नवी दिल्ली | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (रविवार दि.०८) रोजी या वर्षीची दिवाळी छत्तीसगडमधील बस्तर (Bastar) येथील सुरक्षा दलांच्या जवानांसोबत साजरी केली. या प्रसंगी जवानांशी संवाद साधताना त्यांनी देशातील नक्षलवाद आणि माओवादी दहशतवादाविरोधात मिळालेल्या ऐतिहासिक यशाचे श्रेय केंद्र सरकारची धोरणे आणि सुरक्षा दलांच्या अढळ दृढनिश्चयाला दिले. तसेच नक्षलवादाची दहशत आता पूर्णपणे संपुष्टात आली असून देशात विकासाच्या एका नवीन युगाची सुरुवात झाली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी २०१४ नंतर देशातील अंतर्गत सुरक्षेच्या चित्रात मोठा बदल झाला असल्याचे सांगत पंतप्रधान (PM) म्हणाले, “देशाने नक्षलवादाविरुद्धची अनेक दशकांची लढाई जिंकल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी (Diwali) आहे. आज देशातील प्रत्येक जिल्हा नक्षलवादाच्या सावटातून पूर्णपणे मुक्त झाला असून, करोडो नागरिक कोणत्याही भीतीविना हा सण साजरा करत आहेत”, असे त्यांनी म्हटले.
वर्षभरात एकही सीआरपीएफ जवान शहीद झालेला नाही
गेल्या ४७ वर्षांत प्रथमच एक अभूतपूर्व गोष्ट घडली असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की,”गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावताना ‘सीआरपीएफ’चा (CRPF) एकही जवान शहीद झालेला नाही. पूर्वी नक्षलवाद्यांच्या तुलनेत आपले अधिक सैनिक शहीद होत असत; मात्र सरकारच्या योग्य रणनीतीमुळे आणि जवानांच्या शौर्यामुळे हे चित्र बदलले आहे. हे यश म्हणजे सुरक्षा दलांचे धैर्य, संयम आणि सरकारच्या धोरणांचा विजय आहे, असे मोदींनी म्हटले.
२०१४ नंतर बळकट झाली राजकीय इच्छाशक्ती
काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की,”पूर्वीच्या सरकारांकडे सुरक्षेच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक ती राजकीय इच्छा शक्ती नव्हती आणि त्यांनी जवानांच्या सुरक्षेकडे पुरेसे लक्ष दिले नाही. २०१४ मध्ये सत्तापालट झाल्यानंतर देशाने शत्रूंना रोखण्यासाठी सुव्यवस्थित रणनीती आखली”, असेही त्यांनी सांगितले.
सीमांचे रक्षण करण्यासाठी जवानांचे योगदान मोलाचे
संपूर्ण देश आज प्रकाशाचा सण साजरा करत असून लोक आपापल्या घरी परतत आहेत. अशा वेळी देशवासीयांचे रक्षण करणाऱ्या १४० कोटी भारतीयांच्या वतीने तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि तुमच्यासोबत आनंद वाटून घेण्यासाठी मी बस्तरच्या जंगलात आलो आहे,” अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या. सीमांचे रक्षण करणारे सैनिक आणि अंतर्गत सुरक्षा सांभाळणारे जवान या दोघांचेही योगदान देशाची एकता व अखंडता टिकवण्यासाठी तितकेच मोलाचे असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले.
मानसिक नक्षलवाद्यां’चा पराभव करण्याचे आवाहन
सशस्त्र नक्षलवाद्यांनी जंगले सोडली असली, तरी ‘मानसिक नक्षलवादी’ संस्थांवर ताबा मिळवून नव्या पिढीच्या मनात शिरकाव करत आहेत आणि मुलांची दिशाभूल करत आहेत. या विचारशून्य संघटनांना ओळखून त्यांचा पराभव करणे आता आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.
२०२६ ची दिवाळी ऐतिहासिक आणि विशेष
पंतप्रधान मोदी यांनी २०२६ ची ही दिवाळी अत्यंत विशेष असल्याचे प्रतिपादन केले. भारताने नक्षलवादाविरुद्धची अनेक दशकांची लढाई पूर्णपणे जिंकली असून, देशातील प्रत्येक जिल्हा आता नक्षलवादमुक्त झाला आहे. एकेकाळी देशातील २० राज्यांमधील २३० हून अधिक जिल्हे नक्षलवादाने प्रभावित होते, परंतु आता कोट्यवधी नागरिक भीतीशिवाय हा सण साजरा करत आहेत.
५० कोटी लोक गरिबीतून बाहेर; विकासकामांचा वेग वाढला
गेल्या १२ वर्षांत राबवलेल्या ठोस धोरणांमुळे देशातील ५० कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत, असा उल्लेख जागतिक बँकेच्या अहवालाचा हवाला देत पंतप्रधानांनी केला. एकेकाळी नक्षलवादाने ग्रस्त असणाऱ्या भागांमध्ये आता जनजीवन पूर्वपदावर येत असून तेथे विकासाचा वसंत ऋतू फुलला आहे. सीमेवर आणि देशांतर्गत राष्ट्राचे रक्षण करणारे शूर जवान हे माझे कुटुंब आहेत. १४० कोटी देशवासीयांच्या वतीने जवानांच्या त्यागाबद्दल आणि सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच मी बस्तरला आलो आहे,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी जवानांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.




