पिंपरी निर्मळ (वार्ताहर)
पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या एका होतकरू तरुणाचा काळाने घाला घातला आहे. पुणे येथे पोलीस भरती प्रक्रियेसाठी दुचाकीवर जात असताना नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात साईकीरण भागवत शेलार (वय २५) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राहाता तालुक्यासह पिंपरी निर्मळ गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी निर्मळ येथील साईकीरण शेलार हा आपल्या मित्रासह शुक्रवारी दुचाकीवरून पुणे येथे पोलीस भरतीसाठी निघाला होता. प्रवासादरम्यान नारायणगाव हायवेवरील ‘चौदा नंबर’ परिसरात त्यांच्या दुचाकीला एका भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये साईकीरणला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
साईकीरण हा अत्यंत मनमिळावू आणि कष्टाळू तरुण म्हणून गावात परिचयाचा होता. त्याचे वडील भागवत शेलार हे पिंपरी निर्मळ सेवा संस्थेत लिपिक म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबाचा मोठा आधार असलेल्या साईकीरणच्या निधनाने शेलार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस भरतीसाठी त्याने मोठी तयारी केली होती, मात्र भरती केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी पिंपरी निर्मळ येथे शोकाकुल वातावरणात साईकीरणवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आणि चुलते असा परिवार आहे. एक तरुण आणि जिद्दी युवक अशा प्रकारे अपघातात दगावल्याने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, हायवेवरील अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.





