Sunday, June 21, 2026
Home Blog Page 13456

नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके जानेवारीत

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

तिसरी आणि बारावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डिसेंबर महिनाअखेरपर्यंत हे काम अंतिम टप्प्यात येणार असून शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात नवीकोरी पुस्तके पडणार आहेत. येत्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात बारावीची सर्व विषयांची नवीन पुस्तके बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

पहिलीपासून बारावीपर्यंतची सर्व विषयांची पुस्तके बालभारती तयार करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून विषयतज्ज्ञांकडून नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या कोणत्या घटकांचा समावेश अभ्यासक्रमात असावा, याबाबत अभ्यास मंडळातील सदस्य चर्चा करत आहेत.

अभ्यासक्रमाचे काम डिसेंबर महिनाअखेरपर्यंत अंतिम टप्प्यात येणार आहे. त्यानंतर विषयतज्ज्ञ व राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रत्येकी दोन शिक्षकांसमोर नवीन अभ्यासक्रम ठेवला जाईल. पाठ्यपुस्तक निर्मितीच्या विविध प्रक्रियेतून सर्व विषयांची पुस्तके गेल्यानंतर ही पुस्तके छपाईसाठी दिली जातील.

इयत्ता बारावीच्या गुणांवर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. तसेच मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षा अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. नव्याने तयार होणार्‍या बारावीच्या पुस्तकांमध्ये या प्रवेशपूर्व परीक्षांना पूरक असणार्‍या घटकांचा समावेश केला जात आहे.

ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार करून पुस्तके तयार केली जात आहेत. विज्ञान व गणित या विषयांच्या पुस्तकांवर अधिक भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना कृतिपत्रिकेवर आधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इयत्ता तिसरीपेक्षा बारावीची पुस्तके बाजारात लवकर आणली जाणार आहेत.

बालभारतीकडून यंदा इयत्ता तिसरी व बारावीची नवीन पुस्तके तयार केली जात आहेत. विविध विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांकडून नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके उपलब्ध होतील, अशी माहिती बालभारतीच्या संचालकांनी दिली आहे.

राष्ट्रसेवा दलातर्फे उद्या अहिराणी जागर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मालेगाव । प्रतिनिधी

येथील राष्ट्रसेवा दलातर्फे विभागस्तरीय अहिराणी भाषेचा जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, रविवार (दि. ८) डिसेंबर रोजी या. ना. जाधव विद्यालयात होणार्‍या या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.सानेगुरूजींच्या आंतरभारती संकल्पनेनुसार नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आदी जिल्ह्यातील अहिराणी भाषिकांचा मेळावा व अहिराणी भाषेचा जागर करण्याचा निर्णय येथील राष्ट्रसेवा दलातर्फे घेण्यात आला आहे. हा संपुर्ण कार्यक्रम अहिराणी भाषेतच संपन्न होणार आहे.

रविवारी सकाळी ७.३० वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. पहिल्या सत्रात बागलाणचे अहिराणी साहित्यीक डॉ. सुधीर देवरे अहिराणी भाषेची सद्यस्थिती तर अहिराणी नाटककार बापूसाहेब हटकर हे अहिराणीचा संपुर्ण इतिहास या विषयावर मार्गदर्शन करतील. अध्यक्षस्थानी राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी उपस्थित राहतील.

कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात दुपारी २ ते ४ दरम्यान अहिराणी लोककलांचा जागर केला जाईल तर तिसर्‍या सत्रात ४ ते ५ दरम्यान अहिराणी भाषादिनाचा ठराव मांडण्यात येईल. धुळ्याचे ‘खान्देशनी वानगी’ वृत्तपत्राचे संपादक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप होईल. अहिराणी भाषेचा या जागर सोहळ्यात ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडणार असून त्यासाठी महिनाभरापासून सेवादल कार्यकर्ते नियोजन करीत आहेत. त्यासाठी पालखी समिती, भोजन समिती, उद्घाटन सत्र समिती, लोकजागर समिती, नोंदणी समिती, मंडप व व्यवस्थापन समिती, सत्कार समिती आदी समित्या तयार करण्यात आल्या आहेत.

शहरातील विविध संस्था-संघटना, समविचारी कार्यकर्ते व अहिराणीप्रेमी नागरीकांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले असून राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे, तालुका कार्याध्यक्ष विकास मंडळ, राज्यसचिव नचिकेत कोळपकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

कांदा 21 हजारांवर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

राहुरीत लाल कांद्याला 14 हजारांचा दर

राहुरी (तालुका प्रतिनिधी) – परतीच्या पावसाचा मोठा फटका हा शेतमालावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. कांद्याच्या पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून तेजीत असणार्‍या कांद्याच्या दरांनी पुन्हा एकदा वेग पकडला आहे. सध्याच्या घडीला कांद्याचे दर 210 रुपये प्रति किलो इतक्यांवर पोहोचले आहेत. मंगळवारी एक किलो कांद्यासाठी 80 रुपये मोजावे लागत होते. हेच दर अवघ्या काही दिवसांत क्विंटलमागे थेट द्विशतकाच्या पुढे पोहोचले आहेत. राहुरी बाजार समितीत 25 गोण्यांना 2100 रूपयांचा तर 33 गोण्यांच्या वक्कलला 20100 रूपयांचा दर मिळाला आहे. हा दर राज्यात आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारातही कांद्याचे दर लक्षणीयरित्य वाढले आहेत. दैनंदिन जीवनात स्वयंपाकामध्ये, विविध पदार्थ बनवतेवेळी कांद्याचा सर्रास वापर केला जातो. पण, आता मात्र कांद्याचे हे वाढलेले दर सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लावणार असंच चित्र आहे. मुळात अनेकांच्या खर्चाची आखणीही या वाढीव दरांमुळे बिघडली आहे. राहुरी बाजार समितीत एकूण कांद्याची आवक 3,296 गोणी झाली. त्यात गावरान कांद्याची आवक 714 गोणी होती.  काल निघालेले भाव असे-कांदा नं.1 -15000 ते 21000, कांदा नं.2 – 7500 ते 14995, कांदा नं. 3 – 1000 ते 7495. कांदा गोल्टी- 7000 ते 10000.

बाजारभाव व गोणी पुढीलप्रमाणे-
25 गोणी-रु. 21000, 33 गोणी- रु. 20100, 13 गोणी -रु. 20001 ते 20500,14 गोणी- रु. 19501 ते 20000, 14 गोणी- रु. 19001 ते 19500, 68 गोणी- रु. 17501 ते 18000, 61 गोणी- रु. 15501 ते 16000, 76 गोणी – रु. 14501 ते 15000.
लाल कांदा आवक 2,582 गोणी झाली. त्यात कांदा नं.1 -10500 ते 14500, कांदा नं.2 – 5000 ते 10495, कांदा नं.3 – 1000 ते 4995
कांदा गोल्टी- 5000 ते 7000 रूपयांचा दर मिळाला. 18 गोणी कांद्याला 14001 ते 14500 रूपयांचा दर मिळाला.

कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या
दिवशीही बाजार समित्यांचे व्यवहार सुरु

मुंबई – राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्या खरेदी-विक्रीची गैरसोय होऊ नये यासाठी बाजार समित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. बाजारपेठेत शेतमालाची घटलेली आवक पाहता कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सुटट्यांमुळे बाजार समित्यांचे व्यवहार बंद राहिल्यास ग्राहक आणि शेतकरी यांची गैरसोय होऊ शकते म्हणून शेतकर्‍यांना कांदा, बटाटा, टोमॅटो सुट्टीच्या दिवशीही बाजार समितामध्ये घेऊन येता यावे यासाठी सुट्टीदिवशीही बाजारसमित्यांचे व्यवहार सुरू राहणार आहेत.
ज्या जिल्ह्यामंध्ये कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतमालाचे उत्पादन आणि आवक जास्त आहे अशा जिल्हयातील सर्व बाजार समित्यांनी आणि विशेषतः नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे व मुंबई या जिल्ह्यातील बाजार समित्यांनी शासकीय, सार्वजनिक आणि बाजार समित्यांच्या साप्ताहिक सुटट्यांच्या दिवशीही बाजार आवारे चालू ठेवावीत आणि शेतमाल उत्पादक शेतकरी/ व्यापारी आणि ग्राहक यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. असे पणन संचालनालयाच्या वतीने बाजार समित्यांना परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

पोलीस अधीक्षक ईशू सिंधू जाणार परदेशात शिक्षणासाठी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू पुढील 20 महिने शिक्षणासाठी परदेशात जाणार आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे ते शिक्षण घेणार आहेत. ईशू सिंधू यांनी स्वतः या माहितीला दुजोरा दिला. त्यांच्या पत्नी बुलढाणाच्या जिल्हाधिकारी सौ. निरुपमा सिंधू या देखील त्यांच्याबरोबर शिक्षणासाठी असणार आहेत. अशी माहिती आहे.

ईशू सिंधू आणि सौ. निरुपमा ह्या दोघा पती-पत्नीने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षणासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला होता. त्याची दखल केंद्र सरकारने घेतल्याचे समजते. केंद्र सरकारने शिक्षणासाठी असलेला हा अर्ज मंजूर केला आहे. लवकरच याबाबत आदेश प्राप्त होऊन शिक्षणासाठी रवाना होईल, असे स्वतः ईशू सिंधू यांनी सांगितले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा  अभ्यासक्रम वीस महिन्यांमध्ये पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंधू यांनी 1 मार्च 2018 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. जिल्ह्यात 9 महिने यशस्वी कार्यकाळ संभाळून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. लोकसभा, विधानसभा निवडणूक, विविध सण-उत्सव काळात चोख बंदोबस्त ठेवून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही यांची दक्षता घेतली. अनेक सराईत गुंडावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून गुन्हेगारीला लगाम घातला. जळगाव येथील जैन प्रकारणात त्यांनी आपल्या कामगिरीची छाप पाडली होती.

भाजपमधील विखे विरोधकांची गोपनीय बैठक

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

माजी मंत्री राम शिंदे यांचा पुढाकार?

जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीपासून माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर नाराज असलेल्या भाजप नेत्यांनी आज त्यांना टाळून बैठक घेतली. या बैठकीचे नियोजन माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केल्याचे समजते.

जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस स्वतः शिंदे, माजी आ. शिवाजी कर्डिले, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, माजी आ. वैभव पिचड, माजी आ. चंद्रशेखर कदम सायंकाळपर्यंत उपस्थित झालेले होते. विधानसभेत पराभूत झालेले सर्व उमेदवार एकत्र आले असले, तरी आ. राजळे आणि आ. पाचपुते मात्र बैठकीस नव्हते. हे दोघेही बैठकीस उशीरा येणार असल्याचे एका नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. 2014 ला जिल्ह्यात सक्षम नेतृत्त्व नसतानाही पक्षाने पाच जागा जिंकल्या होत्या. यावेळी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे सक्षम नेतृत्त्व असताना हा आकडा तीनवर आला. विशेष म्हणजे पराभूत झालेल्या माजी मंत्री राम शिंदे यांच्यापासून आ. कर्डिले, आ. पिचड, आ. मुरकुटे यांनी आपल्या पराभवास विखे हेच जबाबदार असल्याच्या तक्रारी केल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या.

या नेत्यांपैकी काहींनी खासगीतही यास दुजोरा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
बैठकीत संघटनात्मक निवडी, आगामी निवडणुका अशी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र या बैठकीसाठी विखे पिता-पुत्रांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या बैठकीचा तोच अजेंडा असल्याचे खात्रीलायक समजते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. विखे यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील या सध्या अध्यक्षा आहेत. भाजपकडून त्याच पुन्हा उमेदवार असू शकतात, अशी चर्चा आहे. मात्र विखे विरोधातील सर्व भाजप नेत्यांच्या या बैठकीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हा योगायोग की अन्य काही
विखे पाटील यांचे परंपरागत राजकीय विरोधक असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात शुक्रवारी नगरमध्ये होते. नेमक्या त्याच दिवशी भाजपमधील नाराज नेत्यांची ही बैठक होत असल्याने हा योगायोग की यामागे अन्य काही आहे, अशीही चर्चा यामुळे सुरू होती.

काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडून गेलेल्यांनी काही दिवस तिकडेच रहावे!

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले नेते आता त्याठिकाणी अस्वस्थ आहेत. यातील काही मित्र आम्ही चुकलो, आम्ही फसलो असे सांगत आहेत. मात्र, त्यांनी आता काही दिवस तिकडेच रहावे. त्यांच्या जागा आता नवीन लोकांनी भरून काढल्या असून त्यांना विचारल्याशिवाय गेलेल्यांना परत घेणे योग्य नाही असे महाविकास आघाडीचे नेते मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी नगरमध्ये सांगितले.

मंत्री झाल्यानंतर आ. थोरात पहिल्यांदा नगरला आले होते. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री थोरात म्हणाले, महाविकास आघाडीचे खातेवाट निश्‍चित झाले असून एक ते दोन दिवसात ते पूर्ण होवून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणार का? या प्रश्‍नावर थोरात म्हणाले, जे आम्हाला सोडून गेले तेच आज मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत. जे पक्ष सोडून गेले त्यांच्या जागेवर अनेक तरूणांनी पक्षाच्या विजयासाठी खूप काम केले. यामुळे त्यांना विचारल्याशिवाय सोडून गेलेल्यांना पक्षात कसा प्रवेश द्यावयाचा? सोडून गेलेल्याची जागा आता दुसर्‍यांनी पकडली असून त्यांनी ती जागा भरून काढली आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून गेलेल्यांनी काही दिवस तिकडेच रहावे, असा सल्ला थोरात यांनी यावेळी दिला.

