Sunday, June 14, 2026
Homeनगरभीषण अपघात! माणिकदौंडी शिवारात वळणावर कार उलटून कर्जतच्या दोघांचा जागीच मृत्यू, दोन...

भीषण अपघात! माणिकदौंडी शिवारात वळणावर कार उलटून कर्जतच्या दोघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

वेगवान प्रवासाला लागलेले अपघाताचे ग्रहण दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी ते बोरसेवाडी फाट्यादरम्यान असलेल्या एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून भीषण अपघात झाला. मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्दैवी घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

मृत आणि जखमी व्यक्ती कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील रहिवासी आहेत. कालिदास शहादेव बनकर (वय अंदाजे ३० वर्ष) व बबन किसन खेतमाळीस (वय अंदाजे ७० वर्ष) अशी अपघातात जीव गमावलेल्यांची नावे आहेत. तर अक्षय निलेश शिरसागर (वय अंदाजे २८) आणि उमेश मिटकरी (वय अंदाजे ३८) हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरजगाव येथील चार प्रवासी टाटा अल्ट्रॉझ कारने (क्र. MH 14 LG 8416) पाथर्डीहून आपल्या गावाकडे जात होते. दरम्यान, माणिकदौंडी परिसरातील हॉटेल शुभमजवळ असलेल्या एका तीव्र आणि धोकादायक वळणावर वेगात असलेल्या कारला चालकाला योग्य रीतीने टर्न घेता आला नाही. यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. कार वेगात असल्याने हा अपघात अत्यंत तीव्र होता.

अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. जखमींना तात्काळ पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच कालिदास बनकर व बबन खेतमाळीस यांची प्राणज्योत मालवली होती, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. गंभीर जखमी झालेल्या अक्षय शिरसागर आणि उमेश मिटकरी यांना प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुहास गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल धनराज चाळक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या घटनेमुळे मिरजगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...