बारामती | Baramati
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सखोल चौकशी व्हावी, व्हीएसआर कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी यासाठी शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. बुधवारी रोहित पवार यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात व्हिएसआर कंपनीविरोधात पत्र दिले सोबतच कंपनीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणीही केली आहे. अशातच आज गुरवारी सकाळी रोहित पवार हे बारामतीत दाखल झाले असून ते बारामती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचले आहे.
यावेळी रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे वडील राजेंद्र पवार आणि युगेंद्र पवार हे देखील आहेत. बारामती पोलिस स्टेशनबाहेर बारामतीकरांनी मोठी गर्दी केली आहे. एफआयआर दाखल करून घेण्यात यावी यासाठी बारामतीकर आक्रमक झाले असून मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देण्यात येत आहे. बारामती माझा श्वास आहे, तो कधीच थांबणार नाही , असे म्हणत हातात पोस्टर घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत.
यावेळी ‘एकच वादा अजितदादा’, ‘अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे’, ‘परत या परत या अजितदादा परत या’, अशा घोषणा बारामतीकर देत आहेत. आमच्या दादांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती बारामतीकरांनी केली आहे. हा लढा सामान्य लोकांचा आहे. नेत्यांनीही या लढ्याला पाठिंबा द्यावा, असे रोहित पवार यांनी सांगितले.
ज्या पद्धतीने हे सरकार चालवले जात आहे ते योग्य नाही असे वाटतेय-राजेंद्र पवार
राजेंद्र पवार म्हणाले, ‘जिथे ही घटना घडली, त्यासाठी एफआयआरची मागणी आता सर्व आंदोलक करणार असून, त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ज्या पद्धतीने नागरिकांना न्याय मिळत नाहीये आणि ज्या पद्धतीने हे सरकार चालवले जात आहे ते योग्य नाही असे वाटतेय. न्याय मिळालाच पाहिजे, किमान म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, त्यानंतर कायदेशीर बाबी मांडाव्यात. मी सर्वसामान्य बारामतीकर आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी इथे आलो आहे. जे काही घडले असेल त्याचा सरकारने शोध घेत सत्य नागरिकापुढे आणले पाहिजे, कारण लोकं अजूनही त्या धक्क्यातून बाहेर पडलेली नाहीत’.
पुढे बोलताना राजेंद्र पवार यांनी म्हटले की, आम्ही बारामतीकर म्हणून आमदार रोहित पवार यांच्या पाठीशी आहोत. अधिवेशनात याबाबत चर्चा होत नसेल तर आपण समजून घेतले पाहिजे नक्की काय आहे, असेही त्यांनी म्हटले. काल मुंबईमधील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार पोहोचले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. ज्यानंतर काही वेळ गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले.
पडसाद : नाट्य परिषदेवर अस्वस्थतेचे ढग
तर रोहित पवार यांच्या पाठिंबासाठी जमलेल्या अनेक समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी बोलताना म्हटले की, अनेक शक्ती हा गुन्हा दाखल करू देत नाहीत, म्हणून आम्ही आज बारामतीकर मोठ्या संख्येने हा गुन्हा दाखल करून घ्यावा यासाठी येथे जमलो आहोत. आम्हाला घातपात वाटतोय, कारण त्यांच्याकडून जे सांगण्यात येत आहे, ब्लॅक बॉक्स जळाला वगैरे वगैरे, या गोष्टी संशयास्पद वाटत आहेत, सर्वांनीच जनतेच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि जो अपघाताचा रिपोर्ट आहे, तो दिला पाहिजे. पण आम्हाला हा घातपात असल्याचा जाणवत आहे असेही पुढे काही समर्थकांनी म्हटले आहे.
दरम्यान, याप्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात बुधवारी आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरींनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेण्यास नकार दिला होता. यावरुन पोलिस आणि रोहित पवारांमध्ये वाद झाला होता.