जिल्हा परिषदेत होणार्‍या सत्ता स्थापनेला अजून वेळ आहे. मात्र, या ठिकाणी महाविकास आघाडीच्यावतीने योग्य निर्णय घेण्यात यईल आणि घेतलेला निर्णय यशस्वी करूरन दाखवू, असे सांगत जिल्हा परिषदेतून विखे यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा अप्रत्यक्ष इशाराच यावेळी मंत्री थोरात यांनी दिला.

आणखी कडक शासन व्हावे
हैद्राबाद अत्याचार प्रकरणावर बोलतांना मंत्री थोरात म्हणाले, हा विषय संपूर्ण देशाचा असून सरकारने कायद्यात बदल करून हा कायदा आणखी कडक करण्यासाठी प्रयत्न करावेत. अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कडक शिक्षा होण्यासोबतच अशा प्रकरणावर निर्णय देण्यासाठी अधिकाअधिक जलदगती न्यायालयाची गरज असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

अस्वस्थतेबाबत विखे यांना विचारा
भाजपमध्ये अस्वस्थ असणार्‍यांमध्ये आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचाही समावेश आहे का, असा प्रश्‍न केला असता, ‘याची मला माहिती नाही. याबाबत विखे पाटील यांच्याकडे विचारणा करावी’, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

झेडपीच्या 56 कोटी 50 लाखांच्या विकास कामांना लागणार ‘ब्रेक’!

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यात सरकार बदलल्यानंतर नव्या महाविकास आघाडीच्या सरकारने मागील सरकारच्या काळात मंजूर झालेली परंतु, अद्याप कार्यारंभ आदेश न दिलेल्या विकास कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरवणे तसेच तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत कार्यारंभ आदेश न मिळालेल्या विकास कामांना स्थगिती देण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा आणि ग्रामपंचायत विभागाकडील 56 कोटी 50 लाखांच्या कामांचा यात समावेश आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या आदेशानंतर

गुरूवारपासून जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी कार्यारंभ आदेश न दिलेल्या कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती. यासाठी तालुका स्तरावरून माहिती मागविण्यासोबतच मुख्यालयातील फायली चाळण्यात अधिकारी व्यस्त होते. महाविकास आघाडी सरकारच्या आदेशानंतर ज्या कामांना आतापर्यंत कार्यारंभ आदेश दिलेले नाहीत, अशी कामे पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करावीत, असा स्पष्ट उल्लेख ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पाठविलेल्या पत्रात केला आहेत. या व्यतिरिक्त ज्या कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत, अशा कामांची शासन निर्णयनिहाय यादी तत्काळ सादर करण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत.

शुक्रवारी पाणी पुरवठा विभागाने 241 कामांची यादी तयार केली असून या कामासाठी 50 कोटीचा निधी मंजूर आहे. या सर्व कामांना कार्यारंभ आदेश अद्याप दिलेला नाही. राष्ट्रीय पेयजल योजनेत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने 320 गावात पाणी योजनांचा आराखडा तयार करून तो राज्य सरकार आणि त्यानंतर राज्य सरकार पातळीवरून केंद्र सरकारकडे पाठविला होता. या कामासाठी 150 कोटी रुपयांचे बजेट होते. यातील 79 कामांचा कार्यारंभ आदेश देवून ही कामे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित 241 कामांना अद्याप कार्यारंभ आदेश देणे बाकी असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

दुसरीकडे राज्य सरकारच्या आदेशानूसार ग्रामपंचायत विभागाकडील 25-15 या लेखाशिर्षा खाली मुलभूत सुविधा योजनेत 2018-19 या आर्थिक वर्षात 13 कोटी 47 लाख रुपयांतून 165 कामांना मंजूरी देण्यात आली होती. यातील 80 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला असून उर्वरित कामांना कार्यारंभ आदेश देणे बाकी असल्याचे ग्रामपंचायत विभागातील सुत्रांनी सांगितले. यामुळे सहा कोटी 50 लाखांच्या कामांना नव्या सरकारच्या आदेशामुळे स्थगिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या योजनेत ग्रामीण भागात रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, सुशोभिकरण तसेच स्मशानभूमीचे सुशोभिकरण आणि विकास आदी कामे करण्यात येत होती. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या 56 कोटी 50 लाखांच्या कामांना आता ब्रेक लागणार आहे.

