Friday, October 30, 2026
HomeनगरPathardi : पाथर्डीत एकाच रात्री तीन घरफोड्या; 10.14 लाखांचा ऐवज लंपास

Pathardi : पाथर्डीत एकाच रात्री तीन घरफोड्या; 10.14 लाखांचा ऐवज लंपास

पाच संशयित सीसीटीव्हीत कैद || पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. फुलेनगर आणि भगवाननगर परिसरात पाच जणांच्या सराईत चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घाालत एकाच रात्रीत तीन बंद घरांना लक्ष्य केले. फुलेनगर येथील एका फ्लॅटमधून तब्बल 10 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरट्यांनी पोलिसांच्या गस्तीला उघडपणे आव्हान दिले आहे. या धाडसी घरफोड्यांमुळे पाथर्डी शहरात आणि उपनगरांमध्ये नागरिकांमध्ये तीव्र दहशतीचे व असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

फुलेनगर येथील समर्थ कॉम्प्लेक्समध्ये राहणारे कंत्राटदार संतोष भगवान खेडकर हे आपल्या कुटुंबासह पनवेल येथील एका नातेवाईकाच्या वास्तूशांती कार्यक्रमासाठी गेले असताना चोरट्यांनी घरफोडी केली. शेजारच्या घरांच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावून चोरट्यांनी खेडकर यांच्या घराचा कडीकोयंडा हत्यारांच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट आणि दिवाणातील साहित्याची कसून उचकापाचक केली. संतोष खेडकर यांनी पाथर्डीत परतल्यानंतर केलेल्या पाहणीत असे समोर आले की, शोकेसमध्ये ठेवलेली तब्बल 9 लाख 90 हजार रुपयांची रोकड आणि 24 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (यात 3 हजार रुपयांची 1 ग्रॅमची नथ, 18 हजार रुपयांची 6 ग्रॅमची फुले आणि 3 हजार रुपयांच्या बुगड्यांचा समावेश आहे) असा एकूण 10 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. विशेष म्हणजे, पुरुषांचे महागडे कपडे आणि बूटही चोरून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

फुलेनगरमध्ये हात साफ केल्यानंतर या चोरट्यांच्या टोळीने भगवाननगर परिसराचा रस्ता धरला. तिथे रशीद शेख आणि सतीश डमाळे यांच्याही बंद घरांचे कडीकोयंदे तोडले. दोन्ही कुटुंबे परगावी गेल्यामुळे घरातील साहित्य अस्ताव्यस्त करण्यात आले; सुदैवाने या दोन्ही घरांमध्ये चोरट्यांच्या हाती कोणताही मौल्यवान ऐवज किंवा रोकड लागली नाही, ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या संपूर्ण थरारामध्ये सुमारे एक तासभर हे पाचही संशयित चोरटे परिसरामध्ये अत्यंत बेधडकपणे फिरत असल्याचे विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये कैद झाले आहे. चोरांनी आपली ओळख लपवण्यासाठी चेहर्‍यावर कापड, मफलर, स्वेटर आणि टॉवेल गुंडाळले होते. त्यांच्या हातामध्ये लोखंडी रॉड आणि घरफोडीसाठी लागणारी घातक हत्यारे स्पष्टपणे दिसत आहेत.

बंद असलेल्या घरांची आधी रेकी करणे आणि नंतर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून चोरी करणे, यावरून ही एखादी सराईत टोळी असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघकीस आल्यानंतर खळबळ उडाली. घरमालकाने तातडीने डायल 112 वर संपर्क साधल्यानंतर पाथर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करून पाहणी करण्यात आली. संतोष खेडकर यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात सलग घडणार्‍या घरफोड्यांच्या घटनांमुळे रात्रीच्या वेळी गस्त घालणार्‍या पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तासभर चोरटे शहरात हत्यारे घेऊन मोकाट फिरत असतील, तर पोलीस गस्त नेमकी करते काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. वाढत्या चोर्‍यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ रात्रीची गस्त अधिक तीव्र करावी आणि या चोरांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर जमावबंदी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी...