Monday, May 5, 2025
Home Blog Page 7

Sonu Nigam: गायक सोनु निगमला पहलगाम हल्ल्याविषयी वक्तव्य करणं भोवलं; FIR दाखल

0
सोनु

मुंबई | Mumbai
बॉलिवूडसह देशातील अनेक भाषांमध्ये गाणारा आणि गोड गळ्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या गायक सोनु निगमने अनेक भाषांमध्ये गाणी गात गायकाने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आतापर्यंत अनेक गाण्यांनी सोनू निगमने जगभरात चाहते कमावले आहे त्याची अनेक गाणी खुप प्रसिध्द झाली आहे. मात्र यंदा सोनु निगम एका कॉन्सर्ट शो दरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोनू निगमने कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने कन्नड गाण्याची फर्माइश केली असता त्याच्या वागण्याची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केल्याने, सोनू निगमवर FIR दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय प्रकरण आहे?
सोनु निगम हा बेंगळुरु येथे कॉन्सर्ट शोसाठी गेला होता. त्या शोमध्ये सोनु गाणे गात होता. तेव्हा एक चाहत सतत गायकावर कन्नडमध्ये गाणे गाण्यासाठी दबाव टाकत होता. अशात सोनूने चाहत्यांची इच्छा पूर्ण केली नाही कारण चाहते त्याला धमकी देत होता. यानंतर सोनू निगम याने जे वक्तव्य केले. ज्यामुळे आता वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.

https://www.instagram.com/reel/DI4F-F8hxal/?utm_source=ig_web_copy_link

सोनू निगम सर्वांसमोर म्हणाला की, “या चाहत्याच्या जन्माआधीपासून मी कन्नड गाणी गातोय. याच कारणाने पहलगाममध्ये हल्ला झाला. अशाच वागणुकीमुळे तिथे हल्ला झाला”, अशाप्रकारे सोनू निगमने चाहत्याने जी मागणी केली होती त्याची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केल्याने काही संघटनांनी सोनू निगमच्या असंवेदनशील वागण्यावर बोट ठेवले आहे.

https://www.instagram.com/p/DJHcv2JteUZ/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

चाहत्याच्या मागणीची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केल्याने बंगळुरु येथील अनेक कन्नड संघटनांनी अवलाहल्ली पोलीस स्टेशनमध्ये सोनू निगमविरोधात FIR दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२ (१), ३५२ (२) आणि ३५३ अंतर्गत ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. सार्वजनिक स्थळी अपमान आणि शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केल्याने, सोनू निगमविरोधात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Sanjay Raut : “पंतप्रधान मोदी नऊ तास नट-नट्यांसोबत…”; राऊतांचा निशाणा, नेमकं काय म्हणाले?

0

मुंबई | Mumbai

जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, या हल्ल्याचे चोख प्रत्यूत्तर दिले जाईल असा इशारा गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) दिला आहे. दुसरीकडे या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी वेव्हज परिषदेसाठी काल (शुक्रवारी) मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

यावेळी बोलतांना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, “पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तात्काळ बिहारला गेले. त्याठिकाणच्या प्रचारात सहभागी झाले. त्यानंतर पंतप्रधान देशभरात टंगळमंगळ फिरत आहेत. मुंबईत नऊ तास नट-नट्यांसोबत हास्यविनोद करत आहेत. आंध्रप्रदेशचे नेते पवन कल्याणसोबत हास्यविनोद करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर दुखाची एकही लकेर दिसली नाही. पंतप्रधान खुश मिजास आहेत. पुलवामा हत्याकांडानंतरही भाजपच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दुख दिसले नाही, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की,”देशात (Country) युद्धाची चर्चा सुरू असताना ९ तास पंतप्रधान नट-नट्यांबरोबर राहतात. काल फोटो आले, गौतम अदाणी यांच्या एका बंदराच्या उ‌द्घाटनाला गेले. त्यांना मिठ्या मारल्या. पाकिस्तानला पंतप्रधान मोदी धडा शिकवणार आहेत. पण कधी शिकवणार हेच समजत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर युद्धाबाबत कसलीही चिंता दिसत नाही. मात्र, आम्ही चिंतेत आहोत, ते पाकिस्तानला कसा धडा शिकवतील याची काळजी आम्हालाच आहे, असा चिमटाही यावेळी संजय राऊत यांनी
काढला.

