पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील मिरी येथे अज्ञात चोरट्यांनी तीन ट्रकमधून तब्बल 506 लिटर डिझेल चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीत एकूण 45 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत कैलास रघुनाथ म्हस्के (वय 33, धंदा शेती, रा. जेउर हैबती, ता. नेवासा) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, त्यांच्याकडे दोन दहा टायर ट्रक आहेत. हे ट्रक दौंड साखर कारखान्यासाठी ऊस वाहतुकीसाठी वापरात आहेत. फिर्यादीनुसार, दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता मिरी येथील अष्टविनायक पेट्रोलियम परिसरात दोन्ही ट्रक चालकांनी ट्रक पार्क करून घरी गेले होते. मात्र 3 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चालक पिनु मिरपगार याने फोनद्वारे ट्रकमधील डिझेल चोरी झाल्याची माहिती दिली.
म्हस्के यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्यांच्या ट्रक क्रमांक एम एच – 17 – सी व्ही – 4265 मधून 225 लिटर (20 हजार रुपये), ट्रक क्रमांक एम. एच. 17 सी. व्ही. 4412 मधून 201 लिटर (18 हजार रुपये) तसेच त्याच ठिकाणी पार्क केलेल्या कानिफनाथ बन्सी केरकळ (रा. कडगाव, ता. पाथर्डी) यांच्या ट्रक क्रमांक एम. एच. 16 सी. डी. 3093 मधून 80 लिटर (7 हजार रुपये) डिझेल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
अज्ञात चोरट्यांनी 2 जानेवारी सायंकाळ ते 3 जानेवारी सकाळच्या दरम्यान ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले असून एकूण 506 लिटर डिझेल, किंमत 45 हजार रुपये, असा मुद्देमाल चोरून नेण्यात आला आहे. या घटनेमुळे वाहन चालक व व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पाथर्डी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.




