Tuesday, December 3, 2024
Homeनगरनिवडणूक कोणाच्या अस्तित्वाची तर कोणाच्या प्रतिष्ठेची

निवडणूक कोणाच्या अस्तित्वाची तर कोणाच्या प्रतिष्ठेची

विधानसभा निवडणुकीत कोण कोणावर मात करणार याकडे राज्याचे लक्ष

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर विधानसभेची निवडणूक ही खा. निलेश लंकेच्या प्रतिष्ठेची तर विरोधकांसाठी अस्तित्वाची झाली आहे. विशेष म्हणजे मतदारसंघात ही लढाई राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात असून या लढाईत नगर तालुक्यातून संदेश कार्ले यांनी उडी घेतली आहे. यामुळे या निवडणुकीत कोण कोणावर मात करणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पारनेर विधानसभेसाठी अपक्षांसह 12 उमेदवार नशिब आजमावत आहेत. सुरूवातीला सोपी वाटणारी निवडणूक आता चुरशीच्या दिशेने जाताना दिसत आहे. याठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन प्रमुख उमेदवारांसमोर अपक्षांनी आव्हान निर्माण केले आहे. मतदानाला आता आठ दिवस शिल्लक असल्याने थंडीच्या दिवसातही मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचाराचे नारळ फुटून उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्या सभा झाल्या. येत्या काही दिवसांत अन्य मोठ्या नेत्याच्या सभा होणार आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात असून एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत.

- Advertisement -

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अविनाश पवार (मनसे), काशिनाथ दाते (राष्ट्रवादी अजित पवार गट), राणीताई लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट), भाऊसाहेब जगदाळे (भारतीय जवान किसान पार्टी), सखाराम सरक (राष्ट्रीय समाज पक्ष) यासह अविनाश थोरात, औटी विजय, संदेश कार्ले, प्रविण दळवी, भाऊसाहेब खेडकर, रविंद्र पारधे व विजय औटी हे अपक्ष रिंगणात आहेत. यात खा. निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या निवडणूक रिंगणात असल्याने ही लढत लंके यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. तर महायुतीकडून अजित पवार गटाचे काशिनाथ दाते व काही प्रमुख अपक्ष असून त्यांच्यासाठी अस्तित्वाची ही लढाई झाली आहे. लोकसभेला खा. लंकेनी मोठा विजय मिळवला होता.

तर विरोधात मोठी टीम एकत्र येऊनही मनोमिलनाअभावी लंकेना रोखू शकले नव्हते. पारनेर विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील विकास कामे, रस्ते, वीज, पाणी, पठार भागाला शेतीसाठी पाणी, सुपा औद्योगिक वसाहतीतील ठेकेदारी, रोजगारी, सुपा परिसरातील अतिक्रमणे ही महत्त्वाचे मुद्दे असले तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पतसंस्था बुडाल्या आहेत. या संस्था कोणी बुडवल्या, कोणी मोडून खाल्या, कोणी गोरगरीब जनतेच्या पैशावर राजकारण केले, सत्ता भोगल्या व कोणी कोणाला राजाश्रय दिला यांच्या चर्चा गावागावात रंगत आहेत. हे प्रमुख मुद्दे प्रचारात गाजत असून मतदार कोणाला पसंती देणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

लाडकी बहिण आणि जरांगे फॅक्टर
तालुक्यात लाडकी बहिण योजनेचा किती प्रभाव पडणार, यासह मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा किती प्रभाव पडणार. हे दोनही मुद्दे कोणाला तारण आणि कोणाला मारणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, मतदारसंघात हे दोन मुद्दे प्रभावी ठरणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या