नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या १० वर्षातील सर्वात मोठ्या विदेश दौऱ्यावर असून गुरवारी त्यांना घानाच्या सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ ने सन्मानित करण्यात आले आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये चार वेगवेगळ्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रशासकीय नेतृत्व आणि जागतिक स्तरावर नावाजलेले नेतृत्व याप्रीत्यर्थ हा सन्मान करण्यात आल्याचे घाना सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारत आणि घाना मिळून मानवतेचा शत्रू असलेल्या दहशतवादाविरोधात एकत्र काम करतील, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.
The Officer of The Order of the Star of Ghana या पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भात सविस्तर पोस्ट केली आहे. या पोस्टबरोबर त्यांनी हा सन्मान त्यांना बहाल केला जात असतानाचे फोटोही शेअर केले आहेत. आपल्या पोस्टमध्ये मोदींनी घाना सरकार व जनतेचे आभार मानले आहेत.
काय म्हंटले आहे मोदींनी?
सर्वोच्च सन्मानाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “घानाकडून सन्मानित होणे ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. भारत आणि घाना दहशतवादाला मानवतेचा शत्रू मानतात आणि त्याविरोधात एकत्रितपणे लढा देतील. ही युद्धाची वेळ नसून, चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून समस्या सोडवल्या पाहिजेत. तत्पूर्वी, त्यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांच्यासोबत संयुक्त निवेदन जारी केले. दोन्ही देश संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) सुधारणा करण्यावर एकमत आहेत. त्याचबरोबर, पश्चिम आशिया आणि युरोपमधील सुरू असलेल्या संघर्षांवर दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली.
हा पुरस्करा ही एक जबाबदारीदेखील आहे. दोन्ही देशांमधील घट्ट मैत्री अधिकाधिक वृद्धिंगत करण्याची ही जबाबदारी आहे. भारत नेहमीच घानासोबत उभा राहील आणि एक मित्र आणि विकासातील भागीदार म्हणून नेहमीच घानाला मदत करत राहील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घानाच्या सरकारला आश्वासन दिले आहे.
२५ हजार कोटी रुपयांचे करार
“भारत आणि घाना यांच्यातील व्यापार २५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला असून, पुढील ५ वर्षांत तो दुप्पट करण्याचे आमचे लक्ष्य आहे.” असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. तसेच घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांना भारत भेटीचे निमंत्रणही दिले.
काय आहे हा पुरस्कार?
हा पुरस्कार घाना सरकारकडून दिला जाणारा दुसरा महत्त्वाचा राष्ट्रीय पुरस्कार आहे. ज्या व्यक्तींनी देशासाठी कोणत्याही स्वरूपात एखादी अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली असेल, अशा नागरिकाला हा पुरस्कार प्रदान केला जातो. घानाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यामध्ये अशा पुरस्कारार्थींचा आदर-सत्कार केला जातो. वास्तविक २३ जून २००८ पर्यंत हा घानाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार होता. मात्र, या दिवशी ‘ग्रँड ऑर्डर ऑफ द स्टार अँड इगल्स ऑफ घाना’ हा सर्वोच्च पुरस्कार देण्यास घाना सरकारने सुरुवात केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