तसेच “देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची भाषा केली. देशाचे गृहमंत्री अमित शाह चुनचुन के मारेंगे म्हणाले, मग मारा ना. कोणी अडवले? या सर्वाला जबाबदार अमित शाह आहेत. काश्मीरमध्ये जे हत्याकांड घडलं, तसंच, गेल्या दहा वर्षांतील प्रत्येक हत्याकांडाला अमित शाह जबाबदार आहेत. तरीही मोदींनी त्यांना पदावर का ठेवलं? २७ जणांचं हत्याकांड झालं त्यात राज्यातील ६ माणसं आहेत. आमच्याच लोकांना चुन चुन के मारलं. त्यामुळे अमित शाहांनी राजीनामा (Resign) दिला पाहिजे”, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. तसेच विरोधकांनी अद्यापही अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी न केल्याने आपल्याला त्यांची कीव वाटते”, असेही राऊत म्हणाले.

Akole Suicide Case : पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

0

अकोले (प्रतिनिधी)

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आपली जीवनयात्रा संपल्याची घटना अकोले शहराजवळील माळीझाप शिवारात घडली आहे. संदीप दिलीप मंडलिक असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी अकोले पोलिसांत मयत संदीपचे वडील दिलीप उमाजी मंडलिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून मयत संदीपची पत्नी रूपाली मंडलिक हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. २) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संदीप यांची बहीण उज्ज्वला हिने गोठ्यात दोरीने गळफास घेऊन केल्याचे तिने आत्महत्या बघितल्यावर आरडाओरडा केला.

त्यानंतर अकोले पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संदीपचा मृतदेह खाली काढला तेव्हा त्याच्या खिशात एक चिठ्ठी मिळून आली. त्यामध्ये एवढे सर्व होऊनही बायको सुधारली नाही. त्यामुळे जीवन संपवत आहे. बैठक घेऊन काही उपयोग नाही. कारण मला तिला सोडायचं नव्हतं, ती सुधारावी ही अपेक्षा असा मजकूर लिहिलेला होता.

यानंतर संदीप याचे वडील दिलीप उमाजी मंडलिक यांनी त्याची पत्नी रुपाली हिच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यास संदीपच्या मृत्यूस पत्नी रूपाली ही कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. मयत संदीप हा बुवासाहेब नवले पतसंस्थेच्या राजूर शाखेत लिपीक म्हणून सेवेत होता. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्याच्या मागे एक मुलगा, आईवडील असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे हे करत आहे.

स्थानिक रहिवाशांना घर बांधकामासाठी वाळू ६०० रुपये प्रती ब्रास मिळणार

0

अहिल्यानगर (प्रतिनिधी) 

विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच इतर स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या घरांच्या बांधकामाकरिता वाळूची मागणी केल्यास कमाल ५ ब्रास मयदित वाळू स्वामित्वधन रक्कम (रुपये ६००/- प्रती ब्रास) उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक काल जारी करण्यात आले आहे.

