Monday, May 5, 2025
Home Blog Page 30

Ahilyanagar : चोंडी येथील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त चोंडी (ता. जामखेड) येथे 29 एप्रिल रोजी होणारी राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 24 एप्रिल रोजी मुंबई दौरा निश्चित झाल्यामुळे, बैठकीची नवी तारीख आता 6 मे ठरवण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण प्रस्तावांवर निर्णय घेतला जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाने चोंडीतील बैठकीसाठी युध्दपातळीवर तयारी सुरू केली होती. बैठकीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून निविदाही प्रसिध्द करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी विविध विभाग प्रमुखांसमवेत बैठक घेऊन कामांची जबाबदारी विभागली. याशिवाय विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही तयार झालेल्या यंत्रणेचा आढावा घेतला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिलपासून मुंबईत सुरू होणार्‍या इंडिया स्टील 2025 या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत. तीन दिवस चालणार्‍या या भव्य कार्यक्रमात देश-विदेशातील उद्योगपती, व्यापारी प्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि विविध राज्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी व राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांची उपस्थिती अपेक्षित आहे. 6 मे रोजी होणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीत जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मांडले जाणार आहेत.

त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सृष्टी, संत ज्ञानेश्वर सृष्टी, भुईकोट किल्ला संवर्धन, श्रीगोंदा येथील पेडगाव किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज स्मारक, तसेच नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभारण्याचे प्रस्ताव आहेत. याशिवाय जिल्ह्याचा औद्योगिक विकास आराखडाही बैठकीत सादर केला जाणार असून, या सर्व प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवे गतीमान रूप मिळण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर, तीन संशयितांचे स्केच जारी

0

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये काल (दि.22) झालेल्या दहशवादी हल्ल्यात (Terrorist Attack) 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मोठी खळबळ माजली असून, हल्ला करणाऱ्या दहशवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या संशियत दहशतवाद्यांचे स्केच समोर आले आहे. तपास यंत्रणांनी हे स्केच जारी केले आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे नेतृत्व स्वतः पाकिस्तानी दहशतवाद्याने केले होते. या हल्ल्यात जवळपास 6 दहशतवादी सहभागी होते. या दहशतवाद्यांकडे AK-47 सारख्या रायफल होत्या. या घटनेनंतर पहलगाममध्ये भारतीय सैन्याकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी पहलगामच्या जंगलात आणि परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली असून ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.

जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. मंगळवारी दहशतवाद्याने २6 पर्यटकांचा जीव घेतला. नाव विचारले, आयडी पाहिले अन् धडाधड गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या वेशात आलेल्या या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. मित्रांसोबत ते फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते, पण त्यांची ती ट्रीप अखेरची ठरली.

 

Crime News : व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीविरूध्द ‘मोका’

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

व्यापार्‍याच्या अंगावर मिरची पूड टाकून त्यांना लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीविरूध्द ‘मोका’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंजुरी दिली आहे. या टोळीत आठ सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. यामध्ये टोळी प्रमुख विनोद बबन बर्डे (वय 27, रा. वारणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), टोळी सदस्य राहुल दिलीप येवले (वय 22, रा. वारणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), शुभम शहादेव धायतडक (वय 22, रा. धायतडकवाडी, ता. पाथर्डी), संदीप बबन बर्डे (वय 37, रा. वारणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), बाळासाहेब दगडु बडे (वय 23, रा. टाकळीमानूर, ता. पाथर्डी), अमोल सुभाष मंजुळे (वय 24, रा. वडगाव तनपुरा, ता. कर्जत), भारत येलप्पा फुलमाळी (रा. वारणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), हनु उर्फ हनुमंत गोल्हार (रा. पाथर्डी, ता. पाथर्डी) यांचा समावेश आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून अमोल मंजुळे, भारत फुलमाळी व हनु उर्फ हनुमंत गोल्हार पसार आहेत.

18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.05 वाजता कर्जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारावर दोन अज्ञात इसमांनी एका व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न केला. रामराजे प्रफुल्ल नेटके (रा. भांडेवाडी, ता. कर्जत) असे त्या व्यापार्‍याचे नाव आहे. ही घटना घडली, तेव्हा फिर्यादी आपल्या पैशाची बॅग घेऊन जात असताना काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी एकाने त्यांच्या अंगावर मिरची पूड फेकली व मारहाण करून बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादीच्या आरडाओरडीनंतर बाजार समिती परिसरातील लोक घटनास्थळी धावून आले. संशयित आरोपी पळून जात असताना त्यांच्यापैकी एकाच्या कंबरेतील पिस्तूल खाली पडले, जे नंतर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. या घटनेप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या सर्व संशयित आरोपींवर यापूर्वी दरोडा, घरफोडी, चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, जबरी मारहाण, खून, अपहरण, अत्याचार आणि अनुसूचित जाती-जमातीविरूध्द अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्याकडे ‘मोका’ अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी आठही सराईत गुन्हेगारांविरूध्द ‘मोका’ कायद्यान्वये वाढीव कलम लावण्यास मान्यता दिली आहे.

Crime News : दोघा भावांवर धारदार शस्त्रांनी हल्ला

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडीतील पद्मानगर भागात किरकोळ वादातून तिघा तरुणांनी एक 19 वर्षीय युवक व त्याच्या मावस भावावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी (20 एप्रिल) रात्री घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अभि व्यंकटेश तिरंदास, वेदान्त व्यंकटेश तिरंदास व निखील दोन्ता (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. पद्मानगर, सावेडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी अक्षय अनिल मिरचंदानी (वय 19, रा. साईनगर, तपोवन रस्ता, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, रविवारी रात्री 7.30 च्या सुमारास ते व त्यांचा मावस भाऊ यश निखील मोरे हे दोघे दुचाकीवरून जात असताना पद्मानगरमधील घागरे यांच्या किराणा दुकानासमोर वरील तिघांनी त्यांची दुचाकी अडवून शिवीगाळ करत अचानक धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यात निखील दोन्ता याने कोयत्याने अक्षयच्या कानावर वार केल्याने त्याला कानातून रक्तस्राव झाला.

वेदान्त तिरंदास याने चाकूच्या मुठीने डोक्यावर मारले तर अभि तिरंदास याने निखील मोरेच्या कमरेवर चाकूने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. आरडाओरड ऐकून घटनास्थळी फिर्यादीचे मावशी अर्चना वारे व काका मुकुंद वारे हे धावून आले असता संशयित आरोपींनी त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र घटनास्थळी लोकांची गर्दी जमल्याने संशयित आरोपी तिथून पळून गेले. जखमींना तत्काळ रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही संशयित आरोपींविरूध्द गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Accident News : हॉस्पिटलमधुन पळाला अन् पुढे वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

17 एप्रिल रोजी विषारी पदार्थ सेवन केल्यामुळे एका 43 वर्षीय व्यक्तीला येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच, 21 एप्रिल रोजी ती व्यक्ती वॉर्डमधून पळून गेली आणि अहिल्यानगर शहरातील पत्रकार चौक येथे एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली.

या अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. बाबासाहेब मोहन बर्डे (वय 43, रा. आडगाव, ता. पाथर्डी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी 17 एप्रिल रोजी विषारी पदार्थ सेवन केल्याने त्यांना त्यांची पत्नी छाया बर्डे यांनी उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

उपचार सुरू असताना, 21 एप्रिल रोजी वॉर्डमधून पलायन केले, त्यांना पत्रकार चौक येथे अज्ञात वाहनाने धडक दिली. दरम्यान, त्यांना पुन्हा उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

