मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या राजकीय आणि गुन्हेगारी जगताला हादरवून सोडणाऱ्या ऐतिहासिक पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या अंतिम निकालाची प्रतीक्षा आणखी चार दिवसांनी वाढली आहे. गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या या हाय-प्रोफाइल खटल्याचा निकाल आज, मंगळवारी (१६ जून) मुंबई सत्र न्यायालयात लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे आणि निकालाच्या सविस्तर वाचनासाठी वेळ लागणार असल्याने न्यायालयाने हा अंतिम निकाल आता २० जून रोजी जाहीर करण्याचे निश्चित केले आहे. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता आगामी शनिवारकडे लागले आहे.
मंगळवारी सकाळी ठीक ११ वाजता मुंबई सत्र न्यायालयात या बहुप्रतीक्षित खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी न्यायालयात कमालीची शांतता आणि उत्सुकता पाहायला मिळत होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर, जयराजे निंबाळकर, त्यांच्या मातोश्री आनंदीदेवी निंबाळकर यांच्यासह पवनराजेंचे दिवंगत चालक समद काझी यांचे कुटुंबीय न्यायालयात उपस्थित होते. दुसरीकडे, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे थेट रुग्णवाहिकेतून न्यायालयाच्या आवारात पोहोचले होते. न्यायाधीशांनी कामकाज सुरू करताच सर्व नऊ आरोपींची हजेरी घेतली. परंतु, अंतिम निकालाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने २० जून ही नवीन तारीख देऊन सर्व पक्षांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.
न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर भावुक झाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “गेली २० वर्षे आणि १३ दिवसांपासून आमचे कुटुंब न्यायासाठी अविरत संघर्ष करत आहे. आम्ही संविधानाच्या आणि कायद्याच्या मार्गाने ही लढाई लढलो आहोत. न्यायालयाने आता २० जून ही तारीख दिली असून, आम्हाला न्याय मिळेल अशी पूर्ण अपेक्षा आहे.”
पुढे बोलताना त्यांनी सूचक भाष्य केले. “सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. आमची आर्थिक आणि सामाजिक क्षमता होती, म्हणून आम्ही उच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊ शकलो. ‘रीट याचिका’ दाखल केल्यामुळेच हा तपास ‘सीबीआय’कडे (CBI) गेला आणि सर्व आरोपी समोर आले. मात्र, आरोपी वारंवार उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जात राहिल्याने या खटल्याला दोन दशके लागली. सामान्य माणूस इतकी वर्षे आणि न्यायालयाचा खर्च पेलू शकेल का? आम्ही सक्षम होतो म्हणून इथपर्यंत पोहोचलो,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
३ जून २००६ रोजी मुंबईहून उस्मानाबादकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली येथे राजकीय वैमनस्यातून दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून पवनराजे निंबाळकर यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला होता. या भीषण हल्ल्यात पवनराजे आणि त्यांचे चालक समद काझी यांचा जागीच मृत्यू झाला होता. या हाय-प्रोफाइल हत्याकांडात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण ९ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. आता २० जून रोजी न्यायालय काय निकाल देते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.




