मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
भरधाव पिकअप वाहनाने समोरून येत असलेल्या दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी व मुलगी असे तिघे जण गंभीररित्या जखमी होवून जागीच गतप्राण झाले. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मालेगाव-कुसूंबा रोडवर टिंगरी येथे वनपट फाट्यालगत हा भीषण अपघात घडला. ओव्हरटेकच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळी होती.
या अपघाताचे पोलीस सुत्रांकडून समजलेले वृत्त असे की, धुळे जिल्ह्यातील चिंचगाव येथील राजेंद्र नाना माने (४५) त्यांची पत्नी बालाबाई माने (३५) व १८ वर्षाची मुलगी भटाबाई राजेंद्र माने हे तिघे जण नांदगाव येथे कार्यक्रमानिमित्त गेले होते. नांदगाव येथून ते दुचाकी क्र. एम.एच.-१८-ए.एल.-२१५० वरून मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील नातेवाईकाकडे भेट घेण्यासाठी जात होते. डोंगराळे येथे मुक्काम करून सकाळी घरी चिंचगाव येथे जाण्याचा तिघांनी निर्णय घेतला होता.
दुचाकीवरून मालेगाव-कुसूंबा महामार्गावरून हे तिघे जात असतांना टिंगरी गावालगत वनपट फाट्यावर भरधाव वेगाने जात असलेल्या पिकअप वाहन क्र. एम.एच.-०२-एच.वाय.-०२०३ ने ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकीसमोरून धडक दिली. पिकअप वेगात असल्याने धडक बसताच दुचाकीवरील माने कुटूंब अक्षरश: हवेत उडून फेकले गेले. यात दाम्पत्य व मुलगी गंभीररित्या जखमी झाले. वाहनांची धडक होताच मोठा आवाज झाल्याने टिंगरी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना उपचारासाठी ग्रामस्थ व पोलिसांनी तातडीने रूग्णवाहिकेतून सामान्य रूग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकारी डॉ. दीपक पाटील यांनी जखमींची तपासणी केली असता ते मृत असल्याचे घोषीत केले.
पती-पत्नीसह मुलगी देखील अपघात मृत्यूमुखी पडल्याने पोलिसांनी या घटनेची माहिती त्यांच्या कुटूंबियांना देताच त्यांनी मालेगावी धाव घेतली. रात्री मालेगावी दाखल झालेल्या शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी सामान्य रूग्णालयास भेट देत मृत माने कुटूंबियांच्या आप्तस्वकिय व नातेवाईकांचे सांत्वन केले व वैद्यकिय अधिकार्यांना मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची सुचना केली.
मालेगाव-कुसूंबारोड हा अपघातप्रवण रस्ता बनला आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गत दोन महिन्यात एका विद्यार्थीनीसह दोघा वृध्द महिलांचा बळी अवजड वाहनाने घेतला आहे. गावालगत गतीरोधक नसल्याने अवजड व इतर वाहने सुसाट वेगाने जात असतात. त्यातच गावालगत देखील वाहनांचा वेग चालक कमी करत नसल्याने त्यांचे नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
पिकअप वाहन देखील वेगाने जात होते. ओव्हरटेकच्या प्रयत्नात पिकअप समोरून येत असलेल्या दुचाकीवर धडकल्याने पती-पत्नीसह कन्या देखील मृत झाली आहे. यामुळे महामार्ग प्राधिकरणाने सातत्याने निरपराधांचे बळी जात असल्याने या महामार्गावर गावालगत किमान गतीरोधक टाकावेत, तसेच अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून बंद करावी, अशी मागणी टिंगरी, करंजगव्हाण, वडगाव, डोंगराळे येथील संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, या अपघातप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत.




