पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पंचायत समितीच्या कामकाजात शिस्तीचा अभाव, अस्वच्छता आणि कामात होत असलेली दिरंगाई याची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी गुरुवारी पंचायत समिती कार्यालयात येऊन सर्व विभागाची झाडाझडती घेतली. यावेळी तीन कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आल्याने त्यांना विना पगारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर उशिरा येणार्या आणि अनुपस्थित राहणार्या कर्मचार्यांना शोकॉज नोटीस देण्याचा इशाराही त्यांनी दिला.
गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी पाथर्डी पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली. त्यांच्या अचानक भेटीमुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांची धावपळ उडाली. कार्यालय परिसरातील अस्वच्छता, अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आणि उशिरा येणारे कर्मचारी याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी संगीता पालवे यांच्याकडून सविस्तर माहिती घेत झाडाझडती घेतली.
भंडारी कार्यालयात दाखल होताच कर्मचार्यांनी घाईघाईने स्वच्छता मोहिम सुरू केल्याचेही चित्र पाहायला मिळाले. अस्ताव्यस्त पडलेले साहित्य उचलण्याचे काम सुरू झाले. अधिकारी, कर्मचारी ते शिपाईपर्यंत सर्वजण कार्यालय आवरण्यासाठी धावपळ करत असल्याचे दिसून आले. भंडारी यांनी पंचायत समितीच्या सर्व विभागप्रमुखांची स्वतंत्र बैठक घेऊन विविध योजनांचा आढावा घेतला. यामध्ये रोजगार हमी योजना, बांधकाम विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, सामान्य प्रशासन तसेच विविध लोककल्याणकारी योजनांच्या कामकाजाची माहिती घेतली. रोजगार हमी योजनेच्या कामकाजासंदर्भातील संपूर्ण दप्तर तपासणी उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांमार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भंडारी म्हणाले, पंचायत समितीचे काम समाधानकारक नाही. अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये पंचायत समितीच्या कामकाजाबाबत नकारात्मक बातम्या प्रसिद्ध होत असल्याने प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
सर्व विभाग प्रमुखांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून बायोमेट्रिक तपासणीद्वारे उशिरा येणार्या व गैरहजर राहणार्या कर्मचार्यांवर कारवाई केली जाईल.कार्यालय परिसरातील अस्वच्छतेवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.पंचायत समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नियमित स्वच्छता होत नसल्याबद्दल त्यांनी संबंधित कर्मचार्यांना फटकारले. शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळांवर नगर परिषदेकडून घरपट्टी आकारली जात असल्याबाबतही भंडारी यांनी नाराजी व्यक्त करून नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संतोष लांडगे यांच्याशी संपर्क केली. शिक्षणाचे ज्ञानदानाचे कार्य जिल्हा परिषद करत असताना नगर परिषदेकडून सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
सीईओंच्या रडारवर तो अधिकारी
सर्वाधिक तक्रारी रोजगार हमी योजनेबाबत आहेत. या योजनेशी संबधीत अधिकारी जाणीवपूर्वक बेकायदा कामे करून मलिदा खाण्याकडे अधिक लक्ष देत असल्याच्या प्रकाराची गंभीर दखल भंडारी यांनी घेतली असून रोजगार हमी योजनेच्या कामकाजा संदर्भातील संपूर्ण दप्तर तपासणी व चौकशी उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांमार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, रोजगार हमी योजनेशी संबधित तो अधिकारी बदलीसाठी प्रयत्न करत असल्याचे समजते. त्याच्यावर कारवाई होणार की तो कारवाई पूर्वीच बदली करून जाण्यात यशस्वी होतो याकडे संपूर्ण तालुक्याकडे लक्ष लागले आहे.
घरकुल योजनेबाबत कडक सूचना
तालुक्यातील शेकटे येथील नितीन बाबासाहेब घुले यांनी घरकुल योजनेच्या दुसर्या टप्प्याचे अनुदान मिळावे, यासाठी संबंधित अधिकार्यांशी वारंवार संपर्क साधला; मात्र अधिकार्यांकडून टाळाटाळ होत असल्याची तक्रार करण्यात आली. याची दखल घेत संबंधित अधिकार्यांना तात्काळ घरकुलाची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे अत्यंत कडक शब्दांत दूरध्वनीद्वारे आदेश देण्यात आले.




