Sunday, May 4, 2025
Home Blog Page 39

Sanjay Raut : “आम्ही वाट पाहू…”; उद्धव ठाकरेंशी केलेल्या चर्चेनंतर राज ठाकरेंच्या आवाहनाला राऊतांची साद

0

मुंबई | Mumbai

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘मराठी माणसांसाठी आमच्यातील वाद किरकोळ असून मी महाराष्ट्राच्या हितासाठी माझा इगो बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहे, असे म्हटले होते.

त्यानंतर राज ठाकरेंच्या या आवाहनाला प्रतिसाद देतांना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एका कार्यक्रमात बोलतांना ‘मी देखील किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. पण माझी अट एक आहे की, महाराष्ट्राच्या हिताच्या जो आड येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतील बसणार हे आधी ठरवा’, असे म्हटले होते. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलतांना यावर आणखी भाष्य केले.

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे रक्ताचे आणि मैत्रीचे नाते आहे.’एसशिं’ नावाचा पक्ष अमित शाह महाराष्ट्रात चालवत आहे. आमच्यासाठी ते महाराष्ट्राच्या (Maharashtra) हिताच काम करत नाहीत. ते राज ठाकरे यांचा वापर करून मराठी माणसाला पडद्याआडून त्रास द्यायचे काम करत आहेत. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता पुढे काय होईल, ते पाहू, असे त्यांनी म्हटले.

तसेच “मी उद्धव ठाकरेंशी सकाळी आणि रात्रीही चर्चा केली. राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या याविषयावर मी त्यांच्याशी बोललो. आम्ही हवेत बोलत नाही. ही मुंबई आणि मराठी माणूस त्याचा व्यवसाय आणि व्यवहारावर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावेच लागेल. राज ठाकरे यांच्याकडून चांगली भूमिका आली असेल तर ती नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही,” असे म्हणत आम्ही मनसेसोबत (MNS) युती करण्यास तयार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

Ahilyanagar News : ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास पोलिसांना यश, अवघ्या 18 तासाच्या आत मुली पालकांकडे सुपूर्द

0

करजगाव । वार्ताहर

नेवासा तालुक्यातील मुळाकाठ परिसरातील पानेगाव आणि शिरेगाव येथील विटभट्टीवरून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची सोनई पोलिसांनी अवघ्या 18 तासांत सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

16 एप्रिल 2025 रोजी या मुली बेपत्ता झाल्या होत्या. सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तातडीने कारवाई करत पुलतांबा परिसरातून मुलींची सुटका केली. पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली.

या घटनेनंतर सोनई पोलिसांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय तुकाराम माळी (वय 24, रा. शिरेगाव) आणि आकाश मधुकर बर्डे (वय 27, रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

सुटका केलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिसांनी तपास तीव्र केला असून, आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics : टाळी वाजली! राज ठाकरेंच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंचा ‘ग्रीन सिग्नल’; मात्र ठेवली ‘ही’ अट

0
Maharashtra Politics : टाळी वाजली! राज ठाकरेंच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंचा 'ग्रीन सिग्नल'; मात्र ठेवली 'ही' अट

मुंबई | Mumbai

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर (Actor Mahesh Manjrekar) यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ‘मराठी माणसांसाठी आमच्यातील वाद किरकोळ असून मी महाराष्ट्राच्या हितासाठी माझा इगो बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहे, असे म्हटले होते. त्यानंतर आता राज ठाकरेंच्या या टाळीवर उद्धव ठाकरेंनीही हाळी दिली आहे. मात्र, त्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही अटी शर्ती ठेवल्या आहेत. आज श्री छत्रपती महाराज शिवाजी मंदिर स्मारक मंडळ, दादर येथे आयोजित केलेल्या भारतीय कामगार सेनेच्या ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, “किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत आहे. पण माझी अट एक आहे, जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसले नसते. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे सरकार केंद्रात बसवले असते. त्याचवेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिबा द्यायचा, आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

पुढे बोलतांना ते म्हणाले की,”महाराष्ट्राच्या (Maharashtra) हिताच्या जो आड येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतील बसणार हे आधी ठरवा. मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. माझ्याकडून कुणाशी भांडणे नव्हतीत, पण मी मिटवून टाकली चला. त्यावेळी सर्व मराठी माणसांनी ठरवायचे भाजपसोबत जायचे की शिवसेनेसोबत म्हणजे एसंशी, गद्दार नव्हे तर माझ्यासोबत जायचं”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

