अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील पोलीस विभागाच्या 12 एकर जागेच्या काही गुंठ्यामध्ये बांधकाम व्यावसायिकाने (बिल्डर) ‘ताबेमारी’ करत तेथे ‘आरंभ’ नावाची 60 फ्लॅटची एक इमारत (सदनिका) उभी केली आहे. त्या लगतच चार बंगले (रो- हौसिंग) बांधले आहेत. 60 फ्लॅट व चार बंगले यांची विक्री केली असून ते विकत घेणारे लोक (सदनिकाधारक) तेथे राहत आहे. आता पोलिसांनी ते अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्या सदनिकाधारकांना पोलिसांनी नोटिसाही बजावल्या आहेत. 30 दिवसांत जागा खाली करण्याचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. दरम्यान, ‘अल्टिमेटम’ मिळताच सदनिकाधारकांत खळबळ उडाली आहे. त्यांनी बिल्डर विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आमची फसवणूक झाली असून बिल्डरने आम्हाला आमचे पैसे परत करावे, अशी मागणी केली आहे.
तपोवन रस्त्यावरील गट क्रमांक 50/2 व 55/7 मधील 12 एकर जागा पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या नावाने आहे. त्यातील गट क्रमांक 55/7 मधील काही भागात अतिक्रमण झाले असल्याचे भूमी अभिलेखने केलेल्या मोजणीतून समोर आले आहे. दरम्यान, हे अतिक्रमण पोलिसांच्या गट क्रमांक 55/7 लगत असलेल्या गट क्रमांक 56 मध्ये इमारत उभी करत असताना झाले आहे. ‘ए टू झेड’ कन्ट्रक्शनचे झोएब खान व अभिजित देवी यांनी ‘आरंभ’ नावाने ही इमारत उभी केली. त्यांनी यामध्ये 10 ‘टू- बीएचके’ व 50 ‘वन-बीएचके’ फ्लॅट काढले. त्या सर्व फ्लॅटची सर्वसामान्य लोकांना विक्री केली. त्या लगतच गुरूदत्त बंग्लोज नावाने चार रो- बंगलो उभे केले गेले. ते बांधकाम नंदकुमार कासार व राजेंद्र बेरड या बिल्डरने करून त्याची विक्री केली आहे. मात्र पोलिसांनी त्यांच्या जागेची मोजणी केली असता आरंभ इमारत व गुरूदत्त बंग्लोजचे बांधकाम पोलिसांच्या जागेत झाले असल्याचे समोर आले.
तोफखाना पोलिस व भूमी अभिलेखच्या अधिकारी, कर्मचार्यांनी 2 जानेवारी व 5 जानेवारी 2025 रोजी मोजणी करून मार्किंग केली. त्यावेळी सदनिकाधारकांना काही तोंडी सुचना केल्या होत्या. त्यामध्ये आरंभ इमारत अतिक्रमीत आहे, पोलिसांच्या गट क्रमांक 50 मधील जागेचा पूर्वीचा 12 मीटर रूंदीचा रस्ता हा ‘आरंभ’ इमारतीच्या मध्यातून जात आहे. हा सर्व प्रकार पोलिसांनी काही सदनिकाधारकांच्या लक्ष्यात आणून दिल्यानंतर सदनिकाधाराकांनी लेखी निवेदन देऊन बिल्डर खान व देवी यांना सदरचा प्रकार लक्ष्यात आणून दिला होता. त्यावेळी सदनिकाधारकांनी बिल्डरकडे सदर जागेच्या संदर्भात मूळ कागदपत्रांचा पूर्वीपासूनचा दस्ताऐवज द्यावा, आरंभ इमारत सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून उभी राहिलेली आहे त्यामुळे त्याची सर्व कागदपत्रे सदनिकाधारकांना द्यावीत, भविष्यात अतिक्रमणाबाबत काही प्रश्न उद्भवल्यास याची सर्व जबाबदारी ‘ए टू झेड’ कन्ट्रक्शन व त्यांचे झोएब खान व अभिजित देवी यांची राहिल. इमारत पाडण्यासाठी कोणताही प्रशासकीय अधिकारी आल्यास त्याची सर्व जबाबादारीही त्यांची राहिले असे लेखी पत्राव्दारे कळविले होते.
