Thursday, June 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकेंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते 'नाफेड'च्या ई-लिलाव पोर्टलचे...

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘नाफेड’च्या ई-लिलाव पोर्टलचे उद्घाटन

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे नॅशनल अ‍ॅग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (नाफेड)च्या ‘NAFEX.in’ या ई-लिलाव पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘DRISHTI’, ‘ERP’ आणि ‘नाफेड कल्याण’ या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचाही शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना मंत्री अमित शाह म्हणाले की, 2014 मध्ये आर्थिक संकटात असलेली नाफेड आज 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल आणि 500 कोटी रुपयांच्या नफ्यासह देशातील 74 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची सेवा करणारी सक्षम संस्था बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आर्थिक मदत आणि पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून नाफेडला पुन्हा भक्कम स्थितीत आणल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मंत्री शाह यांनी सांगितले की, उत्पादन आणि खरेदी या दोन्ही क्षेत्रांत नाफेडने लक्षणीय प्रगती केली आहे. देशाला डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर करण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफने अधिक वेगाने काम करण्याची गरज असून शेतकऱ्यांकडून उत्पादित डाळींचा प्रत्येक दाणा खरेदी केला गेला पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य आणि हमीभाव मिळेल तसेच डाळींच्या लागवडीखालील क्षेत्रातही वाढ होईल, असे त्यांनी नमूद केले.

गेल्या तीन वर्षांत डाळी, मका आणि इतर कृषी उत्पादनांच्या थेट खरेदीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. पुढील दोन वर्षांत सर्व शेतकऱ्यांना आपला शेतीमाल थेट नाफेड आणि एनसीसीएफला विकता येईल आणि त्याचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतील, असे आश्वासनही शाह यांनी दिले.

नाफेडने गेल्या काही वर्षांत सेंद्रिय शेती, बियाणे उत्पादन, किरकोळ व्यापार, जैव-खत निर्मिती, अन्नसुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अशा विविध क्षेत्रांतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सहकार मंत्रालयाच्या स्थापनेच्या वेळी नाफेडची उलाढाल 20 हजार कोटी रुपये होती, ती आता वाढून 30 हजार कोटी रुपयांवर पोहोचली असून पुढील दोन वर्षांत ती 50 हजार कोटी रुपयांहून अधिक होईल, असा विश्वास मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी नाफेडचा निव्वळ नफा 139 कोटी रुपयांवरून 405 कोटी रुपयांपर्यंत, तर निव्वळ मत्ता 358 कोटी रुपयांवरून 2,050 कोटी रुपयांपर्यंत वाढल्याची माहिती दिली. नाफेड आज आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर संस्था म्हणून उदयाला आली असून शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करून मध्यस्थांचे जाळे संपुष्टात आणण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी कुटुंबांतील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि करिअर विकासासाठी नाफेड आपल्या नफ्याच्या एक टक्का रक्कम शिष्यवृत्तीसाठी राखून ठेवणार असल्याची घोषणाही शाह यांनी यावेळी केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त आदरांजली वाहिली.

ताज्या बातम्या

दुर्दैवी : लसीकरणानंतर काही अंतरावर १६ वर्षीय मुलगी कोसळली; उपचारापूर्वीच मृत्यू

0
नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik खुटवडनगर परिसरात महापालिकेच्या लसीकरण शिबिरात लस घेतल्यानंतर काही वेळातच १६ वर्षीय मुलगी अचानक चक्कर येऊन कोसळून मृत्यू झाल्याची घटना...