पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असून कांद्याला प्रतिक्विंटल कमाल 5 हजार 200 रुपये, तर किमान 1 हजार रुपये भाव मिळाला. कांद्याचा सरासरी बाजारभाव 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल राहिला. चांगला भाव मिळण्याबरोबरच शेतमाल विक्रीनंतर त्वरित पट्टी मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांचा पाथर्डी बाजार समितीकडे कल वाढत आहे.
बुधवार, दि. 19 रोजी पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत 761 क्विंटल कांद्याची आवक झाली. बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये प्रतवारीनुसार कांद्याला वेगवेगळे दर मिळाले. चांगल्या प्रतीच्या कांद्याला 4 हजार ते 5 हजार 200 रुपये, दुसर्या प्रतवारीच्या कांद्याला 2 हजार 800 ते 4 हजार रुपये, तिसर्या प्रतवारीच्या कांद्याला 1 हजार 800 ते 2 हजार 800 रुपये, तर चौथ्या प्रतवारीच्या कांद्याला 1 हजार ते 1 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव बुधवार आणि रविवार या दोन दिवशी होत आहे. त्यामुळे तालुक्यातील तसेच परिसरातील कांदा उत्पादक शेतकर्यांनी आपला कांदा मोठ्या प्रमाणात पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे अध्यक्ष सुभाष बर्डे, उपाध्यक्ष कुंडलिक आव्हाड व संचालक मंडळाने केले आहे.
याबाबत अध्यक्ष सुभाष बर्डे म्हणाले, पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकर्यांना प्राधान्य देऊन काम करीत आहे. गेल्या दोन वर्षांत बाजार समितीने चांगली प्रगती केली असून, शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पाथर्डी बाजार समितीमध्ये पूर्वी कांदा मार्केट नव्हते. मागील वर्षापासून कांदा मार्केट सुरू करण्यात आले असून, त्याला शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या पाथर्डी बाजार समितीत दिवसेंदिवस कांद्याची आवक वाढत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात कांदा पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणून विक्री करावी, असे आवाहन अध्यक्ष बर्डे यांनी केले.




