Sunday, May 4, 2025
Home Blog Page 31

Nashik News: काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांना अटक व सुटका; सातपीर दर्गा परिसराला देणार होते भेट

0
हुसैन

नाशिक | प्रतिनिधी
काँग्रेस नेते माजी खा.हुसैन दलवाई आज नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्या नियोजनाप्रमाणे दुपारी ते द्वारका भागातील हजरत सातपीर दर्गा येथे ज्या ठिकाणी मनपाने कारवाई केली, त्या ठिकाणी जात असतांना पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले. नंतर काही वेळेत त्यांना सोडण्यात आले. मात्र मी पुन्हा येथे येणार अशी घोषणा त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.
आज (दि.22) दलवाई सकाळी ११ वाजेच्या सुमारास नाशिकला आले. यानंतर त्यांनी स्थानिक नागरिकांशी काठे गल्ली, सातपीर दर्गाबाबत माहिती घेतली, तर दुपारी पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली.

यावेळी त्यांनी निर्दोश लोकांवर पोलिसांनी कारवाई करू नये, त्याच प्रमाणे ज्यांनी या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला, त्यांना कडक शासन करण्याची मागणी केली. यानंतर दलवाई व त्यांच्या समवेत काही कार्यकर्ते सातपीर बाबा येथील घटनास्थळी भेट देण्यासाठी पखालरोड उस्मानिया चौकात दाखल झाल्यावर पोलिसांनी त्यांना रोखले, मात्र ते तेथे जाण्यावर ठाम राहिल्याने त्यांना ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. नंतर सुमारे दोन तासांनी त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हाजी तन्वीर तांबोळी, फारुक मंसुरी आदी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Nashik News: त्र्यंबकेश्वरमध्ये फिरस्त्या साधुचा मृतदेह आढळला

0
मृतदेह

त्रंबकेश्वर | प्रतिनिधी
सोमवारी (दि. २१) रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये स्वामी समर्थ कमानीजवळ एक साधु मृतावस्थेत आढळून आला. या व्यक्तीचे नाव प्रभाकर सदाशिव घोटे (वय ५२) रा. पिंपळगाव डुकरा ता. इगतपुरी असे असून हा साधु फिरस्ती होता. या साधुची त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात मृत्यूची माहिती देण्यात आली असता त्याची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सदर साधुचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर येथील महंत शंकरानंद सरस्वती, महंत जयदेव गिरी व अन्य साधुंनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेसंदर्भात अधिक माहिती घेतली असून या बाबत पोलिसांकडून कायदेशीर तपास सुरु केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या साधुची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी केला असून त्या दृष्टीने तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे अशी मागणी देखील महंतांनी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Cabinet Meeting: राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ८ महत्वाच्या विषयांना मंजुरी; मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखा दर्जा देण्याचा निर्णय

0
राज्य

मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखाच दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मच्छिमारी आणि मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि सवलतींचा लाभ होणार आहे.

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ता. पवनी, जि.भंडारा यासाठीही मोठी आर्थित तरदूत करण्यात आली आहे. गोसी खुर्द प्रकल्पाच्या २५ हजार ९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या तरतूदीस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मत्स्यव्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखाच दर्जा देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. मत्स्य व्यवसायला कृषीचा दर्जा दिला आहे, हा गेमचेंजर निर्णय असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले. या निर्णयामुळे मत्स्य व्यवसायमध्ये आपले राज्य पहिल्या तीन क्रमांकामध्ये येऊ शकते. आपले राज्य सागरी मासेमारी मध्ये ६ व्या क्रमांकवर आहे. ४,६३००० मच्छिमारांना शेतकऱ्यांप्रमाणे सवलत लाभ मिळणार आहेत. मच्छिमारांना कृषीप्रमाणे सर्व लाभ मिळणार आहेत. कृषी दरानुसार कर्ज, वीजदरात सवलत, विमा सौर ऊर्जेचाही लाभ मिळेल. तसेच, निधीची उपलब्धता सहज पद्धतीने होणार आहे, असेही नितेश राणेंनी सांगितले.