तरतुदीनुसार निश्चित वाळू गट तसेच, पर्यावरण अनुमतीप्राप्त वाळू गटांपैकी जे वाळू गट लिलावामध्ये गेलेले नाहीत अशा वाळूगटामधून शासनाच्या विविध घरकूल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांकरिता स्वामित्वधन न आकारता कमाल ५ ब्रासपर्यंत वाळू उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच, अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी तसेच इतर कोणत्याही कारणामुळे शासनाने जप्त केलेली वाळूदेखील विविध घरकूल लाभार्थ्यांना स्वामित्वधन न आकारता उपलब्ध करून द्यावी. शासनाच्या विविध घरकूल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी गट विकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना स्वामित्वधन न आकारता कमाल ५ ब्रासपर्यंतच्या वाळूसाठी तहसिलदार यांनी जवळचा वाळू गट नमूद करुन ऑनलाईन पासेस उपलब्ध करून द्याव्यात. याकरिता संबंधित लाभार्थ्यांनी तहसिलदार यांच्याकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तहसिलदार यांनी उपलब्ध करून दिलेले ऑनलाईन पासेस डाऊनलोड करुन संबंधित ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी यांच्यामार्फत १५ दिवसांच्या आत घरकूल लाभार्थ्यांना घरपोच उपलब्ध करुन द्यावेत व त्याची पोच घेऊन योग्य ती नोंद ठेवण्यात यावी.

तहसिलदार यांनी घरकूल लाभार्थ्यांस पास उपलब्ध करुन दिल्याच्या दिनांकापासून १ महिन्याच्या आत वाळू उचल करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील. या कालावधीत वाळू न उचलल्यास हा पास आपोआप रद्द होईल. ऑनलाईन पास उपलब्ध करुन देण्यास काही तांत्रिक अडथळा आल्यास तहसिलदार यांनी लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने पास उपलब्ध करुन द्यावेत. तथापि, याची नोंद महाखनिज प्रणालीवर घेण्यात यावी. या कार्यवाहीची संपूर्ण जबाबदारी संयुक्तरित्या तहसिलदार तसेच गट विकास अधिकारी यांच्यावर राहील. त्याचप्रमाणे अशा वाळू गटामधून इतर स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या घरांच्या बांधकामाकरीता वाळूची मागणी केल्यास कमाल ५ ब्रास मर्यादेत वाळू स्वामित्वधन रक्कम (रुपये ६००/- प्रती ब्रास), जिल्हा खनिज प्रतिष्ठाण निधी व इतर अनुज्ञेय रकमांचा भरणा करुन घेऊन दिनांक ८ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय बांधकामांसाठी वाळूच्या मागणीबाबत बांधकाम आराखडा विचारात घेऊन अशा वाळू गटामधून सदर बांधकामाच्या अंदाजपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेल्या दराने तथापि, स्वामित्वधनाच्या रक्कमेपेक्षा (रुपये ६००/- प्रती ब्रास) कमी नसणारे शुल्क आकारुन वाळूचा पुरवठा करण्यात यावा. प्राप्त रक्कमेमध्ये स्वामित्वधन रक्कम, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व इतर अनुज्ञेय रकमांचा समावेश असेल. यासाठी शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार वाळू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी जप्त केलेली वाळू विविध घरकूल लाभार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्यानंतर शिल्लक वाळूची दिनांक शासन निर्णयामधील तरतुदीनुसार विल्हेवाट लावावी.

Ahilyanagar Weather Alert : जिल्ह्यात तीन दिवस यलो अलर्ट; हवामान खात्याची माहिती

0

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

जिल्ह्याच्या काही भागात ३ ते ६ मे दरम्यान विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने सूचना जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती अशा २६ जिल्ह्यात शनिवार ३ ते १० मे पर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून किरकोळ ठिकाणी विजा, वारा व गडगडाटीचे वातावरण राहून पावसाची शक्यता जाणवते, अशी माहिती हवामान खात्याचे सेवानिवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

सध्या महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान ३८ डिग्री तर काहीं ठिकाणी विशेषतः छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यात ४० डिग्रीच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत नाही, असे खुळे यांनी कळवले आहे.

वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त बदल

अरबी समुद्रात दीड किमी उंचीपर्यंत घड्याळ काटा दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ताशी ४५ ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे हा वातावरणीय बदल झाला असल्याचे खुळे यांनी सांगितले आहे.

