Wednesday, July 22, 2026
HomeराजकीयPM Modi : दिल्लीत आंदोलन सुरु असतानाच NEET पेपरफुटीवर PM मोदींचं मोठं...

PM Modi : दिल्लीत आंदोलन सुरु असतानाच NEET पेपरफुटीवर PM मोदींचं मोठं विधान

दिल्ली । Delhi

- Advertisement -

एकीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे पडघम आणि दुसरीकडे राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर धगधगणारे विद्यार्थ्यांचे आंदोलन! ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सध्या देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे तापले आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत कठोर कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर तीव्र शब्दात हल्लाबोल केला आहे.

एनडीएच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. “देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी अजिबात खेळ खपवून घेतला जाणार नाही. पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी ‘फुलप्रूफ’ यंत्रणा उभारली जाईल,” असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

या बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, नीट प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली असून फेरपरीक्षाही सुरळीत पार पडली आहे. “हा विषय एका राज्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशाशी संबंधित आहे. त्यामुळे यावर कुणीही पक्षीय राजकारण करू नये,” असे आवाहन रिजिजू यांनी केले. याशिवाय बैठकीत मुक्त व्यापार करार (FTA) आणि शेतकरी हिताच्या विविध मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

दुसऱ्या बाजूला, गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे निदर्शने सुरू आहेत. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला विरोधी पक्षांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. काल आंदोलकांनी संसदेवर धडक मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याने राजधानीत तणाव निर्माण झाला. संसदेपासून १५० मीटर अंतरावर पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स आंदोलकांनी तोडण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये तीव्र झडप झाली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. या चकमकीत ११८ पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक विद्यार्थी-आंदोलक जखमी झाले आहेत. पोलिसांनी ७८ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

जंतर-मंतरवरील आंदोलनाचा हवाला देत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. “पंतप्रधान मोदी हे देशाच्या इतिहासातील तरुणांच्या सर्वात विरोधी असलेले पंतप्रधान आहेत. १५२ वेळा परीक्षांचे पेपर फुटून साडेसात कोटी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. तरीही अपयशी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला. रास्त हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना लाठीमार आणि अटकेला सामोरे जावे लागत असून दोषी मात्र मोकाट फिरत आहेत, असा दावाही त्यांनी केला. एकंदरीत, नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देश ढवळून निघाला असून, एका बाजूला सरकार कडक पावले उचलण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे विरोधक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरून आरपारच्या लढाईच्या भूमिकेत दिसत आहेत.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळिंबाला सर्वाधिक 205 रुपये किलो चा भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 9816...