तसेच “कुणासोबत जाऊन मराठी माणसाचे आणि हिंदुत्वाचे हित होणार आहे हे ठरवा. मग विरोध करायचा की बिनशर्त पाठिंबा द्यायचा ठरवा. महाराष्ट्राचे हित ही एकच शर्त माझी आहे. पण मग बाकीच्या चोरांना कळत नकळत पाठिंबा देणार नाही. त्यांचा छुपा प्रचार करणार नाही, अशी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर (Chhatrapati Shivaji Maharaj) शपथ घ्यायची. मग टाळी द्यायची भाषा करा”, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंच्या आवाहनाला साद; म्हणाले, “आज सांगतो, भांडण मिटवून टाकलं, पण…”

0

मुंबई । Mumbai

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (दि.19) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र येण्यासाठी साद घातली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यांनी युतीसाठी काही स्पष्ट अटी मांडल्या आहेत.

“मी देखील मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. राज ठाकरेंच्या वक्तव्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “माझी एक अट आहे. महाराष्ट्राच्या हितास आड येणाऱ्यांचं समर्थन मी करणार नाही. त्यांच्या घरी जाणार नाही, त्यांना घरी बोलवणार नाही, त्यांच्या पंगतीला बसणार नाही. हे आधी ठरलं पाहिजे.”

ते पुढे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही सांगत होतो की, राज्यातून उद्योग गुजरातला जात आहेत. त्यावेळी विरोध केला असता, तर आज केंद्रात महाराष्ट्राच्या हिताचं सरकार असतं. पण तेव्हा पाठिंबा दिला आणि आता विरोध करत आहेत. याला तडजोड म्हणता येणार नाही.” उद्धव ठाकरे यांनी सर्व मराठी जनतेला एकत्र येण्याचं आवाहन करताना म्हटलं, “आज ठरवा की भाजपसोबत जायचं की माझ्यासोबत. मी गद्दार नाही, माझी शिवसेना खरी आहे.”

“हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हिताचं निर्णय घ्या. विरोध करायचा की निस्वार्थ पाठिंबा द्यायचा हे ठरवा. महाराष्ट्राचं हित हाच एकमेव निकष आहे. चोरांना पाठिंबा न देता, छुप्या भेटी न घेता आणि प्रचार न करता छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घ्या,” असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडलं.

Raj Thackeray : “आमच्यातील वाद…”; उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याबाबत राज ठाकरेंचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

0

मुंबई | Mumbai

गेल्या अनेक वर्षांपासून महराष्ट्रातील जनतेची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूनी एकत्र यावे अशी इच्छा आहे. लोकसभा असो विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यावेळेस ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याच्या चर्चा अधिक जोमाने सुरु होतात. पंरतु, ते काही सत्यात उतरत नाही. अशातच आता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनासोबतच्या युतीवर मोठे विधान केले आहे.

अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी राज ठाकरेंना भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते का? अजून तुम्ही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्र खूप मोठा आहे. कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे आणि हे वाद शुल्लक आहेत. एकत्र येणे आणि एकत्र राहाणे फार कठीण गोष्ट आहे, मला असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. फक्त माझ्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. महाराष्ट्राचा (Maharashtra) स्वार्थ मी पाहतच आहे. मी तर म्हणतो सगळ्या महाराष्ट्रातील पक्षातील मराठी नेत्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा”, असे उत्तर त्यांनी मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिले.

पुढे महेश मांजरेकरांनी ‘शिंदेची शिवसेना (Shinde Shivsena) टेकओव्हर करायला हरकत नव्हती’, असा दुसरा प्रश्न राज ठाकरेंना विचारला. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, “मी आयत्या पीठावर रेघोट्या ओढत नाही. मुळात शिंदेचे बाहेर पडणे, शिंदे फुटणे हा वेगळ्या राजकारणाचा भाग झाला. मी शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळी माझ्याकडेही आमदार खासदार आले होते ना. मलाही त्यावेळी काहीही शक्य होते. पण माझ्या डोक्यात त्यावेळी एकच होते की, मी बाळासाहेबांशिवाय कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. उद्धव सोबत मला काम करायला काहीही हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का सोबत काम करावं?” असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी मांजरेकरांच्या दुसऱ्या प्रश्नाला उत्तर दिले.