Lairai Devi Stampede : लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी; ६ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी

0

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोव्यातील (Goa) शिरगाव (Shirgaon) येथील लैराई देवी यात्रेदरम्यान (Lairai Devi Yatra) चेंगराचेंगरी झाल्याची घटना आज (शनिवारी) पहाटेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत सहा भाविकांचा मृत्यू (Death) झाला असून तीस हून अधिक जखमी झाले आहेत. या जखमींना गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, यातील १५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

लैराई देवीचे मंदिर दक्षिण गोव्यातील शिरोडा गावात (Shiroda Village) आहे. या मंदिरात दरवर्षी यात्रा असते. त्यामध्ये ४० ते ५० हजार भाविक (Devotees) सहभागी होतात. शनिवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक पोहचले. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, एका ठिकाणी उतार असताना गर्दीतील लोक वेगाने चालू लागले होते. यामुळे गर्दीत गोंधळ निर्माण होऊन पळापळ सुरु झाली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा आढावा घेतला. तसेच डिचोली, गोमेकॉ इस्पितळात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची व जखमींची (Injured) भेट घेतली.

घटनेतील मृतांची नावे

जत्रेतील चेंगराचेंगरीत मृतांमध्ये सूर्या मयेकर (साखळी), आदित्य कवठणकर व तनुजा कवठणकर (दोघेही अवचीतवाडो-थिवी), यशवंत केरकर (माडेल-थिवी), प्रतिभा कळंगुटकर (कुंभारजुवे) व सागर नंदरगे (माठवाडा-पिळगाव), अशी मृतांची नावे आहेत. या घटनेतील मृत आदित्य व तनुजा हे काकू व पुतण्या असून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

शिरगाव येथील घटना अत्यंत दुर्दैवी असून उत्तर गोवा जिल्हाधिकारी व पोलिस यंत्रणेला आपण चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच जखमींची विचारपूस केली. यावेळी पुढील तीन दिवसांसाठी मुख्यमंत्र्‍यांचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत .

संपादकीय : ३ मे २०२५ – गोदा प्रदूषणमुक्तीचे स्वप्न

0

एकशे दोन वर्षांची परंपरा लाभलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेला गोदाकाठी कालपासून सुरुवात झाली. ही व्याख्यानमाला नाशिककरांचे पिढ्यान-पिढ्या बौद्धिक पोषण करीत आहे. यानिमित्ताने जागतिक कीर्तीचे व्याख्याते नाशिकला येतात. त्यांचे विचार नाशिककरांना ऐकायला मिळतात. संगीताची मेजवानी रसिकांचे कान तृप्त करते. गोदा आणि रामकुंड परिसर नाशिककरांसाठी हक्काचा परिसर आहे. पन्नाशीला आलेले नाशिककर या परिसराला भेट देतात तेव्हा त्यांच्या मनःपटलावर अनेक आठवणी पिंगा घालत असतील.

गोदाकाठचा परिसर नाशिककरांसाठी नेहमीच ऊर्जास्रोत राहिला आहे. लेखक आणि कवींना हा परिसर नेहमीच खुणावतो. चित्रकारांच्या कलेला इथेच धुमारे फुटतात. नाशिकमध्ये वेगवेगळ्या निमित्ताने निघणार्‍या बहुसंख्य सार्वजनिक व धार्मिक मिरवणुका येथेच येऊन समाप्त होतात. त्याअर्थाने गोदाघाट सर्वसमावेशकतेचे अनोखे उदाहरण ठरू शकेल. विविध प्रकारच्या रोजगार निर्मितीला कारण ठरल्याने नाशिककर गोदावरीला त्यांची मजीवनदायिनीफच मानतात. अशी ही गोदावरी आणखी किती दिवस फक्त कागदावरच प्रदूषणमुक्त होत राहणार? किती दिवस ती फक्त डॉ. राजेंद्रसिह यांच्यासारख्या जाणत्यांच्या स्वप्नात बारमाही वाहत राहणार?

