडी केली होती. जागावाटप एकमताने करण्यात आले. स्वतंत्रपणे निवडणूक लढवून झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्याचे भाजपचे मनसुबे धुळीला मिळण्याचे हे एक महत्त्वाचे कारण ठरले. 2014 मध्ये या तीनही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. मात्र काँग्रेसने हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणूक निकालांमधून बोध घेऊन झारखंडमध्ये केलेली आघाडी पक्षाला फायदेशीर ठरली. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 81 पैकी 65 जागा आपल्याला मिळतील असा दावा भाजपकडून केला जात होता. पंतप्रधान मोदींचा चेहरा घेऊन निवडणूक लढवल्यास हे सहज शक्य आहे, असे भाजपला वाटत होते. ही रणनीती

अंमलात आणताना भाजपने झारखंडमध्ये पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अनेक सभा आयोजित केल्या. एवढेच नव्हे तर हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून योगी आदित्यनाथ यांनाही प्रचारात उतरवले. परंतु भाजपची ही रणनीती पूर्णपणे फसली.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे भाजपमध्ये घबराट निर्माण झाली होती आणि त्याच मनःस्थितीत पक्ष झारखंडमध्ये मतदारांना सामोरा गेला. अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक कृती करण्यावर भाजपचा भर राहिला. कोणत्याही पक्षाशी आघाडी करायची नाही हा निर्णय या घबराटीतूनच आला असण्याची शक्यता आहे. मित्रपक्षांना दूर ठेवण्यामागे भाजपची स्वबळाबद्दलची खात्री होती की मित्रपक्षांबद्दल संशय, हे गुलदस्त्यातच राहणार असले तरी आघाडी न करता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे अवघड आहे, एवढा बोध भाजपने नक्कीच घेतला असेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळी मतदारांच्या मानसिकतेत फरक असतो आणि तो भाजप नेत्यांना समजून घ्यावा लागणार आहे.

झारखंडमध्ये 26.3 टक्के लोकसंख्या आदिवासी आहे आणि विधानसभेच्या 28 जागा आदिवासींसाठी राखीव आहेत. भाजपविरोधी महाआघाडीने मुख्यमंत्रिपदासाठी आदिवासी चेहरा समोर आणला होता. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन हे आदिवासींमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. भाजपने मात्र आदिवासी समुदायांपैकी नसलेले रघुबर दास यांचाच चेहरा दुसर्‍यांदा लोकांसमोर आणला. दास यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात आदिवासीविरोधी धोरणे राबवली, असा या समुदायांमधील लोकांचा आक्षेप आहे. खुंटी येथील दौर्‍यावेळी आदिवासींनी दास यांच्यावर बूट-चप्पल भिरकावले होते. आदिवासी नेते अर्जुन मुंडा यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले जावे, अशी लोकांची अपेक्षा होती. परंतु भाजपच्या हायकमांडने रघुबर दास यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले आणि तिथेच भाजपचा पाय आणखी खोलात गेला.

पक्षबांधणीच्या बाबतीतही भाजपच्या नेत्यांकडून निवडणुकीपूर्वी चुका झाल्या. निवडणुकीच्या तोंडावरच अनेक भाजप नेत्यांनी पक्षाला मोठे धक्के दिले. राधाकृष्ण किशोर यांनी भाजप सोडून एजेएसयू पक्षात प्रवेश केला. राधाकृष्ण किशोर यांचा पक्षत्याग भाजपला महागात पडला, असे निकालांवरून दिसून येते. तिकिटे वाटतानाही भाजपमध्ये अनेकजण नाराज राहिले. अशाच नाराज नेत्यांपैकी सरयू राय यांनी थेट जमशेदपूर (पूर्व) मतदारसंघातून मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याच विरोधात शड्डू ठोकला. या प्रतिष्ठेच्या लढतीत राय यांनी रघुबर दास यांना घाम फोडला.

मित्रपक्षांपासून दूर राहण्याचा निर्णय घेताना भाजपने किमान स्वपक्षातील नेते नाराज होणार नाहीत, अशी काळजी घेणे अपेक्षित होते. स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची असल्यामुळे जागावाटपासाठी फारशा अडचणी येण्याची शक्यताही नव्हती. परंतु अनेक महत्त्वाचे नेते दुखावले आणि निवडणुकीआधी पक्ष सोडून गेले, याचा फटका भाजपला अपेक्षेप्रमाणेच बसला. स्वबळावर निवडणूक लढवण्यामागे अतिआत्मविश्वास होता की मित्रपक्षांबद्दलचा संशय, याबाबत पक्षाने आता मंथन करायला हवे. विधानसभेची गणिते लोकसभेपेक्षा वेगळी असतात, याचेही भान राखायला हवे. हरियाणात निवडणुकीनंतर आघाडी करून पक्षाने सत्ता मिळवली, पण महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात अपयश आले आणि पाठोपाठ आता झारखंडमध्येही पराभवाचा सामना करावा लागल्याने भाजपला चिंतन करावेच लागणार आहे.

अदृश्य पुरावे : गुन्हेगारांची मानसिकता

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

परेश चिटणीस – 

समाजात कितीतरी प्रकारचे गुन्हे घडत असतात. गुन्हेगारांची मानसिकता वेगवेगळी असते. गुन्हेगारांच्या मेंदूत काही साम्य असते का? एखादी व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे का? हे ठरवता येते का? मानसशास्त्रीय अभ्यासात असे काही व्यक्तिमत्त्व गुण सापडले आहेत. 

विविध  प्रकारचे गुन्हे आपल्याला पाहायला किंवा ऐकायला मिळतात. गुन्हेगाराची मानसिकता वेगवेगळ्या प्रकारची असते. गुन्हा करण्यामागे त्यांची कारणे वेगळी असतात. एक प्रश्न नेहमीच मनात येतो की, सगळ्या गुन्हेगारांमध्ये किमान समान मानसिकता काय असते? एखादी व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे का, हे कसे ठरवायचे?

मानसशास्त्रीय अभ्यासात काही व्यक्तिमत्त्व गुण असे सापडले आहेत की जे गुन्हा करणार्‍या व्यक्तीमध्ये सामान्यपणे मोठ्या प्रमाणात आढळतात. तीन असे स्वभाव गुण आहेत की जे जास्त प्रमाणात एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर ती व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची होऊ शकते. याला मानसशास्त्रीय भाषेत डार्क ट्रायेड असे म्हणतात. हे तीन स्वभाव गुण कोणते आहेत? या स्वभाव गुणांची नावे मजेशीर आहेत. त्याचा अर्थ आपण समजून घेऊ.

पहिला आहे नार्सीसीजम म्हणजे आत्मरतीवाद. या शब्दाचा मराठी अनुवादही इंग्रजी शब्दाइतकाच न उलगडणारा आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर आत्मरतीवाद म्हणजे

स्वतःच्या प्रेमात पडून आंधळा झालेला. स्वतःबद्दल खूप उच्च भावना असणे व त्याचबरोबर इतरांना तुच्छ लेखणे, पराकोटीचा अभिमान, गर्व व अहंकार असणे हे सर्व स्वभाव गुण आत्मरतीवाद म्हणून ओळखले जातात. नार्सीसीजम जास्त प्रमाणात असल्यास असे लोक स्वतःचेे खरे करणे, असत्य बोलणे, उर्मटपणे वागणे असे करतात.

दुसरा आहे मायकेवॅलीयनीजम. याला आपण मराठीमध्ये धूर्त, कावेबाज किंवा पाताळयंत्री असे शब्द वापरू शकतो. हा स्वभाव असलेले लोक फसवे असतात. नीतिमत्ता, सदाचरण, नैतिकता याचा अभाव असणारे. मायकेवॅलीयनीजम जास्त प्रमाणात असल्यास असे लोक

स्वतःकडे सत्ता किंवा अधिकार  केंद्रित करून ठेवतात. असे लोक क्रूरपणे व्यवस्थापन करतात व अतिशय धूर्तपणे परिस्थिती हाताळतात. तिसरा आहे सायकोपॅथी. समाजविरोधी स्वभाव, सहानुभूती व पश्चाताप यांचा अभाव, निर्भिडपणे व्यक्त करणे म्हणजे सायकोपॅथी.

हे तीनही स्वभाव गुण जर एकाच व्यक्तीमध्ये असतील तर ती व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असण्याची शक्यता जास्त असते.  असे लोक गुन्हे करणे, समाजात तेढ निर्माण करणे, संस्थेत अडचणी निर्माण करणे, असे करू शकतात. हे लोक संघटनेत उच्च पदांवर असल्यास जास्त त्रासदायक ठरू शकतात.

गुन्हेगारांच्या मेंदूमध्ये काही साम्य असते का? आपल्या मेंदूचे दोन भाग असतात. मनुष्याच्या उत्क्रांतीमध्ये मेंदूची रचना बदलत गेली. माकडाचा मेंदू आणि मनुष्याच्या मेंदूचा काही भाग समान आहे कारण आपली उत्क्रांती माकडांपासून झाली. मेंदूच्या या जुन्या भागात काही पेशी असतात ज्यांना मिरर न्यूरॉन म्हणतात. समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घ्यायला या पेशी उपयोगी पडतात. एखादी कृती न करता ती कृती केली असता कसे वाटेल हे आपण अनुभवू शकतो ते या मिरर न्यूरॉन पेशींमुळे.

दुसर्‍याच्या पायाला काटा टोचला तर तो काय अनुभवतोय हे आपण जाणवू शकतो. याला आपण सहानुभूती असे म्हणतो. दुसर्‍या व्यक्तीसह आपण त्याच्या परिस्थितीची अनुभूती घेतो ती सहानुभूती.

डार्क ट्रायेडमधील तिसरा स्वभाव म्हणजे सायकोपॅथी जर जास्त असेल तर सहानुभूतीचा अभाव असतो. या व्यक्तींच्या मेंदूमध्ये मिरर न्यूरॉन पेशी कमी असतात. निर्दयीपणे गुन्हे करणार्‍या लोकांच्या मेंदूमध्ये मिरर न्यूरॉनचा पूर्ण अभाव असू शकतो.

डार्क ट्रायेडमधील हे स्वभाव आपल्या भोवतालच्या लोकांमध्ये आहेत का, ते तुम्ही आता शोधू शकता. तसेच इतिहासातील हिटलर, स्टॅलिनसारख्या व्यक्तींच्या बाबतीत हे किती खरे आहे, तेही पडताळून पाहू शकता. एका अभ्यासात असे लक्षात आले की, रात्री जागरण करणे पसंत करणार्‍या लोकांमध्ये डार्क ट्रायेड स्वभाव गुण जास्त प्रमाणात असतात. सकाळी लवकर उठणार्‍या लोकांमध्ये हे अवगुण कमी असतात.

नगर : शहरात ख्रिसमस साजरा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील विविध चर्चमध्ये ख्रीसमस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम, संदेश देणे आदी कार्यक्रम घेण्यात आले.

शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त सुशोभीकरण करण्यात आले होते. विद्युत रोषणाईने चर्चच्या इमारती सजल्या होत्या. शहरात चांदणीच्या आकाराचे आकाशदिवे लावण्यात आले होते. मंगळवारी रात्री बारा वाजता नाताळ सुरू होताच शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ख्रिश्चन बांधवांच्या घरोघरी आणि सकाळपासून चर्चमध्ये शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. विविध पक्षाच्या नेत्यांनी चर्चला भेटी देऊन ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा दिल्या.

विविध चर्चमध्ये सकाळी प्रार्थना, धर्मगुरूंचे संदेश हे कार्यक्रम झाले. यासाठी ख्रिश्चन बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये तरुणांचा व महिलांचा समावेश मोठा होता. दिवसभर शहराच्या मध्यभागात, सावेडी उपनगरात नाताळ उत्साहात साजरा झाला.