Monday, May 5, 2025
Home Blog Page 8

Ahilynagar Crime News : वयोवृध्द नागरिकासह चार जणांवर धारदार शस्त्राने हल्ला

0

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

लक्ष्मीनगर, तपोवन रस्ता येथील सहकारी गृह निर्माण संस्थेच्या परिसरातील जॉगिंग ट्रॅकवर दुचाकी नेण्यास मनाई केल्याच्या कारणावरून दोन तरूणांनी वयोवृध्द नागरिकासह एकूण चार जणांवर हल्ला केल्याची घटना गुरूवारी (1 मे) सायंकाळी 5.30 वाजता घडली. या हल्ल्यात धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला असून जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.

याप्रकरणी सुर्यकांत नारायण झेंडे (वय 83, रा. लक्ष्मीनगर, तपोवन रस्ता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक राजु बेळगे व अभिमन्यु राजु बेळगे (दोघे रा. डोकेनगर, तपोवन रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी सुर्यकांत झेंडे आणि त्यांचे मित्र राजेंद्र दत्तात्रय शेटे जॉगिंग ट्रॅकवर सायंकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारत होते.

याच दरम्यान अभिषेक बेळगे आणि अभिमन्यु बेळगे हे दुचाकीवरून ट्रॅकवर येत होते. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना ट्रॅकवरून वाहन चालवू नये, असे शांततेने समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरून संतप्त झालेल्या दोघांनी सुर्यकांत झेंडे आणि राजेंद्र शेटे यांच्याशी उध्दटपणे बोलून त्यांना मारहाण केली. यावेळी पोलीस भरती प्रक्रियेतील एक गोळा राजेंद्र शेटे यांच्या दिशेने फेकण्यात आला.

गोंधळ ऐकून निखील राजेंद्र शेटे आणि आनंद सुर्यकांत झेंडे मदतीला धावून आले, त्यांनाही मारहाण करण्यात आली. अभिमन्यु बेळगे याने धारदार शस्त्राने निखील शेटे यांच्या उजव्या गालावर आणि मानेवर, आनंद झेंडे यांच्या कानावर, मानेवर व खांद्यावर, तर राजेंद्र शेटे यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Crime News : विवाह केला, कुटुंबापासून लपवले, संबंध ठेवले, अन्…; पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल

0

पुणे (प्रतिनिधि)

एका २८ वर्षीय तरुणीवर प्रेमसंबंधांचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विराज गावडे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, ३२ वर्षीय विराज गावडे (रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करून नोंदणी पद्धतीने विवाह केला. मात्र, हा विवाह त्याने आपल्या कुटुंबीय व मित्रांपासून लपवला. तिला पत्नीचा दर्जा नाकारत, वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून १० ते १२ लाख रुपये घेतले.

विराजची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर पीडित तरुणीने विवाहाची कबुली देण्याची मागणी केली. मात्र, विराजने तिला तिच्या जातीचा उल्लेख करत विवाह मान्य न होण्याचे कारण दिले आणि संबंध तोडले. ‘तू खालच्या जातीची आहेस, माझ्या कुटुंबीयांना हे मान्य होणार नाही’ असे सांगून तिचा मानसिक छळ केला.

तक्रारीत पीडितेने म्हटले आहे की, विराजने तिचा गर्भपात करवून घेतला आणि जातिवाचक अपशब्द वापरत तिला धमकावले. तसेच त्याचे वडील गजानन गावडे आणि भाऊ कुणाल गावडे यांनीही या प्रकरणात त्याला पाठिंबा दिला. पीडितेने आपल्या वडिलांच्या जागेवर चंद्रपूर येथे मिळालेली नोकरी केवळ विराजच्या सांगण्यावरून नाकारली होती. त्यामुळे आज ती आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून नोकरीही गमावली आहे.

या प्रकरणी विराज गावडे, त्याचे वडील गजानन आणि भाऊ कुणाल यांच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक, जातीवाचक अपमान आणि गर्भपातासंबंधीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

सामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवा – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

0

नाशिक | प्रतिनिधी

ग्रामीण भागातील जनतेस प्रभावी, सहज साध्य व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबवले जाते. या अभियांनाअंतर्गत आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा प्राप्त करून द्याव्यात, असे निर्देश केंद्रीय आयुष मंत्रालय व स्वास्थ आणि कल्याणमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी येथे केले.

मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह सभागृहात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आढावा बैठक झाली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान मुंबई येथील अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, नाशिकचे उपअभियंता भुषण देसले, बुलढाणा येथील उप अभियंता अभिषेक जवकार आदींसह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री जाधव यांनी यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान, पीएम-आयुष्यमान भारत, आरोग्य पायाभूत सुविधा अभियान, आयुष योजना, 15 वा वित्त आयोग या योजनांअंतर्गत करण्यात आलेली कामे, प्रस्तावित कामे व प्रलंबित असलेली कामे यांचा आढावा घेतला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यक्रम अंमलबजावणी योजनेत मंजूर कामांची वर्षनिहाय प्राधान्यक्रमानुसार यादी सादर करण्याच्या सूचना जाधव यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्रांची बांधकाम करताना काम गुणवत्तापूर्वक व उत्तम दर्जाची होतील याकडे प्रामुख्याने भर द्यावा. 15 वा वित्त आयोग अंतर्गत आरोग्य विषयक विविध चाचण्या करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रयोगशाळा या पूर्ण क्षमतेने सुरू कराव्यात. तसेच राज्यात ज्या ठिकाणी आरोग्य विषयक सेवा देणारी दवाखाने व प्रयोगशाळा इमारतींची कामे सुरू आहेत, त्यांची अंदाजपत्रकासह नमूद केलेल्या बाबींसह तपासणी करण्यात येणार असल्याचेही मंत्री जाधव यांनी सांगितले.

धुळे तापले; पारा 44 अंशांवर

0

धुळे | प्रतिनिधी

शहरात उष्णतेने कहर केला असून शुक्रवारी (2 मे) यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सलग चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शहरात गेल्या तीन दिवसांपासून तापमान 43 अंशांवर स्थिर होते. मात्र शुक्रवारी त्यात आणखी एक अंशाची भर पडली आणि सूर्याने अक्षरशः आग ओकली. सकाळी नऊच्या आतच उन्हाचे चटके जाणवू लागले होते. परिणामी, दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. नागरिक डोक्यावर रुमाल, चेहर्‍यावर गॉगल लावूनच घराबाहेर पडताना दिसत आहेत, तर काहींनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणेच टाळले आहे. तप्त उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. घशालाही कोरड पडत असल्यामुळे शीत पेयांना मागणी चांगलीच वाढली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून तापमान 42-43 अंशांच्या घरात फिरत आहे. उकाड्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच त्रास जाणवत आहे. दुपारच्या वेळेस बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणे ओस पडलेली पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना शक्यतो उन्हात न जाण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा आणि उन्हापासून बचाव करणारे उपाय करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची आई निर्मल कपूर यांचे निधन

0

मुंबई |

प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांच्या ९० वर्षीय आई निर्मल कपूर यांचे आज २ मे २०२५ रोजी संध्याकाळी निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेने कपूर कुटुंबासह संपूर्ण बॉलिवूड शोकग्रस्त झाले आहे. अनिल, बोनी आणि संजय कपूर यांना आईचे छत्र हरपले आहे.यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

जंगलात खड्डयात लपवलेला 70 लाखांचा गांजा जप्त

0

धुळे । प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिवारातील जंगलात खड्डा खोदून लपवलेला तब्बल 1010 किलो वजनाचा व सुमारे 70 लाख 70 हजार रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 1 मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रोहिणी शिवारातील जंगलात गांजाचा साठा लपवण्यात आला असून, त्या ठिकाणी दोन जण रखवाली करत आहेत. त्यानुसार त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडून कारवाईची परवानगी घेतली. त्यानंतर पथकासह घटनास्थळी छापा टाकला. तेव्हा दोन जण पोलिसांना पाहून पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी त्यांची नावे भाईदास जगतसिंग पावरा (रा. लाकडया हनुमान) व बाटा अमरसिंग पावरा (रा. रोहिणी, ता. शिरपूर) अशी सांगितली.

जंगलात शोध घेतल्यावर पळसाच्या झाडाजवळील ठिकाणी नवीन माती टाकलेली आढळली. संशय बळावल्याने जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदण्यात आला असता, जमिनीखाली पत्रे लावून त्याखाली 34 पत्रटी कोठ्यांमध्ये गांजा भरलेला सापडला. प्रत्येक गोणीत 25 किलो गांजा भरलेला होता. तर एका गोणी 10 किलो गांजा होता. एकूण 1 हजार 10 किलो गांजा मिळून आला. ज्याची किंमत 7 हजार रुपये किलोप्रमाणे 70 लाख 70 हजार रुपये इतकी होते.याप्रकरणी पोहेकॉ. चत्तरसिंग खसावद यांच्या फिर्यादीवरून दोघा संशयीतांवर शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई. सुनिल वसावे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई. मिलींद पवार, पोहेकॉ. संतोष पाटील, सागर ठाकुर, संदीप ठाकरे, रमेश माळी, अल्ताफबेग मिर्झा, पोकॉ. धनराज गोपाळ, योगेश मोरे, संजय भोई, ग्यानसिंग पावरा, प्रकाश भिल, दिनकर पवार, वाला पुरोहित, रणजित वळवी, मनोज नेरकर, चालक पोकॉ. सागर कासार यांच्या पथकाने केली.