तसेच महेश मांजरेकरांनी यावेळी राज ठाकरेंना ‘महाराष्ट्रासाठी मनसे आणि भाजपा (MNS and BJP) एकत्र येणं गरजेचं आहे का?’ असाही प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देतांना राज ठाकरे म्हणाले की, “मी महाराष्ट्रासाठी जे करू शकतो, त्याकरता भाजपाबरोबर एकत्र येणे हे राजकीय होईल. पण आमच्या सर्वच बाबतीत एकमत होईलच,असे नाही. आम्ही एकमेकांना हस्तांदोलनही करू शकतो किवा एकमेकांना पाहून हातही जोडू शकतो. महाराष्ट्र हडपण्याचा जो प्रयत्न दिसतो, त्याविरोधात मी जेव्हा बोलेन तेव्हा हे पक्ष मला किती साथ देतील हे मला माहीत नाही”, असे त्यांनी म्हटले.

Pankaja Munde : “मुंडे साहेबांचे नाव मोठे करण्याची माझी ऐपत नाही, पण…”; पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

0

बीड । Beed

बीडच्या शिरूर तालुक्यात घाटशील पारगाव येथे गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची उपस्थिती होती.

या अध्यात्मिक मंचावर बोलताना पंकजा मुंडे यांनी वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. “मुंडे साहेबांचं नाव मोठं करण्याची माझी ऐपत नाही, पण ते नाव कधीही लहान होऊ देणार नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. “जीवनात कोणालाही दुखवू नये, एवढीच प्रार्थना मी वामनभाऊं कडे बाबांकडे करते,” असेही त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांनी गडाच्या विकासातील आपल्या योगदानाचा उल्लेख करत सांगितलं की, “मी सत्तेत नसतानाही पाच वर्षे गडासाठी काम करत राहिले. पालकमंत्री असताना भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. २००६ मध्ये साहेब गडावर येऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी मला पाठवले. तेव्हापासून मी इथे येत राहिले आहे.” नारळी सप्ताहाच्या परंपरेचा गौरव करत त्यांनी सांगितलं की, भाऊंनी वैभव आणि संपत्ती सोडून ईश्वरमार्ग स्वीकारला. ज्याच्या कर्मात वैभव असतं, तोच जीवनात पुढे जातो.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत सांगताना भावना व्यक्त केल्या. “मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केल्यामुळे आमचं खास नातं तयार झालं. गडाचा विकास म्हणजे केवळ जागेचा विकास नाही, तर इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा विकास झाला पाहिजे,” असं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले, “संत वामनभाऊंनी समाजाला दिशा दिली आहे. इथे जात, धर्म, पंथ काही विचारले जात नाही. मुस्लिम बांधवही या परंपरेत सहभागी होतात. ही समाज जोडणारी परंपरा आहे.”

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ माजी आमदाराने दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, लवकरच घेणार ‘कमळ’ हाती

0
Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का; 'या' माजी आमदाराने दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, लवकरच घेणार 'कमळ' हाती

पुणे | Pune

काँग्रेसला (Congress) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. अशातच आता पुण्यात (Pune) काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्याकडे ईमेल करत काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला आहे. थोपटे रविवारी भोरमध्ये मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. या मेळाव्यात ते काँग्रेस सोडणार असल्याचे आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर कारण्याची शक्यता आहे.

