चांदोरी | वार्ताहर Chandori
सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील खेरवाडी बाजूकडून चांदोरीकडे जाणाऱ्या मार्गावर दि 25 बुधवार रोजी संध्याकाळी 5 ते 6 च्या भीषण अपघात झाला. पिकअप वाहनाने दुचाकीला व त्यानंतर कारला जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा आणि एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. व कार मधील अन्य तिघे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप क्रमांक MH 18 AA 5243 हे वाहन खेरवाडीहून चांदोरीच्या दिशेने येत होते. वाहन चालकाने नियंत्रण गमावून समोर चालणाऱ्या अॅक्टिवा (MH 15 JK 4879) दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील महिला सिंधुबाई अर्जुन गायकवाड- (वय४२)आणि त्यांच्या सोबत असलेला मुलगा कुणाल अर्जुन गायकवाड -(वय१२) गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या अपघातात धडक लागून पुढे असलेल्या स्विफ्ट डिझायर (MH 48 F 8839) कारलाही फटका बसला. कारमधील चालक आशुतोष घोडके व दोन कलकत्ता येथील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच सायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप घुगे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ पंचनामा केला असून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, पिकअप वाहनाचा चालक व त्याच्यासोबत असलेला इसम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
या दुर्दैवी घटनेमुळे खेरवाडी-चांदोरी परिसरात शोककळा पसरली असून रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या मार्गावर वेगमर्यादा आणि वाहतूक नियंत्रणासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.