Rahuri : भारतीय शेती आर्थिक लाभाची करण्यात कृषी विद्यापीठांची महत्त्वाची भूमिका

0

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

वाढता उत्पादन खर्च, मर्यादित बाजारपेठ प्रवेश आणि अपुरी भावनिश्चिती प्रणाली यामुळे कृषी क्षेत्र अधिक अडचणीत येत असताना भारतीय शेतीला शाश्वत, आर्थिक लाभाची आणि भविष्यासाठी सक्षम व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तुमचे ज्ञान आणि तुमची जिद्द हीच तुमची प्रेरणा आहे. जिचा प्रकाश तुमच्या पुढील जीवन प्रवासात मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 38 व्या पदवीप्रदान समारंभात स्नातकांना उद्देशून मार्गदर्शन करताना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन बोलत होते. यावेळी कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना.अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ.संजय कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरु डॉ.शरद गडाख, राज्यपालांचे ए.डी.सी. अभयसिन्हा देशमुख, डॉ. साताप्पा खरबडे, डॉ.प्रदीप इंगोले, दत्तात्रय उगले, गणेश शिंदे, संजीव भोर, डॉ.विठ्ठल शिर्के, डॉ.गोरक्ष ससाणे, डॉ. नितीन दानवले, डॉ.रविंद्र बनसोड, सदाशीव पाटील, हेमंत सोनार उपस्थित होते.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, तुम्ही केवळ पदवीधर नाही, तर भारतीय कृषी क्षेत्राचे भविष्य आहात. तुम्ही ज्ञान आणि कौशल्याने सज्ज आहात आणि समोरील संधी व आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यास सक्षम आहात. जे ज्ञान तुम्ही प्राप्त केले आहे, ते प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करा. सन 2047 विकसीत भारतामध्ये कृषीचा मोठा वाटा राहणार आहे. हवामान बदलांना तोंड देणार्‍या पिकांच्या जाती विकसित करून, सेंद्रिय शेती, समग्र अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचनाचा प्रसार करून कृषी विद्यापीठे हवामान बदलांचे परिणाम कमी करण्यात आणि उत्पादकता वाढवण्यात मदत करू शकतात. कृषिच्या विद्यार्थ्यांनी शेती फायदेशीर होण्यासाठी आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करावेत.

ना. माणिकराव कोकाटे म्हणाले, वातावरणातील बदलामुळे शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करून नवे तंत्रज्ञान स्विकारावे लागेल. अधिक उत्पादनासाठी वारेमाप खते व किटकनाशकांच्या वापरामुळे समाजाचे आरोग्य बिघडत चालले आहे. यावर मात करण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. कृषी पदवीधरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी करावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी करून राज्य शासन विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कायमच कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

डॉ. संजयकुमार म्हणाले, सन 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 1.7 अब्ज होईल. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी आपल्याला अन्नधन्य उत्पादनात 70 टक्के वाढ करावी लागेल. प्रत्येक घराचे पोषण करणार्‍या शेतकर्‍यांना उन्नत करण्यासाठी आपला मनापासून प्रयत्न असला पाहिजे याची जाणीव ठेवा. पुन्हा एकदा विशेष हरितक्रांती घडवून आणली तरच आपण भविष्यात सर्वांना अन्न उपलब्ध करू शकू असे त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ.शरद गडाख म्हणाले, विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. शेतकर्‍यांना उपयोगी ठरणार्‍या 1866 तंत्रज्ञान शिफारशी, विविध पिकांच्या 311 वाणांची निर्मिती व 51 कृषी अवजारे व यंत्रांची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. राहुरी कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या वाणांचे आर्थिक विश्लेषण केले असता या 8 पिकांच्या वाणामुळे आजपर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये ढोबळमानाने एकूण 2 कोटी 40 हजार 188 कोटी व निव्वळ 32 हजार 206 कोटी रुपये इतक्या महसुली उत्पन्नाची भर पडली आहे. विद्यापीठाने बदलत्या हवामानाला अनुरुप असे शेतकरीभिमुख संशोधन केलेले आहे.

यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी 40 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 331 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 4,830 विद्यार्थ्यांना पदवी असे एकूण 5 हजार 201 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पदवीप्रदान सन 2023-24 मध्ये बी.एस्सी. (कृषि) पदवीत प्रथम आलेली प्रज्ञा खर्डे, बी.एस्सी. (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली प्राची महांकाळ, कृषी अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला दर्शन सूर्यवंशी यांनी सुवर्णपदक मिळविले. यावेळी पीएच.डी.च्या 8 विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदव्युत्तर पदवीच्या 19 विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदवीच्या 9 विद्यार्थ्यांना सुवर्ण व दोन विद्यार्थ्यांना रौप्य पदके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते पदव्युत्तर व कृषी अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले.

समारंभाला जिल्हाधिकारी पंकज अशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिष येरेकर, अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक राकेश ओला, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, माजी कुलगुरु डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. सुभाष पुरी, डॉ.तुकाराम मोरे, डॉ.के.पी.विश्वनाथा, डॉ. एम.सी. वाष्णेय, डॉ. शंकरराव मगर, डॉ.अशोक ढवण, डॉ. किसनराव लवांडे, माजी आ. चंद्रशेखर कदम, डॉ. हरी मोरे, तानाजी धसाळ, कृषिभूषण सुरसिंग पवार, विद्या परिषद सदस्य, मान्यवर, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.आनंद चवई व डॉ.भगवान देशमुख यांनी केले.

Sangamner : भंडारदरा-निळवंडेच्या आवर्तनामुळे शेतकर्‍यांना दिलासा

0

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

ऐन उन्हाळ्यात भंडारदरा आणि निळवंडे लाभक्षेत्रात पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकर्‍यांसह नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवर्तनाच्या केलेल्या नियोजनाचा मोठा फायदा उत्तर भागाला झाला आहे.

यंदा उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने लाभक्षेत्रातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. शेतीच्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेवून दोन्ही धरणांत असलेला पाणीसाठा विचारात घेवून आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले. धरणांत पाणी असतानाही लाभक्षेत्राला पाण्याची समस्या भेडसावणे उचित नाही ही संवेदनशीलता त्यांनी आपल्या निर्णयातून दाखवून दिली.

आवर्तनाच्या बाबतीत काहींनी राजकीय भाष्य करून शेतकर्‍यांना पाणी मिळू दिले जात नसल्याचे आरोप सुरू केले होते. मात्र पाण्याच्या बाबतीत कोणताही राजकीय अभिनिवेश मनात न आणता ना. विखे पाटील यांनी ठरलेल्या नियोजनापूर्वीच निळवंडे आणि भंडारदारा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या निर्णयाचे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे. जलसंपदा विभागाच्या प्रत्येक बैठकीत ना. विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकर्‍याला पाणी मिळेल, असे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. निळवंडे उच्च कालव्यातून यंदा शेतकर्‍यांना पाणी मिळू शकले याचाही आनंद लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मिळाला.

यासंदर्भात ना. विखे पाटील यांनी अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संगमनेरात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. उत्तर भागाला आवर्तनाच्या योग्य नियोजनाचा मोठा दिलासा मिळाला असून ऐन तापलेल्या उन्हाळ्यात भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दक्षिण भागातील तालुक्यांना कुकडी, मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या आवर्तनाचा लाभ मिळाला आहे.

…तर शेतकर्‍यांनी महायुतीतील मंत्र्यांना जाब विचारला पाहिजे- राजू शेट्टी

0

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या काळात सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देत भावनिक करुन शेतकर्‍यांची मते घेतली. आता राज्याची स्थिती चांगली नाही, असे सांगत हात वर करतात. त्यामुळे महायुतीतील या तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांना शेतकर्‍यांनी जाब विचारला पाहिजे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राहुरीत केले आहे.
राजू शेट्टी यांचा राहुरी तालुक्यात उसाच्या एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना एकाचवेळी देण्याचा न्यायालयातील खटला जिंकल्याबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात राजू शेट्टी यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.

राज्यात एक नियमच झाला आहे. सरकार कोणाचेही असो अर्थमंत्री अजित पवारच. मागील सरकारमध्ये आणि आताच्या सरकार मध्येही अजित पवारच अर्थमंत्री आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या तिघांनी मिळून विधानसभा निवडणुकीत महायुतीचा जाहीरनामा काढला होता. आमचे सरकार राज्यात आले तर शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार असल्याचं म्हणाले होते. मात्र आता राज्याची आर्थिक परिस्थिती ठीक नाही असे सांगतात. अजित पवारांना राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे ते माहिती नव्हते का? शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणे शक्य नाही तरीही पवारांनी का तसा जाहीरनामा काढला? यांच्या मनात पाप होते.

शेतकर्‍यांना भावनिक करुन मते मिळवली आणि आता हात वर करत आहेत. आता शेतकरी संतापले आहेत. महाडमध्ये शेतकर्‍यांनी शंभूराजे देसाई यांना आणि अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला. कर्ज माफीचे काय झाले. आता महायुती मधील तीनही पक्षांच्या मंत्र्यांना राज्यात कुठेही गेले तर त्यांना शेतकर्‍यांनी आमचा सातबारा कधी कोरा करणार म्हणून जाब विचारायला पाहिजे.वेळ प्रसंगी यांना तुडवून हाणलं पाहिजे. कसे शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार नाही? असा जाब विचारण्याचं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकर्‍यांना केले आहे.