दरम्यान, आता पोलिस दलाने ‘आरंभ’ इमारत व त्या लगतचे चार बंगले पोलिसांच्या जागेत बांधण्यात आली असल्याचे सांगून ती इमारत व बंगले 30 दिवसांत काढून घेण्याचे आदेश नोटीसव्दारे सदनिकाधारकांना दिले आहे. नोटीस हाती पडताच त्यांच्यात खळबळ उडाली आहे. सदनिकाधारकांना सदर इमारतीचा ताबा डिसेंबर 2023 रोजी देण्यात आला होता. फ्लॅट, बंगल्याची खरेदी होऊन व तेथे राहण्यास जाऊन वर्ष होत नाही तोच इमारत पाडली जाणार, आपले फ्लॅट जमीनदोस्त होणार या भितीने सदनिकाधारकांची झोप उडाली आहे. त्यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. बिल्डरने आमचे पैसे देऊन टाकावे अशी मागणी त्यांनी केली आहे. काही सदनिकाधारकांनी कायदेशीर प्रक्रियेची तयारी केली आहे.
बिल्डरने दिशाभूल थांबवावी
बिल्डरने या जागेत मोठं मोठे बंगले बांधून किंवा थ्री-बीएचके फ्लॅट उभे करून ते श्रीमंत लोकांना विक्री केले असते. परंतू येथे वन बीएचके फ्लॅट निर्माण करून ते सर्वसामान्य लोकांना विक्री करून फसवणूक केली गेली. आता आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. बिल्डरने आमची यातून सुटका करावी, त्याने आमची दिशाभूल करू नये, प्रशासकीय बाबी लक्ष्यात घेऊन आम्हाला आमच्या फ्लॅटचे पैसे द्यावे व त्याने त्याची इमारत ताब्यात घ्यावी, अशी मागणी फ्लॅट धारकांनी केली आहे. दरम्यान, ‘ए टू झेड’ कन्ट्रक्शनने एक पत्र काढून पोलिसांकडून आरंभ इमारतीच्या अतिक्रमणाबाबत कार्यवाही केली जात आहे ती चुकीची आहे, असा दावा केला आहे. यामुळे बिल्डरकडून दिशाभूल करण्याचा तर प्रयत्न होत नाही ना? असा प्रश्न काही फ्लॅट धारकांनी उपस्थित केला आहे.
बिल्डरने फसवणूक केली
पै-पै करून पैसे जमा केले, घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘आरंभ’ इमारती मध्ये फ्लॅट घेतला. पैसे कमी पडले म्हणून बँकेकडून कर्ज घेतले. अजून वर्ष देखील पूर्ण होत नाही तोच ‘आरंभ’ इमारत अतिक्रमीत जागेत बांधली आहे, ती पुढील 30 दिवसांत पाडली जाणार असल्याने झोप उडाली आहे. आमची फसवणूक झाली. आम्हाला बिल्डरने अंधारात ठेवले, अशी संतप्त प्रतिक्रिया ‘आरंभ’ इमारती मधील फ्लॅट धारकांनी व्यक्त केली. आमच्यावर बँकेचे कर्ज आहे, बँकेचे हप्ते कसे फेडणार, हक्काचा फ्लॅट गेल्यावर कुठे राहणार, आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची भावना फ्लॅट धारकांनी व्यक्त केली आहे. बिल्डरने आमची फसवणूक केली आहे. त्यांनी आम्हाला फ्लॅटचे पैसे परत द्यावेत, अशी भावना सर्व फ्लॅट धारकांनी व्यक्त केली आहे.