किती दिवस तिच्या पाण्यात मनसोक्त डुंबण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुटण्याची वाट युवा पिढी पाहणार? गोदा प्रवाही, स्वच्छ आणि सुंदर करण्याची आश्वासने राज्याचे कारभारी आणखी किती दिवस देत राहतील? त्यासाठी तिच्या पात्रात ठिकठिकाणी मिसळणारे सांडपाणी आधी बंद करावे लागेल. तिच्या पात्रातील काँक्रिटीकरण काढावे लागेल. तिचा काठ दुतर्फा सर्व प्रकारच्या अतिक्रमणांपासून मुक्त करावा लागेल. तिचे पात्र प्रदूषित करण्यास हातभार लावणार्‍यांवर सातत्याने कडक कारवाई करावी लागेल. याबाबत स्पष्ट आदेश न्यायसंस्थेने वारंवार दिले आहेत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनीही कोर्टाची पायरी अनेकदा चढली आहे.

कोणतीही नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी फक्त अभियान किंवा प्रकल्प घोषित करणे पुरेसे नाही. त्यासाठी प्रदूषणाच्या मुळाशी जाऊन काम करावे लागेल, असे मत डॉ. माधवराव गाडगीळ यांनी व्यक्त केले आहे. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिहदेखील सातत्याने मार्गदर्शन करतात. या पार्श्ववभूमीवर आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिककर ‘नमामि गोदा’च्या प्रतीक्षेत आहेत. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त होण्यात महत्वाची भूमिका बजावणार्‍या मलनिःस्सारण केंद्रांची उभारणी, गोदाघाटांचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण, कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक प्रणालींची उभारणी आणि सिंहस्थात भाविकांसाठी स्वच्छ पाणी सुविधा देणे हे त्या प्रकल्पाचे उद्देश आहेत. गोदावरीला तिचे वैभव पुन्हा मिळवून देणार्‍या ‘नमामि गोदा’ प्रकल्पाची कार्यक्षमतेने अंमलबजावणी सिंहस्थापूर्वी व्हावी, हीच नाशिककरांची अपेक्षा आहे.

आंबेवाडीत पाणीटंचाई; झर्‍यातून झिरपणार्‍या पाण्यासाठी महिलांची रांग

0

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारामध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, स्थानिक आदिवासी महिलांना अक्षरशः जीव धोक्यात घालून दोनशे फूट खाली उतरून झर्‍यातून पाणी भरावे लागत आहे.

परिसरातील पाझर तलाव पूर्णपणे आटले असून, एकमेव झरा उरलेला असून जो तलावाच्या एका कोपर्‍यात पाझरत आहे. या झिर्‍यातून एक हंडा पाणी भरायला सुमारे 20 मिनिटे लागतात. मात्र, पाणी भरून एवढ्यावरच महिलांचा त्रास संपत नाही. त्यानंतर त्यांना खडकाळ, अरूंद व दोनशे फूट उंच चढणार्‍या पायवाटेने टेकडी चढत 1 ते 1.5 कि.मी. अंतरावर पाणी वाहून न्यावे लागत आहे. हा प्रवास अत्यंत कष्टदायक, धोकादायक आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा महिला पाणी वाहून नेत असताना तोल जाऊन पडल्याने जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु प्रशासनाकडून अद्यापही योग्य उपाययोजना करण्यात आलेली नाही.

