Saturday, May 2, 2026
HomeनगरRahata : सून आणि मुलीचा प्रत्येक घरात सन्मान करा - पंडीत प्रदीप...

Rahata : सून आणि मुलीचा प्रत्येक घरात सन्मान करा – पंडीत प्रदीप मिश्रा

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

ज्या घरात महिलांचा सन्मान, आदर होतो. त्याच घरात लक्ष्मीपूजन सार्थकी ठरेल. सून आणि मुलीचा प्रत्येक घरात सन्मान करा, आदर करा तरच माता लक्ष्मीचा आदर केल्या सारखे होईल, असे प्रतिपादन पंडीत प्रदीप मिश्रा यांनी केले. राहाता तालुक्यातील अस्तगाव निर्मळ पिंपरी शिवेजवळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने भव्य दिव्य अशी शिव महापूराण कथा पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून सुरु आहे. कालच्या कथेच्या दुसर्‍या दिवशी भाविकांचा अथांग सागर पाहायला मिळाला. कथा मैदानातील तीन ही पँडोल भाविकांनी फुलून गेले होते. भाविक मिळेल तेथे बसुन या पवित्र शिवकथेचा आस्वाद घेत आहेत.

- Advertisement -

विखे पाटील परिवाराने कथेची सुंदर पर्वणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पंडीत प्रदीप महाराज यांनी त्यांना धन्यवाद देत उत्कृष्ट नियोजनाची पावतीही दिली. या कथेत भाविकांत प्रचंड उत्साह असल्याने शिवभजनावरही भाविक ठेका धरतात. हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम: या गजराने कथा परिसर शिवमय झाला आहे. तीन तास चालणार्‍या या कथेत भाविक कथामृत सेवन करत आहेत. कालच्या दुसर्‍या दिवशीच्या पंडीत प्रदीप मिश्रा यांनी पहिल्या टप्प्यात कथेचे महत्व विषद करत शिवभक्ती, माता पार्वतीच्या तपाचा प्रसंग, यमाची पत्नी धुमोर्णा प्रसंग, शिव जलाचे महत्व, बेलाच्या पानाचे महत्व, गंगेच्या पाण्याचे, तिर्थांचे महत्व प्रसंगासह विषद करत स्त्रीयांचा सन्मान, छोट्या दुकानदारांकडून खरेदी आदी विषयांना स्पर्श केला.

पंडीत प्रदीप मिश्रा म्हणाले, शिवमहापुराण कथा पवित्र कथा आहे. संपुर्ण जगाचे कल्याण करणारी कथा आहे. ही कथा कठीण आहे. भगवंताची भक्तीत, मैत्रीत जसा विश्वास लागतो. तसा या कथेवर विश्वास लागतो. भरवसा खुप महत्वाचा असतो. माता पार्वतीने शिवाला प्राप्त करुन घेण्यासाठी तप केले. साधना केली, ध्यान केले. पार्वती मातेने बेलाचे पानावर गुजराण केली. पार्वती माता दुर्बल झाली. पाणी, भोजन वर्ज्य, शरीर काळे पडले. महादेवाने परीक्षा घेण्याचे ठरविले. महादेव तेथे गेले ते म्हणाले, पार्वती तू तप करतेस पण महादेव सुंदर आहेत. तू काळी आहेस, दुर्बल झाली. आता शिव तुझ्याबरोबर लग्न कसे करतील? रुप बदलून आलेल्या शिव भगवंताला पार्वतीने ओळखले. पार्वती त्यावर हात जोडून म्हणाली, भगवंत मला विश्वास आहे, बेलपत्र खाण्यामुळे तुम्ही मला भेटण्यासाठी येथे आलात. ज्ञान दिले, बेलपत्र खाण्यामुळे माझ्या शरीरातील सर्व इंद्रीय संयमीत राहातील.

एक ना एक दिवस शिव मला लग्नाची मागणी नक्कीच घालतील, असा विश्वास माता पार्वतीने व्यक्त केला. शिवमहापुरणातील उमा संहितेनुसार शिवाच्या पिंडीवर वाहिलेले पाणी जर तोंडात घेतले तर कायिक, वाचिक आणि मानसिक पापांना नष्ट करते. शिवपुराणातील कथेनुसार हे जल प्राशन केल्याने मुक्ती मिळते. शिव महापुराण कथा श्रवण करणार्‍या भाविकांना शिव भगवंताच्या पिंडीवर टाकलेले जल प्राशन केल्याचे पुण्य मिळते. यमराजाच्या धर्मपत्नी धुमोर्णाने जलाचे महत्व एकदा विचारले. तिने यमराजा बरोबरच्या रेड्याला बघितले. यमराज एकाचा प्राण घेवून जात असताना तो त्याला शिंगाने मारतो. नंतर दुसर्‍या प्रसंगात दुसर्‍याचा प्राण घेवून जात असताना रेडा त्याला मारत नाही. असे का? धुमोर्णाने रेड्याला बोलावले व म्हणाल्या, तू फरक का केला? रेडा म्हणतो, माताजी भगवंत शिवाच्या रुद्रावतारात माझा जन्म झाला.

यमराजाचा सेवक झालो. यमाच्या अज्ञात राहावे लागते. शिव भगवंताने सांगितले होते की, तुला मी जन्म दिला आहे. जर कुणी भुतलावरील मानवाने शिवजल प्राशन केले असेल तर तु त्याला त्रास देवू नको, मी वचन दिले, ज्याच्या तोंडात शिवावर टाकलेले जल असेल त्याला मी त्रास न देता त्याला सरळ कैलासाला घेवुन जातो. यावर विस्ताराने महत्व सांगत पंडीत मिश्रा म्हणाले, एखाद्याचा मरणार्‍याच्या तोंडात गंगा नदीचे पाणी टाकले जाते. हे का टाकतात? गंगा नदी शिवाच्या जटातून आली आहे. म्हणून ते पाणी शंकराच्या अंगावरुन आल्याने ते जल शिव जल! मरणाराच्या अंगावर, तोंडात ते टाकले जाते. त्याला कैलासाला जाताना कष्ट पडू नयेत, असे मानले जाते. कुणी तिर्थक्षेत्री गेले, मानसरोवर, हरिद्वारला गेले, तर तिर्थ तेथुन आणतात व ते आजु बाजुला थोडे थोडे दिले जाते. तिर्थक्षेत्री गेल्यावर तेथील पवित्र प्रसाद हा तेथील कुंडातील जल असतो. ते जर आणले आणि ते इतरांना दिले तर हजारो तिर्थक्षेत्राचे पुण्य मिळते. जे कुणी तिर्थक्षेत्री गेले नाहीत, त्यांनी सेवन केले तर त्या तिर्थक्षेत्राचे पुण्य मिळते. काशीला मृत्यु होणारा शिवाच्या ध्यानात जातो. शिव त्याच्या कानात मंत्र देतात. हे पार्वतीने शिवाकडे मागितलेले वर आहेत.

आजुबाजुच्या शिवमंदिरात दिवाळीला दिवा लावा, शिवधाम, काशी येथे दिवा लावल्याचे पुण्य मिळेल. बेलाच्या पानाचे महत्व पंडीत मिश्रा यांनी विषद केले. जेथे जेथे बेलपत्र असते तेथे शिवाचा वास असतो. एक लोटा जल, सारी समस्या का हल. शिवाच्या पिंडीवर एक लोटा पाणी टाकले तर त्याचे पुण्य मोठे!

आपले गाव, मेहनत, आपल्या परिवाराचे प्रेम कधीच विसरु नये. व्यक्तिला मोठे पद मिळाले तर आपल्या गावाला, आपल्या मातीला विसरु नये. या दिवाळीला खरेदी छोट्या छोट्या विक्रेत्यांकडून करा, आपल्या गावात खरेदी करा, आपल्या गावाचे प्रेम मोठे ते मॉलमध्ये नाही. आपला एक रुपया कुणाच्या घरात जातो त्यावेळी तुमची दिवाळी सफल होईल. स्वदेशी माल खरेदी करा, भारत आत्मनिर्भर होण्यासाठी हे महत्वाचे. आपले जिवन सार्थकी लावा. आपल्या घरातील सून, मुलगी यांचा आदर करा. तरच दिवाळीला लक्ष्मीपुजनाचे पुण्य मिळेल,असे ही कथा सांगते.

कालच्या कथेला ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, आ. काशिनाथ दाते, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, धनश्रीताई विखे पाटील, राजेश परजणे, दीपक पटारे, भास्करराव खर्डे, कैलास तांबे यांचेसह लाखो भाविक उपस्थित होते. शेवटी आरतीने कथेची सांगता झाली.

विखे परिवारामुळे पर्वणी
विखे पाटील परिवाराने कार्तिक महिन्यात शिवमहापुराण कथा आयोजित करुन भाविकांना लाखो अश्मिक यज्ञाचे पुण्य मिळवून दिले, असे सांगत पंडीत मिश्रा म्हणाले, या कथेला भाविकांचा अथांग सागर दिसत आहे. कथेचे उत्कृष्ट नियोजन केल्याने माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे कौतुक केले. ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यामुळे भाविकांना कथेचा आस्वाद घेता आला. विखे परिवारामुळे भाविकांना कथा श्रवणाची पर्वणी मिळाल्याचे पंडीत मिश्रा म्हणाले.

ताज्या बातम्या

Shirdi : पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी घेतले साई दर्शन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून मुम्मका सुदर्शन (SP Mummaka Sudarshan) यांनी शनिवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी शिर्डी...