मंत्रिमंडळात घेतलेले ८ महत्त्वाचे निर्णय
१. ग्रामविकास विभाग
मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय. स्मारकासाठी १४२.६९ कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी ६७.१७ लाख रुपयांच्या तरतूदीस मंजूरी.
२. जलसंपदा विभाग
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ता. पवनी, जि.भंडारा या प्रकल्पाच्या २५ हजार ९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या तरतूदीस सुधारित प्रशासकीय मान्यता.
३. कामगार विभाग
राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करणार.
४. महसूल विभाग
विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त कंत्राटी विधी अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय, ३५ हजार रुपयांऐवजी ५० हजार रुपये मानधन मिळणार.
५. विधी व न्याय विभाग
14 व्या वित्त आयोगामार्फत राज्यात तात्पुरत्या स्वरुपात स्थापन करण्यात आलेल्या १६ अतिरिक्त न्यायालयांना व २३ जलदगती न्यायालयांना आणखी २ वर्षे मुदतवाढ देण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता.
६. मत्स्यव्यवसाय विभाग
मत्स्यव्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रा सारखाच दर्जा देण्याचा निर्णय. मच्छिमारी, मत्स्य व्यावसायसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, सवलतीचा लाभ होणार.
७. गृहनिर्माण विभाग
पायाभूत सुविधांच्या अमंलबजावणीत बाधित झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेतील घरांची निर्मिती व त्यांच्या वितरणासाठीच्या धोरणात सुधारणा.
८. सार्वजनिक बांधकाम विभाग
पुणे जिल्ह्यातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण यावर चार पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर चार पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर यावर जमिनीस समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Jammu & Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; ४ जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

0

दिल्ली । Delhi

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. पहलगाममधील बैसरन खोऱ्याच्या वरच्या भागात झालेल्या या हल्ल्यात किमान ४ पर्यटक जखमी झाले आहेत. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व पर्यटक राजस्थानहून आले होते. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

https://x.com/ANI/status/1914625552289243381

दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ते जंगलात पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या बैसरन खोऱ्याच्या आसपासच्या परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू आहे. दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी ड्रोन, स्निफर डॉग्स आणि विशेष पथकांचा वापर करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ल्याची ही पहिलीच गंभीर घटना असल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. केंद्र सरकारकडून देखील घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे.

विशेष बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच हा हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीत राज्यात सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला जात असताना, दहशतवाद्यांनी अशा प्रकारे हल्ला करणे हे सुरक्षा यंत्रणांसमोरील मोठे आव्हान मानले जात आहे.

सध्या जखमी पर्यटकांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरक्षा यंत्रणांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न सुरू आहेत. अद्यापपर्यंत हल्लेखोरांच्या ओळखीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या घटनेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रशासन विविध पावले उचलत असतानाच घडलेली ही घटना पर्यटन क्षेत्रावर परिणाम करू शकते.

सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासनाकडून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास आणि कारवाईसाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

ही घटना पुन्हा एकदा स्पष्ट करते की, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेच्या बाबतीत अजूनही आव्हाने कायम आहेत. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांसमोर दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान अधिक तीव्र झाले आहे.

 

 

 

UPSC Result 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा महाराष्ट्रात पहिला

0
केंद्रीय

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या युपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शक्ती दुबे या महिला उमेदवाराने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे तर हर्षिता गोयलने देशात दुसरी येण्याचा मान मिळवला आहे. महाराष्ट्राच्या हर्षित डोंगरेचा देशात तिसरा क्रमांक आलेला आहे. २०२४ च्या लेखी आणि मुलाखतीच्या आधारे हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी तरुण-तरुणी दिवसरात्र एक करून अभ्यास करत असतात. अशी मेहनत घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आज निकालानंतर त्याचे फळ मिळाले आहे. सप्टेंबर महिन्यात यूपीएससी परीक्षा आणि जानेवारी महिन्यात पर्सनॅलिटी टेस्ट झाली होती. त्यानंतर एकूण १००९ उमेदवारांपैकी २४१ उमेदवारांची निवड करण्यात आली. उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा (IAS),भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय महसूल सेवा (IRS) अशा सेवांमधअये नियुक्त केले जाईल. संविधानाच्या नियम २० (४) आणि (५) नुसार, आयोगाने २३० उमेदवारांची राखीव यादी देखील प्रसिद्ध केली आहे.

