इस्लामाबाद । Islamabad
दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी निघालेल्या पाकिस्तानी हवाई दलाने (PAF) खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह व्हॅलीमध्ये सोमवारी (२२ सप्टेंबर) सकाळी स्वतःच्याच नागरिकांवर बॉम्बहल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ३० निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्यात २० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हवाई दलाने चिनी बनावटीच्या जे-१७ फायटर जेटचा वापर करून खैबर सीमेवर हवाई हल्ले केले. हल्ल्यादरम्यान काही बॉम्ब चुकून नागरिकांच्या घरांवर पडले, ज्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली. स्थानिक प्रसारमाध्यमे आणि वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास, पाकिस्तानी हवाई दलाने तिराह खोऱ्यातील एका गावावर किमान आठ एलएस-६ बॉम्ब टाकले. या हल्ल्यात पाच घरांचे मोठे नुकसान झाले. मात्र, या घटनेवर पाकिस्तानी हवाई दलाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
खैबर पख्तूनख्वा हा प्रदेश गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी कारवायांसाठी कुख्यात आहे. पाकिस्तानने यापूर्वीही अनेकदा ‘दहशतवादविरोधी कारवाया’ म्हणत या प्रदेशात हवाई हल्ले केले आहेत, ज्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असते.
या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत या प्रांतात ६०५ दहशतवादी घटना घडल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. या हल्ल्यांमध्ये १३८ नागरिक आणि ७९ पाकिस्तानी पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात १२९ हिंसाचाराच्या घटनांची नोंद झाली, ज्यात ६ पाकिस्तानी सैनिक आणि निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
दहशतवाद्यांचे नवे तळ
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. आता जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि हिजबुल मुजाहिदीन (HM) यांसारख्या दहशतवादी संघटना अफगाण सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वामध्ये आपले नवे तळ स्थापन करत आहेत. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेला हा डोंगराळ प्रदेश दहशतवाद्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनला आहे. १९८० च्या दशकातील सोव्हिएत विरोधी अफगाण युद्ध आणि त्यानंतरच्या ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यादरम्यान बांधलेले अनेक तळ आजही या भागात कार्यरत आहेत.




