दिल्ली | Delhi
“७ ऑक्टोबर २००१ रोजी जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती, तेव्हा सार्वजनिक प्रशासनात सेवेची २५ वर्षे पूर्ण होतील असा विचारही केला नव्हता. आज मी जिथे आहे, जे काही आहे ते केवळ १४० कोटी देशवासियांचे प्रेम, आशीर्वाद आणि विश्वासाचे फळ आहे,” अशा अत्यंत भावूक आणि कृतज्ञतापूर्ण शब्दांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजकीय व प्रशासकीय प्रवासाच्या रौप्यमहोत्सव प्रसंगी भावना व्यक्त केल्या.
दिल्लीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या २५ वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळाचा पट मांडला. “पद, प्रतिष्ठा आणि अधिकार जगभरात कुठेही मिळतील; पण भारतासारखी पुण्यभूमी आणि तिच्या लोकांची सेवा करण्याची संधी नशिबानेच मिळते,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
आपल्या भाषणात २५ वर्षांच्या वाटचालीचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, “लोक या २५ वर्षांच्या निरंतर प्रवासाला माझी मोठी उपलब्धी मानत असतील, परंतु माझ्यासाठी हा वैयक्तिक महिमामंडणाचा विषय अजिबात नाही. मी राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी (Ambition) नव्हे, तर एका राष्ट्रसेवेच्या ध्येयापोटी (Mission) जगणारा सामान्य नागरिक आहे. संघटन असो वा सरकार, मला जी काही जबाबदारी मिळाली ती मी एक निष्ठावान सेवक म्हणून निभावत गेलो. कर्म हीच माझी साधना आहे आणि हे काम कधीही थांबता कामा नये.”
आपल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना त्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक राजकारणात चमकण्याची आपली कधीच इच्छा नव्हती. “२५ वर्षांपूर्वी माझे आयुष्य जंगलांत आणि आदिवासी बांधवांच्या सेवेत व्यतीत होत होते. देशाने मला संधी दिली, जनतेने विधानसभा आणि लोकसभेत निवडून पाठवले, ही माझ्यासाठी परमेश्वराची सेवा करण्याचीच संधी ठरली.”
भारताच्या लोकशाही आणि संविधानाप्रती अनन्य आदर व्यक्त करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज सकाळीच मी १४० कोटी देशवासियांच्या समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. मला देशाची अधिक जोमाने सेवा करण्याची ताकद देवो, अशी याचना मी ईश्वराकडे केली आहे. माझ्यासाठी देश आणि देशातील जनता हीच ईश्वर आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, संसाधने मर्यादित असली तरी देशाचे धैर्य आणि स्वप्ने मोठी असावीत हे आपल्याला निवडणुकांनी शिकवले आहे. “भगवान बुद्ध, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची जोपासना करणाऱ्या या महान राष्ट्राची सेवा करताना मला कधीही एकटेपणा जाणवला नाही. गरीब, वंचित आणि गरजूंची सेवा करणे हाच आमचा धर्म आहे,” असा पुनरुच्चार त्यांनी केला.




