Saturday, August 1, 2026
HomeनगरRain Update : पाथर्डी, शेवगाव, जामखेड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर

Rain Update : पाथर्डी, शेवगाव, जामखेड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर

75 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले || जनावरे,वाहने गेली वाहून

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नाणी नदी, कोरडगाव, कोळसांगवी, खरमाटवाडी, कारेगाव परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. या ठिकाणी प्रशासन व नागरिकांच्या मदतीने 75 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पिंपळगाव येथे पुराच्या प्रवाहात वाहून जाणार्‍या एका व्यक्तीचा जीव स्थानिकांनी मोठ्या शर्थीने वाचवला. मात्र अनेक जनावरे व वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली.

- Advertisement -

अमावस्यानिमित्त मढी येथे मुक्कामी आलेले सुमारे 500 भाविक पूरपरिस्थितीत अडकले. गावाचा संपर्क सकाळपर्यंत तुटला होता. दुपारी संपर्क सुरू झाल्यानंतर देवस्थान समितीने या भाविकांना जेवणाची सोय केली. पूरस्थिती गंभीर झाल्याने सोमवारी सकाळी मोहटादेवी गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद झाले. घटस्थापनेच्या दिवशी भाविकांनी गडावर न येता घरीच थांबावे, असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले. कारेगावचा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरकडून येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. नंतर पाण्याचा पूर ओसरल्यानंतर दुपारी चार वाजता मुरुम टाकून तात्पुरत्या स्वरूपात हा मार्ग सुरू करण्यात आला. पर्यायी मार्ग म्हणून धायतडकवाडी-डोंगरशिवारातून दीपाली हॉटेलपासून कल्याण-विशाखापट्टणम मार्गाचा वापर नागरिकांनी केला.

राष्ट्रीय महामार्ग (कल्याण-विशाखापट्टणम) : येळी-फुंदे टाकळी दरम्यानचा पूल खचल्याने अनेक ठिकाणी भगदाड पडले होते. वाहतूक धोकादायक झाली; महामार्ग प्राधिकरणाने चेतावणी फलके लावली आहे. राज्य महामार्ग (बारामती-छत्रपती संभाजीनगर, पाथर्डी-बीड, बीड-मोहटा) सर्व पुलांवरून पाणी वाहिल्याने पूर्णपणे बंद झाले होते. सुसरे-सोमठाणा रोडवरील पूल तुटला, कोरडगाव-बोधेगाव पूल वाहून गेला त्यामुळे येथील वाहतूक बंद आहे. मोहरी-मोहटागड दरम्यानचा पूल वाहून केल्याने येथील परिसरातील देवी भक्तांना मोठी अडचण झाली आहे.

गर्भगिरी डोंगर पट्ट्यातील पाण्याने माणिकदौंडी, वृद्धेश्वर, घाटशिरस, मढी, मोहटा, करोडी, चिंचपूर, अकोला, पालवेवाडी, धायतकवाडी, मोहोज देवढे, जांभळी, खर्डे, तिनखडी, भिलवडे, दुले चांदगाव, भालगाव, मोहरी आदी परिसरात धुमाकूळ घातला. विशेषता तालुक्यातील पूर्व भागातील सर्वच गावांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. या पुराच्या पाण्यात पूर्व भागातील एकही गाव वाचले नाही. सर्वांनाच कमी अधिक प्रमाणात याचा फटका बसला आहे.तिनखडी येथील गाढव तलाव फुटल्याने पाणीच पाणी झाले.धायतडकवाडी येथील पाझर तलाव धोकादायक स्थितीत असून खालच्या वस्त्या जलमय होऊन शेतात पाणी गेले.

जोगेवाडी, चिंचपूर पांगुळ, मानेवाडी, वडगाव, पिंपळगाव टप्पा या भागातही चांगला पाऊस झाल्याने जनजीवन करीत होऊन सर्व ठप्प झाले होते. पावसाचा या आणीबाणीत काही कंपन्यांची दूरसांचार सेवा बंद पडली होती. पाथर्डी शहरात मुंडे कॉम्प्लेक्स, सर्वच उपनगरात पाणी साचले गेले. गाडगे आमराई, रंगार गल्ली याठिकाणी पाणी शिरले. अनेक घरांच्या भिंती पडल्या. नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने गाडगे आमराई परिसरातून दोन नागरिकांना पुरातून बाहेर काढले. भगवान दराडे यांच्या जय मातादी कन्स्ट्रक्शनच्यावतीने कारेगावसह अनेक रस्ते मोकळे केले. तसेच प्रशासनाच्या मदतीने कारेगावचा पुलावरील ही रस्ता सुरळीत केला.

शेतीतील उभी पिके, जनावरे, घरे, दुकाने, पूल, बंधारे, रस्ते या सर्वांवर मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले. कोरडगाव सह अनेक ठिकाणच्या नागरिकांनी घरांच्या छतांवर, उंच ठिकाणी आश्रय घेतला. अनेकांनी स्थलांतर केले. नदीकाठच्या वस्त्यांतील नागरिक रात्रभर जागरण करत राहिले. प्रांत अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण दहातोंडे, पोलीस निरीक्षक विलास पुजारी , पाथर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे हे बचाव कार्यासाठी आपल्या बचाओ पथकाच्या मदतीने मदत करीत होते. पोलीस दलाची रात्रीपासूनच मोठी धावपळ झाली. ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी पोलीस पथक दाखल होत होते.

अनेक ठिकाणचे रस्ते बंद पडले होते ते सुरळीत करण्याचे काम पोलीस दलाने विविध शासकीय विभागांच्या प्रतिनिधींच्या मदतीने केले. मोहटा देवीकडे जाण्यासाठी सर्वच रस्त्यावर पाणी असल्याने भाविकांचे मोठे हाल झाले. घटस्थापनेच्या दिवशी विशेषतः पायी येणार्‍या देवी भक्तांचे संख्या लक्षणीय असते अशा भाविकांचेही मोठे हाल झाले.जिल्हा प्रशासनाने अद्यावत असलेल्या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असलेली राज्य आपत्ती बचाव निवारण पथक हे मोहटा देवी गडावर नियुक्त केले आहे हे 6 ऑक्टोबर पर्यंत येथे असणार आहे.

आमदार मोनिका राजळे यांनी शहर व तालुक्यातील नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला तातडीच्या मदतीच्या सूचना दिल्या. केदारेश्वर संस्थेचे संचालक अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले.

कोरडगाव येथील नाणी नदीने रुद्र रूप धारण केले होते. घरे, दुकाने पाण्याखाली गेली. अग्निशमन व बचाव पथकाने मदतकार्य केले.पागोरी पिंपळगाव येथील नागरिकांना दोरी व जेसीबीच्या साह्याने बाहेर काढले गेले. येथील जुना पूल वाहून गेला आहे. कारेगाव येथील तुकाराम दहिफळे यांचे किराणा दुकान पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. चेकेवाडी (माणिकदौंडी घाट) येथे एक व्यक्ती विहिरीत पडल्याचे समजते. बचाव कार्याच्या पथकाने या ठिकाणची पाहणी केली मात्र व्यक्तीचा शोध लागला नाही.

डोंगरपट्ट्यात रविवारी ढगफुटीसदृश्य पाऊस

बोधेगाव |प्रतिनिधी| Bodhegav

शेवगाव तालुक्यातील डोंगरपट्ट्यात रविवारी रात्रभर ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे सर्वत्र नदी-नाल्यांचे पाणी भरून तालुक्यातील ढोरा, नंदिनी, काशीसह छोट्या-मोठ्या नदींना महापूर आल्याने तालुक्यात सर्वत्र वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गावांना फटका बसून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने सतर्क राहून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. शेवगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे रात्रीपासून वीज, पुरवठा खंडित झाल्याने नेटवर्क गायब झाल्याने मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील प्रमुख रस्ते गटारमय होऊन रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे व घरांचे दुसर्‍यांदा प्रचंड नुकसान झाले आहे. उभी पिके भुईसपाट झाली आहेत. तसेच जायकवाडी जलाशय भरल्याने गोदावरी काठावरील मुंगी गावाला सतर्क राहण्याचे प्रशासनाने आदेश दिले असल्याची माहिती आहे.

पाथर्डी, गेवराई, अहिल्यानगर व मराठवाड्याला जोडणारा शेवगाव-गेवराई राज्य मार्गसह अनेक रस्ते पाण्याखाली गेले असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. नदी पात्राबाहेर पाणी आल्याने अनेक पिकांसह नदीकाठच्या वाडी, वस्तीत पाणी शिरले आहे. आखेगाव येथे एक बंधारा फुटल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. भगूर आणि आखेगाव येथील शेत वस्तीमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे पाण्यात अडकली होती, पण ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र तालुक्यात खरिपातील पिके भुईसपाट झाली आहेत. ढोरा नदीला महापूर आल्याने वडुले खुर्द, वाघोली, ढोरजळगाव – शे, ढोरजळगाव – ने, सामनगाव, माळेगांव शे, लोळेगाव, अखतवाडे या नदी काठावरील अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. अनेक गावांमध्ये शेतात पाणी गेल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.

नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नदी काठच्या काही भागात घरांमध्ये पाणी शिरले आहे, तसेच अनेक ठिकाणी शेतकर्‍यांचे कांदा चाळीतील पिक भिजले आहे. महापुरामुळे विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थाना प्रवेश घेण्यासाठी जाणे शक्य नसल्याने विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रिया तारखेत मुदत वाढ करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

तहसिलदारांची धमकी
आखेगाव येथील बाबा पालवे यांनी आम्ही शेत वस्तीत अडकलो असून पूरस्थितीची शेवगावचे तहसीदार आकाश दहाडदे यांना माहिती देऊन पाण्याची पातळी वाढत असल्याची माहिती दिली असता मला पुन्हा कॉल करू नका अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा अजब प्रकार घडला आहे प्रशासनाने जनतेला आधार देण्याऐवजी धमकी दिल्याने नागरिकांतून असंतोष व्यक्त होऊन चीड निर्माण होत आहे

Shevgav : महापुराने शेतकर्‍यांच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा

कोट्यवधींचे नुकसान || नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला शेवगाव तालुक्यात मुसळधार

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला काल रविवारी (दि. 21) रोजी रात्री शेवगाव तालुक्यात सर्वत्र वरुणराजाने मेघगर्जनेसह पुन्हा दमदार हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणी करत हजारो एकरातील उभ्या पिकांवर पाणी फिरवले. कोट्यावधी रुपयांचे नुकसानीसह शेतकर्‍यांच्या स्वप्नांचा चुराडा काही तासांतच झाला आहे. यामुळे पुरग्रस्त भागांमध्ये हाहाकार माजला आहे. मोलमजुरी करण्यांवरही संकट कोसळले आहे.

तालुक्यातील नदी, नाले, ओढ्यांना पुर आले आहेत. नद्यांच्या पात्रांबाहेर कित्येक मीटर अंतरावर पुराचे पाणी घुसले असल्याने काही काळ भीतीदायक स्थिती निर्माण झाली. हे पाणी नदीपात्रात लगतचे पीक, वस्त्या, शाळा, हॉटेल्स, गावांमध्ये घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी धाव घेण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. तालुक्यातील आखेगाव येथे तीन वर्षांपूर्वी आलेल्या पुरापेक्षा भयानक परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. नद्यांना सोमवारी सकाळपासून महापुर आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होती. दिवसभर पुराच्या पाण्याने गावांचा संपर्क तुटला होता. येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने पाथर्डी मार्गे व मिरी मार्गे अहिल्यानगर वाहतूक ठप्प झाली होती. पाथर्डी तालुक्यात डोंगरमाथ्यावर कोसळणार्‍या पावसामुळे नानी व चांदणी नदीला पूर आला.

सतत कोसळणार्‍या पावसामुळे खरीपातील कपाशी, तूर, बाजरी, उडीद, मुग, सोयाबीन, उस ही पिके व फळबागा पुन्हा पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल झाला आहे. काही पीकं सडून जाण्याची भीती आहे. नदीकाठच्या विहिरी, विजेचे खांब, जनावराचा चारा, संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. नद्यांना महापुर व अतिवृष्टीने पुलांचे तसेच बंधार्‍यांचे लोखंडी कठाडे वाहून गेले असून बंधार्‍यांचा भराव वाहून गेल्याने बंधारे मोठ्या प्रमाणात फुटले असून पुलांना ही ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने पुल खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस परतीच्या पावसाने असेच थैमान घातल्यास बळीराजाच्या उरल्या सुरल्या आशेवर पूर्णपणे पाणी फिरणार आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव मंडळामध्ये पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली. मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पाऊस सकाळपर्यंत सुरू राहिल्याने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या 13 सप्टेंबर रोजी मंडळात 102 मि.मी. तर काल 81.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बालमटाकळी, कांबी, लाडजळगाव व बोधेगाव भागातील शेवगाव-गेवराई राज्य मार्ग काही काळ पाण्याखाली गेला व वाहतूक बंद झाली. या पुलांची उंची वाढविण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. दहिगावने, शहरटाकळी परिसरात झालेल्या पावसाने नुकसानीत भर घातली आहे. मागील आठवड्यात पाथर्डी तालुक्यात डोंगरमाथ्यावर ढगफुटीसारख्या पावसामुळे नदी, नाले व ओढ्यांना मोठा पूर आला, ज्यामुळे शेती आणि शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. परतीच्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील नदीकाठच्या गावांबरोबरच इतर गावांनाही मोठा फटका बसला.

नुकसानी संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. तसेच स्वतः नुकसानग्रस्त भागांचा दौरा करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल व कृषी विभागाच्यावतीने पंचनाम्याचे काम प्रत्यक्षात वेगाने सुरूही झाले आहे. मात्र रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे या कामात व्यत्यय आला आहे. पाऊस सोमवारी पहाटेपर्यंत सुरूच राहिला. शासनाने तालुक्यातील शेतातील उभ्या पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी भरीव नुकसानभरपाई दिली तरच दिपावली गोड होणार आहे.

एनडीआरएफ टीम बचावकार्य करत आहे. आखेगाव, खरडगाव, वरूर, भगूर, वडूले, जोहरापूर तसेच ढोरा नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करून नदीकाठी किंवा पुलाजवळ जाण्याचे टाळावे, असे आवाहन तहसीलदार आकाश दहाडदे आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी केले आहे.

Jamkhed : जामखेड तालुक्यात पावसाचे थैमान; साकत, जातेगाव, दिघोळमध्ये ढगफुटी

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे थैमान घातले असून रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. साकत, जातेगाव, दिघोळमध्ये ढगफुटी झाली. दिघोळमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. विधाते वस्ती येथे मंदिराला पाणी लागले आहे. त्याचबरोबर मांजरा नदीला पुर आला आहे. तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. विशेषतः नदीकाठच्या लोकांना मोठा फटका बसला आहे. पिके पाण्यात गेली आहेत, त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

शहरातील नागेश्वर मंदिरात जाण्यासाठी धाकटी नदीवरील असलेला लोखंडी पुल पावसामुळे खचला आहे. उदघाटनाआधीच पुल खचल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी लाइटचे पोल पडलेले आहेत. तसेच दशक्रिया विधीसाठी तयार करण्यात आलेले ओटेही उखडले आहेत. कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अतिक्रमणांमुळे पाणी नदीपात्रा बाहेर येत आहे. खैरी नदी नदीला महापुर आला. बांधखडक येथील पुलपाण्याखाली गेला आहे. नदी काठावरील वंजारवाडी, तरडगाव, सोनेगाव, धनेगाव तालुका जामखेड व चिंचपूर बुद्रुक, पांढरेवाडी, शेळगाव या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

कॉमनवेल्थ गेम्स 2026 : ‘ज्यूदो’त भारताची सुवर्ण झेप; अस्मिता डे आणि...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताच्या ज्यूदोपटूंनी इतिहास रचत देशाच्या पदकसंख्येत आणखी दोन सुवर्णपदकांची भर घातली. महिलांच्या 48 किलो वजनी गटात अस्मिता...