गावाला येण्यासाठी चांगला रस्ता नाही ; वधुपित्याने मुलगी देण्यास दिला नकार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कान्हेगाव (वार्ताहर) – गावात येण्यासाठी रस्ता चांगला नाही असे म्हणत वधू पित्याने मुलीला या गावात देणार नाही असा निर्णय घेतल्याने एका प्रतिष्ठीत घरातील मुलाचे लग्न रद्द करावे लागल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना आहे कोपरगाव तालुक्यातील पूर्वभागात असलेल्या कान्हेगावची. गत आठवड्यात गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या मुलाला पाहण्यासाठी व लग्न जमावण्यासाठी वधु पित्याकडील काही पाहुणे मंडळी आली होती.

आलेल्या पाहुण्यांसोबत काही महिलाही होत्या. कान्हेगावकडे येणारे सर्वच रस्ते खूपच खराब आहेत. तसेच यावर्षी चांगलाच पाऊस झाल्याने होते ते खड्डे आणखी मोठे झालेले आहेत. येताना पाहुण्यांची गाडी खड्ड्यात आदळली त्यामुळे गाडीतील एका महिलेचे कंबर लचकले. मुलगा पाहण्याअगोदर रस्त्याचीच चर्चा सुरू झाली. चहापाणी झाला, पाहुणचारही झाला. मुलगाही पसंत झाला. परंतु ज्या पाव्हणीचे कंबर लचकले होते तिने मी या गावात मुलगी देणार नाही, गावात यायला धड रस्ता नाही तिथे मुलगी देणार नसल्याचे लावून धरल्याने बाकीच्यांनी काढता पाय घेतला.अखेर त्या महिलेच्या म्हणण्याला पुरुष वर्गानेही दुजोरा दिला. त्यामुळे एका उच्चशिक्षित नवर्‍यामुलाचे लग्न होता होता राहिले.

काही दिवसांपूर्वी याच रस्त्याने एका महिलेला प्रसुतीसाठी दवाखान्यात नेताना खराब रस्त्यामूळे बाळ पोटातच मृत पावले होते. त्याबाबत गटविकास अधिकार्‍यांना निवेदन दिले होते. जिल्हा परिषदेकडे निधी नाही असे उत्तर दिले जाते. गेल्या वीस वर्षांपासून ह्या रस्त्याचे काम झालेले नाही. शाळेच्या मुलांना, ग्रामस्थांना पायी चालणे ही कठीण झाले आहे. येथे असलेल्या गोदावरी बायोरिफायनरीज मुळे बाहेरून अनेक गाड्यांची ये जा नेहमीच चालू असते. वारीतील मुख्य रस्त्याची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे. रस्त्यावर थोडा पाऊस झाला तरी गाळच गाळ होतो. याकडे कोणी लक्ष देईल की नाही हे सांगता येत नाही. या खराब रस्त्यामुळे एकाचे लग्न मोडलं हे मात्र खरं.

संगमनेरातून युवकाचे अपहरण; जुन्नर येथे विजेच्या खांबाला बांधून मारहाण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नऊ जणांविरुद्ध गुन्हा; आरोपींच्या नातेवाईकांकडून युवकाच्या आईला दमबाजी

संगमनेर (प्रतिनिधी) – मोबाईलवरून वाईट शिवीगाळ करू नको, असे म्हणाल्याचा राग येऊन नऊ जणांनी एका जणास संगमनेरातून चारचाकी वाहनात घालून उचलले. ते थेट पिंपळवंडी व जुन्नर येथे नेऊन विजेच्या खांबाला बांधून त्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा संगमनेर शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तर याच प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांनी अपहरण केलेल्या युवकाच्या आईला दमबाजी केल्याने दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अखलाक असिफ शेख (वय 24, रा. कुरण, ता. संगमनेर) हा घरी असताना त्याच्या भावाच्या मोबाईलवर इमरान कुरेशी हा भावाला शिवीगाळ करत होता. तेव्हा अखलाक याने सदर मोबाईल भावाकडून घेतला व इमरान कुरेशी यास शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली. याचा इमरान कुरेशी याला राग आला. दरम्यान अखलाक शेख हा रात्री 10 वाजेच्या सुमारास संगमनेर नाटकी येथे रोडवर गॅरेजसमोर उभा होता. त्यावेळी फयाज कुरेशी व इमरान कुरेशी (रा. कसाईवाडा, जुन्नर) हे दोघे तेथे आले. त्यांनी मोबाईलवरुन शिवीगाळ का केली असे विचारत अखलाक शेख याची गचांडी पकडून त्याला मारुती इरटिका चारचाकी वाहनात टाकले. वाहनात अगोदरच कसाईवाडा येथे राहणारे अयाज कुरेशी, मुजाहिद कुरेशी, महम्मद गौस, सादिक गफुर कुरेशी हे बसलेले होते.

