पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)
जादा व्याजाचे आमिष दाखवून समर्थ क्रॉप केअर या कंपनीने पाथर्डी शहरातील अनेक तरुणांची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या कंपनीचा संचालक असलेला पुणे येथील प्रशांत गवळी याच्याविरोधात पुणे येथे अगोदरच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
फसवणूक झालेल्या तरुणांमध्ये आपसात वाद झाल्यानंतर हा वाद पोलीस दफ्तरी गेला व त्या नंतर शहरातील युवकांची दोन कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पुणे येथील गुन्ह्यात आता पाथर्डी येथील तरुणांच्या फसवणूकीचा गुन्हा वर्ग करण्यात येणार आहे. गवळी याने सोशल मीडियावर आमच्या कंपनीत गुंतवणूक करा व इतरांना सुद्धा साखळी पद्धतीने गुंतवणूक करायला सांगा, तुम्हाला जास्त व्याज व कमिशन सुद्धा मिळेल असे आवाहन केले होते.
एक ते दीड वर्ष हा धंदा बिनबोभाटपणे सुरळीत सुरु होता मात्र काही दिवसांनंतर या उद्योगातील एजंटचे कमिशन व गुंतवणूक करणाऱ्यांना व्याजही न मिळाल्याने अनेकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या नंतर ज्यांनी आपल्याला गुंतवणूक करण्यास भाग पाडले त्या एजंट व गुंतवणूकदारांमध्ये वाद होण्यास सुरवात झाली. दोन दिवसांपूर्वी एक एजंट व एक गुंतवणूकदार यांच्यात हाणामारी झाल्यानंतर हा वाद पोलीस दफ्तरी गेला. या नंतर या सर्व प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर या कंपनीत शहरातील जवळपास चाळीस ते पन्नास युवकांनी एक ते सोळा लाखापर्यंत अशी गुंतवणूक केल्याचे आढळून आले. ही सर्व रक्कम दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक असून पोलीस तपासात हा आकडा वाढू शकतो. दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढू शकते.
गवळी याच्या आमिषाला बळी पडून काहींनी त्याच्या पुणे येथील कार्यालयाला भेट देऊन स्वतः गुंतवणूक केली व इतरांना सुद्धा गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या गुंतवणुकीतून सुरवातीला चांगला परतावा मिळाल्याने अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक या कंपनीत केली. साखळी पद्धतीने सुरु झालेल्या या उद्योगात काहींनी भरपूर रक्कम कंपनीत जमा केल्याने कंपनीने मोठी गुंतवणूक करणाऱ्यांना दुबईवारी सुद्धा घडवून आणली.





