Tuesday, December 3, 2024
Homeक्राईमप्रवाशांकडून पैसे घेताना तोतया टी.सी. पकडला

प्रवाशांकडून पैसे घेताना तोतया टी.सी. पकडला

पुणे ते गोरखपूर रेल्वे गाडीतील प्रकार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पुणे ते गोरखपूर या स्पेशल रेल्वेमध्ये तोतया टी. सी. (तिकीट निरीक्षक) आढळून आला आहे. त्याने तिकीट न घेणार्‍या रेल्वेमधील अनेक प्रवाशांकडून पैसेही घेतले असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दौंड रेल्वे स्टेशन येथील मुख्य तिकीट निरीक्षक शशीकांत मारूती धामणे (वय 56 रा. साईदत्त निवास, पंचशील रस्ता, दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तोतया टी. सी. विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सचिन संजय दिवेकर (वय 25 रा. प्राथमिक शाळे जवळ, कडेठाणवाडी, ता. दौंड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादी धामणे यांची गुरूवारी (14 नोव्हेंबर) पुणे ते गोरखपूर या स्पेशल रेल्वेमध्ये दौंड ते नगर अशी चेकींग ड्यूटी होती. सदरची गाडी विसापूर रेल्वे स्टेशन येथे येऊन थांबली असता काही प्रवाशांनी धामणे यांना येऊन सांगितले की, एक टी. सी. डब्यात असून तो गाडी चेक करत आहे. तिकीट नसलेल्या प्रवाशांकडे 500, एक हजार रुपयांची मागणी करत आहे. धामणे यांनी त्या तोतयाकडे ओळखपत्र मागितले असता त्याच्याकडे ओळखपत्र नव्हते.

तो तोतया टी. सी. असल्याची खात्री झाल्याने धामणे यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. नगर रेल्वे स्टेशन येथे सकाळी 11 वाजता गाडी आल्यानंतर टी.टी.ई पांडुरंग आव्हाड, आर.पी.एफ. उपनिरीक्षक विकेश तिमांडे, आरपीएफचे हे. कॉ. जे. एस. नागुडे, आरक्षक सोमनाथ पठाडे, विठ्ठल खंडागळे आदी हजर होते. त्यांच्या समक्ष रेल्वेमधील प्रवाशांनी आमच्याकडून सचिन दिवेकर याने 500, एक हजार रुपये घेतल्याचे सांगितले. सचिन दिवेकर याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या