Sunday, May 4, 2025
Home Blog Page 40

Pankaja Munde : “मुंडे साहेबांचे नाव मोठे करण्याची माझी ऐपत नाही, पण…”; पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

0

बीड । Beed

बीडच्या शिरूर तालुक्यात घाटशील पारगाव येथे गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची उपस्थिती होती.

या अध्यात्मिक मंचावर बोलताना पंकजा मुंडे यांनी वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. “मुंडे साहेबांचं नाव मोठं करण्याची माझी ऐपत नाही, पण ते नाव कधीही लहान होऊ देणार नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. “जीवनात कोणालाही दुखवू नये, एवढीच प्रार्थना मी वामनभाऊं कडे बाबांकडे करते,” असेही त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांनी गडाच्या विकासातील आपल्या योगदानाचा उल्लेख करत सांगितलं की, “मी सत्तेत नसतानाही पाच वर्षे गडासाठी काम करत राहिले. पालकमंत्री असताना भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. २००६ मध्ये साहेब गडावर येऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी मला पाठवले. तेव्हापासून मी इथे येत राहिले आहे.” नारळी सप्ताहाच्या परंपरेचा गौरव करत त्यांनी सांगितलं की, भाऊंनी वैभव आणि संपत्ती सोडून ईश्वरमार्ग स्वीकारला. ज्याच्या कर्मात वैभव असतं, तोच जीवनात पुढे जातो.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत सांगताना भावना व्यक्त केल्या. “मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केल्यामुळे आमचं खास नातं तयार झालं. गडाचा विकास म्हणजे केवळ जागेचा विकास नाही, तर इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा विकास झाला पाहिजे,” असं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले, “संत वामनभाऊंनी समाजाला दिशा दिली आहे. इथे जात, धर्म, पंथ काही विचारले जात नाही. मुस्लिम बांधवही या परंपरेत सहभागी होतात. ही समाज जोडणारी परंपरा आहे.”

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ माजी आमदाराने दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, लवकरच घेणार ‘कमळ’ हाती

0
Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का; 'या' माजी आमदाराने दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, लवकरच घेणार 'कमळ' हाती

पुणे | Pune

काँग्रेसला (Congress) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. अशातच आता पुण्यात (Pune) काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्याकडे ईमेल करत काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला आहे. थोपटे रविवारी भोरमध्ये मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. या मेळाव्यात ते काँग्रेस सोडणार असल्याचे आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर कारण्याची शक्यता आहे.

संग्राम थोपटे यांनी पुणे जिल्ह्यातील (Pune District) भोर-वेल्हे-मुळशी या विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे मांडेकर हे जायंट किलर ठरले. विधानसभा निवडणुकीतील पराभवापासूनच संग्राम थोपटे काँग्रेसपासून अलिप्त झाले होते. त्यातच भाजपचे दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul) यांनी मध्यस्थी करत थोपटे यांचे भाजप नेतृत्वाशी बोलणे करून दिल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी केलेल्या चर्चेनंतरच आज संग्राम थोपटे यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, संग्राम थोपटे यांनी आपल्या फेसबुक (Facebook) प्रोफाइलवरील कव्हर फोटो देखील बदलला आहे. पहिल्या कव्हर फोटोवर असणारे काँग्रेसचे चिन्ह त्यांनी काढून टाकले आहे. तर नव्याने अपडेट केलेल्या कव्हर फोटोवरून काँग्रेसचे चिन्ह गायब झाले आहे. याधीच्या कव्हर फोटोवर काँग्रेस चिन्ह हाताचा पंजा आणि त्याच्यापुढे संग्राम थोपटे यांचे नाव आणि फोटो होता. मात्र नव्याने अपडेट करण्यात आलेल्या कव्हर फोटोवर फक्त संग्राम थोपटे यांचे नाव आणि फोटो आहे. तसेच काल (शुक्रवारी) रात्री संग्राम थोपटे यांनी आधीचा कव्हर फोटो काढून नवा फोटो अपडेट केला होता. त्यामुळे त्यांनी यातून काँग्रेसला रामराम ठोकल्याचे संकेत दिले होते.

संग्राम थोपटे होते काँग्रेसमध्ये नाराज

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात संग्राम थोपटे यांचे नाव विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी घेतले जात होते. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले होते, मात्र आघाडीतील अन्य पक्षांचे एकमत होत नसल्याने थोपटे यांना त्या पदाने हुलकावणी दिली व अडीच वर्षानंतर आघाडीची सत्ताही गेली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत थोपटे यांचा पराभव झाला.ते तेव्हापासूनच पक्षातून बाजूला झाले होते.

Robbery News : कोपरगावमध्ये घडाळ्याच्या दुकानात 33 लाखांचा मुद्देमाल चोरी

0

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) Kopargav

शहराच्या अहिंसा चौक परिसरातील सचिन वॉच कंपनी या घड्याळाच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी 33 लाख 69 हजार रुपयांची घड्याळे व रोख रक्कम लंपास केली. शनीवारी पहाटे साडे तीन वाजता झालेली ही चोरी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. या चोरीत अज्ञात 6 पेक्षा जास्त चोर सहभागी असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. काही मिनिटांत चोरांनी सर्व मौल्यवान घड्याळे बॅगेत भरून हा मुद्देमाल लंपास केला.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील मध्यवर्ती चौकात गुरुद्वारा रोड येथे असलेले सचिन वॉच हे संजय लालचंद जैन यांचे दुकान असून अज्ञात चोरट्यांनी शनीवारी दि.19 एप्रिल रोजी मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास या दुकानच्या समोर आडवी चादर लावत समोरील शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील 29 लाख 22 हजार रुपये किमतीचे टायटन कंपनीचे 155 व टायमेक्स कंपनीचे 120 घड्याळे असे 275 घड्याळे व 3 लाख 47 हजार रुपये रोख रक्कम असा 33 लाख 69 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्म, पो.नि. भगवान मथुरे, स.पो.नि.किशोर पवार, पोसई भुषन हंडोरे यांनी भेट दिली आहे.घटने बाबत संजय लालचंद जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम 189/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (4), 305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करत आहे.

Devendra Fadnavis : “नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवली गेली”; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, रोख नेमका कुणाकडे?

0
Devendra Fadnavis : "नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवली गेली"; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, रोख नेमका कुणाकडे?

मुंबई | Mumbai

नाशिकच्या (Nashik) काठे गल्ली परिसरातील (Kathe Galli Area) अनधिकृत दर्ग्याच्या पाडकामावेळी मंगळवार (दि. १५) रोजी पहाटे दोन हजारांहून अधिकच्या जमावाने पोलिसांवर (Police) तुफान दगडफेक केली होती. या दगडफेकीत एकवीस पोलीस जखमी झाले होते. यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. तसेच पाठलाग करून त्यांची धरपकड केली होती. याप्रकरणी १५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत ३० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते म्हणाले की, “नाशिकमधील हिंसाचार (Violence) सुनियोजित होता. ठरवून दंगल (Riot) घडवण्याचा याठिकाणी प्रयत्न झाला. न्यायालयाच्या (Court) निर्णयानंतर तिथल्या नागरिकांनी स्वत: ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितले आणि त्याची सुरुवातही त्यांनीच केली. त्याचवेळी जी मंडळी दंगलीत दिसत आहेत त्यांनी जाणीवपूर्वक पोलिसांवर दगडफेक केली आणि दंगा केला. म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई (Action) करण्यात येत आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

दरम्यान, काठे गल्ली सिग्नल परिसरातील रस्ता चार दिवसानंतर वाहतुकीसाठी आजपासून खुला झाला आहे. पोलिसांनी रस्त्यावरील बॅरीकेट्स हटवले आहेत. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी देखील अनधिकृत बांधकाम परिसरात पोलिसांचा (Police) बंदोबस्त मात्र कायम आहे. काठे गल्ली सिग्नल परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र अनाधिकृत बांधकामावरील कारवाईनंतर शहरात कोणताही अनुचित न घडल्याने पोलिसांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.

१५०० जणांवर ४२ कलमांनुसार गुन्हा

पोलिसांवर हल्ला व जमाव जमविल्याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात एकूण १५०० जणांवर भारतीय न्याय संहितेची कलमे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान, शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम व पोलीस (अप्रितीची भावना चेतावने) अधिनियम अशा ४२ हून अधिक कलम व अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तशी फिर्याद सहायक निरीक्षक सतीश शिरसाठ यांनी सरकार पक्षाच्यावतीने दिली आहे. तर, तपास सहायक निरीक्षक सुधीर पाटील करत आहेत. अटकेतील संशयितांना जामीन मिळण्याची शक्यता धूसर आहे.

Ahilyanagar sarpanch reservation : आरक्षण सोडत निश्चित; ६२५ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज

0

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील १ हजार २२३ ग्रामपंचायतीचे पुढील पाच वर्षांसाठी तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात करण्यात आले आहे. सर्वसाधारण आणि अन्य प्रवर्गाचे तहसीलस्तरावर गावनिहाय आरक्षण २३ एप्रिल तर उपविभागीय पातळीवर महिला सरपंच आरक्षण २४ व २५ एप्रिल रोजी निश्चित केले जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ६२५ ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज राहणार आहे. तर ९६ ग्रामपंचायतीमध्ये २०२१ ला आरक्षण काढण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी जुनेच आरक्षण कायम राहणार आहे.

जिल्ह्यातील पुढील पाच वर्षासाठीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जाहीर केला आहे. यात जिल्ह्यातील १४ तालुक्यातील सर्वसाधारण आणि अन्य प्रवर्गाचे तहसीलस्तरावर गावनिहाय आरक्षण २३ एप्रिल रोजी अंतिम केले जाणार आहे. तर २४ एप्रिल रोजी उपविभागीय कार्यालयात अकोले २४, जामखेड ३०, श्रीरामपूर २७, कोपरगाव ३८, शेवगाव ४८, श्रीगोंदा ४४, नगर ५४ ग्रामपंचायतीसाठी महिला आरक्षण सोडत होणार आहे. २५ एप्रिल रोजी संगमनेर ७३, कर्जत ४७, राहुरी ४३, राहाता २६, पाथर्डी ५५, पारनेर ५८, नेवासा ५८ ग्रामपंचायतीसाठी महिला आरक्षण निश्चित होणार आहे.

जिल्ह्यातील १ हजार २२३ ग्रामपंचायतींपैकी ६२४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सरपंच होण्याची संधी आहे. यात ३१२ ठिकाणी महिला आरक्षण आहे. ३३० ठिकाणी ओबीसीसाठी सरपंच पदाचे आरक्षण असून, यात १६९ महिलांना संधी आहे. ११९ ठिकाणी एसटी आरक्षण असून, यात ६२ ठिकाणी महिला आरक्षण आहे. तसेच १५० ठिकाणी एससी आरक्षण असून, यात ७८ महिला सरपंचांचा समावेश आहे. जिल्ह्यात खुल्या प्रवर्गात ६२४ सरपंच निघणार असून या ठिकाणी३१८ ठिकाणी महिलांना सरपंच होण्याचा मान मिळणार आहे. जानेवारी २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या ९६ ग्रामपंचायतीकरिता सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आरक्षणानुसार न झाल्याने ते आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. उर्वरित १ हजार २२३ ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत होणार आहे.

सोडतीचा अहवाल सादर करा

जिल्ह्यात २३, २४ आणि २५ एप्रिलला काढण्यात येणाऱ्या सरपंच आरक्षणाचा अहवाल २५ तारखेला दुपारपर्यंत नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश डॉ. आशिया यांनी काढले आहेत.

Dada Bhuse : राज्यातील शालेय शिक्षकांनाही ड्रेसकोड लागू होणार? मंत्री भुसेंचे सूतोवाच

0

मुंबई | Mumbai

केंद्र सरकारचे नवे शैक्षणिक धोरण राज्यात राबवत असताना शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा हा विषय सक्तीचा करण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता शिक्षणमंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांनी राज्यातील शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू (Dress Code School Teachers Maharashtra) करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांच्या (Teachers) गणवेशाबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, “शिक्षकांना राज्य पातळीवर एकच गणवेश लागू होणार नाही. पण, शिक्षकांनी शाळेच्या स्तरावर आपसात ठरवून एक गणवेश निश्चित करावा. डॉक्टर, वकील यांना त्यांच्या गणवेशावरून समाजात ओळखले जाते. त्यांना मान दिला जातो. त्याच पद्धतीने शिक्षकांनाही त्यांच्या शाळेच्या गावात मान मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिक्षकांच्या गणवेशाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

तसेच शिक्षकांवरील अशैक्षणिक (Non-Academic) कामे लवकरच कमी केली जातील. ज्यामुळे त्यांना त्यांच्या अध्यापणाच्या मूळ कामाकडे अधिक लक्ष देता येईल, असेही त्यांनी म्हटले. तर लवकरच शिक्षकांना गणवेश लागू केला जाईल. त्यासाठी आवश्यक म्हणून खारीचा वाटा म्हणून राज्य सरकार (State Government) थोडाफार खर्चही उचलणार असल्याचे दादा भुसे म्हणाले. .

दरम्यान, शिक्षकांनी कोणते कपडे घालावेत याबाबत वस्त्रसंहिता याआधीच लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुद्दा शिक्षकांच्या गणवेशाचा आहे. राज्य स्तरावर सर्व शिक्षकांसाठी एकच गणवेश निश्चित केला जाणार नाही. त्याऐवजी प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन त्यांना कोणता गणवेश योग्य वाटतो याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शाळेला असणार आहे. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर (Students) येताना एकसमान असल्याचे जाणवले पाहिजे हा यामागचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्यापाठीमागे राज्य सरकारचे नेमके धोरण काय याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. याशिवाय शैक्षणिक वर्तुळातही त्याबाबत अद्याप विशेष भाष्य झालेले नाही. शिक्षकांना गणवेश लागू करण्याबाबत कोणी खास मागणी केल्याचे अद्याप तरी पुढे आलेले नाही. त्यामुळे शिक्षकांना अशा प्रकारची गणवेश सक्ती करुन राज्य सरकार नेमके काय साधू इच्छिते याबाबतही अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारचा नेमका विचार तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Crime News : सासरी छळ, मारहाण आणि पैशांसाठी त्रास; विवाहितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

0

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

बाभुळगाव (ता. राहुरी) येथे सासरी होणार्‍या मानसिक व शारीरिक छळामुळे त्रस्त झालेल्या 22 वर्षीय विवाहित महिलेने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तिच्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती कैलास पाराजी पाटोळे, कमल पाराजी पाटोळे (दोघे रा. बाभुळगाव, ता. राहुरी), उत्तम महादु पाटोळे व शामल उत्तम पाटोळे (रा. कादंबरीनगर, पाईपलाईन रस्ता, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे पती कैलास पाटोळे, कमल पाटोळे, उत्तम पाटोळे व शामल पाटोळे यांनी तिला वेळोवेळी मारहाण केली. लग्नात मिळालेले सोन्याचे दोन ते तीन तोळे दागिने संशयित आरोपींनी तिच्याकडून घेतले होते. दागिने परत मागितल्यावर फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तसेच, पती कैलास पाटोळे याने तिच्या माहेरून 10 लाख रूपये गाडी खरेदीसाठी आणण्याची मागणी करत वारंवार मानसिक त्रास दिला.

या छळास कंटाळून तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात 17 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी बीएनएस कलम 85 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार दिवटे करत आहेत.

Nagar Urban Bank : ‘नगर अर्बन’च्या ठेवीदारांची उद्या नगरला बैठक; ठेवी व कायदेशीर कारवाईवर होणार चर्चा

0

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

नगर अर्बन बँकेत पाच लाखापुढे ठेवी असलेल्या ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यास होत असलेला विलंब तसेच नगर अर्बन बँक डबघाईस आणणारे संचालक मंडळ व थकबाकीदार कर्जदार यांच्यावर कायदेशीर कारवाईला असलेली संथ गतीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्या (रविवार, 20 एप्रिल) सकाळी साडे दहा वाजता अहिल्यानगर शहरातील महाजनगल्लीतील गायत्री मंदिर सभागृहात नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांची बैठक होणार आहे.

नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे सचिव डी. एम. कुलकर्णी यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगर अर्बन बँकेत पाच लाखापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असलेल्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत कधी मिळणार, यांची आशा लागली आहे. तसेच बँकेला अडचणीत आणणार्‍या संशयित आरोपींना कठोर शासन होण्याच्यादृष्टीने प्रशासनाकडूनही गांभीर्याने हालचाली होत नसल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ठेवीदार व खातेदारांसह सभासदांची बैठक रविवारी सकाळी होणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

दरम्यान, यानंतर ठेवीदारांची कोणतीही बैठक घेतली जाणार नाही व व्हॉटसअ‍ॅपवर ठेवीदारांकडून दिल्या जाणार्‍या सूचनांचीही दखल घेतली जाणार नाही. त्यामुळे रविवारच्या बैठकीस ठेवीदारांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

संपादकीय : १९ एप्रिल २०२५ – आयुष्य संपवणे हा उपाय नव्हे

0

विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देणार्‍या मुलांच्या आत्महत्या हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालातदेखील तसे निरीक्षण नमूद आहे. मुलांवर त्यांच्या पालकांचे जीवापाड प्रेम असते. मुलांच्या प्रगतीची स्वप्ने जसे पालक बघतात तसेच मुलेही. त्यांच्या आयुष्याकडून त्यांच्या खूप अपेक्षा असतात. अपेक्षा असणे गैर नाही. तथापि त्या अपेक्षांनाच आयुष्य समजणे गैर आहे. तसे मानले जाते म्हणूनच अपेक्षापूर्ती न झाल्याने अनेक मुले त्यांचे आयुष्यदेखील संपवतात.

कोणतीही परीक्षा आयुष्यापेक्षा मोठी नसते. मुलांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे अपेक्षित आहे. मुले, त्यांचे पालक, मित्र आणि शिक्षक यांचा डोळस आणि सक्रिय सहभाग अपरिहार्य आहे. अपयशाने मुलांच्या मनात नकारात्मक विचार येणे स्वाभाविकच. पण ते ओळखायला मुलांनी शिकण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षा देणारी मुले जाणत्या वयाची असतात. तारतम्यचा विचार करू शकणारी असतात. उचलले जाणारे प्रत्येक पाऊल आणि त्याचे किमान वरवरचे तरी परिणाम त्यांना माहीत असतात. त्यामुळेच आत्महत्येने प्रश्न सुटत नाही, हेही कदाचित ते जाणून असतील.

विचारांची किमान लवचिकता त्यांनी दाखवणे अपेक्षित आहे. प्रत्येक प्रकारचा ताण हलका करण्याचा संवाद हा खूप सोपा आणि सरळ उपाय मानला जातो. मित्रांकडे-पालकांकडे मन मोकळे करणे, मनाची आंदोलने त्यांना सांगणे दबाव कमी करणारे ठरू शकेल. तसा विश्वास मुलांच्या मनात निर्माण करणे, त्याला पोषक वातावरण घरात असणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना मोठे करताना त्यांच्या मनात सकारात्मक-आशावादाची पेरणी करणे, काहीही झाले तरी मुलापेक्षा कोणीतही गोष्ट त्यांच्यासाठी मोठी किंवा महत्त्वाची नाही हे मुलांच्या मनावर कृतीतून ठसवणे, त्यांची कोणाशीही तुलना न करणे, मुलांना व्यायाम-प्राणायाम आणि ध्यान करण्याची सवय लावणे हे पालकांचे कर्तव्यच आहे.

छोटे छोटे छंद जोपासण्यासाठी मुलांना प्रेरणा दिली जायला हवी. एवढेच नाही तर मूल मनाने अस्वस्थ असेल तर समुपदेशकाची मदत घेण्याइतकी समजदारी किती पालक दाखवतात? त्यासाठी वेळ नाही ही सबब उपयोगाची नाही. दुर्दैवाने मुलाने वेडेवाकडे पाऊल उचलले तर वेळ कायमची निघून जाते हे पालक लक्षात घेतील का? परिस्थितीचा स्वीकार हे तिच्यावर मात करणारे पहिले पाऊल ठरते. आयुष्यात चढ-उतार होतच असतात. त्यांचा सामना करायला हवा. तेच खरे माणूसपण आहे. याची शिकवण मुलांमध्ये योग्य वयात रुजली तर वाढत्या वयात त्यालाच धुमारे फुटू शकतात. मुले हार न मानता संघर्ष करतात. यालाच मुलांचे संगोपन आणि संवर्धन मानले जाते. जे फक्त माणसेच करू शकतात. तात्पर्य, हे जीवन सुंदर आहे हेच खरे.

Dnyanradha Credit Society Fraud : ‘ज्ञानराधा’ मध्ये 1300 ठेवीदारांचे 77 कोटी अडकले; राहुरी, जामखेड, खर्डा शाखेचा ‘मनीट्रेल’ अहवाल पोलिसांच्या हाती

0

अहिल्यानगर । सचिन दसपुते

बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या फसवणुक प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, जामखेड व खर्डा शाखेचा ‘मनीट्रेल’ अहवाल येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती आला आहे. त्यानुसार या तीन शाखेतील सुमारे 1300 ठेवीदारांचे 77 कोटी 76 लाख 74 हजार 681 रूपये अडकले असल्याचे समोर आले आहे. हा सर्व पैसा चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे याच्या 12 कंपन्यांच्या कर्जखात्यावर गेला असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

ज्ञानराधा मल्टिस्टेट फसवणुक प्रकरण राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणाचे बीडसह इतर जिल्ह्यात एकुण 98 गुन्हे दाखल आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील जामखेड व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. श्रीरामपूरच्या गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडीट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. तर जामखेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे ‘मनीट्रेल’ करण्यात आले आहे. त्याचा अहवाल गुन्हे शाखेला प्राप्त झाला आहे.

या अहवालातून फसवणुकीचा आकडा 77 कोटींच्या घरात गेला आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चेअरमन सुरेश कुटे, व्हा. चेअरमन यशवंत वसंतराव कुलकर्णी, संचालक वैभव यशवंत कुलकर्णी, आशिश पद्माकर पाटोदेकर यांना बीड पोलिसांच्या ताब्यातून जामखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यांच्या कोठडीदरम्यान पोलिसांनी तपास केला आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

चेअरमन कुटे याने सुरूवातीला जामखेड व नंतर खर्डा, राहुरी येथे शाखा सुरू केल्या होत्या. या शाखेत ठेवीदारांनी पैशांची गुंतवणुक केली. मात्र सहा महिन्याच्या आत या शाखा बंद झाला. जामखेड येथील ठेवीदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळासह 19 जणांविरूध्द 7 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. या दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुन्ह्याचे ‘मनीट्रेल’ ऑडीट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जामखेडसह खर्डा व राहुरी येथील शाखेच्या व्यवहाराचे ‘मनीट्रेल’ करण्यात आले. त्याचा अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यानुसार एकुण 1300 ठेवीदारांचे सुमारे 77 कोटी 76 लाख 74 हजार 681 रूपये ‘ज्ञानराधा’मध्ये अडकले असल्याचे समोर आले आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष शिंदे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

दरम्यान, या तिन्ही शाखेतील 870 ठेवीदारांनीच आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करून तक्रार दिली आहे. इतर ठेवीदार आलेले नाही. इतर ठेवीदारांनी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

84 लाभार्थी

या तीन शाखेतून जमा झालेले सुमारे 77 कोटी 76 लाख रूपये ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या बीड येथील मुख्य शाखेत वर्ग झाले. तेथून हा पैसा सुरेश कुटे याने स्थापन केलेल्या 12 कंपन्यांच्या कर्जखात्यात गेला. तेथून 84 लोकांच्या खात्यावर ‘आरटीजीएस’व्दारे वर्ग करण्यात आला असल्याचे ‘मनीट्रेल’ अहवालातून समोर आले आहे.

32 संशयित आरोपी

सुरूवातीला चेअरमन कुटेसह 19 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र राहुरी, जामखेड व खर्डा शाखेचे मॅनेजर, संचालक व ज्या लोकांना व्यवहाराचे अधिकार दिले अशांना या गुन्ह्यांत संशयित आरोपी करण्यात आले आहे. 13 जणांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे संशयित आरोपींची संख्या 32 झाली आहे.