Thursday, May 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमालेगाव-बागलाणला अवकाळी पावसाचा तडाखा

मालेगाव-बागलाणला अवकाळी पावसाचा तडाखा

गारांच्या वर्षावाने डाळींब, आंब्यासह गहू, कांद्याची हानी

- Advertisement -

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर अवकाळी पावसासह वादळ तसेच गारांच्या तडाख्याने मालेगावसह बागलाण तालुक्यातील अनेक गावांना आज सायंकाळी अक्षरश: झोडपून काढले. दोन दिवसापुर्वी झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतांनाच आज सायंकाळी अकस्मात वादळासह मुसळधार पर्जन्यवृष्टीस प्रारंभ होवून गारांचा वर्षाव देखील सुरू झाल्याने शेतकर्‍यांची अक्षरश: त्रेधातिरपीट उडाली होती. डाळींबासह आंबे आदी फळबागांसह गहू, मका व कांद्याची अतोनात हानी झाल्याने शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत.

आज दिवसभर तीव्र तापमानाने अंग भाजून निघत असतांना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार होवून अकस्मात पावसाच्या सरी कोसळण्यास शहरात प्रारंभ झाला होता. अर्धा ते पाऊण तास उघडकीप घेत कोसळत असलेल्या या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
गत तीन ते चार दिवसापासून कोसळत असलेल्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. तर रमजानपुरा, म्हाळदे, कलेक्टरपट्टा आदी अनेक भागात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

तालुक्यात अनेक गावांमध्ये आज पुन्हा अवकाळी पावसाने सायंकाळी तडाखा दिला. दिवसभर तीव्र तापमान असल्याने असह्य उकाडा जाणवत होता. मात्र सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अकस्मात वातावरणात बदल होवून ढगाळ वातावरण निर्माण होत पावसास प्रारंभ झाल्याने शेतकर्‍यांची एकच धावपळ उडाली होती. दाभाडी, पिंपळगाव, अजंग, वडेल, काष्टी, डाबली, वडनेर, खाकुर्डी, गारेगाव, पोहाणे येथे मुसळधार पावसाने झोडपून काढले तर तळवाडे, आघार येथे किरकोळ पाऊस झाला. माळमाथ्यावरील झोडगे, कंधाणे, गुगुळवाड, पळासदरे, भिलकोट येथे देखील पावसाने हजेरी लावत पिकांची हानी केली.

बागलाण तालुक्यात पिंगळवाडे, करंजाड, मुल्हेर, अजंदे, मोराणे, हरणबारी, टेंभे, खामलोण, बिजोरसे या गाव परिसरात देखील सायंकाळी वादळासह मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. तब्बल अर्धा ते एक तास सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाण्याचे तळे साचून कांदा पिक पाण्यात बुडाले. अनेक गावांमध्ये गारांचा वर्षाव झाल्याने त्याचा फटका गहू, कांद्यासह डाळींब व आंब्यास मोठ्या प्रमाणात बसला आहे. गारांच्या तडाख्यामुळे डाळींब बागांची अतोनात हानी झाली असून झाडावरील कैर्‍या जमीनीवर पडल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

महिनाभरात चार ते पाच वेळा मुसळधार अवकाळी पावसासह वादळ तसेच गारपिटीने कापणीवर आलेल्या कांद्यासह गव्हाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतात पाण्याचे तळे साचल्याने कांदा सडू लागला आहे. शासनाने तातडीने पंचनामे पुर्ण करत आर्थिक मदत करावी, अशी मागणी मालेगाव, बागलाण तालुक्यातील शेतकर्‍यांतर्फे केली जात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...