नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले आहे. एनडीएला २९२ जागा तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहे. एनडीएने आता सत्तास्थापनेसाठी दावा करण्यासाठी सगळ्या सहकारी पक्षांना दिल्लीत बोलावले आहे. संध्याकाळी ४ वाजता एनडीएतील घटक पक्षांची बैठक होणार आहे. त्या अनुशंगाने दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींंनी राजीनामा दिला आहे. लोकसभा भंग करण्याची शिफारस मोदींच्या मंत्रीमंडळाने केली आहे.
पंतप्रधान मोदी आजच सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार असून ते आज सायंकाळी एनडीए आघाडीच्या बैठकीनंतर पाठिंब्याचे पत्र घेऊन पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींची भेट घेणार होते. मात्र दुपारीच राष्ट्रपतीची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रपती भवनात दाखल होत असताना त्यांच्यासोबत दुसरा नेता नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तारीखही समोर आली आहे. मोदी पंतप्रधान पदाची शपथ याच आठवड्यात घेऊ शकतात अशी माहिती मिळत आहे. याआधी मोदी ९ जूनला शपथ घेणार अशी चर्चा होती.
तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार
नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा निवडणुक जिंकून देशाचे पंतप्रधान बनणारे दुसरे नेते होतील. या आधी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर होता. दरम्यान, आज एनडीएतील घटक पक्षांची बैठक होणार आहे. यात जेडीयू प्रमुख नितीश कुमार, टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि इतर नेते सहभागी होणार आहेत. एनडीएच्या मित्रपक्षांशी चर्चेनंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. एनडीएला सत्ता स्थापन करण्यात नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. इंडिया आघाडीनेही नेत्यांची बैठक बोलावली आहे.