अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील 13 पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत आज मंगळवार (दि. 7) रोजी नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. या आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारणसाठी 3, सर्वसाधारण महिलांसाठी 3, ओबीसीसाठी 2 आणि ओबीसी महिलेसाठी 2, तसेच अनुसूचित जाती व जमाती (महिलेसह) 3 पदे हे सभापतीपदाचे आरक्षण हे चिठ्ठ्याव्दारे काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत होणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण आणि जिल्हानिहाय प्रवर्गानुसार पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण राज्य पातळीवरून निश्चित करण्यात आलेले आहे. या प्रवर्गनिहाय आरक्षणात नगर जिल्ह्यात 14 पैकी अकोले पंचायत समिती ही अनुसूचित जमातीसाठी राखीव राहणार आहे. तर उर्वरित 13 पंचायत समितीच्या अनुसूचीत जाती महिलेसह, ओबीसी महिलेसह आणि सर्वसाधारण महिलेस आरक्षणाची सोडतीची आज निश्चित होणार आहे. यात अनुसूचित जातीसाठी 1 अनुसूचित जाती महिलेसाठी 1, अनुसूचित जमाती महिलेसाठी 1, नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी 2, नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलेसाठी 2, सर्वसाधारण प्रवर्ग 3 आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 3 असे आरक्षण काढण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद गट व गणाच्या आरक्षण सोडतीसाठी अनुसूचित जाती व जमातीसाठी जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करून तो 8 ऑक्टोबरपर्यंत देण्यात येणार आहे. त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणे, 13 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे गट जिल्हाधिकारी तर पंचायत समिती गणाच्या आरक्षणाची सोडत तहसीलदार यांनी काढणे, 14 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे, असे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. या प्रारूप आरक्षणावर 17 ऑक्टोबरदरम्यान हरकती व सुचना सादर करता येणार आहे. तसेच 17 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सुचना आधारे अभिप्रायासह गोषवारा जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांना सादर करणार असून 31 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सुचनांचा विचार करून विभागीय आयुक्तांनी आरक्षण अंतिम करणार आहेत. 3 नोव्हेंबरपर्यंत अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.





