Thursday, July 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNasik News : सिझेरियन प्रसूतीदरम्यान पोटात ‘मॉप’ राहिला; जिल्हा ग्राहक तक्रार निवारण...

Nasik News : सिझेरियन प्रसूतीदरम्यान पोटात ‘मॉप’ राहिला; जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून १२.६८ लाखांची भरपाई देण्याचे आदेश

नाशिक : प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

येवला येथील एका खासगी रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीदरम्यान महिलेच्या पोटात शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारा ‘अॅब्डॉमिनल मॉप’ राहिल्याने तिला गंभीर शारीरिक त्रास सहन करावा लागला. या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा सिद्ध झाल्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नाशिक यांनी संबंधित रुग्णालय आणि डॉक्टरांना एकूण १२ लाख ६८ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

प्राजक्ता गणेश दोंड (रा. निमगाव, ता. सिन्नर) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्या मार्च २०२२ मध्ये बाळंतपणासाठी येवला येथे माहेरी आल्या होत्या. ६ मार्च २०२२ रोजी त्यांची सिझेरियन प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतरही पोटात वेदना, उलट्या, ताप आणि त्रास होत असल्याची वारंवार तक्रार करूनही डॉक्टरांनी तो ‘वायूगोळा’ असल्याचे सांगत दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

त्रास असह्य झाल्यानंतर २२ मार्च २०२२ रोजी दुसऱ्या रुग्णालयात सोनोग्राफी व सीटी स्कॅन केल्यानंतर पोटात परकीय वस्तू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नाशिक येथील सुयश हॉस्पिटलमध्ये तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत महिलेच्या पोटातून सुमारे दोन ते तीन लिटर पू आणि सिझेरियनवेळी राहिलेला ‘मॉप’ बाहेर काढण्यात आला.

सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेले सीटी स्कॅन अहवाल, शस्त्रक्रियेच्या नोंदी आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांची साक्ष यावरून पोटात मॉप राहिल्याचे स्पष्ट झाल्याचे आयोगाने नमूद केले. तसेच रुग्णाने वारंवार वेदनांची तक्रार करूनही आवश्यक तपासण्या न करता तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित डॉक्टर व रुग्णालयाचा वैद्यकीय निष्काळजीपणा वादातीतपणे सिद्ध झाल्याचा निष्कर्ष आयोगाने नोंदविला.

आयोगाच्या अध्यक्ष शिल्पा डोल्हारकर तसेच सदस्य कविता चव्हाण आणि प्रेरणा लोणकर यांनी दिलेल्या आदेशानुसार, तक्रारदाराला सिझेरियन आणि त्यानंतरच्या शस्त्रक्रियेचा खर्च म्हणून २ लाख ६८ हजार रुपये तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश संबंधित रुग्णालय आणि डॉक्टरांना देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे वैद्यकीय सेवांमधील निष्काळजीपणाविरोधात ग्राहकांना न्याय मिळू शकतो, असा महत्त्वपूर्ण संदेश या निकालातून गेला आहे.

ताज्या बातम्या

आरोग्य विभागात पाच हजार पदांची भरती – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी पाच हजार नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येईल....