बेंगळुरू । Bangalore
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (Pune Bengaluru Highway) आज (शुक्रवारी) सकाळी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
एक टेम्पो ट्रॅव्हलर (मिनी बस) या महामार्गावरुन जात असताना त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मालट्रकला पाठीमागील बाजूने धडक दिली. हा अपघात इतका भीषण (Accident) होता की ट्रॅव्हलरचा पुढील भागाचा चुरा झाला. या घटनेत एकूण तेरा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एक लहान मुलाचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बसमधील प्रवाशी बेलगावी जिल्ह्यातील सावदट्टी येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. यात्रेनंतर ते घरी परतत होते. घरी परतत असताना ही घटना घडली. मिनी बस अनियंत्रित झाली आणि थेट थांबलेल्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, मिनी बस आणि ट्रक दोघांचे नुकसान झाले. १३ यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले होते त्यामुळे पुढे जाऊन हा अपघात झाला.
पोलिसांनी सांगितले की, मृत शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील होलेहोन्नूरजवळील एमिहट्टी गावातील रहिवासी असल्याचे तपासात समोर आले आहे. १३ लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून एमिहट्टी गावातील लोकांना धक्का बसला असून गावात शोककळा पसरली आहे.