Wednesday, May 7, 2025
Home Blog Page 55

Ahilyanagar : जलजीवनमध्ये रोहित पवार, नीलेश लंकेंशी ठेकेदारांचे लागेबांधे

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

‘जलजीवन मिशन’ मधील पाणी योजनांच्या कामांचे, सर्वेक्षणापासून ते ठेकेदार नियुक्तीपर्यंतची कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली आहेत. त्यांनी बसवलेल्या लोकांकडून कामे करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आहे. कर्जत-जामखेडमधील ठेकेदाराचे आ.रोहित पवार व पारनेरमधील ठेकेदाराचे खा. नीलेश लंके यांच्याशी लागेबांधे आहेत, असा थेट आरोप भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे.

डॉ.विखे अकोळनेर (ता. अहिल्यानगर) येथील कार्यक्रमास उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पवार व लंके यांच्यावर आरोप केला. नगर जिल्ह्यातील जलजीवन मिशनमधील पाणी योजनांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) खा. लंके यांनी संसदेत केली होती. तसे निवेदन संबंधित मंत्र्यांना दिले होते. केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील काही कामांची चौकशीही केली. या पार्श्वभूमीवर डॉ. विखे बोलत होते. डॉ. विखे म्हणाले, आरोप करणारे जर सायंकाळी ठेकेदाराला बोलून घेत असतील तर त्यातील वास्तविकता तपासली पाहिजे.

जलजीवन मिशनमधील सर्व कामांचे सर्वेक्षण, त्याच्या निविदा, ठेकेदार नियुक्ती अशी सर्व कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली आहेत. कार्यारंभ आदेश निघाल्यानंतर सरकार बदलले. मात्र, त्यावेळी सरकारने बसवलेल्या लोकांकडूनच कामे करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आहे, अशी टीकाही डॉ. सुजय विखे यांनी केली.

ठाकरे सेनेतून बाहेर पडण्यासाठी भांडण
छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये वाद-विवाद सुरू आहेत. खैरे यांनी दानवे यांच्या विरोधात मातोश्रीवर तक्रार केली आहे. यासंदर्भात सुजय विखे म्हणाले, दोघांना ठाकरे यांच्या सेनेतून बाहेर पडून कुठेतरी जायचे असेल, म्हणून ते भांडण करत आहेत. ठाकरेंच्या सेनेतील नाराजी आता फॅशन झाली आहे. तक्रार करून उपयोग काय ? कारण मातोश्रीवर ऐकायला तरी कोण आहे ? आता मातोश्री, संजय राऊत यांच्या कार्यपध्दतीत एवढ्या वर्षानंतर बदल झालेला नाही. त्यामुळे मातोश्रीवर तक्रार करूनही काय होणार? त्यामुळे ज्यांना चांगल्या नेतृत्वाकडे जायचे असेल ते लोक प्रसारमाध्यमातून भांडण दाखवत आहेत आणि बाहेर पडणार आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Crime News : गांजा विक्रीसाठी आलेले संगमनेरचे दोघे जेरबंद

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

संगमनेर येथून अहिल्यानगर शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पकडले. संदीप उर्फ संजय राजू मालुंजकर (वय 25) व सचिन प्रताप कतारी (वय 26, दोघे रा. संजय गांधी नगर, संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून एक लाख 27 हजार 500 रुपये किमतीचा आठ किलो 535 ग्रॅमचा गांजा व पाच लाखांची कार असा सहा लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मंगळवारी (15 एप्रिल) रात्री 11 वाजता पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे सावेडी उपनगरातील सोनानगर चौकात ही कारवाई करण्यात आली. सोनानगर चौकातील विराम हॉटेल समोरील मोकळ्या जागेत एक राखाडी रंगाची होंडा कंपनीची चारचाकी (एमएच 01 एई 7213) वाहन उभे असून त्यात दोन इसम गांजा विक्रीच्या उद्देशाने थांबले असल्याची माहिती निरीक्षक कोकरे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक अमोल भारती यांना माहिती दिली. त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या.

पोलीस, पंच, नायब तहसीलदार यांचे पथक सदर ठिकाणी पोहोचले असता, संशयित वाहन आढळून आली. त्या वाहनात संदीप उर्फ संजय राजू मालुंजकर व सचिन प्रताप कतारी हे इसम आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता डिक्कीमध्ये एक पांढर्‍या रंगाची गोणी आढळून आली, ज्यात आठ किलो 535 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा गांजा आढळला. याप्रकरणी संशयितांविरूध्द एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत कलम 8 (क), 20 (ब), 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील करत आहेत.