सरकारचे शंभर दिवसांचे मूल्यांकन फसवे – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

0

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आठ लाख महिलांना वगळले आहे. सरकारचा पिंक रिक्षा उपक्रम अयशस्वी ठरला आहे. आशासेविका, अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा प्रश्न प्रलंबित आहे. महिला आणि बालविकास विभागाचे इतके दुर्लक्ष असताना या विभागाला पहिला क्रमांक कसा काय दिला? असा सवाल करत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारने जाहीर केलेले १०० दिवसांचे मूल्यांकन हे फसवं आणि धुळफेक करणारे असल्याची टीका केली.

महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी १०० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणांचा निकाल जाहीर केला. यात महिला आणि बालविकास विभाग अव्वल ठरला आहे. दानवे यांनी शुक्रवारी या मूल्यांकनावर जोरदार टीका केली. एकप्रकारे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने मूल्यांकनाचा घाट घातल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकारने एप्रिल महिन्यात विभागांच्या केलेल्या गुणांकात एका महिन्यात वाढ कशी केली? सा प्रश्नही त्यांनी केला.

सन २०२२ मध्ये शिवसेना पक्षात गद्दारी झाली त्यावेळी त्या आमदारांना सुरतला घेऊन जाणारे पोलीस अधिकारी हे बाळासाहेब पाटील होते. राज्यात गुटखा, ड्रग्स बंदी असताना ते गुजरातमधून अवैधरित्या पालघरमध्ये आणला जातो. बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात अनेक तक्रारी असताना त्यांना पोलीस अधीक्षक म्हणून पहिल्या क्रमांकाचे मूल्यांकन कसे दिले? एसटीच्या कर्मचाऱ्यांना ४० टक्के पगार देणाऱ्या परिवहन विभागाला गुणांकन कसे दिले जाते? अशी विचारणा दानवे यांनी केली.

राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफ न केल्यामुळे त्यांचे कर्ज थकले आहे. त्यामुळे बँका त्यांना कर्ज देतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही दानवे म्हणाले.

WAVES SUMMIT 2025 : ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यू सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. याशिवाय चित्रपट उद्योग क्षेत्रात झालेले करार चित्रपट निर्मिती क्षेत्राला अधिक उंचीवर नेतील, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ‘वेव्हज् २०२५’ परिषदेमध्ये आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर प्रत्येकी १ हजार ५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. तसेच राज्याच्या उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस कंपनी सोबत ३ हजार कोटी रुपयांचा तसेच गोदरेज सोबत दोन हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, जगातील दोन सर्वोत्तम विद्यापीठांसोबत सामंजस्य करार होत आहे. नवी मुंबईत सुरू होत असलेल्या ‘एज्यू सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकाच ठिकाणी येतील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे.

जगभरात भारतीय चित्रपटसृष्टी आणि कला यांची मोठी लोकप्रियता आहे. आपल्याला सर्वोत्तम व्हायचे आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे आहे आणि आपल्या प्रतिभावान तंत्रज्ञांच्या कौशल्यातून नवनिर्मिती करायची आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, प्राईम फोकस आणि गोदरेज यांच्यासोबतच्या करारांमुळे आपले उद्दिष्ट पूर्ण होईल. विश्वास, गुणवत्ता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या निवडक कंपन्यांमध्ये ‘गोदरेज’चे नाव अग्रगण्य आहे. गोदरेजकडून उभारला जाणारा स्टुडिओ सर्वोत्तम ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. करार झालेल्या सर्व संस्थांना राज्य सरकारच्यावतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले.

एनएसई इंडायसेसकडून ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’ चा शुभारंभ
‘एनएसई इंडायसेस लिमिटेड’ने या परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व्हर्चुअल बेल वाजवून ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’चा शुभारंभ केला. ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’च्या माध्यमातून या कंपन्यांमध्ये जगभरातील गुंतवणूक होईल. निफ्टी वेव्हज् इंडेक्स मध्ये मीडिया, मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रातील ४३ सूचीबद्ध कंपन्या समाविष्ट आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया तसेच युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यांच्याशी ‘सिडको’चा करार
सिडकोमार्फत नवी मुंबई येथे एज्युसिटी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यांचे कॅंपस स्थापन करण्याच्या उद्देशाने दोन्ही संस्थांशी स्वतंत्रपणे प्रत्येकी १ हजार ५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

‘प्राईम फोकस’ आणि ‘गोदरेज’ यांच्यासोबत करार
उद्योग विभाग आणि ‘प्राईम फोकस’ तसेच ‘गोदरेज फंड मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपन्यांशी स्वतंत्रपणे सामंजस्य करार करण्यात आले. ‘प्राईम फोकस’ सोबत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार करण्याच्या दृष्टीने करार करण्यात आला असून यामध्ये प्रस्तावित गुंतवणूक ३ हजार कोटी रुपये असणार आहे. या माध्यमातून सुमारे २ हजार ५०० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होईल. हा प्रकल्प २०२५-२६ मध्ये सुरू होईल.

तर ‘गोदरेज’ सोबत पनवेल येथे एए स्टुडिओ स्थापन करण्याबाबत करार झाला. या कराराचा पहिला टप्पा ५०० कोटी रुपये गुंतवणुकीचा असून याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ६०० रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प २०२७ मध्ये सुरू होईल. पुढील टप्प्यात १ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यामध्ये १ हजार ९०० रोजगार निर्मिती होईल. हा टप्पा २०३० पर्यंत सुरू होईल. या माध्यमातून एकूण २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर २ हजार ५०० रोजगार निर्मिती होईल.

मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी : फडणवीस
दरम्यान, जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. वेव्हज परिषदेसारख्या एका व्यासपीठाची जागतिक पातळीवर गरज होती. ही गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या वेव्हज परिषदेचे आयोजन केले आणि त्याचे यजमानपद महाराष्ट्राकडे दिले. राज्यासाठी ही एक मोठी संधी आहे, असेही त्यांनी सांगितले.

Crime News : विश्रांतवाडीतील दुचाकी चोरटे जामखेडमधून अटकेत; तीन दुचाकी जप्त

0

पुणे(प्रतिनिधि)

विश्रांतवाडी परिसरातून दुचाकी चोरून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी जामखेड (अहिल्यानगर) येथून अटक केली आहे. या चोरट्यांकडून तीन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यात एक बुलेट दुचाकीचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत. आतिक बाबा शेख (वय २२, रा. कवडगाव, जामखेड), चांद नूरमहंमद शेख (वय २०, रा. पिंपरखेड, जामखेड) आणि चेतन ज्ञानेश्वर साळवे (वय १९, रा. कळस माळवाडी, विश्रांतवाडी, पुणे). विश्रांतवाडी परिसरातून आतिक शेख व चेतन साळवे यांनी दुचाकी चोरून त्या जामखेडला नेल्या होत्या. या चोरीप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरटे स्पष्टपणे दिसून आले.

पोलिस कर्मचारी विशाल गाडे व प्रमोद जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे विश्रांतवाडी पोलिसांचे पथक जामखेड येथे रवाना झाले. तेथे त्यांनी अतिक शेख व चेतन साळवे यांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस उपायुक्त हिंमत जाधव व सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक मंगेश हांडे, उपनिरीक्षक महेश भोसले, विशाल माने, बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत आणि संजय बादरे यांनी सहभाग घेतला.

 

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या तरुणाला अटक

0

पुणे(प्रतिनिधि)

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या एका तरुणाला पुण्यातील भोसरी येथून पोलिसांनी अटक केली आहे. अमोल काळे (वय २५) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्याचा आहे.

गेल्या काही दिवसांपासून तो पंकजा मुंडेंना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता. या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ७८ आणि ७९ तसंच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने आरोपी अमोल काळेला अटक केली.

याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून जवळच्या सायबर पोलीस स्थानकांत संपर्क करुन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि फोन करणाऱ्याचे ठिकाण शोधले. तो पुण्यातील भोसरी असल्याचे आढळून आले. यानंतर, सायबर पोलिसांनी भोसरी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आरोपी अमोल काळे याला अटक केली. चौकशीत काळेने पंकजा मुंडे यांना फोन केल्याची कबुली दिली. अमोल काळेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

एका सायबर अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी हा विद्यार्थी आहे आणि त्याने अपशब्द वापरण्यामागील आणि त्रासदायक वर्तनामागील हेतू सध्या तपासला जात आहे. मात्र, त्याला पुण्यातील भोसरी येथून अटक करण्यात आली. आरोपी अमोल काळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी आहे.