युपीएससी आयोगाकडून 2024 च्या युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून upsc.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या परीक्षेत यामध्ये शक्ती दुबे ही देशात पहिली आली असून हर्शिता गोयल ही देशातून दुसरी आली आहे. तसेच महाराष्ट्राच्या पुण्यातून अर्चिंत डोंगरे हा देशातून तिसरा आला आहे. शाह मार्गी चिराग याने चौथा क्रमांक आणि आकाश गर्ग याने पाचवा क्रमांक पटकावला आहे. ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने ९९ वा क्रमांक पटकावला असून ठाण्याच्याच अंकिता पाटीलने ३०३ वा क्रमांक मिळवला आहे.

यशस्वी उमेदवारांना आता त्यांच्या पसंती, रँक आणि उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या सेवा आणि केडर देण्यात येणार आहे. हे वाटप भारत सरकारच्या धोरणांनुसार असेल. आता निवड झालेल्या उमेदवारांना लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA)मध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येईल. याठिकाणी आयएएस (IAS) पदासाठी ट्रेनिंग दिले जाते. तर आयपीएस (IPS) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमीत ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येईल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Sangram Thopte: “मी निष्ठा राखून ज्या पक्षाचे काम केले, त्या निष्ठेचे फळ मिळाले नाही”; भाजप प्रवेश करताच थोपटे काय-काय म्हणाले?

0
थोपटे

मुंबई | Mumbai
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी 22 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले होता. आज संग्राम थोपटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री जयकुमार गोरे, आमदार राहुल कूल, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाकडून सातत्याने झालेले दुर्लक्ष, विधानसभा अध्यक्ष, राज्य मंत्रिमंडळात वेळोवेळी डावलले गेले आणि विधानसभेत झालेला पराभव तसेच राजगड सहकारी साखर कारखान्याला मिळत नसलेले कर्ज यामुळे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपची वाट धरली आहे.

भाजपात प्रवेश केल्यानंतर संग्राम थोपटे म्हणाले, “संग्राम थोपटे काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मी भूमिका जाहीर केल्यावर अखेर त्यावर पडदा पडला. मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला तुम्ही काँग्रेस का सोडताय? खरेतर ही वेळ मला काँग्रेसनेच आणली. विखे-पाटील सांगायचे मला, निर्णय घे…निर्णय घे…भाजपचे सुद्धा…पण, मी सांगायचो, ‘निर्णय नाही घेता येणार…’ मी विचाराला बांधलेला कार्यकर्ता असल्याने निर्णय घेत नव्हतो.”विधानसभा निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल काही कारणामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले.

संग्राम थोपटे पुढे म्हणाले की, लोकसभेला आम्ही महाविकास आघाडी धर्म पाळला होता. काँग्रेस पक्षात निष्ठेने काम केले. मात्र त्या निष्ठेचे फळ मिळाले नाही. तळागाळात काँग्रेस वाढविण्याचा काम आम्ही केले. थोडेसे दुःख वाटतेय, खंत वाटते. काँग्रेस पक्ष तळागाळात वाढवला आणि आज या निर्णयावर पोहोचलो आहे. भाजप देशाचा सगळ्यात मोठा पक्ष आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असणारा पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची चालणारी वाटचाल पाहता सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा पक्षप्रवेश करत आहे, असे त्यांनी म्हटले.

“विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. मी निष्ठा राखून ज्या पक्षाचे काम केले, त्या निष्ठेचे काहीच फळ मला मिळाले नाही. मी आणि वडिलांनी अनेक वर्षे संघर्ष केला. संघर्ष करायला लागत असल्याने आम्ही डगमगलो नाही. जिल्हा परिषद, पंचायत समितीत एकहाती सत्ता मिळण्याचा प्रयत्न केला. पूर्वीच्या काळाता आम्ही जो पक्ष तळागळापर्यंत वाढवला, पण नाइलाजाने हा निर्णय घ्यावा लागला,” असे थोपटे यांनी स्पष्ट केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Nashik News: कुंभमेळ्याच्या पार्श्वभुमीवर सिंहस्थाच्या कामांना गती देण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश

0
मनपा

नाशिक | प्रतिनिधी
मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी सोमवारी (दि.२१) मनपात वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कामांना गती देण्याचे आदेश दिले.

मनपात झालेल्या बैठकीत स्मार्टसिटी, मनपा बांधकाम विभाग, यांत्रिकी विभाग, पाणी पुरवठा, उद्यान विभाग, विद्युत विभाग, आयटी विभाग, वाहतूक कक्ष व महावितरण या विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रामकालपथसाठी जास्तीत जास्त खोदकाम करावे लागणार आहे. त्यादृष्टीने संबंधित सर्व विभागांनी आपल्याला करावयाच्या कामांची माहिती लवकरात लवकर कंपनीच्या सल्लागाराला द्यावी, म्हणजे पुढील काम सोपे होईल. रामकाल पथ मार्गावर खोदकाम होईल, त्यासाठी एमएनजीएल, बीएसएनएल, स्मार्ट सिटीसह बांधकाम विभागाने करावयाच्या कामांचे नियोजन सल्लागारांना सादर करावे. त्यानंतर सल्लागार कामाबाबत निर्णय घेईल व प्रत्यक्ष कामास सुरुवात करणार आहे. याशिवाय बैठकीत इंडिग्रेटेड कमांड कंट्रोल सिस्टिमचा (आयसीसी) आढावा घेण्यात आला.

शिवाय स्मार्ट सिटीला जीआयएस संपूर्ण डेटा लवकरात लवकर उपलब्ध करून काम सुरू करण्याचे आदेशित करण्यात आले. स्मार्ट सिटीकडून महापालिकेला सात प्रकल्प हस्तांतरित केले जाणार आहे. त्यात मुख्य म्हणजे गोदापार्क प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पाचा करार झाला असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. हे प्रकल्प हस्तांतरण करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रक्रिया सुरू आहे.

पावसाळ्यात गोदावरीला येत असलेल्या पुरामुळे लगतच्या घरांमध्ये पाणी शिरते. यामुळे पुराचे नियंत्रण करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेटची उभारणी करण्यात येत आहे. गोदावरीला दरवर्षी येत असलेली पूरस्थिती नियंत्रणासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर पुलाखाली २२ कोटी रुपये निधीतून मेकॅनिकल गेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी कंपनीने २०१९ मध्ये हा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, ठेकेदाराच्या संथ कामामुळे प्रकल्प रेंगाळला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

RBI: आरबीआयने अल्पवयीन मुलांसाठी उचचले मोठे पाऊल; आर्थिक जबाबदाऱ्या समजाव्या यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

0
अल्पवयीन

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवार २१ एप्रिल रोजी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, आता १० वर्षांवरील अल्पवयीन मुले देखील त्यांचे बचत आणि एफडी खाते स्वतः उघडून हताळू शकतील.याबाबत पीटीआयने माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेने हा मोठा निर्णय घेतला आहे. याआधी अल्पवयीन मुलांचे बँक खाते त्यांचे पालक उघडायचे आणि तेच ऑपरेट करायचे.

देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अल्पवयीन मुलांसाठी एक मोठे पाऊल टाकले आहे. मुलांना आर्थिक जबाबदाऱ्या समजावून सांगता याव्यात म्हणून, बँकेने हा निर्णय घेतला आहे. यासोबतच, पालकांना त्यांच्या मुलांना स्वातंत्र्य देणे सोपे झाले पाहिजे, हा देखील उद्देश असल्याचे ‘RBI’ने म्हटले आहे.

आरबीआयनुसार, १० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील मुले स्वतः चे बचत खाते आणि टर्म डिपॉझिट अकाउंट उघडू शकणार आहेत. याचसोबत हे अकाउंट ऑपरेटदेखील करु शकणार आहे. ही सुविधा बँकेच्या रिस्क मॅनेजमेंट पॉलिसीवर आधारित असणार आहे. ही सुविधा कोणत्या अटी-शर्तींवर द्यायची आहे याचा निर्णय बँक घेणार आहे. याबाबत बँक सर्व माहिती खातेधारकांना देणार आहे.RBIने सोमवारी २१ एप्रिल रोजी केलेल्या घोषणेनुसार, नवीन नियम देशातील सर्व बँकांना जसे की व्यावसायिक, घरगुती, वित्तीय संस्थांना लागू असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आरबीआयच्या माहितीनुसार, बँकांना हे सुनिश्चित करावे लागेल की, अल्पवयीन मुलाच्या खात्यातून पैसे काढले जाणार नाहीत. त्या अकाउंटमध्ये नेहमी पैसे असायले हवेत. खाते उघडण्यापू्र्वी त्या मुलाची योग्य चौकशी करणे ही बँकेची जबाबदारी आहे. खातेधारक १८ वर्षांचा झाल्यावर त्याला बँकेच्या ऑपरेटिंग सूचना आणि सही करुन पून्हा नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे.

यासोबतच, आरबीआयने सर्व बँकांना असे निर्देश दिले आहेत की, आर्थिक संकट कमी करण्यासाठी बँकांना स्वतः काही नियम निश्चित करावे लागतील. हे नियम पैसे काढणे आणि ठेवींबद्दल असू शकतात. प्रत्येक बँकेला याबाबत वेगवेगळे नियम बनवण्याची परवानगी असेल. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. यासोबतच, खाते पालकांनी उघडले आहे की मुलाने स्वतः उघडून हाताळले आहे, या दोन्ही परिस्थितीत बँकेने ठरवलेले नियम लागू असतील, असेही RBIने म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेने म्हटले की, बँका अल्पवयीन मुलांना इंटरनेट बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड, चेक बुक यांसारख्या सुविधा देऊ शकतात. हे सर्व बँकेच्या धोरणांवर अवलंबून असेल. १ एप्रिल २०२५ पर्यंतच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार नवीन धोरणे बनवण्यास किंवा सध्याच्या धोरणांमध्ये सुधारणे करण्यास आरबीआयने बँकांना सांगितले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Nashik News: नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा ‘पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार २०२३’ ने सन्मान

0
जलज

नाशिक | प्रतिनिधी
नागरी सेवा दिनानिमित्त नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना ‘पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार २०२३’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या १२ प्रमुख योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासातील उल्लेखनीय योगदानासाठी जिल्हाधिकाऱ्यांना हा पुरस्कार ‘जिल्ह्यांचा समग्र विकास’ श्रेणीत मिळाला.

१७ व्या नागरी सेवा दिनानिमित्त काल विज्ञान भवन येथे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागामार्फत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याने आयुष्मान भारत, पंतप्रधान आवास योजना, जल जीवन मिशन, उज्वला योजना, मुद्रा योजना, पोषण आहार योजना, स्वनिधी योजना आणि पीएम विश्वकर्मा योजना यासह केंद्र सरकारच्या १२ प्रमुख योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीत राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला. केंद्र सरकारच्या सर्वेक्षणात नाशिकच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत शर्मा यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या ‘पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता’ पुरस्कारात स्मृती करंडक, मानपत्र आणि २० लाख रुपये प्रोत्साहन निधी असे पुरस्काराचे स्वरूप असून, हा निधी नाशिक जिल्ह्यातील लोककल्याणकारी प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयोगात आणण्यात येईल.

नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिव्हिल सर्व्हंन्ट्सना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी नागरी सेवेला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणत कार्यक्षमता, पारदर्शकता, इक्यू टीक्यू आणि नवोन्मेषाचे महत्त्व अधोरेखित केले. नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट या मंत्रासह ‘विकसित भारत’च्या दिशेने मार्गदर्शन केले. यावेळी २०२३-२४ मधील उत्कृष्ट प्रशासकीय उपक्रम असलेल्या ई-बुक्सच्या मालिकेचेही अनावरण करण्यात आले.या पुरस्कार वितरण समारंभात डॉ. जितेंद्र सिंग, टी. व्ही. सोमनाथन, व्ही. श्रीनिवास व शशिकांत दास, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व सनदी अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार २०२३ ने सन्मानित झाल्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कोर अरोरा यांनी जलज शर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सर्व सामान्य नागरिक केंद्रबिंदू’ या दृष्टिकोनानुसार राबवण्यात येणाऱ्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांची अंमलबजावणी जिल्हास्तरावर प्रभावीपणे करण्यात येईल, असा निर्धारही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.

हा पुरस्कार नाशिकच्या जनतेचा आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांचा सन्मान आहे. सॅचुरेशन अप्रोचचा अवलंब करत आम्ही प्रत्येक योजनेला गती दिली. केंद्र सरकारच्या योजनांना स्थानिक गरजांशी समन्वय साधून प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला त्यातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला. हा पुरस्कार आम्हाला यापुढेही प्रेरणा देत राहील.
जलज शर्मा, जिल्हाधिकारी

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Dr. Shirish Valsangkar: डॉ. वळसंगकर प्रकरणात नवा खुलासा; रुग्णालयात आरोपी मनिषाकडून काळ्या विद्येचे प्रयोग?

0

सोलापूर | Solapur
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूनंतर सोलापुरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी १८ एप्रिल रोजी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केला आहे. यानंतर मनिषा माने-मुसळे या महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपी मनिषाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. आरोपी मनिषा माने-मुसळे ही काळ्या जादूच्या आहारी गेल्याची चर्चा सुरू आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या निकटवर्तीय व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ‘रूग्णालयात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. ज्याचा शिरीष वळसंगकर यांना वैताग आला होता. रूग्णालयात सुरू असलेल्या विविध विषयात त्यांनी लक्ष घालण्यास सूरूवात केली होती. त्यानंतर महत्त्वाकांक्षी असलेल्या मनिषाने त्रस्त झाली. तिने काळ्या विद्येचाही प्रयोग सुरू केला. बिब्बा, लिंबू अन् काळ्या बाहुल्या ती रुग्णालयातील वेगवेगळ्या भागात ठेवू लागली असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. वळसंगकर यांनी २०१७ पासून सर्व कारभार आपल्या मुलासह सुनेकडे सोपवला होता. त्या काळात मनिषाने मनमानी सुरू केली. या दरम्यान मनिषाने आर्थिक बाबींमध्ये गैरव्यवहार करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांना ही गोष्ट समजताच त्यांनी नाराजी व्यक्त केली. डॉक्टरांना मनीषाचे सारेच समजले तेव्हा तिचे अधिकार काढून टाकले. तिला हॉस्पिटलमध्ये खुर्चीवर न बसता फिरून काम करायला सांगितले. त्यामुळे मनिषा आणखी संतापली होती, असे एका निकटवर्तीयाने माहिती दिली. डॉक्टरांच्या या निकटवर्तीयाला मनिषाने कामावरून काढून टाकले होते.

‘अमावस्येच्या दिवशी मनीषा माने ऑन ड्यूटीवर असताना अचानक मधूनच रिक्षातून कुठेतरी जायच्या. तसेच येताना लिंबू आणि बाहुल्या सोबत घेऊन यायच्या. त्यानंतर लिंबू आणि काळ्या बाहुल्या रूग्णालयात ठेवून कामाला जायच्या’, अशी माहिती डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या विश्वासू व्यक्तीने दिलीय. एक मशीन बसवतानाही तिने खाली या वस्तू ठेवल्या. तिच्या या प्रकाराला डॉक्टर वैतागले होते, अशी माहितीदेखील समोर आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा