दिल्ली । Delhi
देश आज 79वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून जनतेला थेट संबोधित केले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात, ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून त्यांनी एकापाठोपाठ एक मोठ्या घोषणा केल्या, ज्या अर्थव्यवस्था, रोजगार, तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा अशा सर्वच क्षेत्रांना स्पर्शून गेल्या. भाषणात त्यांनी पाकिस्तान व अमेरिकेला थेट इशारा दिला आणि देशाच्या स्वावलंबनाचा नवा रोडमॅप सादर केला.
दिवाळीत मिळणार मोठी भेट
मोदींनी सुरुवातीलाच जनतेसाठी एक सरप्राईज दिले. त्यांनी सांगितले की, सलग 8 वर्षे जीएसटी कमी करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर, “पुढच्या पिढीचा जीएसटी” या दिवाळीत लागू केला जाणार आहे. यामुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू स्वस्त होणार असून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. हे पाऊल केवळ ग्राहकांसाठीच नाही तर लघु उद्योगांसाठीही मोठा दिलासा ठरेल, असा त्यांचा विश्वास आहे.
तरुणांसाठी 1 लाख कोटींचा रोजगार पॅकेज
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच मोदींनी देशातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधींची हमी दिली. पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजना अंतर्गत 1 लाख कोटी रुपयांचा पॅकेज जाहीर करण्यात आला. खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळालेल्या तरुणांना 15,000 रुपयांची मदत दिली जाईल, तर जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल. यामुळे तब्बल 3.5 कोटी तरुणांना फायदा होईल, असा अंदाज आहे.
भारत होणार जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
मोदींनी सुधारणा राबविण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली. 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या महागाई नियंत्रणात असून, परकीय चलन साठा मजबूत आहे आणि आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी भारतावर विश्वास दाखवत आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले.
वर्षाअखेरीस ‘मेड इन इंडिया’ चिप्स
तंत्रज्ञान क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय जाहीर करताना मोदींनी सांगितले की देशात 6 सेमीकंडक्टर युनिट्स उभारण्यात येत आहेत आणि यावर्षाअखेरीस ‘मेड इन इंडिया’ चिप्स बाजारात येतील. दशकांपूर्वी दुर्लक्षित झालेल्या या क्षेत्रात भारत आता मजबुतीने उभा राहील, असा त्यांचा दावा आहे.
स्वावलंबन आणि स्वदेशीचा जोरदार आग्रह
मोदींनी स्वावलंबनाला स्वाभिमानाचा सर्वात मोठा निकष ठरवत, स्वदेशी वस्तूंचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी “येथे स्वदेशी वस्तू मिळतात” असे फलक लावावेत आणि ग्राहकांनी देशी वस्तूंना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सुचवले.
राष्ट्रीय सुरक्षेवर कठोर भूमिका
‘ऑपरेशन सिंदूर’च्या शूर जवानांना सलाम करताना मोदींनी अण्वस्त्रांच्या धमक्यांना भारत आता भीक घालत नाही, असा ठाम संदेश दिला. तसेच सिंधू पाणीवाटप करार हा अन्यायकारक असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
शेतकरी, मच्छीमार आणि मागासवर्गीयांसाठी उपक्रम
शेतकरी व मच्छीमारांच्या हिताशी तडजोड न करण्याची ग्वाही देत मोदींनी “वोकल फॉर लोकल” हा नवा मंत्र दिला. मागासवर्गीयांच्या प्रगतीसाठी ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सलाम
भाषणाच्या शेवटी मोदींनी देश उभारणीत सतत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले आणि त्याला “जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था” म्हणत सलाम केला.