अधीक्षक ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक भारती यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कोकरे, नायब तहसीलदार गणेश भानवसे, उपनिरीक्षक पाटील, अंमलदार योगेश चव्हाण, सुधीर खाडे, भानुदास खेडकर, सुनील चव्हाण, सुनील शिरसाठ, अहमद इनामदार, वसीम पठाण, सुमित गवळी, सतीश त्रिभुवन, सतीश भवर, सागर साबळे, सुजय हिवाळे, महेश पाखरे, बाबासाहेब भापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Crime News : शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

येथील एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनींचा कॉलेजमधील एका शिक्षकाने लैंगिक छळ केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या पीडित विद्यार्थिनीने याप्रकरणी मंगळवारी (15 एप्रिल) रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून शिक्षक अमित खर्डे याच्याविरूध्द विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पीडितेच्या फिर्यादीनुसार, कॉलेजमधील वर्कशॉप मॅनेजमेंटचे शिक्षक अमित खर्डे याने 10 एप्रिल रोजी सकाळी तिला व तिच्या इतर तीन वर्गमित्र-मैत्रिणींना वर्कशॉपमध्ये बोलावून घेतले. तिथे त्यांनी आयडीकार्ड वाटप केल्यानंतर पुन्हा फिर्यादीला फोन करून एकटीला वर्कशॉपमध्ये बोलावून घेतले आणि तिचा हात पकडून, तू नको टेन्शन घेऊ, मी तुला काही होऊ देणार नाही, असे म्हणत तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी सायंकाळीही त्यांनी तिला कॉलेजच्या गोडावूनमध्ये बोलावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.

तिच्यानंतर तिची मैत्रीण हिनेही असाच अनुभव तिच्यासोबत घडल्याचे सांगितले. खर्डे याने तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची माहिती मैत्रिणीने दिली. या प्रकरणाची माहिती त्यांच्या घरी सांगितल्यानंतर विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांनी खर्डे याला ताब्यात घेत अटक केली आहे.

Karjat : नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरोधात पुन्हा अविश्वास ठराव

0

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

राज्य सरकारने नवीन कायदा केल्यामुळे कर्जतच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे बुधवारी (दि.16) 13 नगरसेवकांनी पुन्हा एकदा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार आता पालिका सदस्यांनाच देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या (दि.15) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. यामध्ये एखाद्या नगराध्यक्षाच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्यावर दहा दिवसात सर्वसाधारण सभा बोलून मतदान घेण्याचे बंधनही जिल्हाधिकार्‍यांवर घालण्यात आले आहे.

राज्यातील सर्वच नगरपंचायती नगरपरिषदा यासाठी सन 2020 साली राज्य सरकारने अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी नवीन कायदा अमलात आणला होता. या कायद्यामध्ये संबंधित विभागाच्या मंत्र्यांना व सरकारला अधिकार प्राप्त होते. दरम्यान, कर्जत नगरपंचायतमध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन पक्षांची सत्ता होती. 17 पैकी तब्बल 15 सदस्य या दोन पक्षांचे होते आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचे बारा सदस्य होते. यामुळे नगरपंचायतमध्ये रोहित पवार यांची तशी एकहाती सत्ता होती. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या भारतीय जनता पक्षाचे नगरपंचायतमध्ये अवघे दोन सदस्य आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरसेवकांमध्ये फूट पडली. पक्षाचे आठ काँग्रेस पक्षाचे तीन व भाजपचे दोन सदस्य असे एकूण 13 जणांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. मात्र, प्रस्ताव दाखल केल्यानंतर यामध्ये किमान तीन महिन्यांचा कालावधी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जाणार आहे हे लक्षात आल्यानंतर राज्यामध्ये महायुतीची असणारी सत्ता आणि वर्चस्व याचा पुरेपूर वापर करत कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये थेट कायद्यामध्येच बदल करण्यात आला.

एवढेच नव्हे तर मंगळवारीच राज्यपालांची देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावर स्वाक्षरी देखील घेण्यात आली. अशा पद्धतीने अतिशय वेगाने या सर्व घडामोडी घडल्या आहेत. आणि यासाठी मोठी राजकीय शक्ती सरकारमध्ये असल्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे. नवीन कायद्याने नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करून त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार सदस्यांना देण्यात आला आहे. नवीन कायद्यामुळे नगराध्यक्ष उषा राऊत यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यासाठी कमी कालावधीमध्ये आता प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, यामागे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा सक्रीय सहभाग असल्याची चर्चा आहे.

नवीन कायदा केल्यामुळे बुधवारी जिल्हाधिकार्‍यांकडे नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावेळी रोहिणी सचिन घुले, छाया सुनील शेलार, संतोष सोपान मेहेत्रे, ज्योती लालासाहेब शेळके, सतीश उद्धवराव पाटील, लंकाबाई देविदास खरात, भास्कर बाबासाहेब भैलूमे, भाऊसाहेब सुधाकर तोरडमल, ताराबाई सुरेश कुलथे, मोनाली ओंकार तोटे, मोहिनी दत्तात्रय पिसाळ, अश्विनी सोमनाथ गायकवाड व सुवर्णा रवींद्र सुपेकर या तेरा नगरसेवकांनी पुन्हा एकदा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. आता या नवीन अविश्वास प्रस्तावावर पुढील निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी कोणत्या तारखेला बैठक बोलावणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जुनी प्रक्रिया रद्द
यामुळे यापूर्वी जो अविश्वास प्रस्ताव हुशार राऊत यांच्यावर दाखल केला होता ती सर्व प्रक्रिया आता आपोआपच रद्द झाली आहे. त्यामुळे मागील अविश्वास प्रस्तावावर येत्या 22 तारखेला होणारी सुनावणीही रद्द झाली आहे. आता नवीन अविश्वास प्रस्तावावर जिल्हाधिकारी कोणती तारीख देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

0

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

यावर्षीच्या मंगेशकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून उद्योजक आणि पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार तर संगीत, नाटक, साहित्यासह सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. 24 एप्रिलला सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनिस यांना साहित्य क्षेत्राचा तर ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाला नाट्य श्रेत्रातील पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम या सामाजिक संस्थेलाही सन्मानित करण्यात येणार आहे. अभिनेते सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, श्रद्धा कपूर ,वायोलिनिस्ट एन.राजम गायिका रीवा राठोड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.दीनानाथ मंगेशकर जयंती म्हणजेच 24 एप्रिल रोजी पार्ल्यातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरानजीक असलेल्या ताहाराबाद रोडवरील सुकड नाल्याजवळ दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विरगाव येथील दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर पाठीमागील युवक जखमी झाला.

दुचाकी (क्र. एम. एच. 41 बी. ए. 2426) वरून यशवंत ऊर्फ नाना भरत ठाकूर (27) हा विरगावकडून सटाण्याच्या दिशेने येत असताना रात्री अज्ञात वाहनाने धडक दिली. यशवंत नाना ठाकूर यास डोक्यास व चेहर्‍यावर जोराचा मार लागल्यामुळे त्याला तत्काळ सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

वैद्यकीय तपासणी करत असताना डॉक्टरांनी ठाकूर यास मृत घोषित केले तर जोडीदार भरत सुमा निकम गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यास सटाणा ग्रामीण रुग्णालयातून मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती सटाणा येथील गौरव प्रकाश चव्हाण यांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती कळताच विरगावावर शोककळा पसरली आहे.

राज्यात पहिलीपासूनच हिंदी भाषा सक्तीची

0

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

तमिळनाडू सरकारने केंद्राच्या त्रिभाषा सूत्राला जोरदार विरोध दर्शवला असताना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यंदाच्या चालू शैक्षणिक वर्षात म्हणजे सन २०२५-२६ पासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी, इंग्रजीबरोबरच हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे.नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषासंवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील.

नवीन धोरणानुसार पारंपरिक १० : २ : ३ रचनेऐवजी आता ५ : ३ : ३ : ४ असा शैक्षणिक आकृतीबंध असणार आहे. त्यामुळे यापुढे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तराऐवजी पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरण्यात येणार आहेत.

पायाभूत स्तर : वय ३ ते ८ वर्ष – बालवाटिका – १, २, ३, तसेच इयत्ता पहिली आणि दुसरी
पूर्वतयारी स्तर : वय ८ ते ११ वर्ष – इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवी
पूर्व माध्यमिक स्तर : वय ११ ते १४ – इयत्ता सहावी, सातवी आणि आठवी
माध्यमिक स्तर : वय १४ ते १८ – इयत्ता नववी ते बारावी

अशी होणार अंमलबजावणी
२०२५-२६ – इयत्ता १
२०२६-२७ – इयत्ता २, ३, ४ आणि ६
२०२७-२८ – इयत्ता ५, ७, ९ आणि ११
२०२८-२९ – इयत्ता ८, १० आणि १२

तर बालवाटिका १, २, आणि ३ राबविण्याबाबत महिला आणि बालकल्याण विभागाच्या सहमतीने स्वतंत्र निर्णय जारी करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनुसार एनसीईआरटीद्वारे तयार करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांचा राज्य स्तरावर आवश्यक बदलांसह उपयोग केला जाणार असून यात बालभारती तसेच राज्य शैक्षणिक संशोधन आज प्रशिक्षण परिषदेची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

या धोरणानुसार पायाभूत साक्षरता, अनुभवाधिष्ठित शिक्षण, मूल्याधारित अभ्यासक्रम, समग्र मूल्यांकन आणि शिक्षक प्रशिक्षण यावर विशेष भर दिला जाणार आहे.राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने या अभ्यासक्रम आराखड्यांना मान्यता दिली असून या निर्णयामुळे महाराष्ट्रात शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार आहेत.

तलावात बुडून दोन बालकांचा मृत्यू

0

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तालुक्यातील पिंपळशेवडी जवळील कजवाडेलगत असलेल्या पाझर तलावात खेळताना तोल जाऊन पडल्याने क्रंकाळे गावातील आठ वर्षीय बालकासह सहा वर्षीय बालिकेचा पाण्यात बुडून अंत झाला. या घटनेने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील कंक्राळे येथील सुनील बुधा पवार (8) या बालकासमवेत त्याच्या घराशेजारी राहणारी सहा वर्षीय मुलगी रोहिणी निकम व गावातील चार ते पाच मुले गावाजवळील पाझर तलावात खेळत खेळत पाण्याजवळ पोहोचले.

दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सुनील पवार व त्याच्या शेजारी राहणारी मुलगी रोहिणी हे दोघे तलावातील पाण्यात तोल जाऊन पडल्याने पाण्यात बुडाले. दोघेजण तलावात बुडाल्याचा हा प्रकार अन्य लहान मुलांनी पाहताच त्यांनी घाबरून तेथून पळ काढला व घडलेली घटना गावात येऊन नागरिकांना सांगितली.

नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पाण्यात बुडालेल्या सुनील पवार व बालिका या दोघांचे मृतदेह पाण्यातून काढले. या पाझर तलावात 10 ते 15 फूट पाणी आहे. मुख्य चारीत दोघेजण बुडाले होते. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास पिंपळशेवडी गावाजवळील कजवाडे येथे घडलेल्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. सायंकाळी शोकाकूल वातावरणात दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेची माहिती पोलीस पाटील एकनाथ दासनारे यांनी पोलिसांना देताच पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिंमत चव्हाण करत आहेत.

Ahilyanagar : कालव्यात दोन बहिणींसह ग्रामपंचायत कर्मचार्‍याचा बुडून मृत्यू

0

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील ताजू (Taju) गावाच्या शिवारामध्ये घोड कालव्यात (Ghod Canal) पोहण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींचा व त्यांना वाचवण्यासाठी गेलेला ग्रामपंचायत कर्मचार्‍याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Water Drowning Death) झाला आहे. दिपाली वणेश साबळे (वय 14), ऐश्वर्या वणेश साबळे (वय 10), कृष्णा रामदास पवळ (वय 26) अशी मयतांची नावे आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, घोड कालव्याचे आवर्तन सध्या सुरू आहे.

याच कालव्याच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी (Swimming) दिपाली साबळे व ऐश्वर्या साबळे आणि आणखी दोन लहान मुले गेली असता कालव्यातील पाण्याचा वेग जास्त असल्याचा अंदाज न आल्याने हे चारही मुले पाण्यात बुडू लागली. यावेळी शेजारी शेतात काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा पवळ यांना या मुलांचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी तात्काळ कालव्याकडे धाव घेतली.

त्यांनी कुठलाही विचार न करता पाण्यामध्ये उडी मारून दोन मुलांना पाण्याच्या बाहेर काढले. मात्र दोन मुलींना वाचवण्यासाठी (Girls Save) पुन्हा उडी मारली असता त्याचाही पाण्यामध्ये बुडवून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. या तिघांचे मृतदेह कर्जत (Karjat) येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra News : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू – मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

0
Maharashtra News : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू - मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

डिजिटल शिक्षणाच्या (Digital Eduation) दिशेने महाराष्ट्राची (Maharashtra) वाटचाल सुरू झाली असून महाज्ञानदीप या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil ) यांनी बुधवारी येथे दिली.

‘महाज्ञानदीप’  या पोर्टलचा (Mahagyandeep Portal) शुभारंभ आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, ‘महाज्ञानदीप’ उपक्रमांतर्गत एक हजार तज्ज्ञ प्राध्यापक घडवण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत १५० प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत ‘भारतीय ज्ञान प्रणाली – जेनेरिक’ हा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार केला आहे. हा अभ्यासक्रम या पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून जगभरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑनलाईन सहज एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, या उपक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांचा समावेश आहे. यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सजीव सोनवणे, आयआयटी गांधीनगरचे प्रा. समीर सहस्त्रबुद्धे तसेच राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक, विविध विद्याशाखांचे संचालक उपस्थित होते.