संग्राम थोपटे यांनी पुणे जिल्ह्यातील (Pune District) भोर-वेल्हे-मुळशी या विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे मांडेकर हे जायंट किलर ठरले. विधानसभा निवडणुकीतील पराभवापासूनच संग्राम थोपटे काँग्रेसपासून अलिप्त झाले होते. त्यातच भाजपचे दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul) यांनी मध्यस्थी करत थोपटे यांचे भाजप नेतृत्वाशी बोलणे करून दिल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी केलेल्या चर्चेनंतरच आज संग्राम थोपटे यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, संग्राम थोपटे यांनी आपल्या फेसबुक (Facebook) प्रोफाइलवरील कव्हर फोटो देखील बदलला आहे. पहिल्या कव्हर फोटोवर असणारे काँग्रेसचे चिन्ह त्यांनी काढून टाकले आहे. तर नव्याने अपडेट केलेल्या कव्हर फोटोवरून काँग्रेसचे चिन्ह गायब झाले आहे. याधीच्या कव्हर फोटोवर काँग्रेस चिन्ह हाताचा पंजा आणि त्याच्यापुढे संग्राम थोपटे यांचे नाव आणि फोटो होता. मात्र नव्याने अपडेट करण्यात आलेल्या कव्हर फोटोवर फक्त संग्राम थोपटे यांचे नाव आणि फोटो आहे. तसेच काल (शुक्रवारी) रात्री संग्राम थोपटे यांनी आधीचा कव्हर फोटो काढून नवा फोटो अपडेट केला होता. त्यामुळे त्यांनी यातून काँग्रेसला रामराम ठोकल्याचे संकेत दिले होते.

संग्राम थोपटे होते काँग्रेसमध्ये नाराज

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात संग्राम थोपटे यांचे नाव विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी घेतले जात होते. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले होते, मात्र आघाडीतील अन्य पक्षांचे एकमत होत नसल्याने थोपटे यांना त्या पदाने हुलकावणी दिली व अडीच वर्षानंतर आघाडीची सत्ताही गेली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत थोपटे यांचा पराभव झाला.ते तेव्हापासूनच पक्षातून बाजूला झाले होते.

Robbery News : कोपरगावमध्ये घडाळ्याच्या दुकानात 33 लाखांचा मुद्देमाल चोरी

0

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) Kopargav

शहराच्या अहिंसा चौक परिसरातील सचिन वॉच कंपनी या घड्याळाच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी 33 लाख 69 हजार रुपयांची घड्याळे व रोख रक्कम लंपास केली. शनीवारी पहाटे साडे तीन वाजता झालेली ही चोरी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. या चोरीत अज्ञात 6 पेक्षा जास्त चोर सहभागी असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. काही मिनिटांत चोरांनी सर्व मौल्यवान घड्याळे बॅगेत भरून हा मुद्देमाल लंपास केला.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील मध्यवर्ती चौकात गुरुद्वारा रोड येथे असलेले सचिन वॉच हे संजय लालचंद जैन यांचे दुकान असून अज्ञात चोरट्यांनी शनीवारी दि.19 एप्रिल रोजी मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास या दुकानच्या समोर आडवी चादर लावत समोरील शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील 29 लाख 22 हजार रुपये किमतीचे टायटन कंपनीचे 155 व टायमेक्स कंपनीचे 120 घड्याळे असे 275 घड्याळे व 3 लाख 47 हजार रुपये रोख रक्कम असा 33 लाख 69 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्म, पो.नि. भगवान मथुरे, स.पो.नि.किशोर पवार, पोसई भुषन हंडोरे यांनी भेट दिली आहे.घटने बाबत संजय लालचंद जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम 189/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (4), 305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करत आहे.

Devendra Fadnavis : “नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवली गेली”; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, रोख नेमका कुणाकडे?

0
Devendra Fadnavis : "नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवली गेली"; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, रोख नेमका कुणाकडे?

मुंबई | Mumbai

नाशिकच्या (Nashik) काठे गल्ली परिसरातील (Kathe Galli Area) अनधिकृत दर्ग्याच्या पाडकामावेळी मंगळवार (दि. १५) रोजी पहाटे दोन हजारांहून अधिकच्या जमावाने पोलिसांवर (Police) तुफान दगडफेक केली होती. या दगडफेकीत एकवीस पोलीस जखमी झाले होते. यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. तसेच पाठलाग करून त्यांची धरपकड केली होती. याप्रकरणी १५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत ३० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते म्हणाले की, “नाशिकमधील हिंसाचार (Violence) सुनियोजित होता. ठरवून दंगल (Riot) घडवण्याचा याठिकाणी प्रयत्न झाला. न्यायालयाच्या (Court) निर्णयानंतर तिथल्या नागरिकांनी स्वत: ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितले आणि त्याची सुरुवातही त्यांनीच केली. त्याचवेळी जी मंडळी दंगलीत दिसत आहेत त्यांनी जाणीवपूर्वक पोलिसांवर दगडफेक केली आणि दंगा केला. म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई (Action) करण्यात येत आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

दरम्यान, काठे गल्ली सिग्नल परिसरातील रस्ता चार दिवसानंतर वाहतुकीसाठी आजपासून खुला झाला आहे. पोलिसांनी रस्त्यावरील बॅरीकेट्स हटवले आहेत. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी देखील अनधिकृत बांधकाम परिसरात पोलिसांचा (Police) बंदोबस्त मात्र कायम आहे. काठे गल्ली सिग्नल परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र अनाधिकृत बांधकामावरील कारवाईनंतर शहरात कोणताही अनुचित न घडल्याने पोलिसांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.