त्यावेळी त्यांनी अखलाक शेख यास शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली व वाहन पुण्याच्या दिशेने सुरु केले. अखलाक शेख याच्या खिशातील 15 हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल देखील त्यांनी काढून घेतला. पिंपळवंडी येथे पुलावर येऊन आयाज कुरेशी व इमरान कुरेशी यांनी अखलाक यास वाहनातून खाली उतरवून पुलावर नदी पात्रात लटकवून पुन्हा वर घेऊन हाताने मारहाण केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा वाहनात टाकले व त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळून टाकू असे म्हणत जुन्नर येथे नेले. तेथे कसाईवाडा येथे विजेच्या खांबाला अकलाख यास जनावरांच्या दोराने बांधले व इमरान कुरेशी, फयाज कुरेशी, इसराल बेपारी, सादीक गफृर बेपारी, शादाफ कुरेशी, अयाज कुरेशी, मुजाहिद कुरेशी, महम्मद गौस, सादिक गफूर कुरेशी व इतरांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.

याबाबत अखलाक असिफ शेख याने जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील 9 जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता 367, 327, 341, 324, 143, 147, 149 प्रमाणे दाखल केला आहे. दरम्यान अखलाक शेख याचे संगमनेरातून अपहरण केल्याने सदर गुन्हा शून्यने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आला असून 641/19 प्रमाणे दाखल झाला आहे.

दरम्यान याप्रकरणातील फिर्यादी अखलाक शेख याची आई निलोफर आसिफ शेख (रा. कुरण, ता. संगमनेर) हिला गुलजार पठाण (जुन्नर), अजीज कुरेशी (जुन्नर) यांनी संगमनेरला येऊन धमकावले. तुझ्या मुलाला फिर्याद मागे घ्यायला लाव नाहीतर तुझ्या मुलांना महागात जाईल, नाहीतर त्यांना परत उचलून घेऊन जाऊ, अशी धमकी दिली. याबाबत निलोफर शेख हिने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लग्न समारंभातून 17 तोळे सोने असलेली पर्स लांबविली

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

राहाता (तालुका प्रतिनिधी)- राहाता शहरातील कुंदन लॉनमध्ये लग्न समारंभातून 17 तोळे सोने व 10 हजार रोख असा सात लाख रूपये किमतीचा ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्याने पळविली. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना गुरुवारी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास राहाता येथील कुंदन लॉन्समध्ये घडली. श्रीरामपूर येथील उद्योजक मुळे यांच्या कुटुंबातील विवाहासाठी डॉ. मंजुषा नरेंद्र कुलकर्णी, नंदिग्राम कॉलिनी, औरंगाबाद या आल्या होत्या. त्या विवाहस्थळी खुर्चीवर बसल्या होत्या. त्यांच्या बहीणीने ग्रे रंगाची पर्स त्यांच्याकडे सांभाळण्यासाठी दिली होती. त्यांनी ती शेजारील मोकळ्या खुर्चीवर हातातील पर्स ठेवली व नातेवाईकांशी बोलत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून ती पर्स पळवून नेली.

या पर्समध्ये दोन राणी हार व दोन कानातले जोड वजन साडेतीन तोळे, साखळी मनी व पदक वजन 7 तोळे, नेकलेस, चार बांगड्या, दोन अंगठ्या, एक ब्रासलेट, सॅमसन कंपनीचे दोन मोबाईल, एटीएम, पावर बँक, असे सर्व साहीत्य 17 तोळे सोने व 10 हजार रूपये रोख असा सुमारे सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.

याप्रकरणी डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कुंदन लॉन्समधील सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले असता एक संशयित तरुण हातात पर्स घेऊन जाताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राहाता शहरातील मंगल कार्यालयात अशा चोरीच्या अनेक घटना घडल्या तसेच बाहेर गर्दीत गंठन चोरीच्या घटनाही घडल्या होत्या. त्या अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे.