नवी दिल्ली | प्रतिनिधी | New Delhi
राज्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) घेतलेल्या पुढाकाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या समाजमाध्यमावरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) म्हणाले, “महाराष्ट्र सरकारने दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे मी अभिनंदन करतो. हे प्रयत्न लोकांच्या जीवनात सुलभता आणतील आणि अधिक प्रगती साध्य करतील. गडचिरोली व आसपासच्या परिसरातील माझ्या सर्व बंधू-भगिनींना विशेष शुभेच्छा”, असे त्यांनी म्हटले.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या या प्रशंसेला उत्तर देताना म्हटले, “गडचिरोलीच्या जनतेचे कौतुक आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार. तुमचे अखंड समर्थन आणि दूरदर्शी मार्गदर्शन आम्हाला प्रेरणा देते. ‘ईझ ऑफ लिव्हिंग’ साठीचा तुमचा दृष्टीकोन लोकांचे जीवन बदलत आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी नवी क्षितिजे उघडत आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासी भागांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांना पंतप्रधानांच्या प्रोत्साहनपर शब्दांनी नवी ऊर्जा मिळाली आहे.
दरम्यान, आव्हानांना संधींमध्ये रूपांतर करण्याचा महाराष्ट्र सरकारचा दृढ संकल्प अधिक बळकट झाला आहे, असेही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार (Thank You) मानत सांगितले.