Tuesday, May 5, 2026
Home Blog Page 13302

श्रीगोंद्यात अनधिकृत सावकारांचे फुटले पेव

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

महिन्याला 15 ते 20 टक्के वसुली

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – श्रीगोंदा गाव तसे निमशहरी असल्याने फारसे उद्योग, व्यवसाय नसले तरी नौकरदार, छोटे व्यावसायिक आणि शेतकरी असलेल्या श्रीगोंद्यात सध्या अनधिकृत सावकाराचे पेव फुटले असून ज्यांना बँका, पतसंस्थांमध्ये कर्ज मिळत नाही असे अनेक तरुण आपल्या गरजा भागवण्यासाठी या अनधिकृत सावकारांच्या दारात व्याजाने पैसे घेण्यासाठी मध्यस्था मार्फत जात आहेत. ही अनधिकृत सावकारकी करणारे तथाकथित राजकीय वलय असलेले पुढारपण करत असून त्यांच्याविरोधात तक्रारी होत नसल्याने अव्वाच्या सव्वा व्याज चुकते करणारे अनेक जण शहरात व्यथित जीवन जगत आहेत.

श्रीगोंदा शहरात मोठे उद्योग, व्यवसाय नाहीत. कुठली औद्योगिक वसाहत नसल्याने सर्वच तरुणाच्या हाताला काही काम मिळत नाही. शहरातून शेजारी शिरूर, पुणे, दौंडकडे कामासाठी जावे लागते. सर्वच जणांना हे शक्य नसल्याने शहरात अनेक तरुण छोटे मोठे व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायात आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी अनेक वेळा बँक, पतसंस्थांकडे कर्ज घ्यावे लागते. हे कर्ज काहींना उपलब्ध होते; मात्र अनेक जणांना कुठली पत नसल्याने सहज कर्ज उपलब्ध होत नाही. अशी परिस्थिती असल्याने आपली गरज पूर्ण करण्यासाठी कुणापुढे तरी हाथ पसरावे लागत असतात.

शहरात अशाच प्रकारे व्यावसायिक, कामगार, नोकरदार, शेतकरी, बेरोजगार तरुण यांपैकी अनेकांना आर्थिक गरज पडते. अशा वेळी त्यांचा आर्थिक प्रश्न बँक, पतसंस्था मधून सुटत असली तरी सगळ्यांना कर्ज मिळतेच असे नाही. यापुढे जाऊन ऐनवेळी कुणी कर्ज देते असेही नसल्याने तातडीने पैसे उपलब्ध होण्यासाठी अनेक वेळा खाजगी सावकारांच्या दारात जावे लागते.

शहरात असे कर्ज देणारे अनेक जण आहेत. त्यांच्याकडे कुठला परवाना नाही; मात्र ऐन वेळी कुणाच्या तरी मध्यस्थीने पैसे दिले जात असले तरी एक महिन्यासाठी 15 ते 20 टक्के याप्रमाणे सावकार पैसे देत आहेत. कर्जापेक्षा व्याज जास्त होत असल्याने अनेक तरुण या ओझ्याखाली दबले आहेत.

इथे करा तक्रार
शहरात अनेक जण बेकायदेशीर सावकाराच्या ओझ्याखाली दबले असून वेळेत घेतलेले पैसे देता आले नसल्याने वेळप्रसंगी त्यांच्याकडून घेतलेले धनादेश बँकेत भरून ते परत आल्यावर अनेकांना कोर्टात खेचले जात आहे. अशा ओझ्याखाली दबलेल्यानी सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तसच पोलीस स्टेशनला आपली कैफियत पुराव्यानिशी द्यावी.

कर्जापेक्षा व्याज झाले डोईजड
शहरात अडीचणीच्या वेळी घेतलेले अनधिकृत सावकाराचे पैसे वेळेत परत देता न आल्याने या पैशाचे व्याज हे मुद्दलाच्या दुप्पट होत असून हे पैसे फेडता आले नसल्याने अनेक जण तरुण तणावात आहेत.

डॉ.जितेंद्र ठाकुर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

धुळे  – 

शिरपूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका प्रभारी डॉ. जितेंद्र युवराज ठाकुर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला असून ते दि. 12 डिसेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये समर्थकांसह प्रवेश करणार आहेत.

त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणार आहे. तसेच जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळकटी मिळणार आहे. आगामी जि.प, पं.स निवडणुकीत याचा  राष्ट्रवादीचा फायदा होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने डॉ. जितेंद्र ठाकुर नाराज झाले. त्यामुळे त्यांनी पद आणि पक्षाचा राजीनामा देवून अपक्ष उमेदवारी केली. त्यानंतर आगामी जि.प, पं.स निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी विकास आघाडीची घोषणा केली.

त्यामुळे डॉ. ठाकुर कोणत्या पक्षात जातील, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. अखेर त्यांनी समर्थकांच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा कल व वरिष्ठांशी चर्चा करून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहिर केले.

त्यानुसार डॉ. जितेंद्र ठाकुर हे दि. 12 डिसेंबर रोजी निवडक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तथा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.

डॉ. ठाकुर यांना राष्ट्रवादीकडून पद देखील मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणार असून जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह शिरपूर पंचायत समितीच्या निवडणुकीत रंगत येणार आहे.

सारंगखेडा येथील यात्रोत्सवास आजपासून सुरुवात

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

सारंगखेडा  – 

सारंगखेडा येथील महानुभाव संप्रदायाचे प्रमुख श्रध्दास्थान असलेल्या एकमुखी दत्ताच्या यात्रेला उद्या दि. 11 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे.  उद्या दहा हजार भाविकांच्या उपस्थितीत सायंकाळी 7 वाजता महाआरती करण्यात येणार आहे.

प्रशासनातर्फे यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त भरणार्‍या घोडे बाजारात आतापर्यंत दोन हजार पाचशे घोडे दाखल झाले आहेत. त्यापैकी 40  घोडयांची विक्रीतून 25 लाख रुपयांची उलाढाल झालेली आहे. यंदाच्या अश्व बाजारात लाखो रुपयांचे घोड्यांचे आकर्षण ठरणार राहणार आहे.

जातीवंत घोडयांचा बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील यात्रेची  व चेतक फेस्टिवलची महिन्याभरापासून तयारी सुरु होती. येथील चेतक फेस्टिव्हल समिती, ग्रामपंचायत , पोलीस प्रशासन, विज वितरण कंपनी, महसुल विभाग, शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती, दत्त मंदिर संस्थान यांनी यात्रेचे नियोजन केले आहे.

यात्रेत संसारोपयोगी साहित्य विक्रीसह इतर व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. याशिवाय मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करणारे कलावंतही दाखल झाले आहेत. यंदा प्रथमच अहमदाबाद येथील अत्याधुनिक झुले येथे दाखल झाले आहेत. मौत का कुवा मध्येही बदल झाला असून या कुव्यात बुलेट फिरविण्यात येणार आहेत. त्यामुळे मनोरंजनाचा साधनामध्ये लक्षवेधी झुाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

महाआरती होणार

येथील दत्त मंदिरापासून उद्या दि.11 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास दत्त मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी दहा हजार भाविकांच्या उपस्थितीत महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच वेळी हजारावर भाविकांच्या हातात प्रज्वलित दिवे असतील. त्याद्वारे आरती होणार आहे.  त्यासाठी श्री दत्त मंदिर संस्थानतर्फे नियोजन करण्यात करण्यात येत आहे.

दत्त मंदिर संस्थानतर्फे तयारी पूर्ण

दत्त मंदिर संस्थानतर्फे तयारी पूर्ण झाली आहे . भाविकांना प्रवेशासाठी बॅरिकेट्स करण्यात आले आहेत. भाविकांना गैरसोय होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मंदिरात दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होते. त्यासाठी वेगवेगळे बॅरिकेट्स लावण्यात येणार आहेत.

मंदिराच्या गाभार्‍यात दर्शनासाठी भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात येईल. नारळ वाढविण्यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था केली आहे. मंदिर आवारात असलेल्या दक्षिणेकडील विश्रामगृहात पोलीस कर्मचार्‍यांची राहण्यासाठी व्यवस्था केली आहे. यात्रा काळात भाविकांच्या सुरक्षितेवर लक्ष ठेवण्यासाठी दहा सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वीत करण्यात आले आहेत.

महामार्गावर लूट करणार्‍या 10 जणांच्या मुसक्या आवळल्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

चाकण पोलिसांची कामगिरी; टोळीत राहुरीचे तीन तर पाथर्डीच्या एका आरोपीचा समावेश

राहुरी (प्रतिनिधी) – राज्यमार्गावर एलईडी, वॉशिंग मशीन लुटणार्‍या 10 जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात चाकण पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात रस्तालुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या टोळीत नगर जिल्ह्यातील राहुरीच्या तिघांचा तर पाथर्डीच्या एका आरोपीचा समावेश आहे.

गेल्या 27 नोव्हेबर रोजी रात्री रांजणगाव ता. शिरूर, येथील हायर कंपनीचे वॉशिंग मशीन व एलईडी टीव्ही भिवंडी, मुंबई येथून चाकण-शिक्रापूर रोडने घेऊन जाणार्‍या कंटेनरला अज्ञात लुटारूंनी टेम्पो आडवा लावला. कंटेनर चालकाचे हातपाय बांधले व तोंडात बोळे कोंबून त्याला निर्जन ठिकाणी नेले. तो कंटेनर खाली करून त्याला मारहाण करून कंटेनर तळेगाव येथे सोडून देण्यात आला होता. याबाबत चाकण पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. 1450/2019 भादंवि कलम 395, 120(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेची चाकण पोलिसांनी अतिशय शिताफीने उकल केली. या घटनेत कट रचून आरोपी माधव रोहिदास गिते (वय 22, रा. युवराज गुजर यांच्या रूममध्ये भेदणकरवाडी ता. खेड जि. पुणे मुक्काम रा. सोमठाणा ता. कंधार जि. नांदेड), मंगेश काकासाहेब शिंदे (वय 26, रा. खडकी जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), प्रदीप उर्फ ज्योतीराम जालिंदर देशमुख (वय 30, रा. खडकी जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), गणेश शांताराम राक्षे (वय 30, रा. राक्षेवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे), जमराम रामनाथ तनपुरे, कृष्णा उर्फ राहुल एकनाथ धनवटे (रा. राहुरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर), संदीप उर्फ अण्णा रावसाहेब धनवटे (वय 43, रा. राहुरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर), राजेश महादेव बटुळे (वय 34, ह. रा. किरण येळवंडे यांची खोली, निघोजे, ता. खेड, जि. पुणे, मु. रा. भारजवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) प्रवीण शंकर पवळे (वय 23, रा. राक्षेवाडी, ता. खेड, जि. पुणे), बबुशा उर्फ बाबाजी ज्ञानेश्वर नाणेकर (रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी रस्तालुटीचा कट केला असल्याची गोपनीय खबर सपोनि गायकवाड, पोहेकॉ हिंगे, पोना गायकवाड, पो. शिपाई वर्पे यांना मिळाल्याने त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. या आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. यातील बबुशा नाणेकर हा पसार झाला आहे.

अटकेत असलेल्या आरोपींकडे केलेल्या तपासात आरोपींनी या गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल मौजे राक्षेवाडी चाकण येथील निर्जन जंगलात लपवून ठेवला असल्याने या मालाचा शोध घेऊन 33 लाख 65 हजार रुपये किमतीचे वॉशिंग मशीन व एलईडी टीव्ही संच हस्तगत करण्यात आले आहेत.

आरोपींकडे अधिक तपास केला असता यातील आरोपी राजेश महादेव बटुळे (मु.रा. भारजवाडी, ता. पाथर्डी, जि. नगर) याने त्याचे साथीदार विशाल भोसले, नितीन भोसले, अजय उर्फ पप्पू भोसले यांच्या मदतीने मौजे कुरुळी, ता. खेड गावाच्या हद्दीतून एमआरएफ कंपनीचे सुमारे 4 लाख 80 हजार रुपये किमतीचे टायर चोरून नेले आहेत. त्याबाबत महाळुंगे पोलीस चौकी (चाकण पोलीस स्टेशन) गुन्हा रजि. नंबर 1141/2019 भा. दं. वि. कलम 379 प्रमाणे दाखल असून या गुन्ह्यातील 4 लाख रुपये किंमतीचे 30 ट्रॅक्टरचे टायर जप्त करण्यात आले आहेत.

मौजे सुदुबरे, ता. मावळ, जि. पुणे गावाच्या हद्दीतील महिंद्रा कंपनीच्या पार्किंगमधून एक लाख 80 हजार रुपये किमतीच्या एक्साईड कंपनीच्या बॅटर्‍या चोरून नेल्या आहेत. याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 159/2019 नुसार भा. दं. वि. कलम 379 प्रमाणे दाखल असून आरोपींकडून एक लाख 80 हजार रुपये किंमतीच्या बॅटर्‍या जप्त करण्यात आल्या आहेत. मौजे पॉइंट येथील महाराष्ट्र बँक फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत चाकण पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. 1104/2019 नुसार भा. दं. वि. कलम 457, 380, 511 प्रमाणे दाखल असून या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींकडून एकूण चार गुन्ह्यांतील 46 लाख 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप विष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पो. नि. कल्याण पवार, सहयक पो. नि. विक्रम गायकवाड, पो. उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोहेकॉ सुरेश हिंगे, पोना संजय जरे, वीरसेन गायकवाड, हनुमंत कांबळे, संदिप सोनवणे, पो. शिपाई निखील वर्पे, प्रदीप राळे, नितीन गुंजाळ, अशोक दिवटे, मनोज साबळे, मच्छिंद्र भांबुरे यांनी केली. गुन्ह्याचा तपास सहायक पो. नि. विक्रम गायकवाड करीत आहेत.

अर्थव्यवस्था सक्षम; लवकरच मंदीतूनही मिळणार मुक्ती

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांची ‘देशदूत’शी बातचीत 

जळगाव  – 

भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्व मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेइतकीच सक्षम आहे. जगभर सुरु असलेला जागतिक मंदीचा फटका भारताला बसला असला तरी त्यामागे अनेक स्थानिक कारणे आहेत. मात्र, येत्या चार ते पाच महिन्यात भारताची अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर पडेल, असा विश्वास भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतिश मराठे यांनी ‘दैनिक देशदूत’शी बोलताना व्यक्त केला.

मंगळवारी सहकार भारतीतर्फे जैन हिल्स येथे घेण्यात आलेल्या सहकारी बॅकांच्या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी मराठे जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी देशदूतशी बातचीत केली. ते म्हणाले की, अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या ट्रेड वॉरचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये सध्या मंदीचे सावट आहे. युरोपीयन देश हे भारताचे मुख्य ट्रेडींग पार्टनर होते. मात्र, या देशांमध्ये निर्माण झालेला फडिंग गॅप हा देखील अर्थव्यवस्थेवर परिणाम करत आहे.  बांधकाम व्यवसायासह वाहन

उद्योगाला सर्वाधिक मंदीचा फटका बसला आहे. पुढील पाच ते सात वर्षाच्या मागणी इतकी घरे आताच तयार आहेत. मात्र, उठाव नसल्याने मंदीच्या सावटाखाली असलेल्या बांधकाम व्यवसायाची परिस्थिती पुढचे काही काळ देखील अशीच राहण्याची शक्यता आहे. शहरा-शहरांमध्ये निर्माण झालेली पार्किंगची समस्या आणि कोणत्याही प्रवासासाठी भाडे तत्वावर तात्काळ उपलब्ध होणारी ओला-उबेर सारखी वाहतूक व्यवस्था यामुळे चारचाकी घेण्याकडील ग्राहकांचा कल देखील मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

मागणीच नसल्याने विक्री मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे मुलभूत अर्थव्यवस्था मजबूत असतानाही मंदीचे चटके सहन करावे लागत आहेत. आवक कमी होऊन निर्यात वाढली असली तरी अर्थव्यवस्थेला योग्य ती चालना मिळत नसल्यामुळे मंदीचे परिणाम दिसत आहेत.

आणखी पाच ते सहा महिन्यात अर्थव्यवस्थेला गती मिळून परिस्थिती नक्की सुधारणार आहे. असा विश्वासही श्री. मराठे यांनी यावेळी व्यक्त केला.  रिझर्व बँकेच्या स्वायत्ततेला कोणताही धोका नसून रिझर्व बँक पुर्णपणे स्वायत्त आहे. असा दावाही त्यांनी केला. जगात भारताची अर्थव्यवस्था पुर्णपणे मजबूत आहे.

म्हणूनच पाच टक्के विकासदर असलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. नैसर्गिक संकटे सहन करायला शिकण्यासोबतच  उद्योजकांनीदेखील सर्वच बाबतीत  सरकारवर विसंबून राहणे टाळायला हवे. सरकारनेही ट्रेड अ‍ॅन्ड टेरिफ पॉलिसी नव्याने तयार करून छोट्या-छोट्या गोष्टी आयात न करता त्या देशातच कशा निर्माण करता येतील याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

विमा सरंक्षण वाढवणे गरजेचे

ठेवीवर सध्या एका लाखापर्यंतच विमा सरंक्षण दिले जाते. त्यात वाढ करणे गरजेचे आहे. यामुळे ठेवीदारांच्या मनाती भीती दूर होऊन बँकींग व्यवस्थेवर त्यांचा विश्वास अधिक  वाढले.

महाराष्ट्र, पंजाब बँकेचे प्रकरण हे संचालकांनी केलेले दुर्लक्ष, लेखापरीक्षकांकडून अपहारावर टाकलेले पांघरुन यामुळे घडला आहे. यासंदर्भात माहिन्याभरात अहवाल मिळणार असल्याचे श्री.मराठे यांनी सांगितले.

‘डॉ.तनपुरे’च्या कामगारांचे थकीत पगारासाठी 17 पासून उपोषण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर)- एकेकाळी राहुरी तालुक्याची कामधेनू म्हणून लौकिक असणार्‍या डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना कर्मचार्‍यांचे मागील संचालक मंडळाच्या काळात 90 कोटी व नवीन संचालक मंडळाच्या काळातील 17.50 कोटी रुपये थकले असूनही थकीत रक्कम मिळावी, म्हणून येत्या 17 तारखेपासून उपोषण करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

याबाबत सुमारे 248 कामगारांच्या सह्या असलेले निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले, डॉ. तनपुरे कारखाना सुरू झाल्यानंतर परिवर्तन मंडळाने कामगारांना केवळ अत्यल्प अग्रिम देऊन काम करून घेतले. कारखाना सुरू असताना पद्मश्री विखे कारखाना व गणेश कारखान्याचे कामगार आणून त्यांना पूर्ण पगार व ग्रॅच्युईटी फंड देण्यात आले. सत्ताधारी संचालक मंडळाने सत्ता घेतल्यापासून कामगारांचे 17.50 कोटी रुपये थकविले असून त्यासाठी सर्व कामगार तनपुरे कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर 17 डिसेंबर रोजी उपोषण करणार आहेत.

डॉ. तनपुरे कारखान्याची सत्ता मिळण्यापूर्वी खा. डॉ. सुजय विखे यांनी कामगार व सभासदांना 100 कोटी रुपये उपलब्ध करीत कारखान्याचे सभासद व कामगारांची देणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सर्वांनी विश्वास ठेवत परिवर्तन मंडळाला कारखान्यामध्ये एकहाती सत्ता दिली. सत्ताधारी परिवर्तन मंडळाने सन 2017-18 व सन 2018-19 साली कारखान्याचा गाळप हंगाम सुरू केला. त्यासाठी कामगारांनी मोलाची साथ दिली. कामगारांना सत्ताधारी परिवर्तन मंडळाने अत्यल्प अग्रिम देऊन काम करून घेतले. कामगारांनी 1 ऑगस्ट 2017 पासून ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले.

कामगारांना या काळात अत्यल्प अग्रिम देण्यात आले. त्याउलट या काळात गणेश कारखाना व पद्मश्री विखे कारखान्याच्या कामगारांनी तनपुरे कारखान्यामध्ये काम केले. त्या कामगारांचे वेतन प्रॉव्हिडंट फंडासह अदा करण्यात आले. परंतु तनपुरे कारखान्याच्या कामगारांचे वेतन व प्रॉव्हिडंट फंड देण्यात आले नाही. तसेच सेवानिवृत्त कामगारांचेही प्रॉव्हिडंट फंड जमा करण्यात आले नाही. व त्या संचालक मंडळाच्या काळातील कामगारांचे वेतन 9 कोटी रुपये, त्यावरील प्रॉव्हिडंट फंड 2.5 कोटी व सेवानिवृत्त कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड रक्कम 6 कोटी असे एकूण 17.50 कोटी रुपये थकीत झाले असल्याची माहिती कामगारांनी दिली आहे.

यासाठी खा. डॉ. सुजय विखे व संचालक मंडळाची कामगारांनी वेळोवेळी भेट घेतली. परंतु सत्ताधारी संचालक मंडळाने कामगारांकडे दुर्लक्ष केले. असा आरोप कामगारांनी केला आहे. संचालक मंडळाने सन 2019-20 चा गळीत हंगाम बंद ठेवत कामगारांना ले ऑफ देण्याचा निर्णय घेतला. कार्यकारी संचालक यांच्या तोंडी आदेशाने फलकावर ले-ऑफची माहिती ऐन दिवाळी सणापूर्वी देण्यात आली. यामुळे कामगारांची काळी दिवाळी साजरी झाली. यामुळे जिल्हाधिकारी यांनी कामगारांच्या मागणीची दखल घ्यावी, कामगारांचे थकीत वेतन व प्रॉव्हिडंट फंड अदा करण्यात यावे या मागणीसाठी समस्त कामगार तनपुरे कारखाना कार्यस्थळावर उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे कामगारांनी जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे.

समस्त कामगार वयोवृध्द असून उपोषण काळात कामगारांच्या प्रकृतीचे बरे वाईट झाल्यास सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असाही इशारा देण्यात आलेला आहे. याबाबाबत सत्ताधारी संचालक मंडळ काय निर्णय घेते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

कर वसुलीच्या कामातही राजकीय हस्तक्षेप

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

महापालिका प्रशासन हवालदिल : कर्मचार्‍यांनाही नोटीस काढून तंबी

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या कर वसुलीमध्ये कठोर कारवाई सुरू केल्यामुळे एकीकडे वसुलीचे प्रमाण वाढत असतानाच आता कठोर कारवाई होऊ नये म्हणून राजकीय दबाव येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी महापालिका कर्मचार्‍यांनाही त्यांच्या मालमत्तेचा कर 15 दिवसांत जमा करण्याची नोटीस दिली आहे.

महापालिकेच्या थकीत कराची रक्कम जवळपास 285 कोटींच्या घरात आहे. त्यातील काही रक्कम न्यायप्रविष्ट आहे. मात्र न्यायप्रविष्ट नसलेल्या कराची रक्कम देखील मोठी आहे. त्याच्या वसुलीसाठी यापूर्वी शास्तीमाफीसारख्या योजना आणण्यात आल्या. मात्र वसुली होताना दिसत नाही. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार कर्मचार्‍यांनी जप्ती, नळजोड तोडणे अशी कारवाई हाती घेतली. शहरातील व्यावसायिकांकडे विशेषतः गाळेधारकांकडे मोठ्याप्रमामात थकीत रक्कम आहे. अनेकदा नोटिसा देऊनही गाळे धारकांकडून कर जमा केला जात नाही. मात्र महापालिकेने आता जप्तीची कारवाई हाती घेतल्याने गाळेधारकांमध्ये घबराट आहे. त्यांनी महापालिकेसमवेत चर्चा करण्याऐवजी थेट राजकारण्यांना जवळ करण्यास सुरुवात केली आहे.

जप्तीची कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे त्यांनी राजकारण्यांना घालायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे राजकारण्यांनीही यासाठी महापालिका प्रशासनावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. गाळेधारकांना हप्ते पाडून देण्याचे सांगण्यात आले. यापूर्वी गाळेधारकांनी दरमहा 15 हजार रुपये जमा करण्याचे मान्य केले होते. त्यापैकी अनेकांनी ते पाळले नाही. पुन्हा हप्ते पाडून दिल्यानंतर त्याची नियमित अंमलबजावणी होईलच, याची खात्री प्रशासनाला नाही. मात्र गाळेधारकांवर कठोर कारवाई केल्यास इतर कोणत्याही कारणावरून महापालिकेवर मोर्चा आणणे, अधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या देणे असे प्रकार होण्याचीही शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. प्रशासनाने कठोर भूमिका कायम ठेवल्यास महापालिकेत आंदोलने झाले तर नवल वाटायला नको.

दुसरीकडे कर वसुलीची मोहीम तीव्र करताना जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त द्विवेदी यांनी महापालिका कर्मचार्‍यांनाही झटका दिला आहे. त्यांच्या मालकीच्या किंवा वारसाने मिळालेल्या किंवा वारसाच्या नावावर असलेल्या मालमत्तांचा कर कर्मचार्‍यांनी जमा करण्याचे आदेश काढले आहेत. त्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत सर्व कर्मचार्‍यांनी आपल्याकडील मालमत्तांची माहिती आस्थापना विभागाकडे द्यावयाची आहे. त्या मालमत्तांवरील थकीत कर पंधरा दिवसात जमा करावयाचा आहे.

एकाचवेळी सर्व रक्कम जमा करणे शक्य नसल्यास वेतनातून त्याची कपात करण्यात येणार आहे. त्यासाठी किती रकमेचा हप्ता ठेवायचा, याची माहितीही कर्मचार्‍यांनी द्यावयाची आहे. झेंडीगेट प्रभाग समितीमध्ये कराची थकबाकी असलेले 130 कर्मचारी आहेत. एकाच समिती कार्यक्षेत्रात एवढे कर्मचारी असतील, तर इतर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील कर्मचार्‍यांची अवस्था काय आहे, याचीही माहिती संकलित करण्याचे आदेश द्विवेदी यांनी दिले आहेत.

कोचिंग क्लासच्या वर्गांना सील
बुरूडगाव रस्ता प्रभाग समितीअंतर्गत येणार्‍या ज्ञानसागर कोचिंग क्लासच्या बच्चुभाई पुजारा यांच्याकडे मालमत्ताकराची 15 लाख 37 हजार 469 रुपये अधिक शास्तीची रक्कम थकीत आहे. वारंवार नोटीस देऊनही कर जमा न केल्यामुळे या मालमत्तेच्या पाच खोल्यांना सील करण्यात आले. प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांच्या नेतृत्त्वाखाली एस. एस. पुंड़, व्ही. जी. जोशी, राजेंद्र म्हस्के, विजय चौरे यांनी ही कारवाई केली.

पवार, जपे, शेवाळे, पठाण, उंडे यांचा शिक्षक पुरस्काराने गौरव

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मालनताई ढोणे : महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका शिक्षण विभागाच्यावतीने मनपा व खाजगी प्राथमिक शाळेतील गुणवंत शिक्षकांना महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. तर सेवानिवृत्त शिक्षक व आयएसओ मानांकन मिळवणार्‍या शाळेच्या मुख्यध्यापकांसह शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

माउली संकुल सभागृहात झालेल्या शिक्षकांच्या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर मालनताई ढोणे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, उपसभापती सुवर्णा गेनाप्पा, नगरसेवक मनोज कोतकर, मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण, डी. आर. कुलकर्णी, वसंत म्हस्के, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ ठोंबरे, सचिव विठ्ठल उरमुडे, शहराध्यक्ष पारुनाथ ढोकळे, अरविंद गोरेगावकर आदींसह शालेय शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रशासन अधिकारी सुभाष पवार यांनी केले. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे म्हणाल्या, आयएसओ मानांकन मिळवून महापालिकेच्या शाळा आपली गुणवत्ता सिध्द करीत आहे. समाजाचा व देशाचा पाया शिक्षक आहे. शिक्षक युवकांना दिशा देण्याचे कार्य करतात. शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडत असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते मीना पवार (बाई इचरजबाई फिरोदिया), योजना जपे (समर्थ विद्या मंदिर), सुनिता शेवाळे (महाराष्ट्र बालक मंदिर), निलोफर पठाण (मनपा शाळा क्र.17), शेखर उंडे (पंचशील विद्या मंदिर) या पाच शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.अमोल बागुल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर सेवानिवृत्त शिक्षकांसह आयएसओ मानांकन प्राप्त करणारे ओंकारनगर मनपा शाळा क्रमांक 2, रिमांड होम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा शाळा क्रमांक 4 या शालेय शिक्षकांचा सत्कार झाला.

अखेर साईबाबांचा ‘तो’ वादग्रस्त फलक बसस्थानकातून हटविला

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

वादग्रस्त फलक लावण्यामागाचा उद्देश काय? शिवसेनेचे बसस्थानकात आंदोलन

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- शिर्डी येथील बसस्थानकावर साईबाबांच्या जन्मभूमीचा फलक लावल्याने त्या वादाला नव्याने तोंड फुटले आहे. हा वादग्रस्त फलक तातडीने काढण्यात यावा म्हणून काल शिवसेना आक्रमक झाली होती. याबाबत त्यांनी शिर्डी बस डेपो व्यवस्थापकांना निवेदन देऊन हा बोर्ड हटविला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर काही वेळातच बस डेपो व्यवस्थापकांनी हा बोर्ड हटविला आणि या वादावर पडदा टाकला.

साई समाधी शताब्दी वर्षानिमित्ताने उद्घाटन समारंभाप्रसंगी राष्ट्रपती शिर्डी येथे आले असता त्यावेळी त्यांच्या वक्तव्यातून साईबाबांच्या जन्मभूमीबद्दल जो वाद निर्माण झाला होता त्यामुळे शिर्डीसह राज्यात तसेच देशात भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली होती; परंतु राष्ट्रपतींना भेटून संवाद संपुष्टात आला होता. त्यास वर्ष दीड वर्षे उलटत नाही तोच शिर्डी बसस्थानकात साईबाबांच्या जन्मभूमीचा फलक लावून पुन्हा वाद निर्माण होण्याचा प्रयत्न चालविला आहे. शिर्डी आगाराचा हा वादग्रस्त फलक लावण्यामागे नेमका काय उद्देश असावा याबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे. या वादग्रस्त फलकाच्या विरोधात काल शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली.

दरम्यान शिर्डी येथील बसस्थानकात साईबाबांची जन्मभूमी पाथरी येथे जाण्यासाठी बसचे वेळापत्रकाचा चौकशी कक्षाच्या खिडकीवर फलक लावल्याने साईभक्त संभ्रमात पडले. बसच्या वेळा विचारण्यासाठी जाणार्‍या प्रत्येक भाविकांच्या नजरेसमोर हा फलक येत असल्याने काही भाविकांनी पाथरी गावांबाबात विचारपूस सुरू केली आहे. सदर फलकाबाबत साईबाबा संस्थान काय कारवाई करते तसेच शिर्डी ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे लक्ष वेधले आहेत. दरम्यान साईसमाधी शताब्दी महोत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी शिर्डीत झालेल्या कार्यक्रमात महामहीम राष्ट्रपती यांनी साईबाबांच्या जन्मस्थळा संदर्भात पाथऱी गावाचा उल्लेख केल्याने साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

यामुळे नव्या वादाला तोंड फुटल्याने याबाबत शिर्डीतील भाजप-शिवसेना पदाधिकार्‍यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन चर्चा केली होती. यावेळी त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि साईबाबांनी आयुष्यभर जपलेली सर्वधर्म समभावाची ओळख जपण्यास सहकार्य करावे अशी साईभक्तांची भावना आहे. यापूर्वी अनेकांनी साईबाबांचे जन्मस्थळ, जात किंवा आईवडील कोण होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आपण कोण आहोत हे साईबाबांनीच अखेरपर्यंत गोपनीय ठेवले आहे. साईबाबांच्या जन्मस्थळा संदर्भात कोठेही कोणताच उल्लेख नसताना बाबांचे जन्मस्थान म्हणून पाथरीची ओळख नको.

पाथरी गावाच्या विकास संदर्भात आमचे दुमत नाही मात्र साई बाबांचे जन्मस्थळावर शिक्कामोर्तब झाल्यास सर्वधर्म समभावाची ओळख पुसली जाईल असेही यावेळी नमूद करण्यात आले होते. मात्र या प्रकरणास वर्ष सरत नाही तोच शिर्डी येथील बसस्थानकात चौकशी कक्षाच्या बाहेरील मध्यवर्ती भागात साईबाबांची जन्मभूमी पाथरी अशा आशयाचे बसचे वेळापत्रक लावण्यात आले असून बसस्थानकात येणारे लाखो भाविक संभ्रमात पडले आहेत. या फलकामुळे पुन्हा एकदा साईबाबांच्या जन्मभूमीचा वाद चव्हाट्यावर येतो की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा फलक लावण्याचा उद्देश काय आहे आणी यामागचा हेतू काय आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.

