पिंपळगाव बसवंत | वार्ताहर Pimpalgaon Basvant
पिंपळगाव नगरपरिषदेसाठी बुधवार (दि.८) रोजी नगरसेवक व पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अत्यंत पारदर्शक व उत्साहपूर्ण वातावरणात पिंपळगाव बसवंत महाविद्यालय सभागृहात पार पडला. यावेळी निफाड प्रांत अधिकारी तसेच पिंपळगाव नगरपरिषद मुख्याधिकारी प्रमुख उपस्थित होते. यावेळी पिंपळगाव शहरातील सर्वपक्षीय नेते, नगरसेवकपदाचे इच्छुक उमेदवार, नागरिक, महिला व विविध समाजघटक उपस्थित होते.
आरक्षण सोडतीदरम्यान संपूर्ण सभागृहात उत्सुकतेचे वातावरण होते. प्रत्येक विभागाचा क्रमांक जाहीर होताच उपस्थितांमधून जल्लोषाचा प्रतिसाद मिळत होता. काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे आरक्षण न निघाल्याने काही इच्छुक उमेदवारांचा हिरमोड देखील झाल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे काही ठिकाणी पुरुष असायला हवे होते, असे वाटणार्या जागांवर महिला आरक्षण निघाल्याने झेरॉस उमेदवारांचा दबदबा दिसणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या सोडतीनुसार पिंपळगाव नगरपरिषद निवडणुकीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग निश्चित झाला आहे. एकूण २५ नगरसेवक जागांपैकी तब्बल १३ जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत. यात अनुसूचित जमाती (एस.टी) साठी ३ जागा, अनुसूचित जाती (एस.सी) साठी २ जागा, इतर मागासवर्गीय (ओबीसी) साठी ४ जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
विभागनिहाय आरक्षण
विभाग १ : एस.टी पुरुष, ओबीसी महिला,
विभाग २ : एस.टी पुरुष, सर्वसाधारण महिला,
विभाग ३ : ओबीसी, सर्वसाधारण,
विभाग ४ : ओबीसी, सर्वसाधारण,
विभाग ५ : एस.टी पुरुष, ओबीसी महिला,
विभाग ६ : एस.सी महिला, सर्वसाधारण महिला,
विभाग ७ : ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला,
विभाग ८ : एस.टी महिला, ओबीसी महिला,
विभाग ९ : एस.सी पुरुष, सर्वसाधारण,
विभाग १० : एस.टी महिला, ओबीसी, सर्वसाधारण महिला,
विभाग ११ : एस.सी महिला, सर्वसाधारण,
विभाग १२ : एस.टी महिला, सर्वसाधारण पुरुष.