परभणीत शेतकर्‍याने दीड लाखांच्या कर्जसाठी आत्महत्या केली. त्याच रात्री त्याच्या सात महिन्याच्या गरोदर पत्नीने देखील आत्महत्या केली. आणि सरकार अहिल्यानगर येथील चौंडी येथे होणार्‍या एक दिवसीय मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी दिडशे कोटींचं टेंडर काढते. यावरून देखील राजू शेट्टी यांनी सरकारला चांगलेच घेरले. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना रायगड पासून सुतारवाडीपर्यंत आंब्याचा वाटीभर रस पिण्यासाठी जाण्याकरिता दीड कोटी रुपये खर्चून हेलिपॅड तयार केला. यासाठी यांच्याकडे पैसे आहेत. मात्र शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत, असा जोरदार घणाघात राजू शेट्टींनी राज्य सरकारवर केला. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू- मुख्यमंत्री फडणवीस

0

मुंबई |

पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी जीव गमावला त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांना माझी मनापासून श्रद्धांजली. आम्ही शोकाकुल कुटुंबांसोबत दृढ आहोत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो.आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील दिलीप दिसले आणि अतुल मोने हे २ पर्यटक मृत्युमुखी पडले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे

आम्ही जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदारी यांच्याशी फोन करून चर्चा केली आणि सविस्तर माहिती घेतली.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एक पनवेल येथील माणिक पटेल आणि दुसरा एस. भालचंद्र राव आहे. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

 

संपादकीय : २२ एप्रिल २०२५ – हसण्यासाठी जन्म आपुला

0

समाजात भेदाभेदाच्या भिंती उंच होत असतांना हसण्यामध्ये मात्र अजून जातधर्म आलेला नाही अशी टिप्पणी अभिनेते संदीप पाठक यांनी केली. ते विनोदी नट म्हणूनही ओळखले जातात. म्हणून त्यांच्या टिप्पणीची संभावना विनोदी म्हणून करणे योग्य ठरणार नाही. त्यांनी एका अर्थाने समाजातील वास्तव मांडले आहे. समाजात भेदाभेद आहेत. परिणामी अधूनमधून सामाजिक तणाव निर्माण होतो. कधी काय होऊ शकेल या भावनेने सामान्य माणसांची मने कायमच तणावात असू शकतील का? त्याचा एक परिमाण म्हणून माणसे हसणे विसरत चालली असावीत का? हसण्याचा एक ठळक सामाजिक परिणाम सगळेच जाणून असतील.

कोणत्याही प्रकारच्या हसण्यामुळे माणसांचा परिचय होऊ शकतो. ओळख नसतांनाही एकमेकांकडे बघून स्मित हास्य करणारी माणसे नंतर एकमेकांशी परिचित होऊ शकतात. त्यांच्यात सामाजिक बंध निर्माण होऊ शकतात. हेच बंध सामाजिक मैत्रीचा मार्ग प्रशस्त करतात. हसणे माणसांना क्षणभरासाठी का होईना प्रसंगी स्वतःला देखील विसरायला लागू शकते. म्हणजेच त्या क्षणाला माणसे परस्पर भेदही विसरत असू शकतील का? पण माणसे सहज हसणेच विसरत चालली असावीत का? हास्याची मैफल आता फारशी भरत नसावी का? खळखळून एकमेकांच्या हातावर टाळी देत हास्य मैफल रंगवणारे मित्रांचे कट्टे फारसे आढळत नाहीत.

किंबहुना दोन व्यक्ती जोरात हसल्या तर अन्य माणसे त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहतांना आढळू लागली आहेत. वास्तविक हसण्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी देखील जवळचा संबंध आहे. हसण्याने मेंदूतून एन्डोरफीन स्त्रवते. जे आनंदाचे संप्रेरक (हॅपी हार्मोन) मानले जाते. जे स्त्रवले की माणसांना छान वाटते. उत्साह वाढतो. हसणे ताण विसरायला लावते. वेदना कमी होऊ शकतात. चेहर्‍याच्या स्नायूंचा,श्वसनाचा, हृदय आणि फुफ्फुसांचा व्यायाम होतो. हसण्याची जादू अशी की, समोरच्या व्यक्तीला ते तसाच प्रतिसाद द्यायला प्रवृत्त करते. भाग पाडते असे म्हणा ना. कोणत्याही प्रकारे हसले तरी चालेल पण माणसांनी हसले पाहिजे. कारण हसणारा चेहरा समोरच्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरही आपसूकच हसू फुलवतो. वातावरण प्रसन्न करतो. तेव्हा हसण्यासाठी जन्म आपुला हेच खरे.