अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
हेल्मेट आणि जॅकेट घालून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने वृध्द महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची मोहनमाळ ओरबडून नेल्याची घटना सोमवारी (6 एप्रिल) सायंकाळी 7 ते 7:15 वाजताच्या सुमारास शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील केशर गुलाब मंगल कार्यालयासमोर शिवाजी हौसिंग सोसायटी परिसरात घडली.
याप्रकरणी विवेक पांडुरंग खाकाळ (वय 39, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, बुरूडगाव रस्ता, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक खाकाळ हे आपल्या कुटुंबासह शिवाजी हौसिंग सोसायटी येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या आई वृषाली पांडुरंग खाकाळ (वय 70) या रोजप्रमाणे सायंकाळी कॉलनी परिसरात पायी फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी 7.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वृषाली खाकाळ या आपल्या मैत्रिणींसह चालत असताना अचानक मागून एका दुचाकीवर आलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची मोहनमाळ जोरजबरदस्तीने तोडून हिसकावून नेली.
चोरट्याने डोक्यावर हेल्मेट घातले होते तसेच अंगात काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. घटना घडताच त्याने वेगाने पळ काढला. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून विवेक खाकाळ यांनी तात्काळ चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हाती लागला नाही. चोरीस गेलेली मोहनमाळ सुमारे 5 तोळे वजनाची आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे करीत आहेत.
दरम्यान, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत वारूळवाडी शिवारात सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. त्यानंतर दुसर्या दिवशी पुन्हा कोतवाली हद्दीत घटना घडली. शहरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




