शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgaon
शहरातील वाढत्या जडवाहतुकीमुळे आणखी एक भीषण अपघात (Accident) घडला असून मालवाहू ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून दोन तरुणांचा जागीच मृत्यू (Death) झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि. 28) दुपारी सुमारे 4 वाजता पांढरीपुल-मिरी रस्त्यावरील (Pandharipul-Miri Road) इंदिरानगर परिसरात घडली.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे प्रतिक सचिन शिंदे (वय 19) व निखिल सोमनाथ पठाडे (वय 20, दोघेही रा. वरुर, ता. शेवगाव) अशी आहेत. या घटनेची नोंद शेवगाव पोलीस ठाण्यात (Shevgaon Police Tation) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रतिक शिंदे व निखिल पठाडे हे दोघे शनिवारी दुपारी पांढरीपूल-मिरी मार्गावरून पायी जात होते. त्यावेळी शेवगावहून (Shevgaon) मिरीकडे जाणारा मालवाहू ट्रक (एम.एच. 16 ए.ई. 3778) इंदिरानगर परिसरातून जात असताना दोघेही ट्रकच्या मागील चाकाखाली सापडले. चाक डोक्यावरून गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू (Death) झाला.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. त्याचा फायदा घेत ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला. मृतदेहांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. वरुर येथील स्मशानभूमीत रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले.
कुटुंबावर शोककळा
दोन्ही तरुण गरीब कुटुंबातील होते. प्रतिक शिंदे याच्या पश्चात आजी-आजोबा, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे; तर निखिल पठाडे याच्या पश्चात आजोबा, आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वरुर गावावर शोककळा पसरली आहे. शहरातील वाढत्या जडवाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरत आहे.