१५०० जणांवर ४२ कलमांनुसार गुन्हा

पोलिसांवर हल्ला व जमाव जमविल्याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात एकूण १५०० जणांवर भारतीय न्याय संहितेची कलमे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान, शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम व पोलीस (अप्रितीची भावना चेतावने) अधिनियम अशा ४२ हून अधिक कलम व अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तशी फिर्याद सहायक निरीक्षक सतीश शिरसाठ यांनी सरकार पक्षाच्यावतीने दिली आहे. तर, तपास सहायक निरीक्षक सुधीर पाटील करत आहेत. अटकेतील संशयितांना जामीन मिळण्याची शक्यता धूसर आहे.

Ahilyanagar sarpanch reservation : आरक्षण सोडत निश्चित; ६२५ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज

0

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील १ हजार २२३ ग्रामपंचायतीचे पुढील पाच वर्षांसाठी तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात करण्यात आले आहे. सर्वसाधारण आणि अन्य प्रवर्गाचे तहसीलस्तरावर गावनिहाय आरक्षण २३ एप्रिल तर उपविभागीय पातळीवर महिला सरपंच आरक्षण २४ व २५ एप्रिल रोजी निश्चित केले जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ६२५ ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज राहणार आहे. तर ९६ ग्रामपंचायतीमध्ये २०२१ ला आरक्षण काढण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी जुनेच आरक्षण कायम राहणार आहे.

जिल्ह्यातील पुढील पाच वर्षासाठीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जाहीर केला आहे. यात जिल्ह्यातील १४ तालुक्यातील सर्वसाधारण आणि अन्य प्रवर्गाचे तहसीलस्तरावर गावनिहाय आरक्षण २३ एप्रिल रोजी अंतिम केले जाणार आहे. तर २४ एप्रिल रोजी उपविभागीय कार्यालयात अकोले २४, जामखेड ३०, श्रीरामपूर २७, कोपरगाव ३८, शेवगाव ४८, श्रीगोंदा ४४, नगर ५४ ग्रामपंचायतीसाठी महिला आरक्षण सोडत होणार आहे. २५ एप्रिल रोजी संगमनेर ७३, कर्जत ४७, राहुरी ४३, राहाता २६, पाथर्डी ५५, पारनेर ५८, नेवासा ५८ ग्रामपंचायतीसाठी महिला आरक्षण निश्चित होणार आहे.

जिल्ह्यातील १ हजार २२३ ग्रामपंचायतींपैकी ६२४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सरपंच होण्याची संधी आहे. यात ३१२ ठिकाणी महिला आरक्षण आहे. ३३० ठिकाणी ओबीसीसाठी सरपंच पदाचे आरक्षण असून, यात १६९ महिलांना संधी आहे. ११९ ठिकाणी एसटी आरक्षण असून, यात ६२ ठिकाणी महिला आरक्षण आहे. तसेच १५० ठिकाणी एससी आरक्षण असून, यात ७८ महिला सरपंचांचा समावेश आहे. जिल्ह्यात खुल्या प्रवर्गात ६२४ सरपंच निघणार असून या ठिकाणी३१८ ठिकाणी महिलांना सरपंच होण्याचा मान मिळणार आहे. जानेवारी २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या ९६ ग्रामपंचायतीकरिता सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आरक्षणानुसार न झाल्याने ते आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. उर्वरित १ हजार २२३ ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत होणार आहे.

सोडतीचा अहवाल सादर करा

जिल्ह्यात २३, २४ आणि २५ एप्रिलला काढण्यात येणाऱ्या सरपंच आरक्षणाचा अहवाल २५ तारखेला दुपारपर्यंत नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश डॉ. आशिया यांनी काढले आहेत.