Monday, May 20, 2024
Homeनगरपंढरीच्या वारी, निघाली एकटी स्वारी

पंढरीच्या वारी, निघाली एकटी स्वारी

अस्तगाव |वार्ताहर|Astgav

आषाढी एकादशीला वारकर्‍यांंना पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागते. करोनामुळे मागील वर्षी आणि यंदाही दिंडी सोहळ्यांवर बंदी आहे. त्यामुळे वारकर्‍यांची घुसमट होत आहे. यावर मात करत अस्तगाव येथील एक तरुण एकटाच पायी वारकरी बनून पंढरपूरला निघाला आहे.

- Advertisement -

अनिल पठारे असे या तरुणाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी तो पायी निघाला आहे. सुरुवातीला अस्तगावहून निघून तो कोल्हार येथे मुक्कामी त्यानंतर राहुरी, नगर असा त्याचा प्रवास तो करत आहे. गेल्या 11 वर्षांपासून तो पायी दिंडीत प्रवास करतो. सन 2008 ला पहिल्यांदा रामदास कैकाडी यांच्या मनमाड वरून येणार्‍या दिंडीत सहभागी व्हायचा, 2018, 2019 ही दोन वर्ष नांदुर्खी येथील चौधरी महाराज यांच्या दिंडीत सहभागी व्हायचा, परंतु मागील वर्षी करोनामुळे सर्व दिंड्या रद्द झाल्याने तो जाऊ शकला नाही.

परंतु यावर्षी मनाशी निश्चय करून तो पायी निघाला. गावातील सर्व देवतांचे दर्शन करत त्यांनी पहिला मुक्काम कोल्हार मध्ये केला. भगवती मातेचे दर्शन घेऊन तो पायी पंढरीकडे निघाला. काल सायंकाळी 6 वाजता तो राहुरी विद्यापिठाच्या पुढे निघाला होता. जिथे अंधार पडेल तिथे मुक्काम करणार असल्याचे त्याने सांगितले. मजल दर मजल करत आषाढी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन आपण घेणार आहोत, असे तो म्हणाला.

अनिल हा शिवप्रेमी तरुण आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची जयंती असली की हा तरुण तनमनधनाने त्यात सहभाग घेतो. शिवरायांबद्दलचे प्रेम त्याच्या नसानसांत भिनले आहे. असा हा शिवप्रेमीचे पंढरीच्या पांडुरंगावरही नि:स्सीम प्रेम करतो. सर्व गावकर्‍यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आणि तो पांडुरंगाच्या दर्शनाला रवाना झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या