काल सकाळी हा वादग्रस्त फलक हटविण्याबाबत शिवसेनेच्या वतीने बस आगारात जाऊन आंदोलन करण्यात आले होते. त्यांनी हा फलक हटविला नाही तर या आंदोलनाचे स्वरुप व्यापक होऊ शकेल असा इशारा देताच त्यांनी हा वादग्रस्त फलक तेथून हटविला.
यावेळी शिवसेना नेते कमलाकर कोते, विजयराव जगताप, तालुका प्रमुख संजय शिंदे, शहर प्रमुख सचिन कोते, शिवसेना ग्राहक कक्षाचे मुकुंद सिनगर, विठ्ठल पवार, अक्षय तळेकर, सुयोग सावकारे, अमोल गायके,जयराम कांदळकर, पुंडलीक बावके, सोमनाथ कोते, चंद्रकांत कोते, संजय मुदलीयार, रवींद्र सोनवणे, महेश महाले, दत्ता भालेराव, विश्‍वजित बागुल, विरेश गोंदकर, महेंद्र कोते, अनिल पवार आदी शिवसैनिक उपस्थित होते.

शिक्षण समितीच्या सदस्यांचा मासिक सभेतून वॉकआऊट

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जिल्हा परिषद : अधिकारी माहिती देत नसल्याने सदस्य संतप्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची मासिक सभा मंगळवारी पार पडली. या सभेत अधिकार्‍यांना विचारलेली माहिती मिळत नसल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी सभेतून वॉकआऊट करणे पसंत केले. बैठकीत कोपरगाव तालुक्यात पोलिसांनी पकडलेल्या शालेय पोषण आहाराचे वाहन शहरी की ग्रामीण भागातील यांची माहिती अखेरपर्यंत शालेय पोषण आहार अधीक्षकांना देता आली नाही.

जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी शिक्षण समितीची मासिक बैठक पार पडली. यावेळी सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, मिलिंद कानवडे, विमलताई आगवण, उज्ज्वला ठुबे उपस्थित होत्या. सभेच्या सुरुवातीला जिल्हा स्तरावरील पथक व तालुकास्तरावरून शाळा भेटींचे नियोजन करण्यात आले. गट शिक्षणाधिकारी आठवड्यात चार शाळा भेटी, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी आठवड्यात 6 शाळा भेटी व केंद्रप्रमुखांनी आठवड्यात 10 भेटींचे उद्दिष्ट देण्यात आले.

मात्र, त्यानंतर सदस्य परजणे यांनी कोपरगाव तालुक्यात पकडलेला शालेय पोषण आहाराचा ट्रक पोलीस ठाण्यात कसा पोहचला. हा ट्रक शहरी की ग्रामीण भागाचा याबाबत जिल्हा स्तरावरील पोषण आहार अधीक्षक यांना महिनाभरानंतर देखील माहिती देता आली नाही. यासह जामखेडचे गटशिक्षणाधिकारी यांना शाळा भेटीबाबत विचारण्यात आलेली माहिती देता आली नाही. सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी बदली झालेल्या शिक्षकांच्या सुनावणीनंतर दोन महिन्यांनी कारवाई कशासाठी, क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी न होणार्‍या शाळांवर कारवाई का केली नाही. केंद्र प्रमुखांच्या जागा रिक्त असून त्यावर कार्यवाही करणार आदी प्रश्‍न विचारले.

सभा संपण्यापूर्वी उपाध्यक्षा घुले आणि त्यानंतर सदस्य जालिंदर वाकचौरे सभेतून गेले. मात्र, त्यानंतर परजणे, कानवडे आणि ठुबे यांनी सभा चालवी. पण अधिकार्‍यांकडून उत्तरे मिळत नसल्याने त्यांनी सभेतून काढता पाय घेतला.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अभ्यासदौरा
शिक्षण आणि आरोग्य समितीच्या सदस्यांचा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अभ्यास दौरा होणार आहे. हा म्हैसूर, हैदराबाद या ठिकाणी होणार असल्याचे सांगण्यात आले. आधी दौर्‍यासाठी 23 डिसेंबर तारीख निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, नूतन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम समोर आल्याने हा दौरा आता पुढे ढकलण्यात आला आहे.

बहुदा शेवटची सभा
शिक्षण समितीच्या सभापती घुले यांची ही शेवटीची सभा ठरणार आहे. पुढील मासिक सभा येईपर्यंत जिल्हा परिषदेत नव्याने पदाधिकारी यांचे मंडल अस्तित्वात येणार आहे. यामुळे उपाध्यक्षपदी देखील नवीन व्यक्तीला संधी मिळणार असून यामुळे घुले यांची ही शेवटी सभा ठरणार आहे. मात्र, विद्यमान उपाध्यक्ष घुले यांना यापेक्षा मोठा पदावर संधी आहे. पदाधिकारी बदले तरी समितीचे सदस्य तेच राहणार आहेत.