विशेष म्हणजे गावात जलजीवन मिशनअंतर्गत पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असले तरी नियोजनाच्या अभावामुळे त्या टाकीत अद्याप पाणीच आलेले नाही. परिणामी ही योजना केवळ कागदावरच मर्यादित राहिली आहे. या गंभीर समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः महिलांना दररोजच्या जीवनात अत्यंत त्रास सहन करावा लागत असून, आरोग्य व सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. गावकर्‍यांनी प्रशासनाकडे तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याची आणि जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Ahilynagar Crime News : वयोवृध्द नागरिकासह चार जणांवर धारदार शस्त्राने हल्ला

0

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

लक्ष्मीनगर, तपोवन रस्ता येथील सहकारी गृह निर्माण संस्थेच्या परिसरातील जॉगिंग ट्रॅकवर दुचाकी नेण्यास मनाई केल्याच्या कारणावरून दोन तरूणांनी वयोवृध्द नागरिकासह एकूण चार जणांवर हल्ला केल्याची घटना गुरूवारी (1 मे) सायंकाळी 5.30 वाजता घडली. या हल्ल्यात धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला असून जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.

याप्रकरणी सुर्यकांत नारायण झेंडे (वय 83, रा. लक्ष्मीनगर, तपोवन रस्ता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक राजु बेळगे व अभिमन्यु राजु बेळगे (दोघे रा. डोकेनगर, तपोवन रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी सुर्यकांत झेंडे आणि त्यांचे मित्र राजेंद्र दत्तात्रय शेटे जॉगिंग ट्रॅकवर सायंकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारत होते.

याच दरम्यान अभिषेक बेळगे आणि अभिमन्यु बेळगे हे दुचाकीवरून ट्रॅकवर येत होते. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना ट्रॅकवरून वाहन चालवू नये, असे शांततेने समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरून संतप्त झालेल्या दोघांनी सुर्यकांत झेंडे आणि राजेंद्र शेटे यांच्याशी उध्दटपणे बोलून त्यांना मारहाण केली. यावेळी पोलीस भरती प्रक्रियेतील एक गोळा राजेंद्र शेटे यांच्या दिशेने फेकण्यात आला.

गोंधळ ऐकून निखील राजेंद्र शेटे आणि आनंद सुर्यकांत झेंडे मदतीला धावून आले, त्यांनाही मारहाण करण्यात आली. अभिमन्यु बेळगे याने धारदार शस्त्राने निखील शेटे यांच्या उजव्या गालावर आणि मानेवर, आनंद झेंडे यांच्या कानावर, मानेवर व खांद्यावर, तर राजेंद्र शेटे यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Crime News : विवाह केला, कुटुंबापासून लपवले, संबंध ठेवले, अन्…; पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल

0

पुणे (प्रतिनिधि)

एका २८ वर्षीय तरुणीवर प्रेमसंबंधांचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विराज गावडे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, ३२ वर्षीय विराज गावडे (रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करून नोंदणी पद्धतीने विवाह केला. मात्र, हा विवाह त्याने आपल्या कुटुंबीय व मित्रांपासून लपवला. तिला पत्नीचा दर्जा नाकारत, वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून १० ते १२ लाख रुपये घेतले.

विराजची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर पीडित तरुणीने विवाहाची कबुली देण्याची मागणी केली. मात्र, विराजने तिला तिच्या जातीचा उल्लेख करत विवाह मान्य न होण्याचे कारण दिले आणि संबंध तोडले. ‘तू खालच्या जातीची आहेस, माझ्या कुटुंबीयांना हे मान्य होणार नाही’ असे सांगून तिचा मानसिक छळ केला.

तक्रारीत पीडितेने म्हटले आहे की, विराजने तिचा गर्भपात करवून घेतला आणि जातिवाचक अपशब्द वापरत तिला धमकावले. तसेच त्याचे वडील गजानन गावडे आणि भाऊ कुणाल गावडे यांनीही या प्रकरणात त्याला पाठिंबा दिला. पीडितेने आपल्या वडिलांच्या जागेवर चंद्रपूर येथे मिळालेली नोकरी केवळ विराजच्या सांगण्यावरून नाकारली होती. त्यामुळे आज ती आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून नोकरीही गमावली आहे.

या प्रकरणी विराज गावडे, त्याचे वडील गजानन आणि भाऊ कुणाल यांच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक, जातीवाचक अपमान आणि गर्भपातासंबंधीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.